होमिओपॅथी : (समचिकित्सा पद्धती) . ‘होमिओपॅथी’ हे निसर्गनियमांवर आधारित शास्त्र किंवा एक वैद्यकीय शाखा आहे. हेशास्त्र ‘सिमिलिया सिमिलिबस क्युरेंटर’ म्हणजेच ‘समः समं शमयति( काट्याने काटा काढणे) या नियमावर आधारित आहे. होमिओपॅथीमधील औषधे असा आजार बरा करतात की, जी औषधे निरोगी मनुष्यास सौम्यमात्रेत दिली असता, ती त्या आजाराचा ठराविक लक्षणसमूह त्याच्यात निर्माण करतात. होमिओपॅथी ही समचिकित्सेच्या नियमावर आधारित औषधप्रणाली आहे. या उपचारपद्धतीचा शोधक्रिस्टिआन फ्रीड्रिक झामूएल हानेमान (१७५५–१८४३) या जर्मन शरीरक्रियावैज्ञानिकांनीलावला, म्हणून तिला ‘हानेमानिझम’ असेही म्हणतात. हानेमानयांनी परंपरागत वैद्यकीय पद्धतीला ‘ॲलोपॅथी’ व स्वतःच्या पद्धतीला ‘होमिओपॅथी’ हे नाव दिले. 

 

इ. स. पू. ४६० मध्ये हिपॉक्राटीझ यांना काही औषधांचे परिणामव ती ज्या रोगांवर दिली जात त्या रोगांची लक्षणे यांमध्ये साम्यअसल्याचे आढळले होते. तसेच पूर्वीच्या काही वैद्यांनी वरील ‘काट्याने काटा काढणे’ हा नियम सुचविला होता. शिवाय अठराव्या शतकात यूरोपमध्ये आजार आणि त्याची कारणमीमांसा यावरून आजार बराकरण्याच्या बऱ्याच पद्धती होत्या परंतु ठाम तत्त्व असलेली एकहीपद्धती नव्हती. १७७९ मध्ये हानेमान यांनी डॉक्टरेट ऑफ मेडिसीन(एम्.डी.) ही पदवी एर्लांगेन विद्यापीठातून प्राप्त केली. दोन वर्षांच्या वैद्यकीय व्यवसायानंतर हानेमान यांच्या लक्षात आले की, आजार बरा करण्याचा आभास तयार केला जातोय परंतु आजार पूर्णपणे बरा होतनाही. म्हणून त्यांनी वैद्यकीय व्यवसाय बंद करून रसायनशास्त्र, तत्त्वज्ञान, औषधनिर्माणशास्त्र व औषधे या विषयांचा अभ्यास सुरू केला. हानेमान यांचा विद्याव्यासंग मोठा होता व त्यांना निरनिराळ्या चौदा भाषा अवगत होत्या. १७९० मध्ये प्राध्यापक विल्यम कलेन यांनी म्हटले होते की, पेरूव्हियनची साल (जी आज क्विनीन म्हणून ओळखली जाते) हिवताप (मलेरिया) बरा करू शकते, कारण ती चवीने कडू आहे. हानेमान त्यांच्या या स्पष्टीकरणाने समाधानी झाले नाहीत म्हणून त्यांनी एक प्रयोगकरायचा ठरविला. तो म्हणजे ४ ग्रॅम सिंकोनाची साल ते दररोज दोन वेळा घेऊ लागले. काही दिवसातच त्यांना हातपाय थंड पडणे, थकवा, ग्लानी, छातीत धडधड, काळजी, अतिशय थरथर तसेच मुदतीचा ताप यांसारखी लक्षणे दिसू लागली. त्यांचे हिवतापाच्या लक्षणांशी साधर्म्य होते. सिंकोनाची मात्रा बंद केल्यानंतर लक्षणे जाणवायची नाहीत व मात्रा चालू केली की, लक्षणे जाणवायला लागायची. या प्रयोगावरून हानेमान यांनी असा निष्कर्ष काढला की, कोणतेही औषध तोच आजार बरा करू शकते जे निरोगी माणसाला दिले असता, ते त्या आजाराचा ठराविक लक्षणसमूह निर्माण करू शकते. उदा., पॉयझन आयव्ही (टॉक्सिकोडेंड्रॉन रॅडिकन्स) या वनस्पतीमुळे त्वचेवर पुरळ येते. अशा प्रकारे होमिओपॅथिक वैद्य यापुरळावर याच वनस्पतीने उपचार करतो. कांद्यामुळे डोळ्यात पाणी येतेव नाकातून पाण्यासारखा स्राव येतो. म्हणून पडशावरील उपचारासाठी होमिओपॅथीत कांदा वापरतात. 

 

हानेमान यांनी नंतर अनेक औषधे स्वतः व दुसऱ्यांना पारखण्यासाठी देऊन (सिद्धीकरण करून) लक्षणसमूहाचा अभ्यास केला व त्या पद्धतीचे आजार बरे केले. हा प्रयोग त्यांनी तब्बल वीस वर्षे केला व प्रत्येकवेळी मिश्र औषधे न वापरता एकच औषध घेऊन केला (उदा., गंधक, सोने, तांबे, सिलिका इ.) व विविध आजारांवर उपचार शोधून औषधेनिश्चित केली. हानेमान यांनी अनुभवाने असा निष्कर्ष काढला की, रुग्णाच्या शरीरात जे औषध चिकित्सेकरिता वापरण्यात येते, तेच औषध निरोगी शरीरात त्या रोगाची लक्षणे उत्पन्न करते. म्हणजेच जे औषधनिरोगी शरीरात रोग लक्षणे उत्पन्न करते, तेच औषध रोगनिवारण करूशकते. अशा तर्‍हेने हानेमान यांनी होमिओपॅथीचा रोग बरा करण्याचानिसर्गसिद्ध नियम संपूर्णपणे अभ्यासून जगभर प्रस्थापित केला. 

 

होमिओपॅथी ही एक आदर्श उपचारपद्धती आहे कारण : (१) ती ‘समः समं शमयति’ या तत्त्वावर आधारित आहे. (२) आजार लवकरात लवकर बरा होतो. (३) उपचारपद्धती हळुवार आहे. (४) या उपचार-पद्धतीने आजार मुळापासून बरा होतो. (५) हे दुष्परिणामविरहित वैद्यकीय शास्त्र आहे. 

 

होमिओपॅथीची तत्त्वे : समानतेचा नियम : होमिओपॅथीमध्येदोन प्रकारचे लक्षणसमूह जमा केले जातात. एका प्रकारचा लक्षणसमूह रुग्णांकडून, तर दुसरा होमिओपॅथिक औषधशास्त्रातून (वैद्यकीय द्रव्यांचे स्रोत, गुणधर्म व प्राप्ती यांविषयीच्या शास्त्राच्या आधारे) जमा केलेजातात. ज्या औषधात जास्तीत जास्त आजारांची लक्षणे समाविष्टअसतात, ते औषध रुग्णास दिले जाते. रोगाची लक्षणे ज्या औषधाच्या लक्षणसमूहात आहेत, परंतु जी रोगलक्षणांपेक्षा शक्तिमान (गुणकारिता असलेली) आहेत ती औषधे रुग्णाला मुळापासून जलद व कायमचाबरा करतात. ती रोगमारक (रामबाण) औषधे होत. 

 

साधेपणाचा नियम : रोगावर उपचार करताना एका वेळी एकाच समलक्षणी औषधाची निवड करतात. अनेक औषधांचे मिश्रण तर्काला सोडून असल्यामुळे मिश्र होमिओ औषधे वापरत नाहीत. अनेक औषधे दिल्याने जीवनशक्तीत (जैवशक्तीत) अपेक्षित योग्य फरक पडण्याऐवजी गोंधळ निर्माण होऊन नेमके कशाने काय झाले, ते कळत नाही. औषध परिणाम एकमेकांविरुद्ध होऊन सर्वच निष्प्रभ ठरतात. म्हणजे मिश्र औषधामुळे प्रत्येक विशिष्ट उपचाराच्या परिणामकारकतेत ढवळाढवळ होते. 

 

किमानतेचा नियम : कोणत्याही रोगकारक वस्तूंमुळेच जीवनशक्ती बिघडू शकते. तो बिघाड फक्त सूक्ष्म मात्रेनेच जाऊ शकतो. निःसत्त्व (अचैतन्यवादी) वारेमाप मात्रेने नव्हे सूक्ष्म मात्रेचे महत्त्व एका वेळी एकच औषध देण्याइतकेच आहे. जास्त मात्रा दिल्याने आधीचीच अशक्त झालेली जीवनशक्ती जास्तच अशक्त होते. म्हणूनच होमिओपॅथी औषधांची मात्रा सूक्ष्म ठेवली पाहिजे व वारंवार दिली गेली पाहिजे. 

 

औषधाचे सिद्धीकरण : औषधाची खरी शक्ती (गुणकारिता) कळण्यासाठी निरोगी मनुष्यावर औषधाचे सिद्धीकरण करावे लागते.निरोगी व्यक्तीमध्ये बदल घडवून आणणारी किंवा रोग्याला बरे करणारी औषधाची अंतर्गत शक्ती तर्काने व कारणपरंपरेने सिद्ध होत नाही, तर प्रत्यक्ष निरोगी व्यक्तीवर औषध सिद्धीकरण करूनच (पारखून घेतल्या-वरच) होते. 

 

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे होमिओपॅथिक औषध सिद्धीकरण हे गिनीपिग सारख्या प्राण्यांवर न होता सर्व वयाच्या निरोगी स्त्री-पुरुषांमध्ये होते. त्यामुळे शारीरिक, मानसिक व लैंगिक लक्षणे मिळतात. प्रयोग करताना वापरायचे औषध विनाभेसळ, शुद्ध व एकच पाहिजे. 


