ताइपिंग बंड : थायफीग बंड. राजकीय, सामाजिक व आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी चीनमध्ये झालेले एक प्रसिद्ध बंड. १८४८–६५ अशी सतरा वर्षे ते चालले होते. मांचू राजवट नष्ट करून शांततेचे साम्राज्य स्थापन करणे (ताइपिंग–दीर्घ शांतता) हे त्याचे प्रमुख उद्दिष्ट होते. हुंग शिऊ–च्यूआन (हूंग स्यौ–च्युवान) याच्या नेतृत्वाखाली अनेक असंतुष्ट गटांनी हे बंड पुकारले. राजकीय स्वातंत्र्याबरोबरच जमिनीचे समान वाटप, भाषेचे सुलभीकरण, वेश्या व्यवसायास बंदी, स्त्रियांसाठी समान हक्क, गुलामांचा व्यापार व अफूचे व्यसन यांस विरोध, लोहमार्गाची आखणी व विस्तार इ. विविध उद्दिष्टे साध्य करण्याचे प्रयत्न बंडखोरांनी केले. हे बंड झपाट्याने पसरले आणि बंडखोरांनी नानकिंगसारखी शहरे काबीज केली. पूर्व चीनचा यांगत्सी नदीच्या खोऱ्याचा बहुतेक भाग बंडखोरांच्या अधिपत्याखाली आला होता. त्यांनी अनेक प्रांतावर हल्ले केले, परंतु त्यांनी आपला जम कुठेच व्यवस्थितपणे बसविला नाही. त्यांना प्रथम पाश्चात्त्यांची सहानुभूती होती. पण आपला व्यापार नष्ट होईल, या भीतीने इंग्लंड, अमेरिकादी देशांनी मांचू राजवटीला आर्थिक व लष्करी सहाय्य दिले. शिवाय इष्ट सुधारणा अंमलात आणण्याचे राज्यकर्त्यांनी आश्वासन दिल्यामुळे बंडाचा जोर आपोआपच कमी झाला. त्यात बंडखोरांमधील कलहांमुळे आणखीनच व्यत्यय निर्माण झाले. यामुळे बंडाचा बीमोड झाला. या बंडात सु. दोन कोटींची प्राणहानी झाली, असे म्हणतात. कबूल केलेल्या सुधारणा अंमलात न आल्याने कालांतराने राज्यकर्त्यांवरील जनतेचा विश्वास उडाला. साहजिकच १९११ मध्ये मांचू राजवटीचा पुढे अंत होणे फार सोपे झाले.