न्यूप : नायजेरियातील एक बहुजिनसी जमात. त्यांच्या पारंपरिक शासनास न्यूप या नावानेच संबोधितात. यांची वस्ती मुख्यत्वे नायजर व काडूना या नदीसंगमाच्या परिसरात आहे. बेनी, झाम, बताची, केडे (क्येड्ये) या न्यूपांच्या काही प्रमुख जमाती होत. त्यांची लोकसंख्या १०,००,००० (१९७१) होती. ते क्वा भाषासमूहातील न्यूप गटाच्या पाच स्वतंत्र बोली बोलतात. त्यांची छोटीमोठी खेडी दाट वस्तीने गजबजलेली असून घरे मातीने सारविलेली असतात, तसेच मातीच्या विटांची गोलाकार घरेही आढळतात. त्यांवर गवताचे छप्पर असते. अर्थोत्पादनात न्यूप व्यापाराला विशेष महत्त्व देतात व शेतीला दुय्यम स्थान देतात. ते स्थलांतरित कुदळी शेती करतात. ज्वारी हे प्रमुख पीक असून शिवाय अंबाडी, कापूस, गळिताची धान्ये ही पिके काढतात. अमेरिकन लोकांशी संपर्क आल्यानंतर त्यांची आर्थिक स्थिती सुधारली आणि त्यांनी तंबाखू, टोमॅटो, मिरी वगैरे नगदी पिके घेण्यास सुरुवात केली. शेतीशिवाय ते मच्छिमारी व गुरे पाळणे हे व्यवसायही करतात. या लोकांची पारंपरिक हस्तकला प्रसिद्ध असून त्यांच्यात पितळकाम, चांभारकाम, विणकाम, लोहारकाम, शिंपीकाम वगैरे लघुउद्योग करणारे अनेक कसबी कारागीर आहेत. त्यांच्या शिस्तबद्ध श्रेणिसंघटना आहेत. तलम कापड, पितळेची सुबक तबके, काचेचे सुरेख मणी इ. त्यांची उत्पादने उल्लेखनीय आहेत आणि त्यांना आसपासच्या प्रदेशात चांगली मागणीही आहे. न्यूप पुरुष हा शेती करतो स्त्रिया व्यापारातही तरबेज आहेत.
वयोगटाप्रमाणे न्यूप समाजात सामाजिक दर्जा बदलतो. त्यांच्यात पितृसत्ताक कुटुंबपद्धती प्रचलित आहे. विवाहात वधूमूल्य दिले जाते. मामा-भाची विवाहाची पद्धत रूढ असून बहुपत्नीत्व आढळते तथापि पहिल्या किंवा ज्येष्ठ पत्नीचे स्थान उच्च मानले जाते. बहुतेक न्यूप हे इस्लाम धर्मीय आहेत. पुरुषांत सुंता करण्याची आणि स्त्रियांत भगशिश्नाचा काही भाग कापण्याची चाल आढळते. इस्लाम धर्माचा स्वीकार करूनही अनेक लोक प्राचीन धार्मिक परंपरा आणि विधी पाळतात. ते आकाशदेवाची तसेच पितरांची पूजा करतात. जादूटोणा व भूताखेतांवर त्यांचा विश्वास आहे. प्रजोत्पादनासाठी ते अनेक विधी करतात.
न्यूप खेड्यात एकजण प्रमुख असतो आणि तो वडिलधाऱ्या व्यक्तीच्या सल्ल्याने खेड्याची व्यवस्था पाहतो. एकूण न्यूप राज्याचे चार विभाग आहेत आणि त्या प्रत्येकावर एक अधिकारी असतो. तो राजाला जबाबदार असून राजास इत्सू न्यूप म्हणतात. तो तीन सरदार घराण्यांतून निवडला जातो. त्यामुळे राजसत्ता ठराविक घराण्यांतच फिरत राहते.
संदर्भ : Murdock, G. P. Africa : Its Peoples and Their Culture History, New York, 1959.
मांडके, म. वा.