तार काढणे, धातूची : लाटन यंत्रातून तयार केलेल्या धातूंच्या सळया विशेष प्रकारच्या यंत्रामध्ये कमी कमी होत गेलेल्या व्यासांच्या वेजांच्या (छिद्रांच्या) मुद्रांमधून (डायमधून) ओढून पाहिजे तितक्या लहान व्यासाच्या तारा तयार करतात. तांब्याच्या व ॲल्युमिनियमाच्या तारा विद्युत् संवाहक म्हणून वापरतात. पोलादी तारांपासून दोर, खिळे, स्प्रिंगा, जाळ्या अशा अनेक वस्तू बनविता येतात. सोने व चांदीच्या तारा दागिने व जरीकामासाठी उपयोगी पडतात. सोनारकामात सोन्याचांदीची तार तयार करण्यासाठी निरनिराळ्या व्यासांची वेजे असलेली एक पोलादी पट्टी वापरतात व तार हातानेच ओढून काढतात.
तार काढण्यासाठी ६ ते १० मिमी. व्यासांच्या सळया घेतात व त्यांचा पृष्टभाग अम्लाने स्वच्छ करतात. सळईचे टोक ठोकून बारीक करून यंत्रातील पहिल्या मुद्रेतून ओवून घेतात व ते यांत्रिक शक्तीने पुढे ओढतात. पुरेशी लांबी तयार झाल्यावर ती तार यांत्रिक रिळावर अडकवतात. यांत्रिक शक्तीने रीळ फिरू लागले म्हणजे नवी तार मुद्रेतून ओढून तयार केली जाते आणि रिळावरच गुंडाळली जाते. मुद्रेतून तार ओढली जात असताना तारेची धातू कडक होते. त्यामुळे ती तार पुन्हा बारीक करण्यासाठी दुसऱ्या मुद्रेतून ओढण्यापूर्वी गरम करून अनुशीतन (हळूहळू थंड करण्याच्या) पद्धतीने नरम करावी लागते.
आ. १ मध्ये सळईचा व्यास लहान करून तार काढावयाच्या मुद्रेचा छेद दाखविला असून आ. २ मध्ये तार काढण्याच्या यंत्राची सर्वसाधारण मांडणी दाखविली आहे. यंत्रातील रिळे साधारणतः शंक्वाकृती किंवा दंडगोलाकार असतात. आधुनिक तार काढण्याच्या यंत्रात एकानंतर एक मुद्रा व रिळे अशा ७, ९ किंवा ११ जोड्या बसविलेल्या असतात. पहिल्या रिळावर येणाऱ्या तारेला ३ किंवा ४ वेढे देऊन ती तार दुसऱ्या मुद्रेमधून पुढे नेण्यात येते. मुद्रेमधून तार ओढली जात असताना घर्षण कमी करण्यासाठी वंगण वापरावे लागते. वंगणाकरिता खनिज तेल, चरबी, साबण, ग्रॅफाइट, मॉलिब्डेनम सल्फाइड वगैरे पदार्थ वापरतात. तार काढण्याच्या मुद्रा बनविण्याकरिता कठीण पोलाद, टंगस्टन कार्बाइड किंवा हिरा असे पदार्थ वापरतात.
संदर्भ : Charnock, G. F. Partington, F. W. Mechanical Technology, Bombay, 1962.
वैद्य, ज. शि. ओक, वा. रा.
“