न्यायवैद्यक : वैद्यकशास्त्र व परिवैद्यकीय (वैद्यकीय बाबींशी संबंधित अशा) ज्ञानाचा उपयोग दिवाणी आणि फौजदारी अशा दोन्ही कायद्यांच्या कामात न्यायदानाच्या मदतीकरिता करणाऱ्या शास्त्राला ‘न्यायवैद्यक’ असे म्हणतात. वैद्यकाच्या विविध शाखांचा या कामाकरिता उपयोग होतो. कायद्याच्या कक्षेत येणाऱ्या सर्व वैद्यकविषयक बाबींचे स्पष्टीकरण या शास्त्राद्वारे न्यायाधिशांना सहज उपलब्ध होते. या शास्त्राची एक बाजू कायद्याच्या वैद्यकीय अंगाचे स्पष्टीकरण करते व म्हणून न्यायवैद्यकास ‘विधिवैद्यक’ किंवा ‘राज्यवैद्यक’ असेही म्हणतात. दुसऱ्या बाजूमध्ये वैद्यकीय व्यवसाय आणि तत्संबंधीच्या कायद्यांचा समावेश असल्यामुळे त्यास ‘वैद्यकीय न्यायशास्त्र’ असे म्हणतात व यामध्ये डॉक्टर व रोगी यांचे परस्परसंबंध, दोन डॉक्टरांचे एकमेकांशी असणारे संबंध आणि डॉक्टर व राज्यव्यवस्था यांचे संबंध यांवर प्रामुख्याने विचार केला जातो. डॉक्टर व रोगी यांचा संबंध एखाद्या करारासारखा असतो. व्यवसायाच्या ओघात रोग्यासंबंधी काही गुप्त माहिती डॉक्टरला सहज मिळते. करारभंग करणे किंवा गुप्त माहिती बाहेर फोडणे कायद्याच्या कक्षेत येतात. दुसऱ्या व्यवसायबंधूची निंदानालस्ती करणे, अप्रामाणिक प्रतिस्पर्धा करणे यांवरही बंधने आहेत. अपघात, विषबाधा वगैरेंमुळे झालेल्या मृत्यूच्या संदर्भात वा साथीच्या रोगांची योग्य अधिकाऱ्यांना माहिती न पुरविणे यांसारख्या गोष्टी वैद्यकीय व्यवसाय आणि राज्यव्यवस्था यांच्याशी निगडीत असतात. वरील विवेचनावरून जे वैद्यकीय ज्ञान न्यायाच्या कामात मदत करते ते ‘न्यायवैद्यक’, अशी सुटसुटीत व्याख्या करता येते.

इतिहास : वैद्यकशास्त्राचा व न्यायशास्त्राचा संबंध फार प्राचीन काळापासून आलेला दिसतो. वेदकाली भ्रूणहत्या हे फार मोठे पातक किंवा गुन्हा समजला जात असे. गर्भवती स्त्रीला देहदंडाची शिक्षा देऊ नये असा पूर्वी दंडक होता. ‘वाक्‌पारुष्य’ (कठोर बोलणे, शिव्या देणे वगैरे) गुन्ह्यात मोडत असे. त्वग् भेद करणे (त्वचा फाटेल अशी जखम करणे), रक्त काढणे, मांस बाहेर पडेल अशी जखम करणे, हाड मोडणे या गोष्टी गुन्हे समजले जात आणि याकरिता निरनिराळ्या शिक्षा मनुस्मृतीत सांगितल्या आहेत. त्याचप्रमाणे बलात्कार आणि परस्त्रीगमन हीही शासनार्ह असल्याचे मनुस्मृतीत सांगितले आहे. कौटिलीय अर्थशास्त्र (इ. स. पू. चौथे शतक) या राजनीतिशास्त्रावरील ग्रंथात न्यायदानाच्या कामी वैद्यकशास्त्रामध्ये अंतर्भूत असणाऱ्या गोष्टींचा विचार करावा असे म्हटले आहे. त्यात अकस्मात मेलेल्याची परीक्षा कशी करावी, मृत्यूचे कारण कसे शोधावे, मृत्यूस कारणीभूत होणारा कसा शोधावा, मयत व्यक्तीची ओळख कशी पटवावी, बलात्कार व अनैसर्गिक संभोग कसे ओळखावेत व त्यासाठी कोणती शिक्षा द्यावी इत्यादींविषयी सविस्तर विवेचन केलेले आहे.

पाश्चात्त्य देशांतून बॅबिलोनियन काळापासून (इ. स. पू. ३०००–५३९) या विषयाकडे लक्ष जाण्यास सुरुवात झाली होती. पाश्चात्त्य न्यायवैद्यकाची सुरुवात मोझेसच्या पशुसंभोग (मानवाने पशूशी संभोग करणे) व इतर अनैसर्गिक लैंगिक संबंधांवरील आज्ञांपासून झाली असे म्हणावयास हरकत नाही. १२२४ मध्ये सिसिलीचे बादशाह दुसरे फ्रेडेरिक यांनी वैद्यकविषयक कायदे केले होते. त्यांत व्यावसायिक परवाने, वैद्याने घ्यावयाचे शुल्क वगैरेंबद्दल नियम होते. व्यवसाय करण्यापूर्वी भावी वैद्याने चारचौघांसमोर सालर्नो येथील अधिकृत शिक्षकापुढे परीक्षा द्यावयास हवी असा दंडक होता. वैद्यकीय व्यवसाय करण्याचा परवाना फक्त बादशाह किंवा त्याचा प्रतिनिधीच देई. स्पेन (१२८३) आणि जर्मनी (१३४७) येथेही वरीलप्रमाणे कायदे करण्यात आले. मुद्रणकलेचा शोध लागण्यापूर्वी चौदाव्या व पंधराव्या शतकांत वैद्य आपल्या व्यवसायाच्या हस्तलिखित नोंदी ठेवीत. या नोंदींना ‘कॉनसिलिया’ म्हणतात व त्यांमधून भोंदू वैद्यांवरील निर्बंध व इतर न्यायवैद्यकीय विषयांचा उल्लेख आढळतो.

अठराव्या शतकात न्यायवैद्यकास स्वतंत्र आणि पद्धतशीर स्वरूप प्राप्त होण्यास सुरुवात झाली. यामध्ये जर्मन लोक अग्रेसर होते व त्यांनी या विषयाची प्राध्यापकपदे प्रथम स्थापन केली आणि या विषयावरील उत्तम ग्रंथही प्रसिद्ध केले. Corpus Juris Medico-Legale हा एम्. बी. व्हॅलेन्टिनी यांनी लिहिलेला जर्मन भाषेतील या विषयावरील पहिला ग्रंथ १७२२ मध्ये प्रसिद्ध झाला. फ्रान्समध्ये ॲन्टोइन लुई यांनी गळफास लागून मेलेल्या मृतांच्या शरीरांवरील खूण आणि आत्महत्या यांमधील खुणांच्या फरकांचे वर्णन १७६३ मध्ये प्रसिद्ध केले. एफ्. ई. फोडेरे यांनी या विषयावरचा आपला महान ग्रंथ १७९८ मध्ये प्रसिद्ध केला. यांशिवाय ए. ए. तारेद्य (१८६७) यांनी या शास्त्रात मोलाची भर घातली.

