तक्षण : तक्षण म्हणजे कोरीव कामाची हस्तकला. ही कला फार प्राचीन काळापासून रूढ आहे. लाकूड, दगड, शिंगे अथवा हस्तिदंत इत्यादींचा वापर या कलाकामासाठी प्रामुख्याने केला जातो.

चंदनी पेटी

लाकडावरील तक्षण : ईजिप्तमध्ये ख्रि. पू. २६६४–२१५५ या काळातील शाही थडग्यांत मृत राजांच्या मरणोत्तर जीवनात त्यांची सेवा करण्यासाठी सेवकांच्या कोरीव लाकडी मूर्ती ठेवलेल्या आढळून आल्या आहेत. भारतातही काश्मीर, गुजरात, राजस्थान, म्हैसूर व त्रावणकोर हे भाग प्राचीन काळापासून कलात्मक लाकडी कोरीवकामासाठी प्रसिद्ध आहेत. त्यातही काश्मीरमधील पारंपरिक भौमितिक व वेलबुटीदार लाकडी तक्षण विशेष लोकप्रिय आहे. तेथील नौकागृह व घरांतील तक्तपोशी यांवर केलेले कोरीवकाम मनोवेधक असते.

अक्रोड वृक्षाचे लाकूड हे बेताचे मऊ व नाजूक पोताचे असल्यामुळे ते तक्षणास सोयीचे असते. त्यापासून बनविलेल्या सुबक, कोरीव व नक्षीदार वस्तू आंतरराष्ट्रीय बाजारातही लोकप्रिय झाल्या आहेत. अशा वस्तूंत आडोशीपट, सजावटीचे सामान, चित्रचौकटी, पेट्या, तबके, करंडे इ. नित्योपयोगी वस्तूंचा समावेश असतो. दक्षिण भारतातील मंदिरांमधील देवतांचे रथही तक्षण कलेचे उत्कृष्ट नमुने आहेत. गुजरात व राजस्थानातील जुनी मंदिरे व राजवाडे यांतील लाकडी कलाकुसर विलोभनीय आहे. अहमदाबाद येथील राणी सिप्रीची कबर व सिदी सय्यदची मशीद या दृष्टीने उल्लेखनीय आहेत. म्हैसूर व कूर्ग भागांतील काष्ठशिल्प कलात्मक दृष्ट्या दर्जेदार आहे. नक्षीदार टेबलांसाठी प्राचीन काळापासून मदुराई फार प्रसिद्ध होते. या टेबलाच्या पायांवर गजमुख कोरलेले असे. शिसवी व देवदाराच्या लाकडांवरील कलाकाम पंजाबमध्ये अनेक ठिकाणी होते. उत्तर प्रदेशातील अलीगढ, आझमगढ, बरेली, बुलंद शहर, गाझीपूर, लखनौ, मथुरा वगैरे ठिकाणीही लाकडीकाम होते. त्याकरिता शिसवी आणि साल लाकडांचा उपयोग करण्यात येतो.