 

दीर्घकालिक रोगांचा सिद्धांत : होमिओपॅथिक वैद्याने रोग त्रिदोषात्मक पद्धतींपैकी कोणत्या एका अगर जास्त गटातील आहे ते ठरविले पाहिजे. कारण लक्षणे व रोगांचा गट लक्षात घेऊन उपचार करावे लागतात.त्रिदोषात्मक रोगांचे पुढील तीन गट आहेत : (१) कुष्ठ (सोरा), (२) प्रमेह( सायकोसिस) व (३) उपदंश (सिफिलिस) . जवळजवळ सर्व जुनाटरोगांत अंतर्गत रीत्या कुष्ठरोग खाजेच्या स्वरूपात नांदत असतो. कारणकुष्ठरोग मूलभूत जुनाट असतो. केवळ कुष्ठरोगाचे रुग्ण पुष्कळ असतात. त्याचबरोबर मिश्र स्वरूपाचे आजार असतात, त्याप्रमाणे औषधयोजनाकरावी लागते. (१) कुष्ठ : कमतरतेमुळे होणारे आजार उदा., पंाडुरोग.(२) अधिकतेमुळे होणारे आजार उदा., मुतखडा. (३) उपदंश : संहार-कता, विनाश उदा., पक्षाघात. 

 

औषधी गुणप्रभावन पद्धती : होमिओपॅथिक औषधे तयार करताना एखाद्या पदार्थामध्ये असणारे सुप्त औषधी गुण प्रभावन (प्रभावीकरण्याच्या) पद्धतीमुळे उपयोगात आणले जातात. ही नावीन्यपूर्ण प्रथा हानेमान यांनी सुरू केली. काही औषधांची कच्च्या अवस्थेत औषधीक्रिया आढळून येत नाही परंतु प्रभावन पद्धतीने घोटून ते औषध तयार केल्यास त्याचे गुणधर्म ठळकपणे दिसून येतात. 

 

जैव प्रेरणेचा सिद्धांत : निरोगी व्यक्तींमध्ये शरीरातील कार्ये व संवेदना यांच्यावर ताबा ठेवून मेळ घडवून आणण्याचे काम जीवनशक्ती करत असते. जीवनशक्तीशिवाय शरीर म्हणजे शून्य. जीवनशक्तीवर बाहेरील विकारांचा परिणाम होऊन जीवनशक्ती रोगबद्ध होते. तेव्हा जीवनशक्तीतील प्रकृतिकार्यातील अनियंत्रितपणा बाह्यतः दृष्टोत्त्पत्तीस येतो, ज्याला ‘रोग’ असे म्हणतात. याचा सारांश असा की, रोग म्हणजे प्रकृती नियंत्रक मूलभूत कार्यात, संवेदनात व परिस्थितीत बदल होणे होय. 

 

होमिओपॅथिक औषधांची कार्यपद्धती : होमिओपॅथिक औषधाची मात्रा जिभेवर पडताक्षणी ती शरीरातील रसद्रव्यात श्लेष्मल त्वचेवाटे व जठरामार्फत सर्वत्र पोहोचते. केवळ औषध हुंगण्याने सुद्धा ही क्रिया घडते. शरीरातील प्रत्येक अवयव व कोशिकांमध्ये (पेशींमध्ये) तंतूमार्गे औषधि-क्रिया घडते व औषधाची शक्ती पसरते. त्वचेवरही द्रवस्वरूपाच्या औषधाची क्रिया घडते. 

 

समान लक्षणानुसार सूक्ष्म औषधाची मात्रा दिल्यानंतर तो समानलक्षणी असणाऱ्या नैसर्गिक रोगास काबीज करतो व तोपर्यंतचा शरीरातील नैसर्गिक रोगाने पछाडलेला भाग आपल्या हाती घेतो. नैसर्गिक रोगाचे अशा तर्‍हेने उच्चाटन झाल्यानंतर काही प्रमाणात औषधी रोग मात्र राहतो, परंतु तो इतका हलका असतो की, स्वतःच नाहीसा होतो. होमिओपॅथीने आजारा-तून मुक्ती शरीराच्या आतून-बाहेर, वरून-खाली व सुरुवातीस जी तक्रार उद्भवते ती सर्वांत शेवटी बंद होते.

 

प्रगती : हे तत्त्व दैनंदिन व्यवहारांत आणण्याकरिता व कोणते औषध कोणता रोग बरा करील हे पाहण्यासाठी त्या औषधामुळे निरोगी शरीरात कोणती रोगलक्षणे उत्पन्न होतात ते पाहून त्या रोगाच्या निवारण्यासाठीत्या औषधाचा उपयोग करावा, असे हानेमान यांनी ठरविले. त्यांनी स्वतः शंभरापेक्षा अधिक औषधांवर प्रयोग करून त्यापासून कोणती लक्षणे उत्पन्न होतात, याबद्दलची सविस्तर टिपणे केली आहेत. असेच प्रयोग त्यांच्या अनुयायांनी पुढे चालू ठेवले. त्यांना ‘सिद्धके’ असे म्हणतात. याप्रमाणे अधिकाधिक औषधाने गुणधर्म प्रस्थापित करण्यात आले, म्हणजे कोणत्या औषधाने कोणती रोगलक्षणे उत्पन्न होतात ते पाहून त्यापासून कोणतेरोग बरे होऊ शकतात हे सिद्ध करण्यात आले आहे. या तत्त्वाचा उपयोग करून हानेमान यांनी असंख्य रोगी बरे केले. हानेमान यांच्या जिवंत-पणीच हे तत्त्व जगभर प्रख्यात झाले होते. पुढे ते पॅरिस येथे राहावयासगेले तेव्हा त्यांच्याकडे अनेक देशांतील रोगी येऊ लागले. त्यांच्याया नवीन चिकित्सा पद्धतीला ‘समचिकित्सा पद्धती’ असे नाव पडले.( होमिओ ⇨ सम, पॅथास ⇨ व्याधी). 

 

पुढे असे लक्षात आले की, या नवीन समचिकित्सा पद्धतीने उपचार सुरू झाले म्हणजे प्रथम रोगलक्षणे थोडी तीव्र होतात. औषधे रोगाशी समगुणी असल्यामुळे असे होणे साहजिकच होते. ही सुरुवातीस होणारीतीव्र लक्षणे कमी करण्यासाठी हानेमान यांनी औषधाचे परिमाण म्हणजेमात्रा कमी करून पाहिली. अशा प्रकारे कमी मात्रा दिली असता रोगी अधिक लवकर बरा होई. लहान मात्रेचा उपयोग अधिक चांगला होतो असे दिसून आले. म्हणून औषधमात्रा अधिकाधिक कमी करावी. या दृष्टीने अक्रिय अशा (साखर किंवा अल्कोहॉल) पदार्थांशी औषधाचे अवमिश्रण करण्यास सुरुवात केली. अशा तर्‍हेने अवमिश्रित औषधाचाही चांगला परिणाम दिसू लागला. म्हणून या अवमिश्रणांना ‘औषधिशक्ती’ असे नाव मिळाले. समचिकित्सेचा ‘औषधिशक्ती’ म्हणजे औषधाचे अवमिश्रण हा एक फार महत्त्वाचा भाग आहे.

 

इतिहास : उपलब्ध माहितीप्रमाणे १८१० पर्यंत या पद्धतीचे हानेमान हेच एकटे समर्थक होते. त्या वर्षी ते लाइपसिक येथे स्थायिक झालेआणि १८१२ मध्ये तेथील विद्यापीठाकडून त्यांनी होमिओपॅथिकउपचारांना मान्यता मिळविली. लवकरच त्यांच्याभोवती मोठा शिष्यवर्गजमा झाला व त्या शिष्यांनी हानेमान प्रणित चिकित्सा पद्धतीचा उपयोग करण्यास सुरुवात केली. अशा रीतीने जर्मनीमध्ये समचिकित्सा पद्धतीचा उदय झाला. १८२१ मध्ये त्यांच्या शिष्यवर्गाने आर्काइव्ह या नावाचे समचिकित्सेचा पुरस्कार करणारे नियतकालिक सुरू केले. ते १८४३ पर्यंत प्रसिद्ध होत असे. १८३१ मध्ये अनेक संपादकांच्या मदतीने दुसरे नियतकालिक निघाले, ते १९०२ पर्यंत प्रसिद्ध होत असे. १८३० मध्ये समचिकित्सेच्या अभिमान्यांनी एक केंद्र स्थापन केले. दरवर्षी जर्मनीतील एका शहरी त्यांच्या बैठकी होत. इंग्लंडमधील लिव्हरपूल या गावी २०० खाटांचे रुग्णालय निघाले व तेथे या चिकित्सा पद्धतीचा उपयोग केला जाऊ लागला. जर्मनीमध्ये १८७६ साली या चिकित्सा पद्धतीचे अभिमानी व व्यावसायिक ३०० होते, तर १८९६ मध्ये त्यांची संख्या ४०० वर गेली. बर्लिन आणि म्यूनिक शहरी या चिकित्सा पद्धतीची रुग्णालये निघाली. जर्मनीत सर्वत्र या संस्थांचे जाळेच तयार झाले मात्र या पद्धतीचे नियमित शिक्षण देणाऱ्या संस्था फक्त लाइपसिक आणि म्यूनिक याच शहरांत होत्या. 

 

ऑस्ट्रिया-हंगेरी : या नवीन ज्ञानाचा पहिला प्रसार ऑस्ट्रियात झाला. तेथे १८१९ पर्यंत या पद्धतीचा इतका विकास झाला होता की, त्यावर्षी बादशाही हुकुमावरून त्या पद्धतीचा मज्जाव करण्यात आला असूनही तिची प्रगती इतकी झाली की, शेवटी १८३७ मध्ये हा हुकूम रद्द करावा लागला. एका संस्थेमार्फत या पद्धतीची ‘सिद्धके’ आणि ‘पुनःसिद्धके’ करण्यात आली व ती अप्रतिम ठरली. ऑस्ट्रिया देशात या पद्धतीचा व्यवसाय करणारे एका वेळी एकूण ३०० पेक्षा जास्त व्यावसायिकवैद्य कधीच नव्हते. 