न्यायवैद्यकावरील पहिला इंग्रजी ग्रंथ सॅम्युएल फार यांनी लिहिला असून तो १७८८ मध्ये प्रसिद्ध झाला परंतु खून केलेल्या जारज (अनौरस) मुलांच्या प्रेतांवरील खुणांचे वर्णन केलेला विल्यम हंटर यांचा प्रबंध (१७८३) हा इंग्रजी भाषेतील या विषयावरील मौलिक भर मानतात. डब्ल्यू. ए. गाय यांनी १८४४ मध्ये या विषयावर एक ग्रंथ लिहिला. आर. एल्. टेट नावाच्या एडिंबरो येथील स्त्रीरोगतज्ञांनी बलात्कार व इतर न्यायवैद्यकीय विषयांवर उत्तम लेख लिहिले होते. अमेरिकेत १८२३ मध्ये एलिमेंट्स ऑफ मेडिकल जूरिसप्रूडन्स हा ग्रंथ टी. आर्. बेक यांनी लिहिला.

चिनी वैद्यकात १२४१–४३ च्या सुमारास लिहिलेल्या ‘कॉरोनरांना सूचना’ या ग्रंथात शव पुरण्यापूर्वी किंवा पुरल्यानंतर बाहेर काढून ते तपासण्याविषयीच्या बारीकसारीक सूचना नमूद केल्या आहेत. जखमा, गळा दाबून मरण पावलेल्यांच्या शरीरावरील खुणा, आत्महत्या यांबद्दल त्यात माहिती आहे. यांशिवाय विषबाधा व प्रतिविषे (उतारे) यांचीही माहिती दिली आहे.

हिंदुस्थानात फौजदारी कायद्याची सुरुवात टॉमस मेकॉले (लॉर्ड मेकॉले) यांनी तयार केलेल्या मसुद्यावरून १८३७ पासून झाली. प्रत्यक्ष कायदा १८६२ पासून ब्रिटिश अमलाखालील प्रदेशात लागू झाला. या कायद्यात वैयकीय ज्ञानाचा न्यायाच्या कामी उपयोग करण्याविषयी काही कलमे होती. हिंदुस्थानातील या विषयावरचा पहिला इंग्रजी ग्रंथ नॉर्मन चेव्हर्स यांनी लिहिला. हळूहळू न्यायवैद्यक हा विषय हिंदुस्थानातील सर्व वैद्यकीय शिक्षणसंस्थांतून शिकविण्यात येऊ लागला. लखनौ येथील के. जी. मेडिकल कॉलेजमधील न्यायवैद्यकाचे प्राध्यापक जयसिंग पी. मोदी यांचा मेडिकल जूरिसप्रूडन्स अँड टॉक्सिकॉलॉजी हा इंग्रजी भाषेतील ग्रंथ १९२० मध्ये प्रसिद्ध झाला. तोपर्यंत सर्व न्यायालये व वैद्यकीय शिक्षणसंस्थांमधून पाश्चात्त्य लेखकांचे ग्रंथच प्रमाण मानले जात. मोदींच्या ग्रंथाची १९७७ मध्ये विसावी आवृत्ती निघाली असून तो सर्वमान्य झाला आहे. या विषयावरील दुसरा उत्तम ग्रंथ मुंबईच्या जी. एस्. मेडिकल कॉलेजचे प्राध्यापक सी. के. पारीख यांनी लिहिला असून १९७६ मध्ये त्याची दुसरी आवृत्ती निघाली आहे. मद्रास मेडिकल सर्व्हिसचे एम्. ए. कामथ यांनीही १९२३ मध्ये या विषयावरील एक ग्रंथ लिहिला असून १९६० पर्यंत त्याच्या सहा आवृत्त्या निघाल्या होत्या.

मराठीतील या विषयावरील पहिला ग्रंथ न्यायवैद्यक गो. शि. वैद्य यांनी लिहून १८७१ मध्ये प्रसिद्ध केला. याच नावाचा दुसरा ग्रंथ ज. वा. जोगळेकर यांनी १९४३ मध्ये प्रसिद्ध केला. विधिवैद्यक नावाचा तिसरा ग्रंथ १९६२ मध्ये द. स. लवाटे यानी लिहून प्रसिद्ध केला.


उद्देश : समाजातील अन्यायाचे परिमार्जन करण्याच्या दृष्टीने गुन्ह्यांची योग्य तऱ्हेने छाननी होऊन व जरूर त्या ठिकाणी वैद्यकीय ज्ञानाचा पुरावा म्हणून उपयोग करून, न्यायदानाच्या कार्यात मदत करणे, हा या शास्त्राचा प्रमुख उद्देश होय. न्यायवैद्यक हा विस्तृत विषय असून त्याचा वैद्यकाच्या सर्व शाखांशी संबंध येतो परंतु त्यामध्ये वैद्यकीय ज्ञानाचा विशिष्ट दृष्टिकोनातून विचार केला जातो. उदा., शस्त्रक्रियाविशारदाला जखम निर्जंतुक आहे किंवा नाही, टाके घालावयाचे किंवा नाही, इलाज कोणते करावयाचे याकडे लक्ष केंद्रित करावे लागते. न्यायवैद्यकीय दृष्टिकोनातून जखमेच्या प्रकारांकडे कापीव किंवा ठेचाळलेली, साधी किंवा गंभीर, ताजी किंवा काही दिवसांपूर्वीची इ. बाबींकडे अधिक लक्ष पुरविणे जरूर असते. या कारणामुळे वैद्यकीय न्यायवेत्त्यास त्याच्याकडे येणाऱ्या गोष्टींकडे वैद्यकीय व वैध अशा दोन्ही दृष्टिकोनांतून बघावे लागते आणि याकरिता त्याला फौजदारी प्रक्रिया संहिता, भारतीय दंड संहिता व भारतीय पुरावा अधिनियम यांसारख्या कायदेविषयक बाबींचे ज्ञान असणेही आवश्यक असते. आधुनिक जीवनाच्या वाढत्या जटिलतेबरोबरच बहुतेक सर्व वैद्यकीय व्यावसायिकांना न्यायवैद्यकाचे थोडेबहुत ज्ञान असणे आवश्यक झाले आहे. यामुळे वैद्यकीय शिक्षणक्रमात या विषयास स्वतंत्र व महत्त्वाचे स्थान दिले जाते.

वैद्यकशास्त्राची न्यायाच्या कामी केव्हा मदत लागते ? : समाजातील प्रत्येक व्यक्तीचे व्यक्तिगत संरक्षण अबाधित राहण्याकरिता, तसेच कोणत्याही आरोपीस सबळ पुराव्याच्या अभावी शिक्षा न होण्याकरिता जे न्यायालयीन कार्य चालते, त्यामध्ये न्यायवैद्यकाचा फार महत्त्वाचा वाटा असतो. उदा., एकाद्या स्त्रीने पोलिसात बलात्कार झाल्याची तक्रार केल्यास ती खरी आहे किंवा खोटी आहे, याविषयीचा न्यायवैद्यकीय पुरावा तथाकथित आरोपीस संपूर्ण संरक्षणात्मक ठरण्याचा संभव असू शकतो.

