होफ्मान, एर्न्स्ट टेओडोर आमाडेउस : (२४ जानेवारी १७७६–२५ जून १८२२). जर्मन साहित्यिक, संगीतकार आणि चित्रकार. जन्म केनिंग्झबर्ग, प्रशिया (आता कालिनीनग्राड, रशिया) येथे. एका उद्ध्वस्त कुटुंबातून तो आलेला होता. त्याच्या चुलत्यांनी त्याचा सांभाळ केला होता. कायद्याचे शिक्षण घेतल्यानंतर १८०० मध्ये प्रशियन कायदा अधिकारी म्हणून पोलिश प्रांतांत त्याची नेमणूक झाली तथापि नेपोलियनने १८०६ मध्ये प्रशियाचा पराभव केल्यानंतर तेथील नोकरशाही बरखास्त झाली. त्यामुळे त्याचे पदही गेले. होफ्मानला संगीतात विशेष रस होता. त्यामुळे तो संगीतरचनांकडे वळला. तसेच संगीताच्या क्षेत्रात वाद्यवृंदासमोर वा गायकवृंदासमोर उभा राहून त्यांच्या सादरीकरणाचा मार्गदर्शक, नाट्यसंगीत दिग्दर्शक, संगीत समीक्षक अशा विविध भूमिका त्याने पार पाडल्या. विख्यात संगीतकार ⇨ व्होल्फगांग आमाडेउस मोट्सार्ट ह्याच्याबद्दल त्याला फार आदर होता. तो प्रकट करण्यासाठी एर्न्स्ट टेओडोर व्हिल्हेल्म ह्या आपल्या नावात विल्हेर्ल्मऐवजी आमाडेउस ह्या नावाचा अंतर्भाव त्याने केला.
फांटाझस्टियुक … (४ भाग, १८१४-१५, इं. शी. ‘फँटसी पिसेस इन द स्टाइल ऑफ कॅलट’) ह्या नावाने लिहिलेल्या कल्पनाविलासाधिष्ठित कथांनी साहित्यिक म्हणून त्याला कीर्ती मिळाली. डी एलिक्झिअर डेस टॉयफेल्स (२ खंड, १८१५-१६, इं. शी. ‘द डेव्हिल्स एलिक्झिर्स ‘) आणि ‘द लाइफ अँड ओपिनिअन्स ऑफ केटर मुर विथ ए फ्रॅगमेंटरी बायोग्रफी ऑफ कंडक्टर योहान्नीज क्रेस्लर’ (२ भाग, १८२०–२२, इं. शी.) ह्या त्याच्या दोन कादंबऱ्या तसेच त्याच्या मृत्यूपूर्वी पन्नासांहून अधिक कथा त्याने लिहिल्या. आपल्या उपजीविकेसाठी बर्लिनमध्ये कायदेविषयक अधिकारी म्हणून तो काम करीत होता.
नाख्टष्युक (२ भाग, १८१७, इं. भा. होफ्मान्स स्ट्रेंज स्टोरीज) आणि द सेरापिअन ब्रेदर्न (१८१९–२१, इं. भा.) हे त्याचे दोनकथासंग्रह इंग्लंड आणि अमेरिका ह्या देशांत लोकप्रिय झाले होते.विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात त्याच्या कथा सतत प्रकाशित होत राहिल्या, ही वस्तुस्थिती त्याच्या लोकप्रियतेची साक्ष होय.
होफ्मानच्या कथांमधून अतिमानुष आणि दुष्ट व्यक्ती माणसांच्या जीवनांतून येत-जात असतात. स्वच्छंदी कल्पनाशक्ती व मानवी स्वभावाची आणि मानसिकतेची वेधक चिकित्सा ह्यांची कौशल्यपूर्ण गुंफण त्याने आपल्या कथांतून केली. त्यामुळे त्याच्या कथांतील वेडसर माणसे, समंध ह्यांतून निर्माण होणारे अनोखे, भयकारी आणि गूढ वातावरण त्याला नेमक्या, वास्तववादी निवेदनशैलीत पकडता आलेले आहे. तो एक संवेदनशील संगीतसमीक्षकही होता. मोट्सार्टखेरीज बेथोव्हन, बाख ह्या संगीतकारांबद्दलही त्याला आदर होता.
बर्लिन येथे तो निधन पावला.
गुडेकर, विजया म.
“