चंदनाचे लाकूड मऊ असल्यामुळे तक्षणकामास फारच उपयुक्त व सोयीचे आहे. त्यासाठी लागणारी हत्यारेही अगदी साधी असतात. उदा., लहान करवत, रंधा, विभिन्न आकाराच्या पटाश्या, कानशी, कोरण्या, लाकडी हातोडा व मोगरा एवढेच. हल्ली अहमदाबाद, सुरत, कोईमतूर, मदुराई, म्हैसूर, त्रावणकोर, त्रिचनापल्ली आणि तिरुपती ही चंदनावरील कोरीवकामाची मुख्य केंद्रे आहेत. कर्नाटकातील शिमोगा जिल्हा या कामात अग्रेसर आहे. चंदनावरील तक्षणकाम सामान्यपणे सूक्ष्म, सुबक व कौशल्यपूर्ण असते. तथापि निरनिराळ्या ठिकाणच्या चंदनी कामात काही खास वैशिष्ट्ये दिसून येतात. अहमदाबादी कामात फुलांचे नक्षीकाम तुलनात्मक दृष्ट्या मोठे व खोलवर कोरलेले असून ते पौराणिक व्यक्तिभोवती विखुरलेले असते. उदा., घनदाट अरण्यात मनोविनोदात रममाण झालेले कृष्ण व गोपी, त्याखाली नागमोडी वळणांनी वाहणारी नदी, तिच्यातील अस्पष्ट कोरलेले मासे, कासवे व पाणकोंबडे इ. म्हैसूरकडील चंदनी कामातही पौराणिक प्रसंग कोरलेले असतात, पण त्यात मुख्यत्वे हत्ती व हंस असतात. मुंबई, सुरत व अहमदाबाद येथील चंदनी वस्तू लहान असल्या, तरी त्यांवरील कोरीव काम ठसठशीत व सुबक असते. पानाफुलांच्या विखुरलेल्या नक्षीत पौराणिक व्यक्ती व प्रसंग कोरलेले त्यांत आढळतात. हल्ली विशेषतः दक्षिण भारतात केल्या जाणाऱ्या चंदनाच्या वस्तू म्हणजे फण्या, दागिन्यांच्या पेट्या, लहान प्राणिशिल्पे, पौराणिक मूर्ती, बुद्धिबळाच्या खेळातील प्यादी, पंखे व सजावटीच्या वस्तू असतात तर पाश्चात्त्य प्रवाशांना विशेष आकर्षित करणाऱ्या वस्तूंत आडोशीपट, कलमदान, लेखनमेज, चित्रचौकटी, ग्रंथावरणे वगैरेचा समावेश असतो. अलीकडे मात्र चंदनीकला हळहळू संपुष्टात येत आहे.

भारतामध्ये जुन्या वास्तुकामांत सुबक नक्षीने सजविलेल्या दर्शनी दरवाज्यांच्या चौकटी व दारे सर्वत्र आढळतात. म्हैसूरच्या राजवाड्यातील ‘दसरा’ दिवाणखान्यात व ‘अंबाविलास’ राजवाड्यातील दरबाराच्या दालनात या कलेचे सर्वोत्कृष्ट नमुने पहावयास सापडतात. उत्तर आफ्रिकेतील मुसलमानी देशांतही वास्तूमधील लाकडी तक्षणकाम विपुल प्रमाणात आढळते. यूरोपातील स्कॅंडिनेव्हियन देशात ही कला सर्वांत प्रगत स्वरूपाची असून या कलेचे दहाव्या व अकराव्या शतकांतील नमुने अजूनही सुरक्षित ठेवलेले आहेत. सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात पश्चिम यूरोपमध्ये गॉथिक वास्तुशैलीत लाकडी कोरीवकाम अत्यंत प्रगत झालेले दिसते.

दगडावरील तक्षण : ख्रि. पू. काळापासून दगडी कोरीवकाम भारतात विकसित झाल्याचे दिसून येते. अजिंठा व वेरूळ येथील लेण्यांतील शिल्पकला याची साक्ष देते. तसेच प्राचीन मंदिरांतील खोदकामही उच्च दर्जाचे आहे.

भारतामधील मुसलमानी अंमलात मात्र दगडावरील कोरीवकामांचे नवे पर्व सुरू झाले. उत्तर प्रदेश व राजस्थान या प्रदेशांतील वास्तुकलेत त्याचा प्रभाव दिसून येतो. दिल्लीनजीकचा कुतुबमीनार आणि अजमीरची प्राचीन मंदिरे ही त्याची उदाहरणे होत. या दगडी खोदकामात महिरपी वा टोकदार कमानी, नक्षीदार खांब व रेखीव वेलबुट्टी यांचा समावेश होतो. जगातील सर्वांत भव्य कोरीव कलाकृतिसमूह ख्मेरमधील ⇨अंकोरवात येथे आहे. काळ्या दगडात कोरलेल्या या असंख्य कलाकृती मन भारावून टाकतात, तर अबूच्या पहाडावरील दिलवाडा मंदिर (तेरावे शतक), जौनपूर येथील जुम्मा मशीद (पंधरावे शतक), राजा मानसिंगाने वृंदावन येथे बांधलेले गोविंददेव मंदिर इत्यादिंतील दगडी शिल्पन कलात्मक आहे. मानवांचे आणि प्राण्यांचे आकार खोदलेले गोविंददेवाच्या मंदिरात पहावयास मिळतात. फत्तेपुर सीक्री येथील जोधाबाईच्या राजवाड्यात या कलेचा आविष्कार अधिक स्पष्ट जाणवतो. तसेच तेथील शुभ्र संगमरवरी दगडात बांधलेली शेख सलीम चिस्तीची मोठी कबर म्हणजे मोगल कालातील तक्षणकलेचा एक अतिप्रगत नमुना म्हणावा लागेल. अकबरानंतर जहांगीर बादशाहाच्या काळात तक्षणकामासाठी बहुतकरून लाल दगडाऐवजी संगमरवरी दगडाचाच अधिक उपयोग होऊ लागला. पुढे शाहजहानच्या काळात संगमरवरी शिल्पकला कळसास पोहोचली. त्याने बांधविलेला ताजमहाल, मोती मशीद, जस्मिन मनोरा आणि लाल किल्यातील दिवाण-इ-खास इत्यादींमध्ये त्याचे प्रत्यंतर येते.