देशाच्या राज्यकारभाराचा वैद्यकशास्त्राशी अनेक प्रकारांनी संबंध येतो. सामाजिक आरोग्य व्यवस्थित राखणे, वैद्यकीय व्यावसायिकांची नोंद, तसेच दिवाणी व फौजदारी कामामध्ये वैद्यकशास्त्राचा उपयोग करणे ही कामे राज्यवैद्यकाच्या कक्षेत मोडतात. मारामारीमुळे होणारी इजा, खून, संशयित अगर अनैसर्गिक मृत्यू यांचा कायद्याशी संबंध असल्यामुळे अशा कामांच्या बाबतीत वैद्यकीय तज्ञांचा न्यायालयाशी संबंध येतो. जिवंत किंवा मृत व्यकीची ओळख पटविणे, व्यक्तीच्या वयाची निश्चिती करणे, लिंग ठरविणे, शवपरीक्षण करून मृत्यूचे कारण ठरविणे, औरस आणि अनौरस संतती विचार, बलात्कार, पशुसंभोगादी अनैसर्गिक लैंगिक गुन्हे, गर्भपात, शिशुहत्या, मानसिक विकृती, विषबाधा वगैरे अनेक गोष्टींच्या संदर्भात वैद्यकीय तपासणी फार महत्त्वाची असून ती न्यायदानाकरिता अत्यंत जरूर असते.

वैद्यकीय पुरावा : न्यायालयातून सादर करण्यात येणारा वैद्यकीय पुरावा दोन प्रकारचा असतो : (अ) लेखी किंवा कागदोपत्री, (आ) तोंडी.

लेखी पुरावा : यामध्ये न्यायाधिशासमोर ठेवण्यात येणाऱ्या पुढील कागदपत्रांचा समावेश असतो : (१) वैद्यकीय दाखले, (२) न्यायवैद्यकीय नोंदी, (३) मृत्यूपूर्व विधान.

वैद्यकीय दाखले: हे निरनिराळ्या प्रकारचे असतात. उदा., आजारी असल्याबद्दल, वेड लागल्याबद्दल, मृत्यूच्या कारणासंबंधी, साथीचे रोग होऊ नयेत म्हणून, जत्रेच्या किंवा तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी जाण्यापूर्वी नियमाप्रमाणे प्रतिबंधात्मक अंतःक्षपणे (इंजेक्शने) घेतल्याबद्दल वगैरे. असे दाखले देताना डॉक्टरने फार काळजी घ्यायची असते आणि ते जबाबदारीचे काम असते. न्यायालयात फक्त राज्यवैद्यकीय मंडळाप्रमाणे ज्यांची कायदेशीर नोंदणी झाली असेल अशाच व्यावसायिकांचे दाखले ग्राह्य असतात आणि म्हणून प्रत्येक दाखल्यावर नोंदणी क्रमांक घालणे आवश्यक असते.

या दाखल्यांपैकी मृत्यूचा दाखला फार महत्त्वाचा असतो. या दाखल्यात मरणाचे नक्की कारण आणि मृताची ओळख पटेल अशी माहिती असलीच पाहिजे. काही ठिकाणी ठराविक नमुन्यात छापील पत्रके मृत्यूनंतर भरून द्यावयाची असतात. मृत्यूचा दाखला देताना डॉक्टरने फी मिळाली नाही अशा सबबीवर टाळाटाळ करता काम नये. हे काम त्याच्या कर्तव्याचाच भाग असते व त्याने दाखला दिलाच पाहिजे. मात्र कोणत्याही प्रकारचा संशय असल्यास (उदा., विषबाधेमुळे झालेला मृत्यू) त्याने ताबोडतोब पोलिसात लेखी कळविणे जरूर असते. वेड लागल्याचा दाखला देणे ऐच्छिक स्वरूपाचे असते.

न्यायवैद्यकीय नोंदी: दंडाधिकारी, न्यायाधिकारी, फौजदार किंवा इतर पोलिस अंमलदाराने लेखी विनंती केल्यानंतर डॉक्टर त्यांना ज्ञात झालेली वैद्यकीय माहिती ज्या नोंदीत ठेवतात, तिला न्यायवैद्यकीय नोंद म्हणतात. मारहाण, हल्ला, बलात्कार, खून विषबाधा इ. गुन्ह्यांशी संबंधित अशा या नोंदी असतात. या नोंदींचा उद्देश तपासणी अंमलदारास मदत करण्याचा असतो. सदरच्या नोंदी न्यायालयात मांडल्या जातात व त्यांची छाननी होऊन बचावाच्या वकीलास त्यासंबंधी प्रश्न विचारण्याचा हक्क असतो. याकरिता या नोंदी फार काळजीपूर्वक तयार करावयाच्या असतात. तपासणीनंतर ताबडतोब अशी नोंद करून तिची स्थळप्रत जवळ ठेवणे अगत्याचे असते. जखमांच्या नोंदी, मरणोत्तर शवतपासणीची नोंद, वयाचा दाखला, मानसिक स्थितीचा दाखला, दारूच्या परिणामाचा दाखला इत्यादींचा समावेश यात असतो. पोलिसाकडून आलेली गुन्ह्यातील हत्यारे, कपडे इत्यादींचे वर्णन व्यवस्थित लिहून घेतल्यानंतर, त्या वस्तू न्यायालयात ओळखता येतील अशी खूण करून, मगच त्या सीलबंद करून आणलेल्या पोलिस शिपायाबरोबर परत करणे हितावह असते. न्याय रसायनशास्त्रीय प्रयोगशाळेकडे [→ न्याय रसायनशास्त्र] पाठविण्याच्या वस्तू नेहमी स्वतःच्या ताब्यात योग्य बंदोबस्तात ठेवाव्यात किंवा व्यवस्थित  सीलबंद करून पोलिसाकडे सुरक्षित ठेवण्याकरिता पाठवाव्यात. प्रत्येक न्यायवैद्यकीय नोंदीवर तारीख, वेळ, ओळख पटण्याजोग्या खुणा वगैरे महत्त्वाची माहिती असावी व स्थळप्रत जरूर ठेवावी.

मृत्यूपूर्व विधान: आपला मृत्यू कसा व कोणत्या परिस्थितीत ओढवतो आहे यासंबंधी मरणाऱ्या व्यक्तीने पूर्ण शुद्धीवर असताना केलेल्या लेखी अगर तोंडी विधानाला ‘मृत्यूपूर्व विधान’ किंवा ‘अंत्यविधान’ म्हणतात. सदरचे विधान फौजदारी किंवा दिवाणी न्यायालयीन कामात दखलपात्र असते. मारामारीत गंभीरपणे जखमी झालेला रोगी मरणोन्मुख अवस्थेत आढळल्यास व शक्य वाटल्यास डॉक्टरने पोलिसामार्फत मॅजिस्ट्रेटकडून अंत्यविधान नोंदविण्याची व्यवस्था करावी वा तेवढा वेळ नाही असे वाटल्यास स्वतः हे विधान नोंदवावे. मृत्यूपूर्व विधान ते करणाऱ्याच्या मृत्यूनंतर कायदेशीर पुरावा मानले जाते. मृत्यू ताबडतोब झाला किंवा विधानानंतर काही दिवसांनी झाला, तरी तो कायदेशीर पुरावा म्हणून ग्राह्य असतो. या विधानासंबंधी पुढील गोष्टी महत्त्वाच्या असतात : (१) विधान नोंदविताना रोगी पूर्ण शुद्धीत असावा लागतो. (२) विधान लिहून घेतल्यानंतर त्यावर विधान करणारा पूर्ण शुद्धीत असल्याचा वैद्यकीय दाखला असलाच पाहिजे. (३) तोंडी विधान ऐकणाऱ्याने ते ताबडतोब लिहून काढावयास हवे. (४) विधान करणाऱ्याच्या मातृभाषेतच ते लिहिलेले असावे व विचारलेले प्रश्न व दिलेली उत्तरे जशीच्या तशी नमूद केलेली असावीत.