 

इटली : ऑस्ट्रियाप्रमाणे इटलीतही या नवीन वैद्यकीय चिकित्सा पद्धतीचा प्रवेश जर्मनीमधूनच झाला. अशा रीतीने हे तीन देश म्हणजे या नवीन पद्धतीचे अध्वर्यूच होत. ऑर्गॅनन या ग्रंथाचे भाषांतर प्रसिद्ध करण्यात आले. शिवाय १८२९ मध्ये तेथेच एक स्थानिक नियतकालिक प्रसिद्धहोऊ लागले. रुबिनी या शास्त्रज्ञांनी निवडुंगाच्या एका जातीचे (कॅक्टस ग्रँडिफ्लोरस) सिद्धक प्रथम करून दाखविले आणि कापराचा उपयोग महामारीमध्ये भरपूर प्रमाणात केल्यास फार चांगला उपयोग होतो, हेसिद्ध केले. इटलीत एका वेळी समचिकित्सा पद्धतीचा व्यवसाय करणारे मात्र १०० पेक्षा अधिक क्वचितच असत. इंग्लंड आणि फ्रान्स या देशांत समचिकित्सा पद्धती इटलीतून प्रसृत झाली. १८२८ पर्यंत फ्रान्समध्येया पद्धतीबद्दल काहीच माहिती नव्हती. त्या वर्षी काँते डे गुइडी यांचीपत्नी आजारी पडली व ती व्याधी बरी होऊ न शकल्यामुळे असाध्य मानण्यात आली. त्या वेळी त्यांनी इटलीतील रोमानी यांचा सल्ला घेतलाव त्यांच्या उपचारामुळे ती पूर्ण बरी झाली, हे पाहून गुइडी यांना फारविस्मय वाटला. १८३० मध्ये ते फ्रान्समधील लीआँ या गावी परत आल्यानंतर त्यांनी त्या पद्धतीचा प्रचार सुरू केला. १८३५ मध्ये हानेमान यांनी पॅरिस येथे राहण्याचे ठरविले, तोपर्यंत त्यांच्या अनेक शिष्यांनीतेथे एक संस्थाच स्थापन केली होती. त्या संस्थेतर्फे त्यांचे मोठे स्वागत करण्यात आले. १८४३ मध्ये हानेमान यांच्या मृत्यूच्या वेळी ही पद्धत फ्रान्समध्ये दृढमूल झालेली होती. 

 

पॅरिसमधील रुग्णालयाशी संलग्न असलेल्या एका वैद्याने त्यारुग्णालयातील रुग्णांवर प्रयोग करण्याची संधी साधून या पद्धतीचेश्रेष्ठत्व सिद्ध करण्याचे ठरविले (१८४७). फ्रान्समध्ये एका वेळी ३०० पेक्षा अधिक व्यावसायिक नसूनही तेथे या पद्धतीवरील वाङ्मय मोठ्या प्रमाणात निर्माण झाले. १८७५ मध्ये लीआँ या शहरात एक रुग्णालयस्थापण्यात आले. पॅरिसमध्ये या पद्धतीचा शास्त्रोक्त अभ्यास करण्याचे अनेक प्रयत्न १८३६–४५, १८६३–६९ आणि १८९८-९९ या काळात झाले. 

 

इंग्लंड : नेकर यांनी १८२५ मध्ये क्विन यांना या पद्धतीची ओळख करून दिली. त्यानंतर क्विन लाइपसिकमध्ये रोमानी यांच्या हाताखाली शिकून व त्या पद्धतीची उपयुक्तता पटून तयार झाले. पुढे १८३२ मध्ये ते लंडन येथे स्थायिक झाले. त्यांची उपजत बुद्धिमत्ता, सामाजिक सद्गुण, बळ आणि ज्ञान यांमुळे त्याचे नाव या पद्धतीमध्ये अग्रगण्य ठरले. १८४४ मध्ये त्यांनी ब्रिटिश होमिओपॅथिक सोसायटी स्थापन केली, तिचे ते पहिले अध्यक्ष होते आणि १८७८ मध्ये त्यांचा मृत्यू होईपर्यंत तेच अध्यक्ष राहिले. ड्रिडेल यांनी लिव्हरपूल या शहरी एडिंबरो येथे ‘एडिंबरो ब्रिटिश होमिओपॅथीची शाळा’ स्थापन केली तिची परंपरा आजही चालू आहे. 

 

लंडन, एडिंबरो आणि लिव्हरपूल येथे याप्रमाणे तीन केंद्रे स्थापनझाली. १८४३ मध्ये होमिओपॅथीचे ब्रिटिश नियतकालिक स्थापन झाले, जे आजतागायत चालू आहे. १८५० मध्ये लंडन येथे शाही होमिओपॅथिक रुग्णालय प्रस्थापित झाले व त्यातून उत्तीर्ण होणाऱ्यांनी देशात सर्वत्रदवाखाने काढले. हे शाही रुग्णालय दिवसेंदिवस इतके वाढत गेले, कीसन १८९१ मध्ये ४५,००० पौंड खर्चून ते नव्याने बांधावे लागले.१८५७ पर्यंत ब्रिटिश बेटांत होमिओपॅथीचे सु. २०० व्यावसायिक होते. 

 

होमिओपॅथीतील चैतन्यशक्ती तत्त्व : मनुष्य आरोग्यसंपन्न असताना अभौतिक अशी चैतन्यशक्ती-सार्वभौम शक्ती म्हणजे भौतिकशरीरात सर्वत्र वास करणारे गतिशील तत्त्व शरीरावर अमर्याद सत्ता गाजवते आणि शरीरातील सर्व क्रिया आणि प्रक्रियांचे, संवेदना आणि कार्याचे सुसंवादित्व राखते. जीवनातील उदात्त हेतूच्या सिद्धीसाठी विवेकसंपन्नमनाच्या शक्तीचा मुक्त वापर याच चैतन्यशक्तीमुळे शक्य होतो. 

 

चैतन्यशक्तीच्या अभावी शारीरिक संवेदना, कार्य आणि स्वत्वरक्षणया गोष्टी भौतिक शरीराला शक्य होणार नाहीत. अभौतिक चैतन्यशक्तीच्या योगेच शरीराला सर्व संवेदना होऊ शकतात ह्या शक्तीच्या योगेच ते सर्व शरीरधर्म पार पाडू शकते. निरोगी स्थितीप्रमाणे रोगी अवस्थेतही केवळ याच चैतन्यशक्तीची शरीरावर अधिसत्ता असते. 

 

शरीरातील प्राण जातात त्या वेळी चैतन्यशक्तीची अधिसत्ता संपलेली असते. आता तो निष्प्राण देह बाह्य भौतिक शक्तींच्या तावडीत सापडतो, त्याचे विघटन होते आणि वेगवेगळ्या रासायनिक घटकांत ते शरीरविघटित होते.

 

मनुष्य आजारी पडतो त्या वेळी वस्तुतः शरीरात सर्वत्र वसत असलेली अभौतिक आणि स्वयंभू अशी ही चैतन्यशक्ती प्रथमतः रोगग्रस्त होत असते आणि मानवी जीवनाला शत्रुवत असणाऱ्या रोगकारणांचा चैतन्यशक्तीवर होणारा परिणाम भौतिकच असतो. चैतन्यशक्ती अशा तर्‍हेने ग्रस्त होऊन आणीबाणीस पोहोचल्यानंतर त्या चैतन्यशक्तीद्वारे शरीरात असह्य संवेदना निर्माण केल्या जातात आणि शरीरात अनियमित, अनैसर्गिक क्रिया-प्रक्रिया घडू लागतात (त्यांना आपण रोग असे म्हणतो) . चैतन्यशक्ती स्वतः अव्यक्त असल्याने आणि तिचे अस्तित्व शरीरावर होणाऱ्या परिणामांद्वारेच व्यक्त होत असल्याने चैतन्यशक्तीची रोगावस्थाही शरीरातील संवेदना आणिकार्ये यांद्वारेच व्यक्त होणार, म्हणजे झालेला विकार किंवा रोग लक्षणांखेरीज दुसऱ्या कशानेही व्यक्त होणार नाही. 

 

सूक्ष्म, चैतन्यवत् अशा रोगकारणांनी ग्रस्त झाल्यानेच चैतन्यशक्तीरोग निर्माण करते. म्हणून अंतस्थ अंतरंगात झालेले सर्व बदल शरीरात व्यक्त झालेले दिसतात. म्हणजे अंतस्थ अधितत्त्वाची रोगमय स्थिती बाह्यतःव्यक्त होतच असते. अर्थात् अंतस्थ रोगाचे संपूर्ण चित्र लक्षण-समुदायानेव्यक्त होतच असते. साहजिकच अंतस्थ अस्तित्वाची रोगमय स्थिती नाहीशी झाल्यानंतर आरोग्यापासून ढळलेल्या संवेदना व कार्ये यांचेही अस्तित्वराहत नाही, म्हणजे मग चैतन्यशक्ती व कार्यादिक्रिया-प्रक्रियाही आरोग्य स्थितीस पोहोचतात. 

 

गतिशील असलेली ही सूक्ष्म अशी तेजवत चैतन्यशक्ती ज्ञानेंद्रियांनी आकलन केली जाऊ शकत नाही, एवढ्याच कारणाने तिचे अस्तित्व नाकारणे अयोग्य ठरेल. पौर्णिमेच्या वेळी समुद्रात भरती येते त्या वेळीसूक्ष्म अशी अभौतिक शक्तीच कार्यान्वित झालेली असते. 

 

जिवंत शरीरावर औषधाचा होणारा परिणाम याच प्रकारे जाणावा लागेल. आरोग्यशाली शरीरात बदल घडवून आणण्याची सूक्ष्म अशी चैतन्यमय--शक्ती औषधात वसत असते. म्हणूनच ती द्रव्ये ‘औषध’ या संज्ञेसप्राप्त होतात. देवी किंवा गोवर अशा एखाद्या अतिशय संसर्गजन्य विकाराने पीडलेल्या मुलाच्या सान्निध्यात दुसरे एखादे आरोग्यशाली मूल आलेअसता, ते जसे ह्या विकाराच्या प्रभावाखाली येते, त्याचप्रमाणे औषधे-सुद्धा त्याच्यातील सूक्ष्म अशा चैतन्यवत् शक्तीच्या योगे निरोगी माणसाच्या आरोग्यात बदल घडवून आणतातच. ज्या औषधातील भौतिकतत्त्व अद्ययावत प्रयोगशाळेतही मोजता अथवा ओळखता येणार नाही एवढ्या प्रमाणात कमी करण्यात आलेले आहे व जेथे अशा प्रभावित केलेल्या औषधातीलसूक्ष्मतम अशी चैतन्यशक्ती कार्यासाठी मुक्त झालेली असते व त्या शक्तीच्याच योगे जिवंत शरीरात बदल घडू शकतात. भौतिक द्रव्यात अशी बदल घडवून आणण्याची शक्ती कधीही असू शकत नाही. 