 तांबड्या वालुकाश्मावरील कलात्मक तक्षण, बिकानेर.

भारतीय कारागीर दगडी कोरीवकामासाठी अगदी साधी हत्यारे वापरतो. अनुभव व सराव हाच त्याचा या कलेतील मुख्य आधार असतो. खाणीतून आणलेला दगड प्रथम तो साफ करून घेतो आणि आपल्या छिन्नी-हातोडीने छिलून व त्याचा पृष्ठभाग गुळगुळीत करून त्याला हवा तो आकार आणतो. यानंतर त्या दगडावर हव्या त्या नक्षीकामाची अथवा शिल्पाकृतीची आकृती काढली जाते. त्यासाठी कंपास व गुण्याचा उपयोग केला जातो. यानंतर निरनिराळ्या रुंदीच्या व जाडीच्या छिन्न्या आणि हातोडी घेऊन कोरण सुरू होते. नाजुक वेलबुटीचे जाळीकाम लाल दगडावर अथवा संगमरवरावर खोदणे हे भारतीय कारागिरांचे एक विशेष कसब आहे. अशा प्रकारे केलेले कौशल्यपूर्ण जाळीकाम देशातील अनेक भागांत दिसून येते. तथापि ते प्रथम फतेपुर सीक्री व आग्रा येथे सुरू झाले. यातील नक्षीकाम मुख्यत्वे भौमितिक स्वरूपाचे असे. पुढे त्यात वेलबुट्या आल्या. अशा कोरीवकामाचे नमुने अहमदाबाद येथील वास्तुकामात आढळतात. या जाळीकामाचा उपयोग खिडक्यांमध्येच नव्हे, तर दरवाज्यांची तावदाने, पडदे आणि कबरीभोवतींच्या कठड्यांमध्येही परिणामकारक रीतीने केलेला आढळतो. ताजमहालातील संगमरवरी जाळीदार पडदे म्हणजे मोगलकालीन कलेचा एक अत्युत्कृष्ट नमुना आहे.

जाळीदार कोरीवकाम करणारा कारागीरही प्रथम संगमरवरी फरशीवर जाळीचा आकार रेखाटतो व नंतर छिन्नी–हातोडीने तो खोदकाम करतो. अर्धे खोदकाम एका बाजूने व अर्धे दुसऱ्या बाजूने करावे लागते. खोदलेली नक्षी नंतर निरनिराळ्या प्रकारच्या छिन्न्यांनी एकसारखी व निर्दोष करण्यात येते. शेवटी तो त्यावर पाणी घालून एक प्रकारच्या दगडाने ती घासून गुळगुळीत करतो.

हस्तिदंती कलाकृती

अशा या पाषाणी शिल्पकलेची केंद्रे भारतात उदेपूर, बिकानेर, जयपूर, अजमीर, जोधपूर, जैसलमीर इ. ठिकाणी आहेत. जयपूरचा विशेष म्हणजे पाषाणातून देव-दैवतांच्या सुबक व सुंदर मूर्ती घडविणे हा आहे.