(५) सूचक प्रश्न विचारू नयेत व सूचना करू नयेत. (६) अती अशक्तपणामुळे किंवा इतर कारणामुळे (उदा., स्वरयंत्राची जखम) रोगी बोलण्याच्या परिस्थितीत नसल्यास विचारलेले प्रश्न आणि त्याने दिलेली खुणेवजा उत्तरे या दोन्हींची नोंद करावी. (७) संपूर्ण विधान रोग्यास वाचून दाखवून त्यावर त्याची सही किंवा आंगठ्याची निशाणी घेणे जरूर असते. ज्यांचा संबंध नाही अशा दोन व्यक्तींच्या साक्षीदार म्हणून सह्या घ्याव्यात. (८) विधान अपूर्ण असतानाच रोगी मेला वा बेशुद्ध झाला, तर मिळालेली असेल तेवढीच माहिती डॉक्टरने नोंद करून त्यावर स्वाक्षरी, तारीख, वेळ वगैरे लिहून ठेवावी. (९) पूर्ण किंवा अपूर्ण विधान योग्य त्या अधिकाऱ्याकडे सीलबंद पाकिटातून पाठवावे. (१०) तपासणी करणाऱ्या पोलिस अंमलदारास विधान नमूद करतेवेळी सहसा हजर राहू देऊ नये.

तोंडी पुरावा: हा नेहमी प्रत्यक्ष स्वरूपाचाच असावा लागतो. मी अमूक पाहिले, ऐकले किंवा अनुभवले असे शपथेवर न्यायालयात सांगावयाचे असते. मत प्रदर्शित करताना (उदा., मृत्यूचे कारण सांगताना) अमुक कारणावरून ते बनल्याचे सांगावे लागते. कागदपत्राशिवाय इतर वस्तूविषयी (उदा., चाकू, कुऱ्हाड वगैरे) मत दिले जात असताना ती वस्तू न्यायाधिशासमोर हजर असावी लागते. लेखी पुराव्यापेक्षा तोंडी पुरावा अधिक महत्त्वाचा असतो कारण तो शपथेवर द्यावयाचा असतो तसेच आरोपीस किंवा त्याच्या वकीलास उलटतपासणी करावयाची पूर्ण संधी मिळते. न्यायाधिशासमोर लेखी पुरावा खरा असल्याचे, स्वहस्ते लिहिल्याचे किंवा टंकलिखित केल्याचे आणि त्यावर स्वाक्षरी केल्याचे शपथेवर सांगावे लागते. मात्र मृत्यूपूर्व विधान, तज्ञाचे छापील ग्रंथातील मत, खालच्या न्यायलयात झालेली डॉक्टरची साक्ष, रसायन विश्लेषणज्ञाचे तपासणी वृत्तांत आणि पूर्वी एखाद्या खटल्यात झालेल्या साक्षीचा वृत्तांत यास अपवाद असून अशा शपथेची त्याकरिता गरज नसते.

व्यक्तीची ओळख पटविणे : अमुक एक व्यक्ती हीच आहे असे सिद्ध करणे म्हणजेच तिची ओळख पटविणे होय. अशी व्यक्तिगत ओळख पटविण्याची गरज न्यायदानाच्या कामात नेहमी लागते. खुनाचा प्रयत्न ज्या व्यक्तीवर करण्यात आला तिने आपल्यावरील हल्लेखोर ओळखणे फार महत्त्वाचे असते. गुन्हेगार म्हणून पकडलेली व्यक्ती गुन्ह्याच्या जागी प्रत्यक्ष हजर होती व आपण तिला ओळखतो असे सांगणारा साक्षीदार न्यायदानास मदत करतो. ओळख संपूर्णपणे किंवा काही अंशी पटविणे शक्य असते. जिवंत व्यक्ती, मृत व्यक्ती, शरीराचे मिळालेले अवशेष, हाडे वगैरेंच्या बाबतीत ओळख पटविण्याची नेहमी गरज पडते. जिवंत व्यक्तीची ओळख पटविण्याचे काम बहुतांशी पोलिस कार्यात मोडते परंतु याही बाबतीत वैद्यकीय ज्ञानाची जरूर पडते. उदा., व्यक्तीच्या अंगावरील व्रण जुना आहे की अलीकडील आहे हे फक्त वैद्यकीय तपासणीच ठरवू शकेल. अनेक न्यायवैद्यकीय गोष्टींत ओळख पटविणे जरूरीचे असते आणि त्याचा उपयोग फौजदारी व दिवाणी अशा दोन्ही कामांत होतो. विमा, सेवानिवृत्ती वेतन, वारसा यांसारख्या दिवाणी कामांत व्यक्तीची ओळख पटविणे महत्त्वाचे असते, तसेच फरारी सैनिक, गुन्हेगार, प्रसूतिगृहातील नवजात अर्भकांची अदलाबदल, तोतयेगिरी यांसारख्या फौजदारी कामांत ओळख पटविणे अगत्याचे असते. सरकारी नोकरीतील वैद्यकीय व्यावसायिकांना मृताची ओळख पटविण्याचे काम नेहमी करावे लागते. आगीत जळालेली प्रेते, रेल्वे, बस किंवा विमान अपघातातील प्रेते, कुजलेली प्रेते, मुद्दाम विद्रूप केलेली प्रेते इ. मृतांची ओळख पटविणे जरूरीचे आणि महत्त्वाचे असते. खुनातील प्रेताची ओळख पटविणे अत्यावश्यक असते. प्रेताची खात्रीपूर्वक ओळख पटविणे आणि मृत्यू घातपातानेच ओढवल्याचा सबळ पुरावा सादर करणे या दोन गोष्टी खून खटल्याचा गाभाच असतात.

कोणत्याही व्यक्तीची ओळख पटविण्याच्या दृष्टीने तपासणी करण्यापूर्वी वैद्यकीय अधिकाऱ्याने तिची लेखी संमती घेणे आवश्यक असते. मात्र फौजदारी प्रक्रिया संहितेच्या ५३ व्या कलमाप्रमाणे पोलिसांनी पाठविलेल्या गुन्हेगाराची तपासणी अशी संमती न घेता करता येते. अशा तपासणीच्या दाखल्यावर व्यक्तीच्या अंगावरील कायमच्या कमीत कमी दोन खुणा लिहावयासच हव्यात. अशाच प्रकारच्या खुणा मृत शरीराची तपासणी करताना लिहून ठेवणे आवश्यक असते.

ओळख पटविण्याकरिता पुढील गोष्टी विचारात घ्याव्या लागतात : (१) वंश आणि जात, (२) लिंग, (३) वय, (४) त्वचारंग आणि चेहेऱ्याची ठेवण, (५) केस, (६) मानवनिर्मित अथवा बर्टिलॉन पद्धत आणि बोटांच्या ठशांचे शास्त्र, (७) पायाच्या तळव्याचे ठसे, (८) शारीरिक विद्रूपता, (९) व्रण, (१०) गोंदणे, (११) व्यवसायजन्य खुणा, (१२) हस्ताक्षर, (१३) कपडे, घड्याळ वगैरे व्यक्तिगत वस्तू, (१४) बोलणे व आवाज, (१५) चालण्याची ढब, (१६) सवयी, (१७) मानसिक वाढ, स्मृती व शिक्षण, (१८) इतर गौण माहिती.