 

रोग होतो त्या वेळी निरोगी माणसाच्या आरोग्यस्थितीत बदल होतो. रोग जाऊन निरोगी अवस्था प्राप्त होते, तीदेखील पुन्हा एकदा बदल घडवून आणला म्हणूनच. म्हणजे हे उघड आहे की, असे बदल घडवून आणण्याची शक्ती औषधात असल्याखेरीज रोगमुक्ती होऊ शकणार नाही. अनेक आरोग्यशाली व्यक्तींवर प्रयोग केल्यानेच या शक्तीचे दर्शन घडू शकेल, दुसऱ्या कोणत्याही प्रकारे होऊ शकणार नाही. निरोगी शरीरात औषधे जी रोगलक्षणे निर्माण करू शकतात, ती निदर्शक मानूनच आपणाला औषधातील शक्ती जाणावी लागेल. रोगनिर्माण करण्याची पात्रता त्या शक्तीत आहे, म्हणूनच रोग दुरुस्त करण्याची पात्रता येथे असणारच. 

 

समपद्धतीत वापरात असलेल्या औषधांचे खालील प्रकार आहेत : (१) शाकप्रकार : कुचला, सार्सापरिला (अनंतमूळ), ब्रायोनिया इ. वनस्पती (२) खनिजप्रकार : गंधक, सिलिका, कार्बन वगैरे (३) रोगोत्पन्नप्रकार : रोगामध्ये उत्पन्न होणाऱ्या पदार्थापासून बनलेले जसे कर्णिका (४) जीवरसोत्पन्न प्रकार : प्राण्यांच्या जीवनरसापासून उत्पन्न झालेलेपदार्थ जसे सर्वांपासून तयार होणारे लाचेसिस किंवा जिवंत मुंग्या चिरडून तयार होणारे फॉर्मिका.

 

शक्तिवर्धित औषधनिर्मिती : औषधाचे अवमिश्रण किंवा शक्तिवर्धन करण्याचे विशेष तंत्र आहे. औषधाचा एक भाग ९९ दुग्धशर्करा भागांत अवमिश्रित करून ते दोन तासांपर्यंत सतत पेषण (दलन) करतात.त्यामुळे उत्पन्न होणाऱ्या औषधाला ‘पहिले’ शक्तिवर्धन असे म्हणतात.या मिश्रणाचा एक भाग ९९ भाग दुग्धशर्करेत मिसळून त्याचे दोन तास पेषण केल्यानंतर तयार होणाऱ्या औषधाला दुसरे शक्तिवर्धन असेम्हणतात. द्रवरूप औषधाचा एक थेंब अल्कोहॉलाच्या ९९ थेंबांत अति-मिश्रित करून ढवळून काढल्यानंतर त्याचे ‘मध्यम’ शक्तिवर्धन होते. अशा अवमिश्रित औषधाचा एक थेंब घेऊन तो पुन्हा अल्कोहॉलाच्या ९९ थेंबांत अवमिश्रित केल्यास ‘दुसरे’ शक्तिवर्धन होते. संख्याशास्त्राच्या दृष्टीने पहिले अवमिश्रण अथवा शक्तिवर्धन म्हणजे मूळ औषधाचा १/१०० भाग आणि दुसरे अवमिश्रण म्हणजे १/१००० भाग होय. समचिकित्सक सामान्यपणे ३० ते १००० या प्रमाणात शक्तिवर्धक औषधे वापरतात. इतक्या प्रचंड प्रमाणात अवमिश्रित केलेल्या औषधात भौतिक अथवा रासायनिक दृष्ट्या मूळ औषधाचा काहीही गुण दिसून येत नाही तरीही ही औषधेफार प्रभावी ठरलेली आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात अवमिश्रित केलेली औषधे शरीरावर कशी प्रक्रिया करतात, हे न सुटलेले कोडे आहे. ही शक्तिवर्धनक्रिया म्हणजे हानेमान यांनी या शास्त्राला दिलेली मोठीच देणगी आहे. इतके दुग्धशर्करा किंवा अल्कोहॉलामध्ये अवमिश्रित केलेले औषध स्वाद्य आणि अहानिकारक तर असतेच शिवाय ते इतर औषधांच्या तुलनेत स्वस्तही असते. 

 

औषधांची सिद्धके : कोणते औषध कोणत्या रोगाशी सारखवट आहे हे ठरविण्यासाठी समचिकित्सक निरोगी माणसाला एका वेळी एक असे औषध देऊन त्याच्यापासून होणाऱ्या परिणामांची नोंद करून ठेवतो( सारखवट याचा अर्थ असा की त्या औषधापासून रोगासारखी लक्षणे उत्पन्न होतात) . यासाठी अजूनही मानवी शरीरावरच प्रयोग करण्यात येतात. कारण मनुष्यशरीर हे परीक्षानलिकेपेक्षा अधिक संवेदनक्षम असते आणि पशुपक्ष्यांपेक्षा मनुष्य आपल्याला होणाऱ्या लक्षणाचे विशेष वर्णन करू शकतो. २०१५ सालापर्यंत सु. २,००० औषधांवर प्रयोग करण्यात आलेले आहेत. या दोन हजार औषधांतून समचिकित्सक जे एक औषध निवडतो त्या वेळी त्या औषधापासून जास्तीत जास्त रोगसमान लक्षणे होतात, हे पाहूनच ते निवडतो. हे करीत असताना तो रुग्णाला होणाऱ्या सर्व लक्षणांचा विचार करीत असतो. एखाद्या रुग्णाला औषध देण्याचे ठरविण्यापूर्वी तो इतर वैद्यांप्रमाणेच रोगनिदान करतो. त्यासाठी त्याला इतर वैद्यांप्रमाणेच रोगाचे ज्ञान असणे आवश्यक असते. रोगलक्षणांचे संपूर्ण अवलोकन तर तो करतोच शिवाय विशिष्ट रुग्णात होणारी सर्व लक्षणे तो विचारात घेतो. उदा., फुप्फुसशोथाच्या रुग्णात त्या रोगाची सर्व लक्षणे तो विचारात घेतोच शिवाय रुग्ण अस्वस्थ किंवा चिडखोर आहे किंवा गुंगीत आहे की काय ही लक्षणेही तो पाहतो. म्हणजेच एकाच रोगाने ग्रस्त झालेल्या दोन रुग्णांत रोगप्रतिक्रिया भिन्न दिसते, ही बाब त्याला होणाऱ्या लक्षणांवरून दिसून येते. अशी विविध लक्षणे काळजीपूर्वक पाहिली असता कोणते औषध विशेष तर्‍हेने लागू पडेल हे त्याला ठरविता येते. कारण त्या औषधामुळे सर्व रोगलक्षणे तंतोतंत उत्पन्न होतात, हे आधी सिद्ध झालेले असते. 

 

औषधे देण्याची पद्धती : जिभेवर औषधाच्या तीन किंवा चार बारीक गोळ्या ठेवून औषध देता येते किंवा नेहमी पाणी पिण्याच्या भांड्यात २/३ भाग पाणी ठेवून त्यात औषधाच्या ७-८ गोळ्या टाकून त्या पूर्ण विरघळेपर्यंत ढवळून औषध तयार करतात. या औषधाचा एक लहानसा चमचा मुलाला व मोठा चमचा मोठ्या माणसाला हे प्रमाण असते. जेव्हा औषध अवमिश्रणाच्या स्वरूपात द्यावयाचे असेल, तेव्हा त्याचे २ किंवा ३ थेंब किंवा चाकूच्या पात्यावर १/३ पर्यंत राहील एवढे औषध (म्हणजे सु. एक ग्रॅम वजनाचे) वर सांगितल्याप्रमाणे पाण्यात तयार करतात वतेच वरील प्रमाणात देतात. ज्या भांड्यात अवमिश्रण करावयाचे ते भांडे मात्र अगदी स्वच्छ करण्याची काळजी घ्यावी लागते. याकरिता काचेचे भांडे अधिक श्रेयस्कर असते. औषध तयार केल्यानंतर ते थंड ठिकाणी ठेवतात. आजूबाजूस वास व दर्प येणारे पदार्थ नसावेत म्हणून त्यावर घट्ट झाकण असते. औषधात बुडविलेला चमचा चांदीचा नसेल तर तो औषधात फार वेळ बुडवून ठेवू नये. निरनिराळ्या औषधासाठी एकच भांडे स्वच्छ धुतल्याशिवाय वापरू नये. 

 

विषम आणि समचिकित्सांमधील भेद : या दोन चिकित्सा पद्धतींतील फरक मुख्यतः औषधे वापरण्याच्या व देण्याच्या पद्धतीत आहे. समचिकित्सेसंबंधी मुख्य आक्षेप असा घेण्यात येतो की, त्या पद्धतीमध्ये औषधाची मात्रा फार सूक्ष्म असते. विषमचिकित्सक औषध देतो त्यावेळी त्या औषधाचा शारीरिक प्रक्रियांवर विशेष परिणाम व्हावा म्हणूनच देतो. याचा अर्थ असा की, त्या औषधाचा परिणाम सर्वंकष व्हावा, त्याचा परिणाम संवेदनागम्य व्हावा आणि शरीर व त्यातील इंद्रिये आणि त्यातील ऊतकांवर (समान रचना व कार्य असणाऱ्या कोशिका – पेशी – समूहांवर) रोगलक्षणापेक्षा विपरीत व्हावा या दृष्टीने ते औषध दिलेलेअसते. असा परिणाम व्हावा म्हणून औषधाची मात्रा जास्त प्रमाणात दिली जाते. उदा., मलावरोधासाठी देण्याच्या औषधाचा परिणाम अतिसार होईलअसा असतो, त्यामुळे आंत्रातील (आतड्यातील) सर्व मल बाहेर पडू लागतो. तेव्हा हे लक्षात येत नाही की मलावरोध हा रोग नसून एकरोगलक्षण आहे. म्हणून औषधाचा परिणाम संपला म्हणजे मलावरोध पूर्ववत तसाच राहतो. कारण औषधामुळे कृत्रिम रोगच उत्पन्न होतोआणि मूळ रोगाचे कारण तसेच उरते. 

