हेस्टिंग्ज, वॉरन : (६ डिसेंबर १७३२–२२ ऑगस्ट १८१८). ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा पहिला गव्हर्नर जनरल व एक कार्यक्षम प्रशासक. त्याचा जन्म डैल्सफर्डजवळच्या चर्चिल या खेड्यात एका सामान्य कुटुंबात झाला. त्याचे वडील पेनिस्टन हे एका लहान पॅरिशचे (परगणा) धर्मोपदेशक होते. त्यांच्या आकस्मिक मृत्यूनंतर हाऊवर्ड हेस्टिंग्ज या त्याच्या काकांनी त्याचे शिक्षण व संवर्धन केले पण काकांच्या मृत्यूने त्याचे उच्च शिक्षण खंडित झाले. त्यानंतर वेस्टमिन्स्टर स्कूल (लंडन) मधून त्याने शिक्षण घेतले. एडवर्ड गिबन, कवी विल्यम कॉपर हे त्याचे वर्गबंधू होते.१७५० मध्ये ईस्ट इंडिया कंपनीत कारकून म्हणून तो चाकरीस लागला. लवकरच त्याला हिंदुस्थानात बंगालमध्ये पाठविण्यात आले. त्याची कासिमबाझार येथे नियुक्ती करण्यात आली (१७५३). तेथील वास्तव्यात त्याने फार्सी, बंगाली आणि ऊर्दू या भाषा व एतद्देशीय रीतिरिवाजांचे ज्ञान प्राप्त करून घेतले. कंपनीने त्याची एका व्यापारपेढीवर व्यवस्थापक म्हणून नियुक्ती केली. त्याने कलकत्ता घेण्यासाठी लॉर्ड रॉबर्ट क्लाइव्हबरोबर युद्धात भाग घेतला (१७५६). त्यानंतर त्याची बंगालच्या वखारीत (फॅक्टरी) रेसिडेन्ट म्हणून निवड झाली (१७५७). तेथील कार्यक्षम कामगिरीमुळे कलकत्त्याच्या मंडळात तो प्रविष्ट झाला (१७६१) तथापि तेथील भ्रष्टाचार व गैरकारभार यांमुळे त्याने आपल्या मंडळाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन तो इंग्लंडला परतला (१७६४). पुन्हा त्याची ईस्ट इंडिया कंपनीने १७६९ मध्ये मद्रास येथील काउन्सिलवर नेमणूक केली. त्याच्या कर्तृत्वाचा विचार करून त्यास बंगालचा गव्हर्नर नेमले (१७७१) आणि पुढे गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया या उच्च पदावर त्याची नियुक्ती झाली (१७७४). तत्पूर्वी १७७३ मध्ये ब्रिटिश संसदेने रेग्युलेटिंग ॲक्ट संमत करून बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल हा हुद्दा देऊन त्याचा अधिकार मुंबई-मद्रास येथील गव्हर्नरांवर निश्चित केला आणि त्याच्या मदतीस चार ब्रिटिश सदस्यांचे मंडळ दिले. त्यामुळे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या शासनव्यवस्थेला वैधानिक स्वरूप प्राप्त झाले.
गव्हर्नर जनरल झाल्यानंतर हेस्टिंग्जने बंगालमधील दिवाणी वसुलाचे अधिकार कंपनीकडे सोपविले व इतर वसुली करणाऱ्या मध्यस्थ दलालांना या कामगिरीवरून काढून टाकले. तसेच मीर जाफर याचा तनखा निम्याने कमी करून कंपनीच्या खर्चात काटकसर केली. दिल्लीच्या शाहआलम बादशाहची तो मराठ्यांच्या आधिपत्याखाली गेल्यामुळे वार्षिक खंडणी स्थगित केली. तसेच खंडणीसंबंधाने असलेले अलाहाबाद व कोरा हे प्रांत अयोध्येच्या नवाबास पन्नास लक्ष रुपयांस विकले (१७७३). त्याने बंगाल प्रांतातील जमिनीचा महसूल पाच वर्षांच्या मक्तेदारी पद्धतीने कायम केला. मुलकी आणि सैनिकी खात्यांची पुनर्रचना करून जिल्हाधिका-ऱ्यांच्या नेमणुका केल्या. तसेच दिवाणी व फौजदारी न्यायालयांची स्थापना केली आणि कंपनीच्या राज्यव्यवस्थेचा पाया भरभक्कम करून त्याने पुढील ब्रिटिश राज्यकर्त्यांचा मार्ग अत्यंत सुकर केला.