वरील सर्वच गोष्टींची माहिती देणे अशक्य असल्यामुळे काही महत्त्वाच्या गोष्टींचाच उल्लेख थोड्या विस्ताराने येथे केला आहे.

वंश आणि जात : प्रत्येक वंशातील लोकांचे वर्ण, केस, डोळे व ओठ यांमध्ये वैशिष्ट्य असते व त्यावरून वंशाचा अंदाज करता येतो. उदा., कुरळे व लोकरीसारखे केस, जाड ओठ, काळा वर्ण, नाकाची ठेवण वगैरेंवरून निग्रो ओळखता येतात. काही वैशिष्ट्ये जातनिदर्शक असतात, उदा., नाक व कान टोचणे हिंदूंत प्रामुख्याने आढळते आणि सुंता मुसलमानात आढळते. पुष्कळ वेळा हाडांच्या सांगाड्यातील वैशिष्ट्ये वंश ठरविण्यास उपयुक्त ठरतात.

लिंग : वारसा, इस्टेटीची विल्हेवाट, लग्‍न, नपुंसकत्व, बलात्कार, घटस्फोट इत्यादींच्या बाबतीत व्यक्तीचे लिंग ठरवावे लागते. जिवंत व्यक्तीचे लिंग ठरविणे सर्वसाधारणपणे सरळ व सोपे असते. मात्र काही वेळा उदा., मध्यलिंगी, उभयलिंगी इ. लिंगविकृतींत, अतिशय कुजलेल्या प्रेतामध्ये किंवा केवळ हाडांच्या सांगाड्याचे लिंग ठरविणे कठीण असते. कुजलेले प्रेत, कोल्हे, गिधाडे आदी प्राण्यांनी अंशतः खाऊन टाकलेले प्रेत, प्रेतांचे अवशेष किंवा लिंग ओळखू येऊ नये म्हणून गुन्हेगाराने मुद्दाम केलेली चिरफाड अशा अवस्थेत लिंग ठरविणे कठीण असते. नव्या तंत्रानुसार मिळालेला शरीरभाग पुरुषाचा की स्त्रीचा हे ठरविणे शक्य झाले आहे. या तंत्राला ‘कोशिका लिंग निश्चिती’ किंवा ‘केंद्रक लिंग निश्चिती’ म्हणतात.

कोशिकांच्या (पेशींच्या) केंद्रकातील (कोशिकेतील प्रक्रियांवर नियंत्रण ठेवणाऱ्या जटिल गोलसर पुंजातील) क्रोमॅटिन नावाचा पदार्थ स्त्रियांमध्ये कोशिका भित्तीच्या आतील भागावर विशिष्ट रीत्या गोळा होतो. या गोळ्याला ‘बार पिंड’ म्हणतता. पुरुष कोशिकांत बार पिंड आढळत नाहीत व म्हणून त्यांना ‘क्रोमॅटिन अभावदर्शी’ व स्त्री कोशिकांत ते आढळतात म्हणून त्यांना ‘क्रोमॅटिन अस्तिवाची’ म्हणतात. सूक्ष्मदर्शकाखाली ही परीक्षा मृत्यूनंतर दोन किंवा तीन आठवड्यांपर्यंत करता येते. त्वचेचा खरवडून घेतलेला भाग, अनैच्छिक स्‍नायूच्या कोशिका, कूर्चामधील कोशिका व अधिवृक्क ग्रंथींच्या (दोन्ही मूत्रपिंडांवर टोपीसारख्या असलेल्या ग्रंथींच्या) बाह्यकातील (बाहेरच्या भागातील) कोशिका अशा तपासणीकरिता उत्तम असतात. स्त्री-पुरुषांच्या रक्तातील पांढऱ्या कोशिकांच्या केंद्रकांतही काही विशिष्ट फरक असून त्यावरूनही लिंग ठरविता येते.


वय: जिवंत व्यक्तीच्या वयाचा आणि कायद्याचा संबंध निरनिराळ्या कारणांमुळे येतो. वयनिश्चिती न्यायवैद्यकीय कामात महत्त्वाची असते. ओळख पटविणे, वयात येणे, कायदेशीर जबाबदारी, लग्‍नाचे कायदेशीर वय, नोकरीकरिता लागणारी वयोमर्यादा, बलात्कार, न्यायालयीन सजेच्या वेळी गुन्हेगाराचे वय, गर्भपात इत्यादींच्या बाबतीत वयाचा प्रश्न उद्‍भवतो. भ्रूणहत्त्येच्या संदर्भांत गर्भांच्या वयाची निश्चिती करणे न्यायवैद्यकातील महत्त्वाचे कार्य असते.

वय ठरविण्याकरिता दात, हाडांचे अस्थिभवन (हाडाची पूर्ण वाढ होतेवेळी त्याचे निरनिराळे भाग एकमेकांशी जुळण्याची क्रिया), वजन आणि उंची व इतर काही माहिती विचारात घ्यावी लागते. दात येण्याच्या क्रियेचा व वयाचा घनिष्ठ संबंध आहे [→ दात]. दातांचा आणि न्यायवैद्यकाचा नेहमी संबंध येतो त्याकरिता ‘न्यायवैद्यकीय दंतविज्ञान’ ही स्वतंत्र शाखाच तयार झाली आहे. सर्वसाधारणपणे दुधाचे आणि कायमचे दात येण्याची वये निरनिराळी असून ती निश्चित करण्यात आलेली आहेत. दाताची क्ष-किरण तपासणी करून सर्वसाधारणपणे १७ ते २० वर्षे वयापर्यंतचे वय जवळजवळ निश्चित करता येते. त्यानंतरच्या वयाचा फक्त अंदाज करता येतो व ठाम मत देता येत नाही. दंतवैद्याने केलेल्या दंतारोग्यासंबंधीच्या नोंदी (उदा., किडका दात, वाकडे दात, भरलेले दात, कृत्रिम दात वगैरे) व्यक्तिगत ओळख पटविण्यास फार मदत करतात. अशा नोंदी मृत शरीराची ओळख पटविण्याकरिता फार महत्त्वाच्या ठरल्याची अनेक उदाहरणे आहेत.

हाडांच्या अस्थिभवनावरून वयाचा अंदाज करणे शक्य असते. निरनिराळ्या हाडांच्या अस्थिभवनाचा काल निरनिराळा असतो आणि तो लिंग, प्रदेश इत्यादींवरही अवलंबून असतो. क्ष-किरण चित्रणात अस्थिभवन झाले आहे किंवा नाही तसेच ते कोणत्या अवस्थेत आहे ते स्पष्ट दिसते. क्ष-किरण चित्रणाकरिता लहान मुलात मनगटाची, प्रौढ वयात कोपर व गुडघ्याची आणि वयस्कर व्यक्तीमध्ये कवटीची हाडे तपासतात. अस्थिभवनावरून वयाचा अंदाज करताना अंदाजात ३ वर्षे कमीअधिक होण्याचा संभव असल्याचे अलीकडील संशोधनावरून सिद्ध झाले आहे. वयस्कर व्यक्तीचे वय नक्की सांगणे कठीण असल्यामुळे सर्वसाधारणपणे ते दशकात म्हणजे चाळीशी, पन्नाशी, साठी असेच सांगणे शक्य असते.

आ. १. कोपराच्या हाडांच्या अस्थिभवनाचे क्ष-किरण चित्र (यात हाडांचे न जुळलेले भाग स्पष्ट दिसत आहेत).

