तांगसा : अरुणाचल प्रदेशामधील भारत–ब्रह्मदेश सरहद्दीवरील एक वन्य जमात. तांगसाच्या अनेक उपजमाती आहेत. या उपजमातींची नावे रोंगरांग, केमसिंग, मोसांग, लाँग्री, यौगळी, मोग्लुम, तिखाक, लोंगशांग, लोंगफी, सिंगफो, हावी इ. असून या सर्व जमाती तिराप व नामचिकच्या खोऱ्यांत राहतात. १९६१ च्या जनगणनेनुसार यांची लोकसंख्या १०,९०२ होती.
आपण मूळचे ब्रह्मदेशापलीकडील असून तेथून आसामात आलो, असे तांगसा सांगतात.एवढेच नव्हे, तर समग्र मानवजातीची उत्पत्ती मसोई सिनरापुम या ब्रह्मदेशाच्या पूर्वेकडे असलेल्या आपल्या मूलस्थानापासून झाली, असे त्यांचे म्हणणे आहे. तांगसा हे मुख्यतः स्वतः विणलेले कापड, चहाची पाने, मीठ व मणी इत्यादींचा ब्रह्मदेशाशी व्यापार करतात. याच्या मोबदल्यात ते खंजीर, भाले, चाकू, अफू इ. खरेदी करतात. ते हिशेब ठेवण्यात मोठे कुशल आहेत. आपला हिशेब ते बांबूच्या छिलट्यांची कडी ठराविक संख्येने एकमेकांत गोवून जतन करतात. तांगसा मध्यम उंचीचे व गौरवर्णी असून त्यांत मंगोल छटा स्पष्ट दिसते. तांगसा तरुणतरुणी रंगबेरंगी कपडे परिधान करतात. स्त्रिया झगेवजा पेहेराव करतात. त्यांची घरे चौकोनी असून भिंती बांबूंच्या असतात. घराचे छप्पर दुसोपी व उतरते असते. घरात तीन मुख्य दालने असतात. सर्वांत पुढच्या खोलीत रेडे, डुकरे तसेच इतर जनावरांच्या कवट्या भिंतीला टांगलेल्या असतात. ही खोली पाहुण्यांसाठी असते. मधल्या दालनाचे अनेक भाग केलेले असतात. त्यामुळे प्रत्येक माणसाला एकेक लहान खोली मिळते. याला लागूनच सोपा असतो. त्यात धान्य कांडायची उखळी वगैरे असते. आतील बाजूला स्वयंपाकघर असते. तरुण मुलींसाठी खास वेगळे शयनगृह गावात असते. तांगसा हे कुशल कारागीर असून तऱ्हेतऱ्हेचे सुंदर वेतकाम, लाकडावरचे कोरीवकाम व कापडावर रंगीबेरंगी नक्षीचे विणकाम ते करतात. स्त्रिया भरतकामात तरबेज आहेत. पूर्वी हे लोक युद्ध करीत व शत्रूचे डोके विजयचिन्ह म्हणून कापून आणीत. ही शिरोमृगया हळूहळू बंद पडत चालली आहे. तांगसांचा मुख्य व्यवसाय शेती असून भात हे त्यांचे मुख्य अन्न आहे. ते झूम पद्धतीची शेती करतात. सकाळचे जेवण ते सूर्योदयापूर्वी व रात्रीचे सूर्यास्तापूर्वी घेतात. चहाही ते भरपूर पितात. कोंबडी व डुकराचे मांस त्यांना फार आवडते. रेडा व माकडे यांचे मांसही ते खातात. हातसडीच्या तांदळापासून केलेली दारू त्यांना फार आवडते.
त्यांच्यात एकत्र कुटुंबपद्धती अस्तित्वात आहे. प्रत्येक जमात अनेक कुळींत विभागलेली असून या कुळी बहिर्विवाही असतात. त्यांच्यात पुरोहिताला फार महत्त्व असते. या शिवाय देवऋषीही त्यांच्यात असतात. रोगराई बरी करणे, हे त्यांचे मुख्य काम असते. तांगसा लोकांत सूर्यपूजेला फार महत्त्व आहे. ऊन व पाऊस या दोहोंसाठी ते सूर्यदेवाला भजतात. तांगसा जडप्राणवादी असून लोंग्जुम हा पाऊस पाडणारा व शेती समृद्ध करणारा देव असून रंग्फी हा अग्निदेव आणि यंग्बन हा वनदेव आहे. पूजेसाठी ते प्राणी बळी देतात. गुन्हेगारांस ताळ्यावर येईपर्यंत वाळीत टाकतात. तांगसांना नृत्य आवडते. तसेच त्यांच्या लोककथा प्रसिद्ध आहेत. बिहू उत्सव ते थाटाने साजरा करतात. त्या वेळी विवाहही जुळवले जातात. मृताला ते पुरतात, तथापि काहीजण अग्निसंस्कार करू लागले आहेत.
संदर्भ : Dutta, Parul, Tangsas of the Namchik and Tirap Valleys, Shillong, 1959.
भागवत, दुर्गा
“