हेस्टिंग्ज हा दीर्घद्वेषी स्वभावाचा असल्यामुळे त्याच्या व काउन्सिल-मधील सभासदांच्या भांडणात महाराजा नंदकुमार, काशीचा राजा चेतसिंग व अयोध्येच्या बेगमा यांनी काउन्सिलमधील इतर सभासदांना साह्य केल्यामुळे त्याने नंतरच्या काळात त्यांच्यापैकी प्रत्येकावर चांगला सूड उगवला. अयोध्येच्या बेगमांची नेमणूक करताना हेस्टिंग्जने लाच घेतली, अशा आशयाची तक्रार नंदकुमारने काउन्सिलकडे केली. त्याचा सूड म्हणून हेस्टिंग्जने नंदकुमारविरुद्ध खोटे दस्तऐवज तयार केले आणि फिर्याद घडवून आणली. त्याचा रीतसर खटला होऊन नंदकुमारला फाशीची शिक्षा झाली. घडल्या प्रकाराबद्दल लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला. नंदकुमारप्रमाणेच राजा चेतसिंग यास हेस्टिंग्जने अतोनात छळले. हा राजा पूर्वी अयोध्येच्या वजिराचा मांडलिक होता. १७७५ मध्ये आसिफउद्दौला यास अयोध्येचा नवाब म्हणून मान्यता देतेवेळी हेस्टिंग्जने त्याच्या-कडून सालिना खंडणी कबूल करून घेतली होती. हेस्टिंग्जने त्याच्याकडे पैशाची मागणी केली, तेव्हा नवाबाने आपल्या आई व आजीकडे पैसे असल्याचे कळविले. तेव्हा त्या बेगमांनी हेस्टिंग्जकडे ५५ लाख रुपये भरले परंतु त्याने हेस्टिंगचे समाधान झाले नाही. त्याने रेसिडेन्टमार्फत बेगमांना अटकेत टाकून एक वर्षभर त्यांचा अनन्वित छळ केला आणि पैसे उकळले. त्याच्या या अमानुष वागणुकीचे पडसाद इंग्लंडमध्ये उमटले. एडमंड बर्क, चार्ल्स फॉक्स, रोरिडन प्रभृतींनी त्याच्या दुष्कृत्यांविषयी ब्रिटिश संसदेमध्ये महाभियोगाचा खटला भरला. त्याच्या चौकशीचे काम अनेक वर्षे चालू होते. त्यात हेस्टिंग्ज हा माणुसकीचा कसा शत्रू होता, हे जगाला दाखवून देण्यात आले. हा खटला सात वर्षे चालला. अखेरीस हेस्टिंग्जला निर्दोष ठरविण्यात आले. या खटल्यामुळे त्याच्यावर प्रचंड कर्ज झाले तथापि त्याला निवृत्तिवेतन मंजूर करण्यात येऊन पुढे त्याची प्रिव्ही काउन्सिलरपदी निवड झाली.
हेस्टिंग्ज राजकीय डावपेचांत आणि मुत्सद्देगिरीत अत्यंत मुरलेला होता. त्याला सभोवतालच्या परिस्थितीची जाण फार चटकन येत असे. मराठ्यांचे व इंग्रजांचे सात वर्षे चाललेले युद्ध त्याने मोठ्या चातुर्याने मराठ्यांशी सालबाईचा तह करून (१७८२) संपुष्टात आणले आणि इंग्रजांवर येणारी पराभवाची नामुष्की टाळली. त्याचप्रमाणे कर्नाटकात टिपूच्या सैन्याने इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते. अशा परिस्थितीत हेस्टिंग्जने मंगलोर येथे टिपूशी तह घडवून आणला (१७८४). काही जाणकारांच्या मते इंग्रजांच्या दृष्टीने हा तह नामुश्की करणारा होता.
बंगाली, फार्सी, उर्दू या भाषांव्यतिरिक्त हेस्टिंग्जला अरबी भाषेचेही जुजबी ज्ञान होते. त्याने कलकत्त्यात मद्रसा स्थापन केली (१७८१). त्याने संस्कृत भाषेच्या उत्तेजनार्थ नथॅन्यल हॅलहेडकडून हिंदू विधीचे भाषांतर करून घेतले. त्याचा मित्र सर चार्ल्स विल्किन्स हा संस्कृत व फार्सी भाषांचा जाणकार होता. विल्किन्सने भगवद्गीते चा इंग्रजी अनुवाद केला. थोर प्राच्यविद्यातज्ज्ञ सर विल्यम जोन्स याने मनुस्मृती चे भाषांतर केले (१७८३). जोन्स, विल्किन्स व हॅलहेड यांच्या सहकार्याने हेस्टिंग्जने आपल्या कारकिर्दीच्या शेवटच्या काळात एशियाटिक सोसायटीची स्थापना केली. त्याने संस्कृत पंडितांकरवी संस्कृत साहित्य, उपनिषदे, भगवद्गीता यांतील ज्ञान सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न केले. त्याला कला, विज्ञान आणि ज्ञानसाधनेबद्दल फार आस्था होती. एकोणिसाव्या शतकातील भारतीय प्रबोधनाचा पाया हेस्टिंग्जच्या प्रशासनाने घातला, असे काही इतिहासकारांचे मत आहे.
वृद्धापकाळाने त्याचे डेल्सफर्ड (ऑक्सफर्डशर) येथे निधन झाले.
संदर्भ : 1. Davies, C. C. Warren Hastings and Oudh, Oxford, 1939.
2. Majumdar, R. C. Ed. The Maratha Supremacy, Bombay, 1977.
3. Powell-Price, J. C. A History of India, Toronto, 1958.
कुलकर्णी, गो. त्र्यं.
“