वय, वजन आणि उंची यांसंबंधीची सर्वसाधारण कोष्टके तयार केलेली आहेत परंतु वैयक्तिक फेरफार बरेच असल्यामुळे या कोष्टकांचा न्यायवैद्यकीय दृष्ट्या फारसा उपयोग होत नाही.

पूर्ण दिवसांचे मूल सर्वसाधारणपणे ५० सेंमी. लांब असते आणि ६ महिन्यांनंतर लांबी ६० सेंमी. होते. जन्मवेळी वजन २·५ ते ३ किग्रॅ. असते व ते प्रथम वर्षी दरमहा ०·५ किग्रॅ.ने वाढते. म्हणजे सहा महिन्यांच्या शेवटी वजन जन्माच्या वेळच्या दुप्पट आणि प्रथम वर्षाच्या शेवटी तिप्पट होते.

जन्माचा दाखला, यौवनारंभास होणारे शारीरिक बदल, वयस्कर अवस्थेत होणारे अपकर्षी बदल यांचा समावेश वयाचा अंदाज करण्याकरिता लागणाऱ्या इतर माहितीत होतो. नगरपालिकांचा जन्म दाखला, शालान्त परीक्षेचा वा शाळेचा दाखला यांमधील वयाची नोंद (जन्म तारीख) वयनिश्चितीस उपयुक्त असतात. स्त्रीमध्ये वयाच्या तेरा-चौदाव्या वर्षी स्तनवाढ होते व ऋतुस्रावास सुरुवात होते. पुरुषात सर्वसाधारणपणे चौदाव्या वर्षी जघनास्थिच्या भागावर केस दिसू लागतात, तर स्त्रियांत तेराव्या वर्षी दिसतात. काखेतील केस यानंतर एक वर्षानंतर दिसतात. अपकर्षदर्शक खुणांमध्ये तोंडावरील सुरकुत्या, स्वच्छमंडलाच्या (बुबुळाच्या पुढच्या पारदर्शक भागाच्या) कडेवर दिसणारे वृद्धत्व-वलय, मोतीबिंदू, केस पांढरे होणे वगैरेंचा समावेश होतो. वयाचा दाखला देताना केवळ अंदाजी वय देणेच शक्य असून त्यात ± ३ वर्षांपर्यंत फेरफार होण्याची शक्यता लक्षात घ्यावी लागते.

मानवमिती अथवा बर्टिलॉन पद्धत आणि बोटांच्या ठशांचे शास्त्र : वयाच्या एकविशीनंतर हाडांच्या सांगाड्यात काहीही बदल होत नाहीत या तत्त्वावर आधारलेल्या, एम्. ए. बर्टिलॉन यांनी शोधिलेल्या धंदेवाईक गुन्हेगारांना ओळखण्याकरिता उपयुक्त असलेल्या पद्धतीला त्यांचेच नाव देण्यात आले आहे. ती फक्त प्रौढ व्यक्तीतच उपयुक्त असते. अलीकडे ही पद्धत वापरात नसून बोटांच्या ठशांवर अधिक भर देण्यात येत आहे. हे एक स्वतंत्र शास्त्रच बनले असून त्याला ‘अंगुलीमुद्राशास्त्र’ किंवा ‘बोटांच्या ठशांची पद्धत’ म्हणतात. जगातील कोणत्याही दोन व्यक्तींच्या बोटांवरील रेषांचे ठसे एकमेकांशी कधीही जुळणारे नसतात, या सत्यावर ही पद्धत, आधारलेली आहे. लंडन पोलिसांनी बोटांचे ठसे कोणत्याही देशांत तारायंत्राने किंवा बिनतारी संदेश व्यवस्थेने पाठविण्याची योजनी केली असून त्यामुळे केवळ पाचच मिनिटांत बोटांच्या ठशांचे चित्र तयार करता येते. अज्ञात प्रेताच्या बोटांचे ठसे कधीकधी प्रेताची ओळख पटविण्यास मदत करतात. याकरिता पोलिस असे ठसे घेऊन ठेवतात किंवा शवविच्छेदन करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यास बोटांची त्वचा राखून ठेवून ती मुंबई येथील फिंगर प्रिंट ब्युरोसारख्या संस्थेत पाठविण्यास सांगतात [→ बोटांचे ठसे].

जन्मजात खुणा : काही शारीरिक खुणा जन्मजात असतात. उदा., सहा बोटे असणे, खंडौष्ठ, खंडतालू वगैर. अंगावरील तीळ व जन्म निशाण्या याही जन्मजात खुणांत मोडतात. या खुणांचे वर्णन करताना ते नेहमी अचूक असावे. उदा., तीळ गव्हाएवठा, काळा, केस विरहित, सपाट, बेंबीपासून पाच सेंमी. अंतरावर, घड्याळाच्या तिनाच्या काट्याच्या रेषेत. शक्यतो एकमेकांपासून लांब असलेल्या कमीत कमी दोन खुणांची नोंद करून ठेवतात.

आ. २. विघटित प्रेताच्या हाताच्या पुढील भागावरील बाह्यत्वचा खरवडल्यावर दिसून आलेली गोंदण्याची खऊणनंतर प्राप्त होणाऱ्या खुणा : व्रण, गोंदणे वगैरे. देवीचे व्रण, दंडावरील देवी टोचल्याच्या खुणा, आघातजन्य अथवा शस्त्रक्रियेनंतर राहणारे जखमांचे व्रण, व्यवसायजन्य खुणा वगैरे कालांतराने प्राप्त होणाऱ्या खुणा व्यक्तीची ओळख पटविण्यास उपयुक्त ठरतात. त्वचेच्या सर्व थरांना होणारी जखम नेहमी कायम स्वरूपाचे व्रण शिल्लक ठेवते. व्रण अज्ञात प्रेताची ओळख पटविण्यासह मदत करतात. एका स्त्रीच्या प्रेतामध्ये पोटाच्या कातडीचा फक्त १७·५ X १५ सेंमी. एवढाच भाग शिल्लक होता परंतु त्यावरील शस्त्रक्रियाजन्य जखमेचा कायम व्रण प्रेताची ओळख पटविण्यास पुरेसा ठरला होता. देवाची नावे, चित्रे, बायकोचे किंवा नवऱ्याचे नाव गोंदण्याची प्रथा अस्तित्वात आहे. गोंदण्याकरिता वापरलेला रंग त्वचेत खोलवर गेला असल्यास तो कधीही पुसला जात नाही. एवढेच नव्हे तर विघटन झालेल्या प्रेतावरही गोंदल्याच्या खुणा सापडू शकतात. कधीकधी बाह्यत्वचा खरवडून टाकून या खुणा अगदी स्पष्ट करता येतात.


