हेल, जॉर्ज एलरी : (२९ जून १८६८–२१ फेब्रुवारी १९३८). अमेरिकन ज्योतिर्विद. त्यांनी काही महत्त्वपूर्ण ज्योतिषशास्त्रीय उपकरणे विकसित केली. उदा., पॅसाडीनाजवळील कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या पॅलोमार माउंटन ऑब्झर्व्हेटरी येथील हेल दूरदर्शक. हा दूरदर्शक परावर्तक प्रकारचा व २०० इंची (५०८ सेंमी.) व्यासाचा असून १९४८ मध्ये तो उभारण्याचे काम पूर्ण झाले [→दूरदर्शक]. सौर भौतिकीमधील त्यांचे संशोधनही महत्त्वाचे आहे. विशेषतः त्यांनी सौर डागांमधील चुंबकीय क्षेत्रांचा शोध लावला. 

 

जॉर्ज एलरी हेल
 

हेल यांचा जन्म शिकागो येथे झाला. त्यांना बालपणापासूनच ज्योतिषशास्त्रात रुची होती. एस्. डब्ल्यू. बर्नहॅम यांच्यामुळे त्यांची हीरुची वाढली. हेल यांचे शिक्षण व संशोधन मॅसॅचूसेट्स व बर्लिन येथे झाले. १८९० मध्ये त्यांनी मॅसॅचूसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून पदवी संपादन केली. शिक्षण चालू असतानाच ते हार्व्हर्ड कॉलेजामधील वेधशाळेत संशोधनही करीत होते. प्रथम त्यांनी शिकागो येथील खाजगी केनवुड वेधशाळेत सात वर्षे काम केले. या वेधशाळेच्या उभारणीतही त्यांचा सहभाग होता (१८८८–९१). तेथे त्यांनी वर्णपटीय सूर्यछायालेखक हे उपकरण तयार केले (१८९१). तरंगलांबीचा पल्ला अगदी लहान असलेल्या प्रकाशात (म्हणजे एकवर्णी प्रकाशात) या उपकरणामुळे सूर्याचे छायाचित्रण करता आले. या उपकरणाने काढलेल्या छायाचित्रांवरून सूर्याच्या पृष्ठभागावर कॅल्शियम, हायड्रोजन व लोह यांसारखी मूलद्रव्ये विखुरली असल्याचे स्पष्ट झाले. १८९२ मध्ये ते शिकागो विद्यापीठात अध्यापन करू लागले व १८९३ मध्ये ते तेथेच प्राध्यापक झाले. तेथे त्यांनी विस्कॉन्सिन येथे यर्कीझ ऑब्झर्व्हेटरी ही वेधशाळा उभारली.१८९२ मध्ये ते या वेधशाळेचे पहिले संचालक झाले व १९०४सालापर्यंत ते या पदावर होते. तेथे त्यांनी १०० सेंमी. (४० इंची) प्रणमनी (वक्रीभवनकारक) दूरदर्शक तयार केला. हा या प्रकारचा जगातील सर्वांत मोठा दूरदर्शक आहे. १८९५ मध्ये त्यांनी वर्णपटविज्ञान व खगोल भौतिकी या विषयांना वाहिलेली आंतरराष्ट्रीय दर्जाची ॲस्ट्रोफिजिकल जर्नल ही ज्ञानपत्रिका सुरू केली. 

 

हेल यांनी वॉशिंग्टन, डी. सी. येथील कार्नेगी इन्स्टिट्यूशनच्या आश्रयाने लॉस अँजेल्सलगत मौंट विल्सन ऑब्झर्व्हेटरी ही वेधशाळा १९०४ मध्ये उभारून सुसंघटित केली आणि १९२३ सालापर्यंत ते या वेधशाळेचे संचालक होते. तेथे त्यांनी मोठे शक्तिमान सौर साधन उभारले. तसेचत्यांनी परावर्तक प्रकारचे ६० इंची व १०० इंची (१५० सेंमी. व २५० सेंमी.) व्यासांचे प्रचंड मोठे खगोलीय दूरदर्शकही तेथे उभारले. १९२८ मध्ये त्यांनी पॅसाडीनालगतच्या पॅलोमार पर्वतावरील वेधशाळेची उभारणी करून त्यांच्या नावाच्या हेल दूरदर्शकावरील काम सुरू केले. तेथे त्यांनी सौर प्रयोगशाळा उभारली. त्यांनी सूर्याच्या दीप्तिगोलात दिसणाऱ्या गडद रंगाच्या क्षेत्रांचे – म्हणजे सौर डागांचे – निरीक्षण केले. यावरून त्यांनी पुढील निष्कर्ष काढले : सौर डागांच्या भागातील तापमान इतर भागांच्या तापमाना-पेक्षा बरेच कमी असते, सूर्याच्या दोन्ही गोलार्धांतील सौर डागांची धु्रवता वेगवेगळी आहे आणि सौर डागांच्या आकारमानांत व संख्येत दर अकरा वर्षांनी बदल होतात. या आविष्काराला नंतर सौर डागांचे चक्र वा आवर्तन हे नाव देण्यात आले. सौर डाग भोवऱ्यासारखे असून त्यांच्यात तीव्र चुंबकीय क्षेत्र असते, असेही त्यांनी म्हटले होते. [→सूर्य]. 

 

हेल हे निधी संकलन करण्यात वाकबगार असल्यामुळे यर्कीझ तसेच मौंट विल्सन व पॅलोमार माउंटन येथील वेधशाळा उभारण्यासमदत झाली. १९२८ मध्ये त्यांनी ५०८ सेंमी. व्यासाचा परावर्तकदूरदर्शक उभारण्यासाठी निधी उभारला व त्याची आखणीही केली परंतु हा दूरदर्शक प्रत्यक्षात त्यांच्या मृत्यूनंतर कार्यान्वित झाला. नॅशनल रिसर्च कौन्सिल सुसंघटित करण्यासही त्यांनी मदत केली (१९१६). 

 

हेल यांना अनेक मानसन्मान लाभले होते. त्यांची जगातील बहुतेक आघाडीवरील वैज्ञानिक ॲकॅडेमींवर विदेशी सदस्य म्हणून निवड करण्यात आली होती. त्यांनी लेखन केलेली काही पुस्तके पुढीलप्रमाणे : टेन यिअर्स वर्क ऑफ अ माउंटन ऑब्झर्व्हेटरी (१९१५), बियाँड द मिल्की वे (१९२६) आणि सिग्नल्स फ्रॉम द स्टार्स (१९३१). 

 

हेल यांचे पॅसाडीना (कॅलिफोर्निया) येथे निधन झाले. 

ठाकूर, अ. ना.