पंजाबी विद्यापीठ : पंजाब राज्यात पतियाळा येथे १९६२ साली स्थापन झालेले विद्यापीठ. पंजाबी भाषा व साहित्याचे संशोधन करणे, हे या विद्यापीठाचे एक प्रमुख कार्य आहे. त्याचे स्वरूप निवासी, अध्यापनात्मक व संलग्नक असून त्याच्या कक्षेत भतिंडा, फरीदकोट (शहर), पतियाळा, रूपार व संग्रूर या महसूली जिल्ह्यांतील महाविद्यालये येतात (१९७३-७४). विद्यापीठाचे एकूण ३० अध्यापन विभाग आहेत व ४४ महाविद्यालये त्यास संलग्न आहेत (१९७३-७४). विद्यापीठाचे संविधान इतर विद्यापीठांप्रमाणे असून कुलगुरू व कुलसचिव हे सवेतन काम करणारे सर्वोच्च प्रशासकीय अधिकारी आहेत.
विद्यापीठात शिक्षणाचे माध्यम बी.ए. पर्यंत इंग्रजी किंवा पंजाबी आहे. मात्र पदव्युत्तर परीक्षा तसेच विज्ञान व वाणिज्य या विषयांकरिता इंग्रजी माध्यम आहे. विद्यापीठातील सेवकवर्ग, शिक्षक, सैनिक वगैरेंना तसेच अपंगांना विवक्षित अटींवर बहिःस्थ विद्यार्थी म्हणून मानव्यविद्यांतर्गत विषयांत परीक्षेला बसता येते.
विद्यापीठाने अभियांत्रिकी आणि व्यवसाय व्यवस्थापन इ. विषयांकरिता द्विसत्र परीक्षापद्धत सुरू केली आहे. त्याचप्रमाणे काही विषयांच्या काही परीक्षांकरिता पत्रद्वारा शिक्षण देण्याचीही व्यवस्था केली आहे (उदा., पंजाबी प्रवेशिका, पंजाबी ज्ञानी). काही महाविद्यालयांना काही विषयांकरिता सायंकालीन वर्गांंची परवानगी देण्यात आली आहे.
विद्यापीठाने अरबी, फार्सी, संस्कृत, तिबेटी, जर्मन, रशियन व चिनी या भाषांकरिता एक वर्षाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम ठेवला आहे. अरबी, फार्सी, संस्कृत व तिबेटी या भाषांकरिता मॅट्रिक उत्तीर्ण असणे जर्मन व रशियन यांकरिता उच्च माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण होणे आणि चिनी भाषेकरिता कोणत्याही विद्याशाखेतली पदवी असणे जरुरीचे आहे. विद्यापीठ पंजाबीकरिता ज्ञानी, हिंदीकरिता प्रभाकर, फार्सी व उर्दू भाषेकरिता अबिद फाजिल या परीक्षा घेते. या परीक्षेस बसण्याकरिता मॅट्रिक किंवा उच्च माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण होणे जरुरीचे आहे.
विद्यापीठाचे ग्रंथालय सुसज्ज असून त्यात १९७३-७४ मध्ये १,४०,००० ग्रंथ होते आणि सु. ८०० नियतकालिके येत होती. विद्यापीठाचा १९७३-७४ मध्ये खर्च २२२·६३ व उत्पन्न २११·९६ लाख रु. होते. विद्यापीठात १९७६-७७ साली एकूण विद्यार्थिसंख्या ३४,२३६ होती.
घाणेकर, मु. मा.