 

समचिकित्सक मात्र रोगविपरीत असे औषध वापरीत नाही. रोगसदृश लक्षणे उत्पन्न करणारे औषधच तो वापरतो. मलावरोधाला तो जे औषध देतो ते जास्त प्रमाणात दिल्यास मलावरोध अधिक वाढेल असेच औषध तो देतो. त्यावरून हे स्पष्ट होईल, की समचिकित्सक ते औषध अतिसूक्ष्म प्रमाणात देत असल्यामुळे रोगलक्षणे तीव्रतर होऊच शकत नाहीत. 

 

सर्व क्रिया जवळजवळ सर्व औषधे मनुष्यशरीरावर रोगात अथवा आरोग्यवस्थेत विषासारखी क्रिया करीत असतात. त्यांच्यामुळे शरीरावर चांगला अथवा वाईट परिणाम होत असतो. म्हणून जेव्हा एखादे औषध मनुष्यशरीरात दिले असता त्याची मात्रा मोठी असेल, तर त्याची शरीरावर उद्दीपन क्रिया होते व ती क्रिया लक्षणांवरून समजू शकते. ही लक्षणे म्हणजेच औषधाचा ‘प्राथमिक परिणाम’ होय. त्यानंतर दुसरी गौण लक्षणे दिसू लागतात. कारण औषधाचा विपरीत परिणाम नाहीसा करण्यासाठी शरीराची प्रतिक्रिया होत असते. उदा., एरंडेलाची क्रिया झाली म्हणजे आंत्रातील तंत्रिकाच्या (मज्जापेशींच्या) उद्दीपनामुळे आंत्रातील ग्रंथीआणि स्नायू यांची क्रिया अधिक तीव्र होते. ही क्रिया म्हणजेच एरंडेलाचा प्राथमिक परिणाम होय व त्यामुळे एरंडेल शरीरातून बाहेर उत्सर्जितहोत असते. 

 

औषधाचा हा प्राथमिक परिणाम नाहीसा झाला म्हणजे अतिसार बंद झाल्यानंतर मलावरोध अधिक तीव्र होतो. याचे कारण असे की एरंडेलामुळे शरीरावर जो परिणाम घडलेला असतो त्याच्याविरुद्ध शरीराची प्रतिक्रिया होत असते. 


 

समचिकित्सा पद्धतीप्रमाणे जेव्हा औषध वापरले जाते, त्यावेळी शरीरावरील त्याची क्रिया वरच्यासारखीच असते परंतु औषधिमात्रा फार सूक्ष्म असल्यामुळे शारीरिक प्रतिक्रिया ते औषध सहज बाहेर टाकूशकते व त्याबरोबरच रोगही नाहीसा होतो. 

 

विषमचिकित्सा पद्धतीतील औषधिमात्रेमुळे शरीरातील ऊतकाचे अधिक उद्दीपन होऊन त्याची प्रतिक्रिया करण्याची शक्तीच नाहीशी होते. समचिकित्सा पद्धतीतील औषधिमात्रा शरीरावर थोडीशी छाप पाडून तेवढ्या प्रमाणातच शरीर उद्दीपित करते त्यामुळे शरीरात थकवा उत्पन्न होत नाही. औषधिमात्रा सूक्ष्म प्रमाणात वापरण्यामागील हे तत्त्व आहे. 

 

रॉबर्ट बॉइल या शास्त्रज्ञांनी अत्यंत महत्त्वाचा असा शोध लावला, तो असा की, ग्रस्त शरीर हे निरोगी शरीरापेक्षा अधिक संवेदनाक्षम असते. या शोधाचा हानेमान यांनी आपल्या पद्धतीत विशेष उपयोग करून घेतला आणि त्यांनी औषधाची मात्रा अगदी सूक्ष्म करून वापरली. त्या वेळेपर्यंत या औषधाची मात्रा अशी सूक्ष्म प्रमाणात वापरीत नसत. शरीरातील ऊतकां-वर सूक्ष्ममात्रेचा परिणाम अधिक चांगल्या तर्‍हेने होतो. निरोगी मनुष्याच्या डोळ्यावर अगदी थोडा प्रकाश टाकला तरी डोळ्यांत तीव्र वेदना उत्पन्न होतात. निरोगी मनुष्याच्या कानावर अनेक तोफांचा गडगडाट आला, तरी तो सोसणे शक्य होते परंतु कानाचा शोथ झाला असता अगदी लहान आवाज झाला तरी तो सोसवत नाही. ग्रस्त शरीरातील प्रत्येक इंद्रियांवर विशिष्ट संवेदनेचा वेदनोत्पादक परिणाम होत असतो परंतु निरोगी शरीरातील इंद्रियांवर त्याच संवेदनेचा परिणाम सुखकारक होत असतो. यावरून हे स्पष्ट होते की, ग्रस्त शरीरातील ऊतकाची प्रतिक्रिया त्या त्या संवेदना कमी असल्या तरी तीव्र परिणामकारी दिसून येतात. 

 

विषमचिकित्सा पद्धतीत विविध लक्षणे जसजशी उत्पन्न होतात तसतसे त्याच्यावर उपचार करण्यात येतात. उदा., प्रत्यावर्ती ज्वरास विषमचिकित्सक एक औषध वातासाठी, दुसरे मलावरोधासाठी तर तिसरे पोटातील वायू नाहीसा होण्यासाठी वापरतो. ही सर्व लक्षणे एकाच वेळी असल्यामुळे एकाच वेळी ३-४ औषधेही वापरावी लागतात. ही पद्धत अयुक्त आहे. कारण चिकित्सकाला विविध औषधांचा एकमेकांवर काय परिणाम होत असतो, याचे ज्ञान नसते. त्यामुळे कोणती लक्षणे रोगामुळे उत्पन्न झालेली व कोणती औषधामुळे उत्पन्न झालेली असतात, हे समजत नाही. 

 

समचिकित्सक मात्र औषध देताना रुग्णाच्या शरीराचा सर्वंकष विचार करूनच औषध देतो. तो रुग्णाची व्यक्तिगत प्रतिक्रिया आणि रोग यासर्वांचा साकल्याने विचार करूनच कोणते औषध द्यावे ते ठरवितो. त्या औषधाचा परिणाम निरोगी शरीरात रोगसदृश असाच असावा लागतो.ही पद्धत अगदी शास्त्रोक्त असून त्या चिकित्सकाला त्या त्या औषधाचेसंपूर्ण ज्ञान असते. कारण त्या औषधाचा प्रयोग निरोगी शरीरावर कसा होतो, हे त्याला पूर्णपणे माहीत असते.

 

भारत आणि होमिओपॅथी : होमिओपॅथीची ओळख भारताला पोर्तुगीजांनी करून दिली. भारतामध्ये आपले पाय घट्ट रोवण्याच्या हेतूने आलेल्या पोर्तुगीजांनी ग्रामीण भागातील जनतेला, जी आजार झाल्यानंतर पूर्वापार चालत आलेली झाडपाल्याची औषधे खात होती, त्यांना चवीने गोड, हळुवार व सौम्य अशी होमिओपॅथिक औषधे देऊन त्यांची मनेजिंकून घेतली. त्याचप्रमाणे ईस्ट इंडिया कंपनीमार्फत भारतात शिरलेल्या ब्रिटिशांनी देखील येथील स्थानिक लोकांना होमिओपॅथिक औषधेदेऊन मदतीचा हात दिला. अशा प्रकारे भारतात पोर्तुगीजांबरोबर आलेली होमिओपॅथिक उपचारपद्धती हळूहळू संपूर्ण देशात पसरली. 

 

भारतातील होमिओपॅथीचा विकास : महाराजा रणजित सिंग यांना होमिओपॅथिक उपचार देण्यासंबंधी जर्मन होमिओपॅथिक हॉनिगबर्गर यांनी लाहोरला भेट दिली (१८३९). सर्जन सॅम्युएल ब्रुकिंग यांनी दक्षिण भारतात होमिओपॅथिक रुग्णालय चालू केले (१८४६). होमिओपॅथिक रुग्णालय व मोफत दवाखाना कोलकाता येथे चालू करण्यात आला (१८५१). वैद्य सरकार यांनी होमिओपॅथीबद्दल पहिला लेख द कोलकाता जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये लिहिला (१८६२). सरकार हे ॲलोपॅथिक डॉक्टर होते. मात्र, त्यांनी होमिओपॅथीचा अभ्यास केला व उपचार दिले. भारतातील पहिली होमिओपॅथिक शिक्षणसंस्था द कोलकाता होमिओपॅथिक मेडिकल स्कूल ही मुजुमदार व रॉय यांनी स्थापन केली (१८८१). ऑल इंडिया होमिओपॅथिक मेडिकल ॲसोसिएशनची स्थापना युनान यांनीकोलकाता येथे केली (१९३२). बंगाल सरकारने होमिओपॅथीला सरकारी मान्यता दिली आणि सेंट्रल कौन्सिल ऑफ स्टेट फॅकल्टी ऑफ होमिओपॅथी स्थापन केली (१९४१). होमिओपॅथीबद्दलची माहिती जाणून घेण्यासाठी भारत सरकारने होमिओपॅथी चौकशी समिती नेमली (१९४८). भारत सरकारने होमिओपॅथिक बाबींबद्दल सल्ला देण्यासाठी समिती नेमली (१९५१). पश्चिम बंगाल हे राज्य भारतातील होमिओपॅथीचे मुख्य संस्थापक आहे. होमिओपॅथी भारतामध्ये रुजविण्यास पश्चिम बंगालचे योगदान मोठे आहे. बी. के. बोस, एम्. एल्. सरकार, पी. सी. मुजुमदार, कज्जीलाल, डी. डी. बॅनर्जी यांचे होमिओपॅथीच्या विकासात मोठे योगदान आहे. 

