हेमवती नंदन बहुगुणा गढवाल विद्यापीठ : उत्तराखंड राज्यातील एक विद्यापीठ. उत्तर प्रदेश राज्य विद्यापीठीय अधिनियम १९७३ नुसार श्रीनगर (गढवाल जिल्हा) या ठिकाणी या विद्यापीठाची स्थापना झाली. ह्याचे स्वरूप अध्यापनात्मक आणि संलग्नक आहे. हेमवती नंदन बहुगुणा यांच्या स्मरणार्थ याचे नामकरण हेमवती नंदन बहुगुणा गढवाल विद्यापीठ करण्यात आले (१९८९). त्याचे कार्यक्षेत्र राज्याच्या ७ जिल्ह्यांत विस्तारलेले असून विज्ञान, कला, सामाजिकशास्त्रे आणि भाषा या विद्याशाखांतर्गत वेगवेगळ्या विषयांचे ३८ विभागयेथे आहेत. १८० महाविद्यालये विद्यापीठास संलग्न असून पदव्युत्तर शिक्षण देणाऱ्या तीन घटकसंस्थाही विद्यापीठात कार्यरत आहेत. विद्यापीठाचे संविधान इतर विद्यापीठांप्रमाणेच असून सवेतन कुलगुरूहा प्रशासनाचा सर्वोच्च अधिकारी असतो. त्यास प्रशासकीय बाबतींत कुलसचिव साहाय्य करतो. विद्यापीठात पदवी, पदव्युत्तर पदवी, एम.फिल्, पीएच्.डी. इ. अभ्यासक्रमांच्या अध्यापनाची-मार्गदर्शनाची सोय आहे. या विद्यापीठाचे कार्यक्षेत्र मध्य हिमालय प्रक्षेत्रात विस्तारलेले असल्या-मुळे या क्षेत्राचे पर्यावरणीय महत्त्व लक्षात घेता त्या नुसार विद्यापीठात वैविध्यपूर्ण अभ्यासक्रमांची आखणी केली आहे. उच्च भूमी वनस्पतिशास्त्र व प्राणिशास्त्र संशोधन केंद्र आणि पर्वतीय पर्यटन सुविधा अभ्यास केंद्र ह्या दोन शाखा त्या दृष्टीने स्थापन करण्यात आल्या आहेत. 

भटकर, जगतानंद