पंचमहायज्ञ : गृहस्थ व्यक्तीच्या नित्यकर्मात अंतर्भूत असलेल्या देवयज्ञ, पितृयज्ञ, भूतयज्ञ, मनुष्ययज्ञ व ब्रह्मयज्ञ या पाच यज्ञांना ही संज्ञा आहे. याच पाच यज्ञांचा संबंध ऋणकल्पनेशी जोडला जातो. प्राचीन वैदिक वाङ्मयात देवयज्ञ व पितृयज्ञ यांचा संबंध देवऋण व पितृऋण यांच्याशी दाखविला आहे. तैत्तिरीय संहितेत (६·३·१०) देवऋण, पितृऋण व ऋषिऋण या ⇨ऋणत्रयाचा उल्लेख केला आहे. म्हणजे त्या काळी या यज्ञांत ब्रह्मयज्ञ या तिसऱ्या  यज्ञाचा समावेश झालेला दिसतो. ऋषींनी रचलेल्या वाङ्‌मयाचे अध्ययन करणे, हाच ब्रह्मयज्ञ होय. शतपथ ब्राह्मणामध्ये मनुष्याला अथवा इतर प्राण्यांना अन्न देणे, या स्वरूपात भूतयज्ञाचा उल्लेख केला आहे. याचे दोन भाग कल्पून या ब्राह्मणग्रंथाने पाच यज्ञांचा निर्देश केला आहे. पाच यज्ञांचा स्पष्ट उल्लेख व त्यांचे स्वरूप तैत्तिरीय आरण्यकात (२·१०) आलेले आढळते. अग्‍नीमध्ये आहुती देणे वा वैश्वदेव करणे हा देवयज्ञ, पितरांना स्वधा म्हणून पाणी देणे किंवा तर्पण करणे हा पितृयज्ञ, प्राण्यांना अन्न देणे वा बलिप्रदान करणे हा भूतयज्ञ, माणसांना सत्कारपूर्वक अन्न देणे वा अतिथिपूजन करणे हा मनुष्ययज्ञ आणि स्वाध्याय किंवा शिष्याला अध्यापन करणे हा ब्रह्मयज्ञ होय. हे पाच यज्ञ प्रत्येकाने रोज केले पाहिजेत, असे तैत्तिरीय आरण्यकात म्हटले आहे.

या पंचमहायज्ञांचे तपशीलवार विवेचन गृह्यसूत्रे, धर्मसूत्रे आणि स्मृतिग्रंथ यांत केलेले आहे. यांतील भूतयज्ञ आणि मनुष्ययज्ञ यांतून व्यक्तीच्या सामाजिक कर्तव्याचाही निर्देश होतो. या पाच यज्ञांना अहुत, हुत, प्रहुत, ब्राह्‌म्यहुत वा प्राशित असेही म्हणतात (मनुस्मृति ३·७३). जप हे अहुत, होम हे हुत, भूतबली हे प्रहुत, द्विजाची पूजा हे ब्राह्‌म्यहुत व पितृतर्पण हे प्राशित होय. नित्य व्यवहारात चूल, पाटा, केरसुणी, उखळ व पाण्याचे भांडे या पाच ठिकाणी जीवहत्या होण्याचा संभव असतो. या पापाच्या परिहारार्थ पंचमहायज्ञ करावेत, असे मनू सांगतो (मनुस्मृति ३·६८-६९).

भिडे. वि. वि.