 

केशव लक्ष्मण दप्तरी यांनी त्या वेळच्या मध्य प्रांतात (मध्य प्रदेशात) होमिओपॅथी रुजविण्यासाठी मोठे काम केले. त्यांनी ‘मध्य प्रदेश होमि-ओपॅथिक अँड बायोकेमिक सिस्टिम ऑफ मेडिसिन ॲक्ट १९५२’ हा कायदा तयार करून तो मध्य प्रदेश सरकारकडून अथक परिश्रम करून मंजूर करून घेतला. याच कायद्यानुसार स्थापन झालेल्या बोर्डाची होमिओपॅथिक वैद्यांना कायदेशीर मान्यता मिळाली. दप्तरी या बोर्डाचे शेवटपर्यंत अध्यक्ष होते. १९५४ साली त्यांनी नागपूरला ‘नागपूर होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज’ स्थापन केले आणि त्याचे प्राचार्यपद त्यांनी विनावेतन सांभाळले. 

 

भारत सरकारने सेंट्रल कौन्सिल ऑफ होमिओपॅथीची नवी दिल्लीयेथे स्थापना केली. त्यांच्या अनुसार होमिओपॅथिक शिक्षण घेण्याचेअभ्यासक्रम (१) डीएचएमएस : पदविका प्रशिक्षण, कालावधी ४ वर्षे (२) बीएचएमएस : पदवी अभ्यासक्रम, कालावधी ५१/२ वर्षे. यांशिवाय मास्टर ऑफ डॉक्टरेट ही पदवी होमिओपॅथिक विषयांत मिळविता येते. 


 

होमिओपॅथिक शास्त्रामध्ये शरीररचनाशास्त्र, शरीरविकृतिविज्ञान, स्त्रीरोग-विज्ञान, प्रसूतिविज्ञान, रोगप्रतिबंधात्मक सामाजिक वैद्यक तसेच ऑर्गॅनन, होमिओपॅथिक फार्मसी, मटेरिया मेडिका इ. विषयांचा समावेश असतो. 

 

ऑर्गॅनन ऑफ रॅशनल मेडिसिन किंवा द ऑर्गॅनन ऑफ द हीलिंगआर्ट म्हणजे ऑर्गॅनन या पुस्तकात होमिओपॅथीची सर्व तत्त्वप्रणाली समाविष्ट असून हानेमान यांनी केलेल्या व्याख्यांचे, प्रयोगांचे, रोगांचे व आनुषंगिक गोष्टींचे तार्किक स्पष्टीकरण केलेले आहे. त्याच्या अभ्यासाने होमिओपॅथीचे स्वरूप व औषधपद्धतीचा रुग्णाशी असलेला संबंध यांचा उलगडा होतो. थोडक्यात ऑर्गॅनन हा ग्रंथ म्हणजे होमिओपॅथीची गीताच होय. 

 

होमिओपॅथिक फार्मसी म्हणजे समचिकित्सक औषध बनविण्याचेतंत्र होय. होमिओपॅथीची औषधे तयार करताना औषधाची सुप्त शक्ती ( पोटन्सी) प्रभावन पद्धतीमुळे कमालीची वाढते. ९८% शुद्ध मद्यार्कात ( अल्कोहॉलात) ताज्या वनस्पतीच्या अर्काचे दोन थेंब मिसळून बाटलीत ओतून व बूच लाऊन बाटली जोराने हलवून एका शक्तीचे औषध तयार होते. त्यानंतरची शक्ती एक थेंब शक्तीचा व ९९ थेंब मद्यार्काचे (अल्कोहॉलाचे) याप्रमाणे समलक्षणी औषधे तयार करतात. दर वेळी बाटलीत औषध ओतले की बाटलीस जोराने खाली-वर करून मिसळून घ्यायचे. अशा प्रकारे ३० शक्तीपर्यंत औषधे तयार करतात. दशांशपद्धतीत सुद्धा हीच पद्धत वापरतात परंतु या पद्धतीत औषधाचा एक भाग व माध्यमाचे (म्हणजेच मद्यार्क किंवा दुग्धशर्करेचे) नऊ भाग घेतात. दशांश पद्धतीत इंग्रजीतील X ही खूण औषधाच्या शक्तीची द्योतक आहे. उदा., 1X, 2X, 3X. 

 

होमिओपॅथिक मटेरिया मेडिका या विषयामध्ये होमिओपॅथिक औषधांची माहिती असते. रुग्णांच्या लक्षणानुसार समचिकित्सेच्या नियमावर होमिओ मटेरिया मेडिकाच्या साहाय्याने औषधे दिली जातात. 

 

होमिओपॅथीबद्दलचे समज-गैरसमज : (१) होमिओपॅथीने आजार बरा होण्यास वेळ लागतो, हा गैरसमज आहे. कारण ताप-थंडी, जुलाब किंवा अन्य कोणतेही अल्पमुदतीचे आजार होमिओपॅथीने १?३ दिवसांतच बरे होतात. जुनाट व गंभीर आजारांवर (उदा., उच्च रक्तदाब, मधुमेह, पक्षाघात, संधिवात इत्यादींवर) इतर वैद्यकीय उपचार पद्धतींमध्येही वर्षानुवर्षे किंवा आयुष्यभर औषधे घ्यावीच लागतात. होमिओपॅथीने या आजारांबरोबरच बाकीचे आजारही काही दिवसांच्या नियमित उपचाराने पूर्णपणे बरे होतात. त्यासाठी आयुष्यभर औषधे घ्यावी लागत नाहीत.(२) होमिओपॅथी म्हणजे घरगुती उपचारपद्धती आहे, अशीही काहीलोकांची चुकीची धारणा झालेली आहे. केवळ ‘होमिओ’ या शब्दामुळेतो गोंधळ आहे. होमिओ याचा अर्थ आहे समचिकित्सा. याचा घरगुती उपचारपद्धतीशी काहीही संबंध नाही. (३) लोकांमध्ये असणारा अजून एक गैरसमज म्हणजे एवढ्या लहान गोळ्यांनी एवढा मोठा आजार बरा कसा होणार? जुनाट दीर्घ आजारासाठी एका वेळी अनेक गोळ्या घेणाऱ्या किंवा घ्याव्या लागणाऱ्या रुग्णांच्या मानसिकतेमुळे हा गैरसमज आहे परंतु या छोट्या गोळ्यांमध्येच (सूक्ष्म मात्रेमध्येच) आजार पूर्णपणे बरा करण्याचे सामर्थ्य आहे. होमिओपॅथीमधील एक औषध जुनाट आजारांमध्ये ७ –४० दिवसांपर्यंत प्रभाव करत असते. (४) फक्त एक किंवा दोन थेंबांनीआजार बरा कसा होणार? हा सुद्धा एक चुकीचा समज लोकांमध्ये आहे. वास्तविक पाहता ८–१० थेंबांनी तेवढाच आराम पडतो, जेवढा १-२ थेंबांनी पडतो. होमिओपॅथिक औषध सूक्ष्म मात्रेमध्येच चांगले कामकरते. (५) होमिओपॅथीमध्ये सगळ्या आजारांवर एकसारख्याच गोळ्या दिल्या जातात, हा सुद्धा एक गैरसमज आहे. गोड गोळ्या सौम्य पद्धतीने औषध देण्याचे एक माध्यम आहे, त्यांमध्ये जे औषध टाकले जाते ते प्रत्येक रुग्णाच्या आजारानुसार वेगळे असते. होमिओपॅथीमध्ये व्यक्तीनिहाय तयार केलेली औषधे दिली जातात. ताप-थंडीची तक्रार असलेल्या दोन रुग्णांमध्ये सुद्धा एक औषध दिले जात नाही. सांधेदुखी, पचनाचे विकार किंवा इतर कोणत्याही तत्सम आजारामध्ये एखाद्या रुग्णाला ठराविकऔषधाने आराम मिळाला म्हणून तशाच आजाराच्या दुसऱ्या रुग्णाला ती ठराविक औषधे देता येत नाहीत. कारण व्यक्तीचे वय, प्रकृती, आजाराचा कल, कारणमीमांसा, आजाराची पूर्वीची माहिती इ. अनेक गोष्टी विचारात घेतल्याशिवाय रामबाण औषध दिले जाऊ शकत नाही. त्यामुळे एक-सारखेच औषध हा गैरसमज पूर्णपणे चुकीचा आहे. (६) होमिओपॅथीमध्ये खूप पथ्ये पाळावी लागतात. कांदा, लसूण, कॉफी, मांसाहार पूर्ण बंद करावा लागतो, हा एक गैरसमज आहे. काही ठराविक आजारांमध्ये मांसाहार बंद करण्याचा सल्ला होमिओपॅथिक वैद्य देतात. 

 

होमिओपॅथिक औषधे घेताना घ्यावयाची काळजी :(१) होमिओपॅथिक गोळ्यांना स्पर्श केला जात नाही. डबीच्या टोपणकिंवा बूचावर गोळ्या घेऊन जिभेवर टाकतात. यामुळे त्यातील सूक्ष्म औषधीचा अंश कमी होत नाही. (२) औषधे घ्यायच्या आधी आणिनंतर किमान १५?२० मिनिटे पाणी किंवा अन्नपदार्थ घेत नाहीत.(३) तंबाखू, गुटखा, मशेरी, मद्यपान यांचे सेवन होमिओपॅथिक उपचारा-दरम्यान पूर्णपणे बंद केले जाते. (४) काही ठराविक आजारांमध्ये मांसाहार बंद करावा लागतो. 

