ह्यूएनत्संग : (युआनच्वांग) . (सु. ६०२? – ६६४ ?). भारतात आलेला एक प्रसिद्ध चिनी प्रवासी. (त्याच्या जन्ममृत्यूच्या तारखा ज्ञात नाहीत) . बौद्ध धर्माचा चीनमध्ये प्रसार झाल्यावर काही चिनी यात्रेकरू त्या धर्माच्या पवित्र स्थळांचे दर्शन घेण्यासाठी, तसेच त्या धर्माचा सखोल अभ्यास करण्यासाठी आणि धर्मग्रंथ व मूर्ती जमवून स्वदेशात नेण्यासाठी भारतात येऊ लागले. ह्यूएनत्संग हा त्यांपैकी एक श्रेष्ठ प्रवासी होय.

ह्यूएनत्संग हा चीनमध्ये लोयांग येथे जन्मला होता. अगदी बालपणीच त्याची कुशाग्र बुद्धी आणि धार्मिकता प्रत्ययास आली होती. तेरावर्षांचा असतानाच त्याने लोयांग येथील मठात जाऊन बौद्ध धर्माचीदीक्षा घेण्याचा संकल्प केला नंतर त्याने त्या धर्माच्या ग्रंथांचे सखोल अध्ययन करून त्यात प्रावीण्य मिळविले. त्या काळात चीनमध्ये बौद्ध धर्माचे अनेक पंथ होते आणि त्यांच्याविषयी पुष्कळ अनिश्चितता होती. तेव्हा त्याने पूर्वी भारतात आलेल्याफाहियान या चिनी प्रवाशाप्रमाणे भारतात जाऊन तेथील विद्वानांकडून आपल्या संशयाचे निराकरण करून घेण्याचा निश्चय केला.

ह्यूएनत्संगने आपल्या देशाच्या सम्राटाला परदेशगमनाची परवानगी मागितली पण त्याला नकार मिळाला तथापि निराश न होता त्यानेगुप्तपणे प्रवास करण्याचा निश्चय केला. त्या वेळी (इ. स. ६२८) तो सव्वीस वर्षांचा होता. दिवसा कोठेतरी लपून राहावे आणि रात्री प्रवास करावा, अशा रीतीने त्याने गोबीच्या वाळवंटातून एकट्याने मार्गक्रमण केले. वाटेत पूर्वीच्या प्रवाशांच्या अस्थींशिवाय त्याला काहीच आढळले नाही. तुर्फान (चीनच्या सिंक्यांग-ऊईगुर प्रांतातील एक खोलगट प्रदेश) येथे आल्यावर तेथील अधिपती त्याला आपल्या दरबारी धर्माध्यक्षम्हणून राहण्याविषयी आग्रह करू लागला आणि त्याला पुढे जाऊ देईना. त्यामुळे ह्यूएनत्संगने अन्न सत्याग्रह सुरू केला. तेव्हा तुर्फानच्या अधिपतीने त्याच्या पुढील प्रवासाची सर्व व्यवस्था करून त्याला निरोप दिला. नंतर ह्यूएनत्संग कूचा, समरकंद, बाल्ख या मार्गाने हिंदुकुश पर्वत ओलांडून बामियान येथे आला. तेथून खैबर खिंडीने तो गांधार देशात पेशावर येथे येऊन पोहोचला. पेशावर (प्राचीन पुरुषपूर) ही कनिष्काची राजधानी आणि वसुबंधु व असंग या विख्यात बौद्ध तत्त्वज्ञांची कर्मभूमी होती पण तीत्या काळात हूणांच्या आक्रमणामुळे उद्ध्वस्त झाली होती.

ह्यूएनत्संग पेशावरहून उद्यान (उड्डियान), उदभांड, तक्षशिला या मार्गाने काश्मीरला गेला. हाही प्रदेश हूणांच्या आक्रमणाने बेचिराख झालेला त्याला आढळला. काश्मिरमध्ये त्याने दोन वर्षे राहून महायान पंथाच्या एका वृद्ध विद्वानाजवळ विज्ञानवादाचा अभ्यास केला. नंतर तो शाकल (सध्याचे सियालकोट), मथुरा, सांकाश्य, कनौज, अयोध्या, प्रयाग, कौशांबी, श्रावस्ती इ. मार्गाने बुद्धाचे जन्मस्थान कपिलवस्तु येथे जाऊन पोहोचला. त्या पवित्र स्थळाचे दर्शन घेतल्यावर सारनाथ व गया या सुप्रसिद्ध बौद्ध धर्मस्थानांना भेट देऊन तो नालंदा येथे आला. तेथे त्याने शीलभद्र या विख्यात पंडिताजवळ योगाचार, तत्त्वज्ञानाचे अध्ययन केले. ह्यूएनत्संग नालंदाला पंधरा महिने राहिला होता.