न्यायवैद्यक व मृत्यु : न्यायवैद्यकाचा व मृत्यूचा नेहमी घनिष्ठ संबंध येतो. ज्या शरीराला संवेदना अजिबात नसतात, जे थोडीही हालचाल करू शकत नाही व ज्याच्या मेंदू, हृदय आणि फुप्फुसांचे कार्य पूर्णपणे बंद असते त्या शरीराचा ‘कायिक मृत्यु’ झाला असे म्हणतात. कायिक मृत्यूनंतर तीन ते पाच तासांनी जेव्हा शरीर तापमान परिसरीय तापमानाप्रमाणेच बनते, शरीरातील सर्व ऊतके (समान रचना व कार्य असणाऱ्या कोशिकांचे समूह) आणि कोशिका पूर्णपणे अकार्यक्षम बनतात आणि डोळे, त्वचा आणि रक्त व स्‍नायू यांमध्ये बदल होतात तेव्हा ‘रेणवीय मृत्यू’ झाला असे म्हणतात. अलीकडील प्रतिरोपण शस्त्रक्रियेतील [→ अंतस्त्य-प्रतिरोपण] प्रगतीमुळे या दोन प्रकारच्या मृत्यूंमधील फरक फार महत्त्वाचा बनला आहे. कारण फक्त कायिक मृत्यूनंतर ताबडतोब काढून घेतलेले अवयव प्रतिरोपणाकरिता योग्य असतात. मृत शरीरातील अवयव काढून घेण्यापूर्वी त्या शरीराचा मेंदू संपूर्णपणे मृत झाला आहे, असे ठरविणे जरूर असते. मृत्यूची कायदेशीर व्याख्या केलेली नाही. आधुनिक विचारसरणीप्रमाणे जिवंत राहण्याकरिता योजलेले सर्व कृत्रिम उपाय बंद केल्यानंतर जी व्यक्ती आपोआप सर्व शरीरक्रिया करू लागण्यास असमर्थ असते तिला मृत मानावयास हरकत नाही. सर्वसाधारणपणे मस्तिष्क विद्युत् आलेख (मेंदूमध्ये निर्माण होणाऱ्या विद्युत् प्रवाहांची नोंद दर्शविणारा विशिष्ट यंत्राच्या साहाय्याने मिळविण्यात येणारा आलेख) जेव्हा सतत पाच मिनिटे एक सरळ रेषा मिळतो तेव्हा मरणाची खात्री झाल्याचे कायदेशीर मानले जाते.

मृत्यु नैसर्गिक असो किंवा अपघाती असो, हृदय, फुप्फुस किंवा मेंदू या तीन अवयवांपैकी कोणता तरी एक प्रथम कार्यहीन बनल्यामुळे उद्‍भवतो. या अवयवांचे कार्य एवढे जीवनावश्यक आहे की, त्यांना ‘जीवन त्रिपदी’ म्हणतात. त्यांना अनुलक्षित असे मृत्यूचे तीन प्रकार किंवा तीन संनिकृष्ट कारणे ठरविली आहेत.

(१) बेशुद्धी : मेंदूतील जीवनावश्यक क्रिया बंद पडून बेशुद्धावस्थेत मृत्यु येतो. बेशुद्धी येण्यास अनेक अप्रत्यक्ष कारणे असू शकतात. उदा., मेंदूचे रोग किंवा आघात, ऊष्माघात, अल्कोहॉल, अफू इत्यादींमुळे होणारी विषबाधा, शरीरात उत्पन्न होणारी विषे (उदा., ॲसिटोन, यूरिया) वगैरे.

(२) मूर्च्छा : हृदयक्रिया बंद पडून होणाऱ्या मृत्यु-प्रकाराला मूर्च्छा म्हणतात. हृद्‍रोग, अती रक्तस्राव, रक्ताशी संबंधित असलेले काही रोग, प्रतिक्षेपी क्रियेमुळे हृदयाची क्रिया थांबणे (उदा., पोटावर जोरात लाथ किंवा गुद्दा मारल्यामुळे हृदयक्रिया बंद पडणे), वृषणाघात (पुरुषाच्या जनन ग्रंथीवरील आघात), भावनातिरेक वगैरे.

(३) श्वासरोध : फुप्फुसांचे कार्य प्रथम बंद पडून होणाऱ्या मृत्यूस श्वासरोधजन्य मृत्यु म्हणतात. ⇨ न्यूमोनियासारखे फुप्फुस रोग, अफू विषबाधेमुळे मेंदूतील श्वसनकेंद्राची निष्क्रियता, श्वसनमार्गातील हवेच्या मार्गातील अडथळे (उदा., गळफास, गळा दाबणे, विशिष्ट वायू) वगैरेंमुळे श्वासरोध संभवतो.

अचानक मृत्यू : एकाएकी व अनपेक्षित उद्‍भवणाऱ्या मृत्यूला अचानक किंवा अनपेक्षित मृत्यु म्हणतात. अशा मृत्यूचे कारण सांगून त्याबद्दल दाखला देणे पुष्कळ वेळा अशक्य असते. म्हणून अशा मृत्यूनंतर शवविच्छेदन करून कारण ठरवावे लागते. आघात, मार, सुरामारी, गळफास, पाण्यात बुडणे, आगीमुळे भाजणे वगैरेंमध्ये येणारा मृत्यू अचानकच असला, तरी मृत्युची चौकशी कायदेशीर रीतीने करणे आवश्यकच असते. हृदय व त्याच्या रक्तवाहिन्यांचे विकार, महारोहिणीचे विकार, श्वसन तंत्राचे विकार, आंत्रमार्गाचे (आतड्यातील मार्गाचे) विकार, केंद्रीय तंत्रिका तंत्राचे विकार [→ तंत्रिका तंत्र], जनन-मूत्रमार्गाचे विकार, मधुमेह, ⇨ ॲडिसन रोग, भयादी अवसादोत्पाद (सार्वादेहिक प्रतिक्षोभ निर्माण करणारी) भावनाविवशता, तुडुंब भरलेले मूत्राशय हळूहळू रिकामे न करता एकदमच रिकामे करणे, गळ्यात मासा किंवा इतर पदार्थ अडकल्यामुळे येणारा मृत्यू इ. अनेक कारणांमुळे येणारा अचानक मृत्यु नैसर्गिक असला, तरी शवविच्छेदनाने मृत्युचे कारण निश्चित करणे नेहमी हितावह असते. वरपांगी अनैसर्गिक वाटणारे मृत्यु नैसर्गिक ठरतात किंवा नैसर्गिक दिसणाऱ्या मृत्यूमागे गुन्हा दडविण्याचा प्रयत्‍न असू शकतो. शवविच्छेदन करूनही पुष्कळ वेळा मृत्युचे कारण सापडत नाही, तरीही न्यायदानाकरिता ते उपयुक्तच असते [→ मृत्यु शवपरीक्षा].

मानवी शरीराच्या आघातज पीडा अथवा यांत्रिक इजा : आघातज पीडा अथवा इजा न्यायवैद्यकाचा एक महत्त्वाचा भाग गणला जातो. मारामारी, खून, दरोडे, जाळपोळ, बेफाम जमाव, निरनिराळ्या प्रकारच्या वाहनांचे अपघात इ. कारणांमुळे उद्‍भवणाऱ्या सर्व इजांची तपासणी करून त्याबद्दलचा दाखला देण्याचे काम न्यायवैद्यकीय अधिकाऱ्यास करावे लागते. जिवंत व्यक्तीच्या शरीरावरील तसेच पोलीस अधिकाऱ्याने शवतपासणीकरिता पाठविलेल्या प्रेतांच्या अंगावरील सर्व बारीकसारीक जखमांची काळजीपूर्वक नोंद करावी लागते. मोठ्या रुग्णालयांतून आणि सर्व सरकारी दवाखान्यांतून याकरिता खास नोंदवही (रजिस्टर) ठेवलेली असते व तीत वैद्यकीय अधिकाऱ्याने स्वहस्ते अशा इजांबद्दलची सर्व महत्त्वाची माहिती नोंदवावयाची असते.

न्यायवैद्यकीय दृष्ट्या शरीरावरील आघातज पीडांचे वर्गीकरण पुढील तीन प्रकारांत करतात : (१) ठेचाळलेली जखम (२) ओरखडे आणि (३) इतर जखमा.