 

होमिओपॅथीचे फायदे : (१) हे दुष्परिणामविरहीत शास्त्र आहे. त्यामुळे अगदी लहान अर्भकापासून ते वयोवृद्धांपर्यंत होमिओपॅथी सुरक्षित-पणे वैद्यकीय सेवा देऊ शकते. (२) होमिओपॅथीतील औषध-सिद्धीकरण हे गिनीपिग, बेडूक किंवा उंदीर इ. प्राण्यांवर न करता निरोगी मनुष्यावरकेले जाते. त्यामुळे औषधांच्या शारीरिक लक्षणांबरोबरच मानसिक लक्षणे सुद्धा मिळतात. (३) औषधे घेण्यास सुटसुटीत असतात. (४) काही संभाव्य शस्त्रक्रिया उदा., मुतखडा, मूळव्याध, पित्ताशयातील खडे निश्चित-पणे टाळल्या जातात. कारण शस्त्रक्रिया करूनही हे आजार वारंवारउद्भवतच राहतात. होमिओपॅथिक उपचाराने हे आजार तर बरे होतातच परंतु शरीराची आजार होण्यामागे जी प्रवृत्ती किंवा कल असतो, ती प्रवृत्तीसुद्धा कमी होते. (५) होमिओपॅथिक उपचारपद्धतीमध्ये रुग्णाच्या पूर्ण शरीराचाविचार केला जातो. त्यामुळेच मुख्य लक्षणांसमवेत बाकीची छोटी-मोठी लक्षणे सुद्धा कमी होतात. होमिओपॅथीमध्ये रुग्णाला पूर्णपणे व कायमचेबरे करण्याचा उद्देश असतो. ॲलोपॅथिक उपचारपद्धतीप्रमाणे प्रत्येक वेगळ्या तक्रारीसाठी निरनिराळ्या डॉक्टरांना भेट देण्याची गरज भासत नाही.होमिओपॅथी शरीरातील प्रतिकारशक्ती चांगली ठेवण्यास मदत करतेआणि शरीर निरोगी व निकोप ठेवते.

 

होमिओपॅथीच्या मर्यादा : ज्या आजारांमध्ये किंवा अपघातामध्ये जीवनशक्ती खूपच अशक्त झालेली असते, अशा प्रकारामध्ये होमिओपॅथीला मर्यादा आहेत. उदा., सर्पदंश, कुत्र्याने केलेला दंश, जन्मजात दोष, पूर्णपणे विकसित झालेला कर्करोग, निकामी झालेला अवयव इत्यादी. ज्या ठिकाणी शस्त्रक्रिया करणे गरजेची आहे, असे आजार उदा., सांधा निखळणे, अतिरक्तस्राव, शरीरात घुसलेले बाह्य पदार्थ काढणे. 


 

सामाजिक आरोग्य आणि होमिओपॅथी : होमिओपॅथीचे सामाजिक आरोग्य राखण्यात फार महत्त्वाचे योगदान आहे. होमिओपॅथीच्या तत्त्वांनुसार होमिओपॅथी आजार किंवा नुसती लक्षणे न बरी करता, संपूर्ण मनुष्याला बरे करते. साकल्य दृष्टिकोन यानुसार माणूस म्हणून पूर्णतःत्याची सर्व शरीरसंस्था, मन, आरोग्य संतुलित करते. 

 

होमिओपॅथीनुसार आजार हे निव्वळ जंतुसंसर्ग, विषाणू, बुरशी यांनी होत नसून या सर्व गोष्टी निमित्तमात्र आहेत. आजार व्यक्तीतील प्रतिकारशक्तीच्या कमजोरीमुळे वा कमतरतेमुळे होतात. उदा., एकाच घरातील अनेक व्यक्तींना डेंग्यू, हिवताप वा चिकुनगुनिया यांसारख्या आजारांना कारणीभूत ठरणारे डास चावले तरी त्यांतील ज्यांची प्रतिकारशक्ती क्षीण व कमजोर असते, ते त्या आजारांना बळी पडतात. तसेच क्षयरोग हा मायकोबॅक्टिरियम ट्युबरक्युलॉसिस नावाच्या जंतुसंसर्गाने होतो आणि क्षयाची बाधा साध्या रुग्णाच्या शिंकेतून, थुंकीतून होऊ शकते, असे मानतो परंतु क्षयरुग्णाच्या शरीरात क्षयरोगकारक जंतू असतात आणि तेच जंतू इतरांच्या किंवात्याच्या अवतीभोवतीच्या व्यक्तीच्या शरीरात सुद्धा असतात. मात्र, जेव्हा व्यक्तीची प्रतिकारशक्ती क्षीण होते, तेव्हाच हे जंतू कार्यरत होऊन रोग निर्माण करतात. हे जंतू इतरांच्या शरीरात असूनही आजार निर्माण करू शकत नाहीत. कारण त्यांची प्रतिकारशक्ती क्षयरोगी रुग्णाच्या प्रतिकार-शक्तीपेक्षा सक्षम, मजबूत व निरोगी असते. होमिओपॅथी प्रतिकारशक्तीत सक्षम आणि मजबूत करण्याचे काम करते, शरीरातील बिघडलेले संतुलन राखण्याचे काम करते, म्हणजे समतोल साधण्याचे काम करते. 

 

गरोदर महिला व लहान मुले : गरोदर महिलांना अपत्य जन्मापूर्वी किंवा अपत्य संभवापूर्वी उभयतांना व्यवस्थित होमिओपॅथिक उपचारदिले असता, भविष्यात होणारे अपत्य निरोगी, निकोप व सुदृढ जन्माला येते. शिवाय गर्भधारणा होण्यापूर्वी मिळालेल्या उपचारांमुळे भविष्यातहोणारे जन्मजात दोष, व्यंग व अपंगत्व टाळणे शक्य होते. त्यामुळेसुद्धा सामाजिक आरोग्य राखले जाऊ शकते. गरोदर महिलांना त्यांच्या गरोदरपणातील त्रास टाळण्यासाठी होमिओपॅथी महत्त्वपूर्ण ठरू शकते.निरोगी व निकोप आई सुदृढ व चांगल्या अपत्याला जन्माला घालूनसामाजिक आरोग्य राखू शकते. स्त्रियांना पोषणाच्या तक्रारी असतील, तर त्या दूर करता येऊ शकतात. संसर्गजन्य आजारांना होमिओपॅथीने आळा घालता येऊ शकतो. 

 

आनुवंशिक आजार जसे मुकबधिरपणा, अंधत्व, जन्मजात हृदयविकार, मतिमंदत्व आदी लहान मुलांमधील जन्मजात दोष होमिओपॅथिक उपचारांनी टाळता येऊ शकतात. विकारांचे प्रमाण कमी करता येऊ शकते. आनु-वंशिकीमध्ये सुद्धा होमिओपॅथीचा वापर केल्याने संभाव्य दुर्घटना वा आजार टाळता येऊ शकतात. 

 

मानसिक आरोग्य : होमिओपॅथीच्या उपचार पद्धतीत शरीराबरोबर मन, भावना, विचार यांना महत्त्व दिले जाते. त्यामुळे होमिओपॅथीची औषधे मनोरुग्णांवर उपचार करताना प्रभावी ठरतात. होमिओपॅथीच्या औषधांचेगुण सिद्ध करताना ते निरोगी मनुष्यावर केलेले असल्याने औषधांमुळेनिर्माण होणाऱ्या भावना व मानसिक अवस्था यांचा अभ्यास यात असतो. त्यामुळे तीच औषधे, तशाच प्रकारच्या भावना व लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर औषधे रामबाण उपाय ठरतात. 

 

क्षयरोग व कुष्ठरोग : होमिओपॅथीच्या औषधप्रणालीने क्षयरोग व कुष्ठरोगांमध्ये सुद्धा चांगले यश मिळविले आहे. काही ठिकाणी जसे मल्टी ड्रग रेझिस्टन्स आणि टीबी (टोटल ड्रग रेझिस्टन्स ट्युबरक्युलॉसिस) सारख्या अवस्थांमध्ये जिथे ॲलोपॅथीची व सध्या प्रचलित उपचारपद्धतीची औषधे फोल ठरतात, त्या ठिकाणी होमिओपॅथीने क्षयरोग पूर्ण बरा होऊ शकतो. कुष्ठरोग होमिओपॅथीने लवकर व सुटसुटीतपणे बरा होऊ शकतो. 

 

कर्करोग : कर्करोगात होमिओपॅथिक उपचार वेळेवर मिळाले तर, पूर्वावस्थांमध्ये यशस्वी रीत्या कर्करोगाचा धोका टाळता येऊ शकतो. वेळेवर व लवकर अचूक निदान झाल्यास होमिओपॅथी उपचारांद्वारा कर्करोग पूर्ण बरा होऊ शकतो. होमिओपॅथीमुळे कर्करुग्णातील आजाराचे स्थलांतरण बऱ्यापैकी टाळले जाऊ शकते. 

 

एड्स : एड्स ही सामाजिक आरोग्य बिघडविणारी वाढती समस्या आहे. होमिओपॅथीच्या उपचारांनी एड्स रुग्णांवर खूप चांगले व प्रभावशाली उपचार होतात. एड्स रुग्णांमध्ये एचआयव्ही विषाणू हा प्रतिकारशक्ती क्षीण करीत असतो. त्यामुळे रुग्ण छोट्या-मोठ्या आजारांना बळी पडतो ( उदा., क्षयरोग) . एड्स रुग्णांना झालेले छोटे-मोठे आजार लवकर बरेहोत नाहीत परंतु होमिओपॅथीमुळे रोगप्रतिकारकशक्तीमध्ये सुधारणाहोत असल्याने रुग्णांचे छोटे-मोठे आजार बरे होऊन रुग्णाचे आर्युमानवाढू शकते. 

 

साथीचे आजार : संसर्गजन्य आजारांमध्ये होमिओपॅथी फार प्रभावी ठरते. गॅस्ट्रो, सोरायसीस, कावीळ असे दूषित पाण्यांमुळे होणारे आजार, डासांमुळे येणारा ताप यांसारख्या साथीच्या आजारांमध्ये होमिओपॅथीप्रभावी ठरते. अशा आजारांमध्ये होमिओपॅथीच्या रुग्ण तपासणी-चिकित्सेला जरी वेळ कमी मिळत असला, तरी विशिष्ट भागात पसरलेल्या साथीमध्ये काही रुग्णांची तपासणी करून एका औषधावर आजाराची साथ आटोक्यात आणता येते. अशा साथीच्या आजारांमध्ये होमिओपॅथी प्रतिबंधात्मकउपचार करू शकते. 

