न्यूडिब्रँकिया : मॉलस्का (मृदुकाय प्राण्यांच्या) संघातील गॅस्ट्रोपोडा वर्गाच्या ओपिस्थोब्रँकिया उपवर्गातील सगळ्यांत मोठा गण. यात ३० पेक्षा जास्त कुले आणि १,००० पेक्षा अधिक जाती आहेत. या गणात सागरी पिकळ्यांचा [→ पिकळी] समावेश होतो. त्यांना क्लोम (कल्ले) अथवा कंकतक्लोम (फणीसारखे कल्ले) नसल्यामुळे या गणाला न्यूडिब्रँकिया हे नाव पडले आहे. क्लोमांच्या ऐवजी यांना बाह्य प्रवर्ध (वाढी) अथवा क्लोमक असून प्रावाराला (कवचाच्या लगेच खाली असणाऱ्या त्वचेच्या बाहेरच्या मऊ घडीला) विंधून ते बाहेर आलेले असतात. संरचना आणि रंग या बाबतीत क्लोमकात पुष्कळदा उत्कृष्ट प्रगती (विकास) दिसून येते.

इओलिस : (१) क्लोम, (२) गुदद्वार.

प्रौढावस्थेत न्यूडिब्रँक प्राण्यांना कवच नसते डिंभावस्थेत (भ्रूणानंतरच्या स्वतंत्रपणे अन्न मिळवून जगणाऱ्या व प्रौढाशी साम्य नसणाऱ्या सामान्यतः क्रियाशील पूर्व अवस्थेत) ते असते पण पुढे नाहीसे होते. सगळ्या ज्ञात मृदुकाय (मॉलस्क) प्राण्यांमध्ये हे अतिशय सुंदर प्राणी आहेत. डोक्यावर सूक्ष्म डोळ्यांची एक व संस्पर्शकांची (स्पर्शज्ञान, शोध घेणे, पकडणे, चिकटणे इ. कार्यांसाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या लांब, सडपातळ व लवचिक इंद्रियांची) एक जोडी असते संस्पर्शक घ्राणेंद्रियाचेही कार्य करतात. त्यांना रायनोफोर म्हणतात. मुखात रेत्रिका (कायटिनी दातांच्या ओळी असलेली मुखातील कलेची–पटलाची – एक आखूड व रुंद पट्टी) असून कधीकधी जंभही (जबडेही) असतात. सर्व जगभर जरी यांचा प्रसार झालेला असला, तरी उष्ण कटिबंधातील समुद्रात त्यांची भरपूर वाढ झालेली दिसून येते. ओहटीच्या लगेच खालच्या क्षेत्रात ते वारंवार आढळतात पण काही समुद्रातही आढळतात.

 

बहुतेक न्यूडिब्रँक प्राणी लहान असून त्यांची लांबी २·५ सेंमी. पेक्षा कमी असते काही थोडे ७·५–१०·० सेंमी. लांब असतात पण ऑस्ट्रेलियाच्या बॅरिअर रीफवर (प्रवाल-रोधिकांवर) आढळणाऱ्या प्राण्यांची लांबी ३० सेंमी. असते. सगळे न्यूडिब्रँक उभयलिंगी (नर व मादीची जननेंद्रिये एकाच प्राण्यात असलेले) असतात. हे प्राणी हिंस्र असून मुख्यतः सीलेंटेरेट (आंतरगुही) प्राणी व स्पंज यांवर उपजीविका करतात. काही न्यूडिब्रँक (उदा., इओलिस) समुद्रपुष्पासारखे सीलेंटेरेट प्राणी खाऊन त्यांच्या ⇨ दंशकोशिका क्लोमकांमध्ये साठवून ठेवून प्रसंगी स्वसंरक्षणासाठी वापरतात. बचावाची ही पद्धती प्राणिसृष्टीत तरी वैशिष्ट्यपूर्ण आहे असे म्हणता येईल. हे प्राणी एखाद्या आधाराला, शैवलाला किंवा ते खात असलेल्या प्राण्याला (भक्ष्याला) चिकटून बसतात. प्रसंगी ते आपल्या विलक्षण तरंगी हालचालींनी पोहतात.

जमदाडे, ज. वि.