ड्रेक, सर फ्रान्सिस : (सु. १५४०–२८ जानेवारी १५९६). आपल्या सागरी साहसांनी ब्रिटिश सागरी सत्तेची श्रेष्ठता प्रस्थापित करणारा आणि जगाला प्रदक्षिणा घालणारा पहिला इंग्लिश दर्यावर्दी. त्याचा जन्म डेव्हन परगण्यातील टॅव्हिस्टॉकजवळ एका गरीब शेतकरी कुटुंबात झाला. अल्पसे शिक्षण आणि नौकानयनातील प्राथमिक उमेदवारी पूर्ण केल्यावर १५६५ मध्ये तो जॉन लव्हेलबरोबर स्पॅनिश वेस्ट इंडीजपर्यंत सफर करून आला. नौकाधंद्यातील प्रसिद्ध असलेल्या प्लिमथच्या हॉकिन्झ कुटुंबाशी ड्रेकच्या घराण्याचे नाते होते. त्यामुळे सर जॉन हॉकिन्झबरोबर १५६७ मध्ये गुलामांच्या व्यापाराकरिता सागरी पर्यटनाची संधी त्याला लाभली. त्या वेळी ड्रेकने ‘ज्यूडिथ’ या जहाजाचे कप्तानपद सांभाळले. तथापि मेक्सिकोच्या आखातात स्पॅनिशांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यातून तो व जॉन हॉकिन्झ कसेबसे सुरक्षितपणे बाहेर पडले. तेव्हापासून स्पॅनिश लोकांबद्दलचा द्वेष ड्रेकच्या मनात कायमचे घर करून बसला. १५७०–७२ च्या दरम्यान वेस्ट इंडीजवर लहानसहान हल्ले करून संपत्ती मिळविण्याचा त्याने प्रयत्न केला. १५७३ च्या मोहिमेत चांदीचा बराच मोठा खजिना ड्रेकच्या हाती लागला व इंग्लंडमध्ये त्याला बरीच प्रसिद्धी मिळाली. १५७० च्या सुमारास ड्रेकने पृथ्वी-प्रदक्षिणा करण्याचे ठरविले. एलिझाबेथ राणीनेही यास संमती दिली होती. १३ डिसेंबर १५७७ रोजी ‘गोल्डन हिंद’ या शंभर टनी बोटीतून तो मोहिमेवर निघाला. बरोबर त्याने आणखी चार गलबते व १६० माणसे घेतली होती. दक्षिण अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्याला लागल्यावर तो किनाऱ्याकिनाऱ्याने दक्षिणेकडे आला व मॅगेलनच्या सामुद्रधुनीतून ६ सप्टेंबर १५७८ रोजी बाहेर पडला. परंतु येथे वादळामुळे त्यांच्यात फाटाफूट झाली. ड्रेकचे जहाज दक्षिणेकडून ५७º अक्षवृत्तापर्यंत वाहवले. तो केप हॉर्नला गेला किंवा नाही, ह्याविषयी शंका आहे. परंतु टिएरा डेल फ्यूगो हे बेट आहे याची त्याला खात्री पटली होती. या बेटाच्या दक्षिणेस लागून असलेल्या सामुद्रधुनीस त्याचे नाव देण्यात आले आहे. तेथून तो द. अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्याने उत्तरेस निघाला. चिली, पेरू या देशांना त्याने भेटी दिल्या. त्याने स्पॅनिशांचे एक जहाज लुटले आणि पॅसिफिक महासागर पार करून तो मोल्यूकस बेटावर आला. तेथे त्याने सहा टन लवंगा घेतल्या. २६ सप्टेंबर १५८० रोजी तो प्लिमथला परतला. या सफरीत त्याला पाच लाख पौंड फायदा झाला. एलिझाबेथ राणीने प्रत्यक्ष ‘गोल्डन हिंद’ या बोटीवरच ‘सर’ पदवी देऊन त्याचा गौरव केला. डेव्हन परगण्यात त्याने मालमत्ता घेतली. आजही ड्रेक संग्रहालय म्हणून ते प्रसिद्ध आहे. त्याच्या जहाजाची लाकडे स्मृती म्हणून ऑक्सफर्ड विद्यापीठ व मिडल टेंपलमध्ये खुर्ची-टेबल यांसाठी वापरली आहेत.

पुढे २९ जहाजे घेऊन तो कॅरिबियन समुद्रातील स्पॅनिश वसाहती लुटण्यास गेला. तिकडून आल्यावर १५८७ मध्ये त्याने स्पेनमधील कादिझ बंदरावर धाडसी हल्ला करून तेथे लूटमार केली. या वेळेस सागरी सत्तेमध्ये स्पेन अग्रेसर होते व स्पॅनिश आर्माडाची तयारीही पूर्ण होत आली होती. म्हणून कादिझसारख्या महत्त्वाच्या बंदरावरचा ड्रेकचा हल्ला म्हणजे जणू स्पेनच्या राजाच्या दाढीतीलच केसांना झळ लागण्याचा प्रकार ठरला. या हल्ल्यात त्याने एक लाख पौंडाची मालमत्ता मिळविली. १५८८ च्या स्पेन-इंग्लंडच्या युद्धात तो व्हाइस ॲडमिरल होता. आर्माडा स्पेनहून निघण्यापूर्वीच त्यावर हल्ला करण्याची त्याची योजना लवकर मंजूर झाली नाही व झाली त्या वेळेस आर्माडा इंग्लिश खाडीत येऊन पोहोचला होता. या युद्धात ड्रेकने महत्त्वाचा वाटा उचलून स्पॅनिश आर्माडाचा धुव्वा उडवला. १५८९ मध्ये लिस्बनवर केलेल्या हल्ल्यात याला नाविक आधिपत्य देण्यात आले होते. परंतु नाविक व सैनिकी अधिकाऱ्यांत मतभेद झाल्याने ह्या हल्ल्यात त्याला यश मिळाले नाही. परिणामतः पुढे पाच वर्षे ड्रेकला काही काम देण्यात आले नाही. १५९५ मध्ये हॉकिन्झबरोबर तो पुन्हा द. अमेरिकेच्या लूटमारीच्या दौऱ्यावर गेला परंतु या वेळेस स्पॅनिश वसाहतवाले तयारीत असल्याने त्याला अपयश आले. या हल्ल्यानंतर लगेच तो पनामामधील पॉर्तोबेलो बंदराजवळ आमांशाच्या विकाराने मरण पावला.

मध्यम बांध्याचा, गोरापान, धष्टपुष्ट, सदा आनंदी पण काळजीपूर्वक काम करणारा अशा या ‘सागरी श्वानाचा’ (सी डॉग) दरारा बादशाही थाटाचा असे. तरतरीत, निर्भीड वक्तृत्व असलेला महत्त्वाकांक्षी असा हा ड्रेक आपल्या कर्तबगारीने लोकमान्य व राजमान्य ठरला. पहिल्या एलिझाबेथ राणीच्या कारकीर्दीला इंग्लंडच्या इतिहासातील सुवर्णयुग मानले जाते ड्रेक हा या सुवर्णयुगाचा एक शिल्पकार होय.

संदर्भ : 1. Andrews, K. R. Drake’s Voyages: A Reassessment of Their Place in Elizabethan Maritime Expansion, New York, 1967.

            2. Corbett, J. S. Drake and the Tudor Navy, 2 Vols. New York, 1965

            3. Nuttall, Z, Ed. New Light on Drake, New York, 1914.

            4. Williamson, J. A. The Age of Drake, New York, 1960.

 

शाह, र. रू.