तापाधिक्य व तापन्यूनता : (हायपरथर्मिया व हायपोथर्मिया). मानवी शरीराचे सर्वसाधारण तापमान ३६° ते ३७·५° से. असते. शरीराचे तापमान ४०° से. पेक्षा अधिक वाढले म्हणजे त्यास तापधिक्य अथवा अतिज्वर असे म्हणतात [→ ज्वर]. तापमान जेव्हा ३५° से. पेक्षा कमी असते तेव्हा त्यास तापन्यूनता म्हणतात. तापाधिक्य आणि तापन्यूनता ही दोन्ही लक्षणे तातडीचा वैद्यकीय इलाज योजावयास भाग पाडणारी आहेत.

तापाधिक्य : तापाधिक्य बहुधा शरीरातील उष्णता उत्पादन व उष्णता व्यय, तसेच शरीराचे नैसर्गिक तापमान कायम ठेवणाऱ्या यंत्रणेतील बिघाडामुळे उद्‌भवते. पुढील विकारांमध्ये तापाधिक्य आढळते.

(अ)संसर्गजन्य रोग : उदा., फुफ्फुसगोलाणुजन्य (डिप्लोकॉकस न्यूमोनी या सूक्ष्मजंतुमुळे होणाऱ्या) फुफ्फुसशोथामध्ये (फुफ्फुसाला येणाऱ्या दाहयुक्त सुजेमध्ये, न्यूमोनियामध्ये) कधीकधी रोगी तापाधिक्यामुळेच दगावतो.

(आ) मुग्धभ्रांती कंप : (कंप हे प्रमुख लक्षण असलेला एक प्रकारचा तीव्र मानसिक क्षोभ). या विकारात विशेषेकरून ज्या वेळी परिसरीय तापमान भरमसाट वाढलेले असते त्या वेळी तापाधिक्यामुळे रोगी मरण पावण्याची शक्यता असते.

(इ)औषधिजन्य विषबाधा : काही औषधींच्या सेवनामुळे घाम तयार होण्याची क्रिया बंद पडून तापाधिक्य होते. अ‍ँफेटामीन गटातील औषधे तापाधिक्य तसेच मेंदू व मूत्रपिंड यांच्यातील बिघाडास कारणीभूत होतात.

(ई)अवटु–आधिक्य : (मानेच्या पुढील बाजूस असलेल्या वाहिनीविहीन ग्रंथीची अवाजवी क्रियाशीलता). या विकारात तापाधिक्य आढळते. [→ अवटु ग्रंथि].

(उ)ऊष्माघात : यात ताप ४२·८° से. किंवा त्यापेक्षाही जास्त असू शकतो [→ उष्णताजन्य विकार]. 

(ऊ)हिवताप : यात ताप ४०·५° से. अथवा त्यापेक्षाही जास्त असू शकतो [→ हिवताप]. तापाधिक्य झालेल्या रोग्याच्या गुदाशयातील तापमान नेहमी तपासतात. तापमान ४१° ते ४२° से. इतके वाढल्यास रोगी बहुधा बेशुद्ध होतो.

मेंदूसारख्या महत्त्वाच्या अवयवांना इजा पोहोचण्यापूर्वी तापमान उतरविण्यावर लक्ष केंद्रित करणे, यास तापाधिक्यावरील इलाजांमध्ये प्रथम महत्त्व देतात. हे इलाज गुदाशयातील तापमान ३९° से. पर्यंत खाली येई तो जारी असावे लागतात. त्याकरिता शरीर ओल्या चादरीत गुंडाळून ठेवणे, पंख्याने वारा घालणे, थंड पाण्याचा बस्ती देणे इ. इलाज करतात. तापमान एकदम न उतरवता हळूहळू कमी करतात. एकदम कमी केल्यास अवसाद (तीव्र आघातानंतर दिसून येणारा सार्वदेहिक क्षोभ) होण्याची शक्यता असते. 

तापन्यूनता : शरीराचे तापमान काही विकारांमध्ये नेहमीच्या तापमानापेक्षा कमी होते. तसेच ते कृत्रिम उपायांनीही मुद्दाम कमी करता येते. तापमान ३५° से. पेक्षा कमी असले म्हणजे तातडीचे इलाज करावे लागतात.

पुढील रोगांमध्ये तापन्यूनता होण्याचा संभव असतो : मेंदूतील रक्तवाहिन्यांचे रोग, अती मद्यसेवनामुळे झालेली विषबाधा, फिनोथायाझिने आणि बार्बिच्युरेट औषधांची विषबाधा, काही संसर्गजन्य रोग, विशेषेकरून वयस्कर व्यक्तींमधील श्वासनलिका–फुफ्फुसशोथ, मधुमेहातील अम्लरक्तता (रक्तातील अम्लाचे प्रमाण वाढणे), मूत्रविषरक्तता (मूत्रातून बाहेर पडणारे पदार्थ रक्तात साठून राहिल्यामुळे निर्माण होणारी अवस्था) वगैरे.