 

पर्यावरण आणि होमिओपॅथी : पर्यावरण व वातावरण बिघडविणाऱ्या प्रदूषणासारख्या गोष्टींना होमिओपॅथीमुळे आळा घातलाजाऊ शकतो. निसर्गात प्रदूषण मुख्यतः (१) किरणोत्सर्ग (भेदक कण वा किरण उत्सर्जनाची क्रिया), (२) जैविक द्रव्ये व (३) रासायनिकद्रव्ये या तीन गोष्टींमुळे होते. 

 

किरणोत्सर्ग : किरणोत्सर्गामुळे होणारे प्रदूषण हे मुख्यतः आण्विक चाचण्यांमुळे वा आण्विक अपघातांमुळे होत असते. किरणोत्सर्गामुळे होणारे दुष्परिणाम फार धोकादायक असून बराच काळ व बरीच वर्षे पुढील पिढ्यांवर विपरीत परिणाम करणारे ठरतात. किरणोत्सर्गातून निर्माण होणारी ऊर्जा प्रचंड असते. किरणोत्सर्ग कमी प्रमाणात असला, तरी त्यातील संसर्गाची क्षमता मोठ्या प्रमाणावर असते. किरणोत्सर्गाचे दुष्परिणामशरीरावर तसेच जनुकांवर, गर्भावर आणि पुढील पिढ्यांवर होऊ शकतात. होमिओपॅथीमध्ये किरणोत्सर्गाचा प्रभाव, दुष्परिणाम कमी करणारी चांगली औषधे उपलब्ध आहेत. किरणोत्सर्गाचा प्रभाव असलेल्या ठिकाणी होमिओपॅथीची औषधे गर्भधारणा होण्यापूर्वी व गर्भधारणा झाल्यावर दिली असता किरणोत्सर्गामुळे होणारे विकार व दुष्परिणाम टाळता येऊन पुढील पिढ्या निरोगी व निकोप जन्माला येऊ शकतात. 


 

जैविक प्रदूषण : स्वाइन फ्ल्यू व बर्डफ्ल्यू यांसारख्या साथी तसेच सार्ससारखे आजार झपाट्याने पसरून संपूर्ण जागतिक आरोग्य धोक्यात आणतात. होमिओपॅथीची औषधे ही मनुष्यप्राण्यांबरोबर पक्षी, प्राणी, वनस्पतींसारख्या सजीवांवर परिणामकारक ठरतात. त्यामुळे बर्डफ्ल्यू-सारख्या आजारांना आटोक्यात आणले जाऊ शकते. होमिओपॅथीच्या औषधांमुळे गरीब व गरजू अशा रुग्णांना अशा प्रकारच्या साथीमध्येमहागड्या व दुर्मिळ अशा औषधांवर विसंबून न राहता स्वस्तात इलाज करता येतो. 

 

रासायनिक प्रदूषण : वाहनांमुळे निर्माण होणारे कार्बन मोनॉक्साइड, नायट्रोजन डाय-ऑक्साइड यांसारखे धोकादायक वायू, रासायनिकखते, रासायनिक कंपन्या तसेच विविध कारखाने यांमुळे निर्माण होणारे प्रदूषण हे रासायनिक प्रदूषणाला कारणीभूत ठरतात. त्यांमुळे श्वसनमार्गाचे आजार, दमा, हृदयाचे विकार, कर्करोग व रक्तांचे आजार पसरले जातात. कारखान्यातील कामगारांमधील सिलिकॉसिस, जस्ताच्या उत्सर्जनाने होणारे आजार, ॲस्बेस्टॉसिससारखे आजार तसेच दमा हे होमिओपॅथीमुळे अगदी पूर्णपणे खात्रीने बरे होऊ शकतात.

 

नवीन औषधांचे सिद्धीकरण : अलीकडे ॲलोपॅथीतील प्रतिजैव( अँटिबायॉटिक) पदार्थ, स्टेरॉइडे व आधुनिक ॲलोपॅथिक औषधे यांचे होमिओपॅथीच्या पद्धतीने प्रभावन आणि इतर प्रक्रियांनी ही औषधे होमिओ-पॅथिक औषधांमध्ये रूपांतरित करतात. ही औषधे असाध्य व अतिऔषधाने निर्माण झालेल्या आजारांवर तसेच हट्टी, चिवट व दीर्घ आजारांवर व स्टेरॉइडे अवलंबित आजारांवर प्रभावी ठरतात. उदा., क्लोरॅमफिनिकॉल हे औषध तापांवर गुणकारी ठरते. स्ट्रेप्टोमायसीन हे प्रतिजैविक भोवळ ( घेरी) यावर प्रभावन स्वरूपात वापरल्यास परिणामकारक ठरते. 

 

सार्कोडे आणि नोसोडे यांचे सिद्धीकरण व पुनर्सिद्धीकरण करतात. होमिओपॅथीमध्ये काही नोसोडे रुग्णांच्या दूषित, बाधित भाग व स्रावापासून बनवितात. सार्कोडे नैसर्गिक स्रावांपासून व भागांपासून प्रक्रिया करून बनविलेली असतात. ही औषधे फार जुनाट, किचकट व असाध्यआजारांवर उपयोगी ठरतात परंतु त्या औषधांचे होमिओपॅथीच्यातत्त्वानुसार परिपूर्ण सिद्धीकरण केलेले नसल्याने वापरता येत नाहीत.त्यामुळे त्यांचा वापर मर्यादित स्वरूपातच करता येतो.

 

संशोधन : प्रतिरक्षावैज्ञानिक संशोधन : या संशोधनासाठी प्रत्यक्ष रुग्णाचा प्रतिरक्षावैज्ञानिक अभ्यास आणि निरोगी व्यक्तीची तपासणी ही औषधे देण्यापूर्वी, औषधे देताना आणि औषधे दिल्यानंतर करणेजरूरीचे असते. 

 

होमिओपॅथीच्या औषधांत आजारांना प्रतिबंध करण्याची क्षमता असते, हे सिद्ध झालेले असले, तरी शास्त्रीय संशोधनात व संख्यात्मक परिणामांवर ही औषधे रोगप्रतिकार संस्थेत काय बदल घडवितात, हे सिद्ध केलेपाहिजे. होमिओपॅथीच्या औषधांमुळे संसर्गजनिक आजार बरे होतात, म्हणजे रक्तात प्रतिजैव पदार्थ निर्माण करून प्रथिनांवर परिणाम करतात. होमिओपॅथीची शुद्धीकरण व सिद्ध केलेली औषधे जंतूंना प्रत्यक्ष रीत्यान मारता ते प्रतिकारशक्तीला प्रेरणा देऊन तो आजार बरा करतात. 

 

मानसिक आजारांवर वैद्यकीय संशोधन : होमिओपॅथी उपचारपद्धती मनोरुग्णांमध्ये व मानसिक आजारांमध्ये प्रभावी ठरू शकते. मानसिकरुग्णांमध्ये येणारे होमिओपॅथीचे चांगले परिणाम हे निवळ त्या एकांगी होमिओपॅथिक तज्ञांच्या प्रयत्नांमुळे होतात आणि ते संख्यात्मक विश्लेषण करण्याइतके सिद्ध केलेले नाहीत. होमिओपॅथीची स्वतंत्र मनोरुग्णालये नसल्या-मुळे त्या रुग्णांचा परिपूर्ण अभ्यास करता येत नाही. अशा रुग्णांमध्ये योग्य औषधे शोधणे अवघड असते. कारण रुग्णाची योग्य चिकित्सा करता येत नाही. या संशोधनासाठी होमिओपॅथीची सुसज्ज व सहज उपलब्ध होतील अशी मनोरुग्णालये आणि दवाखाने असणे गरजेचे आहे. 

 

औषधमात्रांचे संशोधन : औषधाची मात्रा किती असावी हा अजून होमिओपॅथीत प्रश्नच आहे. अचूक आणि योग्य औषधाची मात्रा योग्य व बरोबर नसेल तर औषधाची मात्रा किती असावी यासाठी रुग्णाची अधिग्रहण-क्षमता व परिणाम करून घेण्याची क्षमता महत्त्वाची असते परंतु तसे मोजमाप करण्यासाठी यंत्र किंवा तंत्र नाही. यात फक्त होमिओपॅथिकतज्ञाचा अभ्यास, ज्ञान व अनुभव कामी येतो. व्यक्तिनिहाय प्रत्येकात वेगळे-पणा आढळतो. त्यामुळे पूर्ण समाधानकारक मात्रा निश्चित करता येत नाही. औषधमात्रा किती असावी हे ठरविण्यासाठी मूलभूत संशोधन होणे गरजेचे आहे. तसेच कोणत्या रोगावर किती शक्तीचे (पोटन्सीचे) औषध द्यावे, हे ठरविण्यासाठी समचिकित्सक तज्ञाचा अभ्यास, ज्ञान व अनुभव उपयोगी ठरतो. ताप, रक्तदाब, अतिसार, नाडी इ. लक्षणांची तीव्रता उपकरणांनी मोजता किंवा ओळखता येते आणि त्या प्रमाणात उच्च वा कमी शक्तीचे औषध व त्याची मात्रा ठरविता येते परंतु इतर चिरकारी रोगांत व्यक्तिपरत्वे प्रत्येक रुग्णाच्या सहनशक्तीच्या भिन्नतेमुळे त्यांच्या सांगण्यावरून लक्षणांची किंवा रोगाची तीव्रता ठरविता येत नाही. अशा वेळी त्या कुटुंबाच्या नेहमीच्या डॉक्टरची गरज पडते. कारण त्याला त्या रुग्णाचा स्वभाव व त्याची एकूणच कौटुंबिक परिस्थिती माहीत असते. त्यामुळे तो औषधाची शक्ती व मात्रा ठरवू शकतो. अर्थात, यासाठीही मूलभूत तसेच यंत्रोपकरणाविषयी संशोधन होणे गरजेचे आहे. 

 

पहा : औषधनिर्मिति औषधिक्रियाविज्ञान चिकित्साशास्त्र दप्तरी, केशवलक्ष्मण बाराक्षार चिकित्सा वैद्यक हानेमान, (क्रिस्टिआन फीड्रिख) झामूएल. 

 

परांजपे, मो. ना. सोनावणे, पवनकुमार