ताना नदी : केन्यातील सर्वांत लांब (७०८ किमी.) नदी. खचदरीच्या पूर्वेकडील ॲबर्डेअर पर्वतराजीत उगम पावून ती ईशान्येकडे वाहू लागते. किटारू (सेव्हन फोर्क्स) धबधब्यावरून १३४ मी. खाली येऊन ती निमओसाड प्रदेशात शिरते. मग पूर्वेकडे व दक्षिणेकडे मोठे वळण घेऊन ती रुंद खोऱ्यात येते. येथील विस्तृत पूरमैदानात नागमोडी वळणे घेऊन शेवट ती कीपीनी येथे हिंदी महासागराच्या फॉर्मोसा उपसागराला मिळते. हिच्यावरील सासुमुआ धरणाचे पाणी नैरोबीला पुरविले जाते किटारू धबधब्याजवळ किंडारुमा येथे जलविद्युत् उत्पादन होते व एम्बू प्रकल्पाचा उपयोग भातशेतीसाठी होतो. गलोले प्रकल्पावर कापूस पिकविला जातो. नदीकाठच्या जंगलात टोळीवाले लोक निर्वाह शेती करतात.
कुमठेकर, ज. ब.