न्यिकलायेफ : यूरोपीय रशियाच्या युक्रेन प्रजासत्ताकातील याच नावाच्या प्रांताचे प्रशासकीय, तसेच औद्योगिक शहर व काळ्या समुद्राच्या उत्तर किनाऱ्यावरील बंदर. लोकसंख्या ४,१२,००० (१९७५). हे समुद्रापासून सु. ६५ किमी. आत ईंगूल नदीच्या मुखावर वसले आहे. या प्रसिद्ध रशियन बंदराची स्थापना १७८८ मध्ये प्रिन्स पट्यॉमक्यिन याने केली. दुसऱ्या महायुद्धात शहारातील औद्योगिक व व्यापारी उद्योगधंद्यांचे बरेच नुकसान झाले. या काळात (ऑगस्ट १९४१ – मार्च १९४४) हे जर्मनांच्या ताब्यात होते. हे बंदर रशियाचे एक महत्त्वाचे आरमारी केंद्र, व्यापारी शहर आणि धक्के, गोद्या, धान्याची उंची कोठारे इ. सोयींनी युक्त असून येथून मुख्यतः धान्य, लोखंड, मँगॅनीज, कोळसा, साखर, इमारती लाकूड यांची निर्यात होते. हे जहाजबांधणीचे आणि दुरुस्तीचे मोठे केंद्र असून जहाजबांधणी व शिक्षण प्रशिक्षण संस्थाही येथे आहेत. अभियांत्रिकी व उपभोग्य वस्तुउद्योग, पादत्राणे, यंत्रे, रेल्वेची एंजिने व डबे, मांस डबाबंदी, वनस्पती तेल, दूधदुभते, रसायने, कापडनिर्मिती हे येथील महत्त्वाचे उद्योगधंदे होत. ह्याच्या आसमंतात गहू, कापूस, एरंडी, सूर्यफूल इत्यादींचे उत्पादन होते. डिसेंबर–मार्च यांदरम्यान बंदर जरी काही प्रमाणात गोठत असले, तरी बर्फफोडी जहाजांच्या साहाय्याने हे वाहतुकीस खुले केले जाते. येथील ‘ओल्ड गार्ड हाउस’ आणि त्यातील व्ह्येरिश्चागिन वस्तुसंग्रहालय, नौ-अधिकरण न्यायालय आणि पूलकव्ह येथील निकोलस वेधशाळेची शाखा ही ठिकाणे उल्लेखनीय आहेत.
चौधरी, वसंत
“