ह्‌रॉझ्नी, बेद्रिच : (६ मे १८७९–१८ डिसेंबर १९५२). चेक पुरावशेषविद् आणि प्राच्यविद्या पंडित. त्याने हिटाइट (हित्ती) क्यूनिफॉर्म बेद्रिच ह्‌रॉझ्नी(कीलमुखी) लिपीचा प्रथम उलगडा केला (१९१६) आणि दक्षिण–पश्चिम आशियाच्या प्राचीन इतिहासाच्या मांडणीला एक नवीदिशा दिली. ह्‌रॉझ्नीचा जन्म लिसा नद लाबेम (बोहीमिया) येथे झाला. पदवी संपादन केल्यानंतर त्याने व्हिएन्ना विद्यापीठ (१९०५) आणि नंतर चार्ल्स विद्यापीठ (प्राग) येथे अध्यापन केले.

ह्‌रॉझ्नी याने उत्तर पॅलेस्टाइनमध्ये १९०४ मध्ये झालेल्या पुरातत्त्वीय बेद्रिच ह्‌रॉझ्नी उत्खननात भाग घेतला. पहिले महायुद्ध संपून चेकोस्लोव्हाकिया स्वतंत्र झाल्यानंतर प्रागच्या चार्ल्स विद्यापीठात कीलाक्षरविद्या आणि प्राचीन प्राच्य-विद्या इतिहास विभागात तो अखेरपर्यंत प्राध्यापक (१९१९–५२) होता.

तुर्कस्तानात बोगाझकई येथील उत्खननात (१९०६-०७) हिटाइट राजवंशीय पुराभिलेख सापडले होते. जे. ए. क्नुट्त्सॉनने त्यातली भाषा ⇨ इंडो-यूरोपियन भाषाकुटुंबा तील असल्याची शंका व्यक्त केली. ती शंका खरी असल्याचे ह्‌रॉझ्नी याने लँग्वेज ऑफ द हिटाइट्स (१९१५) या ग्रंथातून सप्रमाण सिद्ध केले. इराणी, इटालिक आणि स्लाव्हिक भाषांच्या ती जवळ असल्याचे त्याचे म्हणणे होते. त्याच्याDie sprache der Hethiter(१९१७) ह्या ग्रंथावर इतर बऱ्याच संशोधकांनी प्रतिकूल मते मांडली. त्यावर त्याने अनेक हिटाइटअभिलेखांचे वाचन आणि भाषांतर करून आपले म्हणणे सिद्ध केले (Hethische keilschrifttexte aus Boghazkoi … १९१९). त्याच्या नेतृत्वाखाली झालेल्या १९२५ मधील संशोधनप्रकल्पात तुर्कस्तानात कुल्तपे (कानिश) येथे पुरातत्त्वीय उत्खनन होऊन प्राचीन ॲसिरियनइष्टिका ग्रंथ आणि कानिश या प्राचीन नगराचा शोध लागला. त्यावरून कानिश व ॲसिरिया यांत इ. स. पू. दुसऱ्या सहस्त्रकात व्यापाराची देवघेव होत असावी. ह्र्ॉझ्नीने हडप्पा व मोहें-जो-दडो (सिंधू संस्कृती) या अज्ञात (शोध न लागलेल्या) लिप्यांचा शोध लावण्याचा प्रयत्न केला पण त्यात त्यास यश आले नाही तथापि त्याचे हिटाइट भाषे-विषयीचे संशोधन वादातीत आहे. प्राचीन लिप्यांचा उलगडा करण्यात त्याने उर्वरित कारकीर्द घालविली.

प्राग येथे त्याचे वृद्धापकाळाने निधन झाले.

केळकर, अशोक रा.