उत्तर प्रदेशात आग्रा, मथुरा, मिर्झापूर ही या दृष्टीने फार महत्त्वाची केंद्रे आहेत. आग्रा हे तर जाळीकामाचे प्रसिद्ध केंद्र आहे आणि मथुरा फार पूर्वीपासून पाषाणशिल्पाचे केंद्र म्हणून समजण्यात येते. येथील सामान्य घराच्या प्रवेशद्वाराभोवतीही दगडावरील सुबक खोदकाम आढळते, तर धनिकांची घरे नाजुक आणि सुंदर कोरीवकामाने सजविलेली दिसतात.

हस्तिदंततक्षण : हस्तिदंतावरील तक्षणकलाही फार प्राचीन काळापासून प्रचलित आहे. भारतात ख्रि. पू. दुसऱ्या शतकातील हस्तिदंती वस्तू उत्खननांत आढळून आल्या आहेत, तर आठव्या शतकातील बुद्धिबळाच्या खेळातील हस्तिदंती प्यादी सापडली आहेत. विजयानगरच्या राजवाड्यातील एक दालन संपूर्ण हस्तिदंती खोदकाम केलेले होते, असा उल्लेख मिळतो.

शृंगशिल्पनाचा एक नमुना

अमृतसर, पतियाळा, दिल्ली, वाराणसी, लखनौ, मुर्शिदाबाद, सुरत, अहमदाबाद, त्रावणकोर, विशाखापटनम् व म्हैसूर ही हस्तिदंती तक्षणकलेची केंद्रे पूर्वीपासून प्रसिद्ध आहेत. सामान्यपणे देव-देवतांच्या मूर्ती, मानवी आकृती, शृंगारलेले हत्ती, गाई, मोर, वाघ यांसारख्या वस्तू किंवा पौराणिक प्रसंगचित्रे हस्तिदंतात कोरलेली असतात. या वस्तूंमध्ये कटकच्या बांगड्या, राजकोटच्या फण्या, बडोद्याचे चमचे, अहमदाबाद व सुरत येथील बटने, डब्या, पेट्या, करंडे, छत्रीच्या व चाकूच्या मुठी आजही प्रसिद्ध आहेत. हस्तिदंताच्या सुंदर व कौशल्यपूर्ण वस्तू बनविण्यात म्हैसूर आणि त्रावणकोर आघाडीवर आहेत. मुर्शिदाबाद व कटक येथील तक्षणकामही उच्च दर्जाचे असून दिल्लीतील हस्तिदंती वस्तू परदेशी प्रवाशांचे खास आकर्षण असते. भारतात उत्तम प्रतीचे हस्तिदंत केरळमध्ये मिळतात. ते अधिक घट्ट व कठीण असतात. भारतीय हस्तिदंती तक्षणकलाकाराची हत्यारे म्हणजे करवत, पटाशी, रंधा, सुरी, सामता व कानस हीच असतात. हस्तिदंताच्या लघुरूप ‘मूर्ती’ दक्षिण भारतात तयार होतात, त्यांतून या कलेचे तांत्रिक कौशल्य प्रकट होते.

शिंगावरील तक्षण : रेडा, गवा वगैरे प्राण्यांची शिंगेही तक्षणकामाला वापरतात. म्हैसूर व सावंतवाडी येथे त्यापासून तपकिरीच्या डब्या, फण्या, पेले तसेच छत्री, काठी, सुरी, कट्यार ह्यांच्या मुठी तयार करण्यात येतात. नेपाळमध्ये गेंड्याच्या शिंगापासून पूजापात्रे बनवितात, तर चीनमध्ये हाडापासून व कासवाच्या कवचापासूनही सुंदर वस्तू तयार होतात. केरळमधील त्रिवेंद्रमला नारळाच्या करवंटीवरही मनोवेधक तक्षणकाम होते आणि जयपुरला सुपारीवर सुबक खोदकाम केले जाते. चिंचोक्यावर  किंवा तांदळाच्या दाण्यावर अतिसूक्ष्म असा मुरलीधर कोरलेला असून तो पाहण्यासाठी बृहत् दर्शक काच वापरावी लागते.

पहा : अस्थिशिल्पन काष्ठशिल्प लाकडी कलाकाम शिलाशिल्पन शृंगशिल्पन हस्तिदंतशिल्पन.

कानडे, गो. चिं.