अनियततापी प्राण्यांमध्ये तापमान–नियंत्रक यंत्रणा नसते व त्यांचे तापमान परिसरीय तापमानानुसार कमीजास्त होत असते. हे प्राणी अती थंडीच्या दिवसात सुषुप्तावस्थेत (गाढ निद्रावस्थेत) जातात. त्या वेळी त्यांच्या शरीरक्रिया अतिशय मंद चालतात. यावरून मानवी शरीराचे तापमान कृत्रिम पद्धतीने उतरवून सर्व शरीरक्रिया मंद करण्याची कल्पना शास्त्रज्ञांना सुचली. या अवस्थेत शरीरातील काही अवयवांवर शस्त्रक्रिया करणे सुलभ होते. महारोहिणीचा (हृदयापासून निघणाऱ्या मुख्य शुद्ध रक्तवाहिनीचा) वरचा भाग, हृदय व मेंदूतील रक्तवाहिन्या यांवरील शस्त्रक्रिया कृत्रिम तापन्यूनता तंत्राच्या मदतीने करता येणे शक्य झाले आहे. 

शस्त्रक्रियेच्या वेळी शरीराचे तापमान २५° ते ३०° से. पर्यंत उतरवतात. रोग्याला पाण्याच्या पिंपात ठेवून त्या पाण्याचे तापमान कमीकमी करतात. कधीकधी बर्फाचाही उपयोग करतात. शरीराभोवती घट्ट नळ्या बसवून त्यात गार पाणी फिरवूनही तापमान कमी करता येते.

शरीराचे तापमान एक अंश उतरले, तर शरीरक्रिया सु. ५ टक्यांनी कमी होतात. तापमान ३०° से. पर्यंत उतरविल्यास शरीरावर विशेषेकरुन तंत्रिका तंत्रावर (मज्जासंस्थेवर) अनिष्ट परिणाम होत नाही. मात्र फक्त दहाच मिनिटे हे शक्य असल्यामुळे तेवढ्या अल्प काळात उरकता येणाऱ्या शस्त्रक्रिया तापन्यूनता तंत्राच्या मदतीने करता येतात.

कृत्रिम पद्धतीने तापमान कमी करीत असताना शरीराला थंडी भरून येते. ही प्रतिक्रिया तापमान काही ठराविक पातळीपर्यंत उतरेपर्यंतच आढळते (सु. ३२° से) व नंतर आढळेनाशी होते. अशी थंडी भरून येऊ नये म्हणून या तंत्राचा अवलंब करताना क्यूरारी किंवा क्लोरप्रोमॅझीन यासारखी औषधे वापरतात.

उपचारांमध्ये तापन्यूनतेवरील इलाजाशिवाय मूळ रोगावरील इलाजाकडे लक्ष पुरविणे जरूर असते. हळूहळू शरीराचे तापमान वाढवितात. दर तासास फक्त १° ते २° से. तापमान वाढविणे योग्य असते. तापमान अतिजलद वाढविण्यामध्ये हृदय बंद पडण्याचा धोका असतो. अल्ब्युमीन व मीठमिश्रित द्रवाचा नीलेवाटे उपयोग करतात. कृत्रीम तापन्यूनतेनंतर शरीराचे उष्णतामान नेहमीच्या पातळीवर येईपर्यंत विद्युत् हृद्–लेखन यंत्रासारख्या (हृदयाच्या स्नायूच्या आकुंचनामुळे निर्माण होणाऱ्या विद्युत् प्रवाहाचे आलेखरूपाने निर्देशन करणाऱ्या यंत्रासारख्या) उपकरणांचा सतत उपयोग करावा लागतो. हृदयाच्या स्नायूंची विशेषेकरून निलयांच्या (ज्या कप्प्यातून रक्त हृदयाबाहेर जाते त्या कप्प्यांच्या) स्नायूंच्या तंतुकांची (अतिशय बारीक तंतूंची) आकुंचने होण्याचा संभव असतो व म्हणून विद्युत् आकुंचन प्रतिबंधक उपकरण (डीफिब्रिलेटर) तयार ठेवावे लागते.

मूळ रोगांपैकी अवटु–न्यूनता (अवटू ग्रंथीपासून मिळणाऱ्या रासायनिक पदार्थांच्या कमतरतेमुळे होणारा) हा रोग असण्याची शक्यता लक्षात ठेवून, तो आढळल्यास योग्य इलाज करतात. 

संदर्भ : Harvey, A. M. Johns, R. J. Owens, A. H. Ross, R. S., Eds. The Principles and Practice of Medicine, New Delhi, 1972.

आपटे, ना. रा. भालेराव, य. त्र्यं.