ह्येल्मस्लेव्ह, लूई : (३ ऑक्टोबर १८९९–३० मे १९६५). प्रसिद्ध डॅनिश भाषावैज्ञानिक. त्यांचा जन्म एका विद्याविभूषित कुटुंबात कोपनहेगन (डेन्मार्क) येथे झाला. त्यांचे वडील योहानस ह्येल्मस्लेव्ह हे प्रसिद्ध गणितज्ञ होते. लूई ह्येल्मस्लेव्ह यांनी सुरुवातीचे शालेय शिक्षण जन्मगावी घेऊन तुलनात्मक भाषाशास्त्राचा अभ्यास अनुक्रमे कोपनहेगन, प्राग व पॅरिस विद्यापीठांत केला आणि १९३१ मध्ये ‘कोपनहेगन भाषामंडळ’ स्थापन केले. त्याचे अखेरपर्यंत ते अध्यक्ष होते. १९३७ पासून कोपनहेगन विद्यापीठात प्राध्यापकपद आणि इतरही मानाची पदे त्यांनी भूषविली. ⇨ फेर्दिनां दे सोस्यूर ह्यांच्याआधुनिक चिन्ह मीमांसेचा (सीमिऑटिक्स) त्यांच्यावर खोलवर परिणाम झाला. त्यांच्या विचारसरणीचा आपल्या स्वतंत्र पद्धतीने मंथन करूनत्यांनी हान्स युर्जेन अब्दाल यांच्या सहकार्याने ‘ग्लॉसेमॅटिक्स’ नावाची भाषाविज्ञानाची संरचनात्मक उपपत्ती विकसित केली (१९३५–४३). त्यांनी या संदर्भात काही ग्रंथ लिहिले. त्यांपैकी Principles de grammaire generale(१९२८), La categorie des Case (१९३४–३७), Omkring sprogteoriens grundleggelse(१९४३ इं. शी. ‘प्रोलिगॉमिना टू अ थिअरी ऑफ लँग्वेज’), हे ग्रंथ प्रसिद्ध असून भाषाशास्त्रज्ञांनी व समीक्षकांनी त्यांची दखल घेतली. स्वतःला ह्या संप्रदायातील म्हणवून घेणारे लोक एकंदर थोडेच असले, तरी त्याच्या या सिद्धांतांचा संप्रदायाबाहेरदेखील दूरवर परिणाम झालेला दिसतो. आर्हूस विद्यापीठातील व्याख्यानांतूनही त्यांनी भाषाशास्त्रातील संरचनात्मक उपपत्तीवर (ग्लॉसेमॅटिक्स) अनेकदा विचार मांडले.
ह्येल्मस्लेव्ह यांनी मांडलेले काही महत्त्वाचे सिद्धांत पुढीलप्रमाणे आहेत : (१) भाषा हा एक व्यूह आहे केवळ अनेक वस्तूंचा समुदाय नव्हे. (२) तिचे वैज्ञानिक अध्ययन करताना भाषेच्या बाहेर पाहण्याची जरुरी नाही. म्हणजे असे की, शाब्दिक (वा लिखित) अभिव्यक्तीचे स्थूल स्वरूप, तिचे भाषेमधील आंतरिक रूप, भाषेच्या आशयाचे भाषे-मधील आंतरिक रूप आणि तिची भाषाबाह्य जगाशी स्थूल जोडणी, अशी स्तरांत्मक रचना भाषावैज्ञानिकाला अभिप्रेत असते. (३) केवळ त्या दोन स्तरांची परस्परसंबद्धता आणि परस्परसाधर्म्य हेच अभ्यासाचे आधार आहेत. त्यांच्या जोरावर अभिव्यक्तीचे वर्णादी घटक आणि आशयाचे पदादी घटक निश्चित करणे आणि लहानमोठ्या घटकांचा एक-मेकांशी कसा संबंध आहे ह्याची तार्किक मांडणी करणे, ही कामे भाषेच्या अभ्यासकाला करायची असतात.
कोपनहेगन येथे अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले.
संदर्भ : Siertserma, B., A Study of Glossmatics, The Hague, 1955.
केळकर, अशोक रा.
“