हो : भारतातील एक आदिम जमात. एके काळी ते कोल व लारका कोल म्हणून ज्ञात होते. हो हे नाव होरो (मनुष्य) या शब्दाचे आकुंचन होऊन बनले असावे. ही जमात प्रामुख्याने सिंगभूम जिल्ह्यात (झारखंड) आढळते. शिवाय बिहार, ओडिशा व प. बंगाल या राज्यांतही त्यांची तुरळक वस्ती आहे. त्यांची एकत्रित लोकसंख्या (झारखंड व ओडिशा राज्यांची मिळून) सु. ९,००,००० होती (२०११). सिंगभूमजिल्ह्यातील त्यांनी व्यापलेले क्षेत्र १८६ ⇨ ९६ चौ. किमी. असून त्या प्रदेशाला कोल्हान म्हणतात. हे लोक मुंडांप्रमाणेच छोटा नागपूरहून येथे येऊन स्थायिक झाले, असे त्यांच्या आख्यायिकांवरून समजते. ⇨ हो भाषा ही या लोकांची स्वतंत्र बोलीभाषा आहे. ते झारखंड व बिहार-मध्ये संथाळांच्या खालोखाल स्वभाषेतच व्यवहार करतात. प्रदेशपरत्वेते हिंदी, बंगाली व ओडिया या भाषा व्यवहारात वापरतात. हे लोकबुटके, लंबकपाळाचे, लंबवर्तुळाकार चेहऱ्याचे व बसक्या नाकाचे आहेत. ते पूर्णतः मांसाहारी असून रानडुकराचे मांस ते आवडीने खातात मात्र भात हे त्यांचे मुख्य अन्न आहे. मूग, तूर, उडीद, कुळीथ व मसूर या कडधान्यांचे ते कालवण करतात. शिजविण्यासाठी मोहरीचे व एक विशिष्ट (रेप-सीड) तेल वापरतात.
हो जमातीची अनेक बहिर्विवाही देवक कुळींत (किली) विभागणी झालेली आहे. त्यांची उपशाखा नाही. सबंध जमात एकसंध आहे. त्यांच्या काही कुळी अशा : अलरू, ऐरू, अंगारिया, बबंगा, बंदी, बंसा, बरपाई, बिरूआ, बोद्रू, बुरैली, बुरी सामत, चकी दुकरी, चम्पिया तुबीर, छत्र तुइऊ, चोराई, एचाघाटू, एम्बोरो गागरिया, गतसोरा, हाइबोरू, लांगी, हंसदा, हेम्बारान, हेसा, होने-होगा, जामुलू, जंकु-सामराई, कालुंदिया, किसकू, कोरा, लोगारी, मुरमू, लमामाका, मरली इत्यादी.
वयात आलेल्या मुलामुलींची लग्ने परस्परांच्या विचाराने होतात. जमातीत एकपत्नीत्व असूनही क्वचित काही द्विभार्या उदाहरणे आढळतात. वधूमूल्य दिले जाते. लग्नानंतर मुलगी मुलाच्या पितृगृही जाते. घटस्फोटास जमातीत संमती असून घटस्फोटित स्त्री-पुरुष, विधवा, विधुर यांना पुनर्विवाह करता येतो. मृत पत्नीच्या धाकट्या बहिणीशी किंवा ज्येष्ठ भावाच्या विधवा पत्नीशी विवाह करता येतो. जमातीत बीजकुटुंब आणि संयुक्त कुटुंब पद्धती असून सर्व मुलांत वडिलार्जित संपत्ती सारखी वाटली जाते मात्र ज्येष्ठ मुलाकडे कुटुंबाचे अधिकार येतात. जमातीतील महिला कुटुंबाच्या उत्पन्नात भर घालतात आणि आर्थिक व्यवहारही सांभाळतात. स्त्री बाळंत झाल्यानंतर नऊ दिवस सोयर पाळतात आणि दहाव्या दिवशी बाळाचे जावळ (चटिया) काढतात.
शेती हा हो जमातीचा मुख्य व्यवसाय असून काही लोक कारखान्यांतून नोकरी करतात. जंगलातील लाकूडफाटा गोळा करून तो विकतात, क्वचित मासेमारी करतात आणि तांदळापासून बनविलेली बीअर विकतात. यांशिवाय पशुपालन (विशेषतः ते डुकरे पाळतात) करतात. कुक्कुट-पालनही त्यांना आवडते. मोलमजुरीही काही लोक करतात. जमशेटपूर- सारख्या गावी असलेल्या कारखान्यांतून व लोहखाणींमधून ते काम करतात. त्यांच्या ग्रामसभेचा मुख्य मुंडा ज्ञातीतील असून त्याच्याकडे न्यायिक व प्रशासकीय अधिकार असतात. मंकीनामक प्रमुख अधिकारी अनेक खेड्यांमधील भांडण-तंटे मिटवितो. मुंडा आणि मंकी ही आनुवंशिक पदे होत.
लग्न ठरले की, मुक्रर केलेल्या दिवशी वधूला वराच्या गावी नेतात. तेथे नृत्य, मद्यपान व खाणेही होते. त्यानंतर वधू व वर एकमेकांना मद्याचे प्याले देतात. या उष्टावलेल्या मद्यामुळे त्यांच्या किली ऊर्फ कुळी भिन्न न राहता एक होतात. हाच त्यांचा विवाहविधी असतो. तीन दिवस सासरी राहिल्यावर वधू पळून जाते. तिचा नवरा तिला धुंडाळीत फिरतो. मग ती सापडली की, तिला बळजबरीने पकडून तो आपल्या घरी आणतो. हाविधी झाला की, त्यांचे वैवाहिक जीवन निर्वेधपणे सुरू होते.
