तांडव नृत्य :एक प्राचीन अभिजात नृत्यशैली, भरताने नाट्यशास्त्रात नृत्याचे ‘मार्गी (अधिभौतिक) व ‘देशी’ (भौतिक) असे दोन प्रकार मानले आहेत. त्यांपैकी मार्गी या प्रकारात तांडवाचा आणि देशीमध्ये लास्याचा अंतर्भाव होतो. शिवाने आपला शिष्य तंडू याला शिकविलेले आणि तंडूने प्रचलित केलेले नृत्य म्हणजे तांडव नृत्य होय, अशी पौराणिक आख्यायिका आहे. रूढार्थाने तांडव याचा अर्थ शिवाचे जोषपूर्ण व क्रोधयुक्त नृत्य. आनंद कुमारस्वामी यांच्या मतानुसार देव आणि दैत्य असे दोन्ही अंश ज्याच्यात होते, अशा एका अनार्य देवापासून तांडव नृत्याची उत्पत्ती झाली.
भरताने ‘नृत्ता’ चे (म्हणजे केवळ तालबद्ध अंगविक्षेपयुक्त शुद्ध नृत्य) दोन विभाग कल्पिले आहेत. एक ‘उद्धत’ व दूसरे ‘मसृण’. उद्धत म्हणजेच तांडव व मसृण म्हणजे लास्य होय. ह्या दोन नृत्तप्रकारांतूनच उद्धत किंवा तांडव नृत्य व मसृण किंवा लास्य नृत्य असे दोन नृत्य प्रकार (म्हणजे भावाभिव्यक्तिदर्शक, अभिनययुक्त, तालबद्ध अंगविक्षेप) निर्माण झाले, असे विवेचन अभिनवगुप्ताने (सु. १०-११ वे शतक) केले आहे. लास्य नृत्यातून भाण, प्रहसन, वीथी आणि तांडव नृत्यातून समवकार, डिम, व्यायोग हे नाट्यप्रकार निर्माण झाले, असे मानले जाते. लास्य हा सौम्य नृत्यप्रकार असून त्यात शृंगार रसास प्राधान्य असते तर तांडव नृत्यात वीर, रौद्र, भयानक व बीभत्स ह्यांसारख्या रसांना प्राधान्य असते.
ह्या मूळ उपपत्तीपासून प्रचलित तांडव व लास्य ह्या नृत्यशैली हळूहळू साकार झाल्या. तांडव म्हणजे केवळ शिवाचे नृत्य, एवढेच नसून ती एक आवेशपूर्ण, ओजस्वी व पौरुषयुक्त नृत्यशैली आहे. उत्साहाने रसरसलेले, वीररसयुक्त व प्रसंगी रौद्रभाव निर्माण करणारे, पुरुषांनी उद्धत अंगविक्षेपांनी केलेले नर्तन ते तांडव, असे तांडवाचे स्वरूप सांगता येईल. तांडव व लास्य या नृत्यप्रकारांचे पाश्चात्य बॅले नृत्यातील ‘ॲलेग्रो’ व ‘पियॅनिस्सिमो’ या प्रकारांशी साधारणपणे साम्य आढळून येते.
भारतात प्रचलित असलेल्या सर्व नृत्यपरंपरांमध्ये तांडवाचे अंग अस्तित्वात आहे. मणिपुरी नृत्यातील सर्व ‘चोलम्’ नृत्यप्रकार ‘करताल चोलम्’, ‘पुंग चोलम्’ म्हणजे तांडव शैलीतील नृत्येच आहेत. कथ्थकमध्ये शिव व काली ह्या नृत्यातील काही तोडे तांडव शैलीत आहेत. कथकळी नृत्यात तर लास्यांगापेक्षा तांडव शैलीच जास्त परिपूर्ण झालेली आहे. कारण वीर, रौद्र व अद्भुत ह्या रसांचा परिपोष कथकळीत प्रकर्षाने दिसून येतो. कथकळीतील कथानक कोणतेही असो, त्यामध्ये तांडव शैलीचे नृत्य हा एक अविभाज्य घटक असतो.
दक्षिणेकडे प्रचलित असलेल्या नटनादि वाद्य रंजनम् ह्या ग्रंथात तांडवाचे बारा प्रकार वर्णिलेले आहेत, ते असे : आनंद तांडव, संध्या तांडव, शृंगार तांडव, त्रिपुर तांडव, औद्धव तांडव, मुनी तांडव, भुजंग तांडव, संहार तांडव, उग्गीर तांडव, भूत तांडव, शुद्ध तांडव व प्रलय तांडव. ह्या ग्रंथात तांडव ही संज्ञा आवेशपूर्ण व ओजस्वी नृत्य, अशा अर्थाने उपयोगात आणलेली आहे. भरतनाट्यम्चा समावेश ‘शृंगार तांडव’ ह्या विभागात केलेला असून ते फक्त स्त्रियांनी करावे, पुरुषांनी करू नये, असा दंडक घातला आहे. त्यातील ‘नटनम् आडिनार’ हे नृत्य आनंद तांडवाचे उदाहरण आहे. उत्तरेकडील प्रचलित परंपरेनुसार फक्त शिवाने म्हणजे एकाच नर्तकाने केलेली नृत्ये (सोलो) पाच आहेत, ती अशी : आनंद तांडव, संध्या तांडव, कालिका तांडव, त्रिपुर तांडव व संहार तांडव. ह्याशिवाय गौरी तांडव व उमा तांडव ही पार्वती समवेत केलेली म्हणजे युगुल तांडव नृत्ये होत.
भारतीय तत्त्वज्ञानात विशद केलेले विश्वाच्या निर्मितीचे अभिव्यंजकता ज्ञान शिव तांडव नृत्यातही संकेतार्थाने ध्वनित केले जाते. उत्पत्ती, स्थिती, संहार, तिरोभाव व अनुग्रह या ईश्वराच्या पाच अवस्था शिव तांडवात अभिव्यक्त केल्या जातात.
वडगावकर, सुरेंद्र
“