नालंदाहून ह्यूएनत्संग दक्षिणेत जावयास निघाला. आंध्र प्रदेशातील अमरावती, तमिळनाडूतील कांचीपुरम् (कंची), दक्षिण कोसलची राजधानी श्रीपूर आदी ठिकाणी काही दिवस राहून तो महाराष्ट्रात आला. चालुक्य सम्राट द्वितीय पुलकेशी याची भेट त्याने इ. स. ६४१ मध्ये नासिक येथे घेतली असावी. ह्यूएनत्संगने त्या राजाचे, त्याने हर्षवर्धनावर मिळविलेल्या विजयाचे, महाराष्ट्राचे आणि तेथील शूर, स्वाभिमानी व विद्याप्रेमी लोकांचे सुंदर वर्णन आपल्या प्रवासवृत्तांतात लिहून ठेवले आहे. तेथून तोगुजरात, माळवा व सिंध प्रदेशातील स्थळांना भेट देऊन दुसऱ्यांदा नालंदा येथे गेला. तेथील जयसेनसारख्या विख्यात पंडिताजवळ त्याने काहीकाळ अध्ययन केले. नंतर तो आसामचा राजा भास्करवर्मा याच्या खास आमंत्रणावरून आसामला गेला. त्याच्या आगमनाची वार्ता समजताच कनौजच्या हर्षवर्धनाने त्याला मोठ्या आग्रहाने आपल्या दरबारी बोलावून त्याचा मोठा सन्मान केला. प्रथम कनौज आणि नंतर प्रयाग येथील हर्षाच्या धार्मिक परिषदांना ह्यूएनत्संग उपस्थित होता. त्याने त्यांचे सविस्तर वर्णन आपल्या प्रवासवृत्तांतात लिहून ठेवले आहे.

इसवी सन ६४४ मध्ये जालंधर, तक्षशिला या मार्गाने सिंधू नदी पारकरून ह्यूएनत्संग उदभांडला पोहोचला. नंतर हिंदुकुश ओलांडून त्याने काशगर, यार्कंद, खोतान या ठिकाणी प्रवासात नष्ट झालेल्या ग्रंथांच्या प्रती मिळविल्या आणि इ. स. ६४५ च्या वसंत ऋतूत तो चीनच्या शीआन( चांगान) या राजधानीस पोहोचला. तेथे त्याचे मोठ्या थाटाने स्वागत झाले. राजाने त्याला आपल्या दरबारी मंत्र्याची जागा देऊ केली पण ती न स्वीकारता त्याने आपले नंतरचे आयुष्य राजधानीत स्वत:करिता खास बांधलेल्या मठात, भारतातून नेलेल्या सहाशे संस्कृत ग्रंथांचा चिनी भाषेत अनेक विद्वानांच्या साहाय्याने अनुवाद करण्यात घालविले.

चीनमधून भारतात अनेक यात्रेकरू आले. त्यांनी आपली प्रवासवर्णने लिहून ठेवली आहेत पण त्या सर्वांत ह्यूएनत्संगचा प्रवासवृत्तांत विस्तृतव बहुतांशी यथातथ्य आहे. तो ज्या प्रदेशात गेला, त्याचे त्याने समग्रवर्णन केले आहे. त्या प्रदेशाचा विस्तार, त्याची राजधानी, तेथील जमिनीचा कस, उत्पन्न होणारी अन्नधान्ये, हवामान, लोक, त्यांचे आचार-विचार, तेथील राजा व त्याची शासनपद्धती, धर्म, पंथ, मठ, धर्मग्रंथ, तेथे जतन केलेले बुद्धाचे अवशेष, त्यांविषयींच्या सांप्रदायिक कथा आणि चमत्कार यांविषयी विस्तृत माहिती त्याच्या प्रवासवृत्तांतातून मिळते. त्याच्याशिष्यांनी त्याचे चरित्र लिहून ठेवले आहे. त्यात तर ही माहिती अधिकच विस्ताराने दिली आहे. ह्यूएनत्संग हा अत्यंत श्रद्धाळू बौद्ध होता. त्याने अनेक स्थळांविषयी लिहून ठेवलेली चमत्कृतिपूर्ण वर्णने तर्काच्या, परीक्षणाच्या कसोटीस उतरणार नाहीत. त्याची काही माहिती वदंतांवर आधारित आहे. तिची सत्यता तत्कालीन संदर्भ पाहता विवादास्पद आहे. त्याने लिहून ठेवलेली स्थळांची अंतरे व दिशा याही काही बाबतींत चूक ठरल्या आहेत तथापि एकंदरीत त्याच्या प्रवासवृत्तांताचे महत्त्व भारताच्या तत्कालीन राजकीय, धार्मिक आणि सांस्कृतिक इतिहासाच्या दृष्टीने अनन्यसाधारण आहे.

मिराशी, वा. वि.