हो पारंपरिक जमात-धर्म पाळतात. त्यांपैकी फार थोडे हिंदू धर्मीय आहेत. त्यांच्यात सु. सात सण असून त्यांना परब म्हणतात. या वेळी तांदळापासून केलेली दारू (इली) आवश्यक असते. सर्वांत मोठा सण माघ परब अगर देसौली बोंगा हा होय. या वेळी स्त्री-पुरुष उत्तान नाच करतात व स्वैरपणे वागतात. देसौली देवतेला एक कोंबडा व दोन कोंबड्या बळी देतात. बळीचा विधी गावाचा पुजारी करतो. या विधीमुळे रोगराई नष्टहोते, असा त्यांचा समज आहे. दुसरा बाह बोंगा हा फुलांचा सण असून तो चैत्रात साजरा करतात. दमुराईनामक सणाच्या वेळी भाताची पहिली पेरणी करतात. पितरांच्या नावाने या वेळी कोंबडा बळी देतात. हिरा बोंगा सणाला मुंडा हरिहर म्हणतात. अंगणात मेलवा (बिब्बा) झाडाची डहाळी खोचून तिला कोंबडा बळी देतात व मद्य अर्पण करतात. बहतौली बोंगा, जुम-नामा आणि कलम बोंगा इ. सण भातशेतीशी निगडित असून कलम बोंगा या सणाच्या वेळी भाताची पूजा करून मरांग बुरू या देवाला बळी देतात. प्रत्येक दुसऱ्या वर्षी कोंबडा, तिसऱ्या वर्षी मेंढा व चवथ्या वर्षी रेडा असे हे बलिदान चालते.
हो जमातीत देवऋषीला सोखा म्हणतात. चेटूक व रोगराई यांच्यावर मंत्र घालून तो उतारा करतो. भूतबाधादेखील तो काढू शकतो, अशी त्यांची समजूत आहे. ते मर्तिकाच्या विधीला फार महत्त्व देतात. मृताचा विशेष सन्मान ते करतात. हो व खासी यांच्या मर्तिकाच्या विधींत बरेच साम्य आढळते. ते एक भक्कम शिबिका (पालखी) करतात. ती लाकडांच्या चितेवर ठेवतात. मृताचे सर्व कपडे, दागदागिने, हत्यारे-पात्यारे त्या पालखीत ठेवतात आणि मग त्या चितेला अग्नी देतात. क्वचित मृताला पुरतात व त्या ठिकाणी त्याच्या नावाने पाषाणस्तंभ (निसान) उभारतात. हे वीरगळ हो, मुंडा वगैरे जमातींच्या गावांत नेहमी दिसतात. नवव्या व दहाव्या दिवशी अन्य विधीसंदर्भातील दिवस पाळतात. हो जमातीतील लोक मुंडांच्या निकट संपर्कात होते. एवढेच नव्हे, तर ते त्यांच्यात मिसळलेही होते कारण त्यांच्यात मुंडांच्या अनेक सामाजिक संघटना व चालीरीती आढळतात. त्यांपैकीच त्यांची मुला-मुलींची युवागृहे (धुमकुरिआ) असून ग्रामपंचायतीत त्यांच्या जमातीचाच सरपंच असे. शिवाय त्या दोघांची मिळून अर्धप्रशासकीय लष्करी संघटना होती. या संघटनेने प्रथम १८३१ मध्ये ब्रिटिशांबरोबर यशस्वी संघर्ष केला पण नंतर त्यांच्याशी समझोता करून त्यांनी आपल्या जमिनी शासकीय व्यवस्थेसाठी हस्तांतरित केल्या.
ओडिशातील हो कोल्हाण प्रदेशातून आलेले असून त्यांचे विभाजन चाओ, बिखार, रामगंजिआ, कोल्हाण इ. समूहांत झाले आहे. त्यांना कोल्ह म्हणतात. त्यांच्यात अनेक बहिर्विवाही कुळी असून सिंगभूममधील होप्रमाणेच विवाहविधी होतो. लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून काही जण मोलमजुरी, कुक्कुटपालन व अन्य व्यवसाय करतात मात्र त्यांच्या धर्मात जडप्राणवाद व हिंदू धर्म यांची सरमिसळ आढळते. ते जमातीच्या ठाकुराणी आणि मरंग-बोंगा या देवता भजतात. याशिवाय ग्रामसिन, बराम व बसुकी ह्या ग्रामदेवता वसुमाता व सिंग बोंगा या प्रादेशिक देवता आणि लक्ष्मी, सरस्वती या हिंदू देवता यांना ते पुजतात.
मिदनापूर (प. बंगाल) मधील हो हे मुख्यत्वे चहाच्या मळ्यात काम करतात. शंखाच्या बांगड्या आणि कुंकवाचा टिळा ही विवाहित स्त्रीची सौभाग्य लक्षणे मानतात. बाळंतीण २१ दिवस सोयर पाळते. लग्नापूर्वी मुली सिंग बोंग देवतेची पूजा करतात आणि कोंबड्याचा बळी देतात. शेती हा त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे. काहीजण रिक्षा चालवितात. शिवाय शेतमजूर म्हणूनही ते काम करतात. ते हिंदू धर्माचे अनुयायी आहेत.
संदर्भ : 1. Bhavhani, Enakshi, Folk and Tribal Designs of India, Bombay, 1974.
2. Mishra, K. K. Social Structure and Change Among The Ho of Orissa, Delhi, 1987.
भागवत, दुर्गा
“