ड्रॅको : सरीसृप (सरपटणाऱ्या प्राण्यांच्या) वर्गाच्या स्क्वॅमॅटा गणातील लॅसर्टीलिया या उपगणातल्या ॲगॅमिडी कुलातला एक उडणारा सरडा. याच्या सु. वीसपेक्षा जास्त जाती असून त्या दक्षिण आणि आग्नेय अशियात आढळतात. ड्रॅको डुस्सुमिएराय ही जाती दक्षिण भारतात आढळते. ड्रॅको व्होलान्स ही एक सामान्य जाती असून ती मलाया द्वीपकल्प, सुमात्रा, जावा आणि बोर्निओमध्ये राहणारी आहे.
ड्रॅकोचे शरीर लुकडे, २५–३० सेंमी लांब व बरेच चपटे असते. शेपूट बारीक व सु. १२ सेंमी. लांब असते. शरीराच्या बाजूंवरून मोठ्या पंखांसारख्या पातळ कलांची एक जोडी निघालेली असते. बरगड्यांपैकी काही बऱ्याच लांब होऊन त्यांनी या कलांना आधार दिलेला असतो. या कला पंख्याप्रमाणे उघडता व मिटता येतात. मिटलेल्या स्थितीत त्या शरीराच्या बाजूंना चिकटून असतात. या कलांना विसर्पण कला म्हणतात. गळ्यावर टोक असलेले झोलासारखे तीन प्रवर्ध (वाढी) असतात त्यांपैकी मधला बराच लांब व बाजूचे दोन आखूड असतात. शरीर चकचकीत करड्या अथवा हिरवट रंगाचे असून त्यावर काळे ठिपके व आडवे नागमोडी पट्टे असतात. कला झगझगीत नारिंगी रंगाच्या असून त्यांच्यावरही मोठे काळे ठिपके किंवा पट्टे असतात. नराच्या गळ्यावरील झोलांसारख्या प्रवर्धांचा रंग नारिंगी व मादीच्या गळ्यावरचा निळा असतो.
निरनिराळ्या प्रकारचे कीटक हे याचे भक्ष्य होय. ते शोधण्याकरिता झाडांच्या फाद्यांवरून तो हिंडत असतो. हिंडत असताना विसर्पण कला दुमडलेल्या असतात. एखाद्या फांदीवर स्वस्थ बसलेला असताना तो मधूनमधून फुलपाखराप्रमाणे आपल्या पंखांची (विसर्पण कलांची) उघड-मीट करतो.
ड्रॅको पक्ष्याप्रमाणे पंख खाली–वर हालवून उडत नाही. त्याची उडण्याची पद्धत ⇨उडणाऱ्या खारीच्या पद्धतीप्रमाणेच असते. एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जावयाचे असले म्हणजे तो झाडाच्या शेंड्यावर जातो व तेथून दुसऱ्या झाडाच्या दिशेला हवेत झेप घेतो. ही झेप घेतानाच तो आपल्या विसर्पण कला पूर्णपणे पसरतो व हवेतून घसरत जाऊन दुसऱ्या झाडावर उतरतो. हवेतून जाताना कलांचा उपयोग हवाई छत्रीसारखा होतो. झाडावर उतरण्याकरिता तो झाडाचे उभे खोड अथवा उभी फांदी पसंत करतो. उतरताना डोके जमिनीच्या दिशेला नसून नेहमी वर असते. ड्रॅको अशा प्रकारे विसर्पणाने एका वेळी सु. १८–२० मी. अंतर तोडू शकतो.
कुलकर्णी, सतीश वि.
“