हेमलॉक : बीजी वनस्पतींपैकी प्रकटबीज वनस्पतीत ⇨ कॉनिफेरेलीझ गणातील पायनेसी कुलात अंतर्भूत असलेल्यात्सुगा या प्रजातीतील वनस्पतींना सामान्यतः हेमलॉक ही संज्ञा आहे. यामध्ये सु. १४ जाती असून त्या मूळच्या उत्तर अमेरिका, मध्य व पूर्व आशियातील आहेत. काही जातींची शोभेकरिता, तर काही जातींचे लाकूड इमारतींसाठी उपयुक्त आहे, म्हणून लागवड करतात. ही सदापर्णी वनस्पती उंच व पिरॅमिडासारख्या शंकुमंत (शंकूच्या आकाराचे प्रजोत्पादक इंद्रिय असलेल्या) व राळयुक्त असून तिची साल दालचिनीसारखी तांबडी किंवा जांभळी असते. फांद्या बारीक क्षितिजसमांतर किंवा लोंबत्या पाने अरुंद, रेषाकृती (सूच्याकृती सुईसारखी), लहान देठाची सपाट किंवा कोनीय पुं- व स्त्री-शंकू एका वृक्षावर व लहान, फांदीच्या टोकाला लोंबते व टिकून राहणाऱ्या खवल्यांचे बिया पंखयुक्त, शंकू लार्चसारखे व पाने बाल्सम फरसारखी आणि लहान, परंतु अंतर्रचनेत इतर प्रजातींहून भिन्न असते.
पूर्वीय हेमलॉक (त्सुगा कॅनडेंसिस) याला गार्डन हेमलॉक, कॅनडियन हेमलॉक व हेमलॉक स्प्रूस असेही म्हणतात. तो उंच पठारावरील जंगलात नोव्हास्कॉशिया ते मिनेसोटा व दक्षिणेस जॉर्जियातील पर्वतापर्यंत आढळतो. हा मध्यम ते मोठ्या आकारमानाचा वृक्ष १८–३० मी. उंच वाढतो व त्याचा व्यास सु. १.२५ मी. पर्यंत होतो. पाने २ सेंमी. लांब, गर्द हिरवी, वरील बाजूस खाच असून खालील बाजूस दोन पांढरे पट्टे असतात. सालीमध्ये टॅनीन असते, त्यामुळे ती कातडी कमाविण्यास वापरतात.याचे लाकूड मऊ असून त्याचे तुकडे पाडता येतात. त्यामुळे ते लाकडी पेट्या तयार करण्यासाठी व इमारती बांधकामासाठी उपयुक्त आहे. याचे अनेक प्रकार शोभेकरिता लावतात. याचा आयुःकाल सु. ८०० वर्षे इतका आहे.
पश्चिमी हेमलॉक (त्सुगा हेटेरोफायला) याला हेमलॉक फर वप्रिन्स ॲल्बर्टस फर असेही म्हणतात. हा वृक्ष सु. ६० मी. उंच वाढतोव त्याचा व्यास १.८–३ मी. होतो. याचे लाकूड इतर हेमलॉक जातींपेक्षाउच्च प्रतीचे असून स्प्रूस व पाइन याच्या बरोबरीचे व इष्ट प्रतीचे असते. सीबोल्ड्सचा हेमलॉक (त्सुगा सीबोल्डी) व जपानी हेमलॉक (त्सुगा डायवर्सिफोलिया) या मूळच्या जपानमधील असून त्या यूरोप व अमेरिकेत शोभेकरिता लावतात. तसेच कॅरोलिना (त्सुगा कॅरोलियाना) हा सुंदर वृक्षही शोभादायक आहे.
हेमलॉक हे नाव अंबेलेलीझ गणातील काही विषारी वनस्पतींना लावतात. त्यामध्ये कुर्दुमणा (कोनियम मॅक्युलेटम); जल हेमलॉक (सिक्युटा डगलेसी); लहान हेमलॉक (एथूया सिनॅपियम); ग्राउंड हेमलॉक [कॉमन यू टॅक्सस; बॅकेटा → टॅक्सेलीझ] इत्यादीचा समावेश होतो.
कुर्दुमणा ही विषारी ओषधी वनस्पती सु. २.४ मी. उंच वाढते. खोड पोकळ त्यावर जांभळट-पिवळे ठिपके व अनेक फांद्या असतात. फुले व फळे सु. २ वर्षांनी येऊन झाड मरते. फुले लहान व पांढरी असूनगुच्छाने येतात. फळे अंडाकृती आकाराची व सु. ३ मिमी. लांब असून जुलै-ऑगस्टमध्ये पिकतात. पाने किंवा खोड चुरगळल्यावर दुर्गंध येतो. ही मूळची आफ्रिका (काही भाग) व आशिया येथील असून तिचा प्रसार उत्तर अमेरिकेत झाला आहे.
जल हेमलॉक ही अत्यंत विषारी बहुवर्षायू वनस्पती उत्तर अमेरिकेत ०.५–१ मी. उंच वाढते. फुले लहान, पांढरी व गुच्छ जून-जुलैमध्ये येतात. या वनस्पतीमध्ये सीक्युटॉक्झीन हे विषारी रसायन असते. त्यामुळे ती खाल्ली असता या रसायनाचा गुरेढोरे व मनुष्याच्या मध्यवर्ती चेतासंस्थेवर परिणाम होऊन जोराने आचके देऊन गुदमरल्यामुळे मृत्यू होऊ शकतो. जनावरांमध्ये ही वनस्पती खाल्ल्यावर १५ मिनिटे ते ६ तासांमध्ये विषाचे परिणाम दिसून येतात आणि १५ मिनिटे ते २ तासांत मृत्यू ओढवू शकतो.
लहान हेमलॉक ही विषारी वर्षायू ओषधी वनस्पती पडीक जमिनीत ३०–९० सेंमी. उंच वाढते. ती बागेमध्ये कुंपणासाठी उत्तर पूर्व अमेरिका, पूर्व कॅनडा व यूरोपमध्ये लावतात. फांद्या अनेक, बारीक, त्यावर निळे ठिपके असून केशहीन असतात. फुले व पाने वरील बाजूस गडद हिरवी असून खालील बाजूस पिवळसर हिरवी आणि चकचकीत असतात. फुले जून-सप्टेंबरमध्ये येतात. पाने व मुळे विषारी असून खाल्ल्याने प्राणघातक आहेत.
ग्राउंड हेमलॉक वनस्पतीची पाने, लाकूड, साल व बी विषारी असून खाल्ल्यास वांत्या, भोवळ, अतिसार, आचके इ. त्रास होतात.
जमदाडे, ज. वि.; मगर, सुरेखा अ.