ठेचाळलेली जखम : लाठी, काठी, दगड इ. कठीण व बोथट पदार्थांच्या आघातामुळे केशवाहिन्या तुटून रक्त ऊतकात पसरते, अशा जखमेला ठेचाळलेली जखम म्हणतात व ती नेहमी पृष्ठभागावर आढळते आणि तीमध्ये त्वचा अखंड असते. ठेचाळलेल्या जखमेच्या जागी १-२ तासांत नीलत्वक् (त्वचा काळीनिळी दिसणे) दिसू लागते. हा परिणाम कधीकधी एक किंवा दोन दिवसांनंतरही दिसतो कारण रक्तस्राव खोल भागात झालेला असतो. शरीराचा विशिष्ट भाग, शरीरप्रकृती, त्या भागाचा रक्तपुरवठा, वय, लिंग, त्वचा रंग, काही विकृती व गुरुत्वाकर्षण या गोष्टींवर ठेचाळलेल्या जखमेचे स्वरूप अवलंबून असते. या जखमांचा आकार, लांबी, रुंदी बहुधा वापरलेल्या हत्याराशी जुळणाऱ्याच असतात. पाठीवर लाठीचे वळ अगदी स्पष्ट दिसतात (आ. ३). अनेक वेळा अशा जखमा मरणपूर्व की मरणोत्तर आहेत हे ओळखावे लागते. ठेचाळलेल्या जखमा साध्या जखमा म्हणून गणल्या जातात. म्हणजेच त्या करणाऱ्या विरुद्ध दखलपात्र गुन्हा धरला जात नाही. कधीकधी बोथट हत्याराची बाह्य खूण न दिसता अंतस्थ अवयवास गंभीर इजा होऊन मृत्यूही संभवतो. उदा., पोटावर मारलेली लाथ प्लीहेच्या (पानथरीच्या) विदारणास कारणीभूत होऊ शकते.


आ. ३. लाठीमाराचे वळ

ओरखडे : ज्या जखमांमध्ये बाह्यत्वचेला इजा होते त्यांना ओरखडे म्हणतात. शरीराचा पृष्ठभाग व इतर ओबडधोबड पदार्थ यांच्यातील घर्षणामुळे बहुधा अशा जखमा उत्पन्न होतात. त्यातून अत्यल्प रक्तस्राव होतो व त्या लवकर भरून येतात आणि बऱ्या झाल्यानंतर त्या ठिकाणी व्रण शिल्लक उरत नाही. खरटचणे, समांतर रेषांसारखे ओरखडे, एखाद्या वस्तूचा त्वचेवर उमटणारा ठसा इ. सूक्ष्म प्रकारांवरून ओरखडा कोणत्या पदार्थामुळे झाला असावा हे ओळखता येते. शरीरावर जागजागी खरचटलेले बहुधा रस्त्यावरील अपघातात आढळते. अशा दुखापती अपघातातील वाहनाची दिशा दर्शवितात. दाब पडून झालेले ओरखडे वस्तू ओळखण्यास मदत करतात उदा., वाहनाच्या अपघातात टायरचा दाब पडून किंवा गळफासाच्या दोरामुळे उमटलेले गळ्यावरील ओरखडे. गळा दाबून मृत्यु आल्यास गळ्यावर गुन्हेगाराच्या नखांचे ओरखडे स्पष्ट दिसू शकतात.

इतर जखमा : यांमध्ये विदारित जखमा (त्वचा आणि त्याखालील ऊतके फाटून होणाऱ्या जखमा), कापीव जखमा (चाकू, सुरा इ. तीक्ष्ण धार असलेल्या हत्यारांमुळे होणाऱ्या जखमा), भोकसल्याच्या जखमा, अग्‍न्यास्त्रजन्य जखमा (बंदूक, पिस्तूल, रिव्हॉल्व्हर आदी हत्यारांमुळे होणाऱ्या जखमा) यांचा समावेश होतो. यांशिवाय प्रतिकारजन्य जखमा (हल्लेखोरास प्रतिबंध करताना होणाऱ्या जखमा) आणि विशिष्ट हेतूने केलेल्या स्वनिर्मित जखमा यांचा न्यायवैद्यकीय दृष्ट्या अभ्यास केला जातो.

न्यायवैद्यकीय दृष्टिकोनातून जखमांविषयीची नोंद करताना तसेच दाखला देताना त्यांच्या स्वरूपाविषयी विशेष उल्लेख करावा लागतो. त्याकरिता कायद्याने (भारतीय दंड संहिता, कलम ३२०) जखमांचे वर्गीकरण (१) साध्या आणि (२) गंभीर असे केले आहे. यांशिवाय काही जखमा प्राणघातक असतात. फार व्यापक नसलेल्या, लवकर बऱ्या होणाऱ्या व बऱ्या झाल्यानंतर कोणतीही विकृती किंवा विद्रूपता शिल्लक न उरणाऱ्या जखमांना साध्या जखमा म्हणतात. पुढील जखमांचा समावेश गंभीर जखमात होतो : (१) डोळ्यांची दृष्टी कायमची नाश पावणे, (२) कानाची श्रवणशक्ती नाश पावून कायमचे बहिरेपण येणे, (३) जननेंद्रिय कापून टाकणे, (४) एखादा सांधा निकामी बनणे, (५) अस्थिभंग किंवा सांधा निखळणे, (६) चेहरा कायमचा विद्रूप होणे, (७) मजबूत असलेला दात पडणे, (८) जीव धोक्यात आणणारी व जखमेमुळे व्यक्तीचे जीवन २० दिवसांपेक्षा जास्त दिवस असह्य, त्रासाचे व वेदनाजनक बनविणारी व जीमुळे रुग्णालयात त्या काळात खिळवून टाकणारी (रुग्ण स्वतःचे दैनंदिन कार्य करावयास असमर्थ असला पाहिजे) जखम. कवटीच्या हाडाचा अस्थिभंग, मोठ्या रक्तवाहिनीची इजा आणि अंतस्त्याची (उदर व छाती यांतील हृदय, फुप्फुस, यकृत इत्यादींपैकी कोणत्याही अवयवाची) गंभीर जखम ह्या जखमा प्राणघातक गणल्या जातात.

न्यायवैद्यकीय मनोदोषचिकित्सा : मनोदोषचिकित्सा (मानसिक रोगांसंबंधीचे ज्ञान) हा वैद्यकशास्त्राचा एक स्वतंत्र विभाग आहे. न्यायवैद्यकाचा आणि या विभागाचा जवळचा संबंध पुष्कळ वेळा येतो. सर्वसाधारण भाषेत ज्याला वेड लागणे म्हणतात त्या विकृतीला ‘चित्तभ्रम’ किंवा ‘बुद्धिभ्रष्टता’ म्हणतात.मानसिक विकृतीमुळे समाजातील जी व्यक्ती स्वशरीराकडे लक्ष देत नाही, स्वतःचे व्यवहार बघण्यास असमर्थ असते व जिची स्वतःचे बरेवाईट करून घेण्याकडे किंवा इतरांना अपाय करण्याकडे प्रवृत्ती असते तिला समाजाच्या व कायद्याच्या दृष्टिकोनातून ‘वेडा’ म्हणतात. कधीकधी व्यक्तीचे सामाजिक अपसमायोजन (परिस्थितीशी जळवून घेण्याची क्षमता नसणे) एवढे वाढते की, तिला तिच्या किंवा समाजाच्या हिताकरिता बंदिस्त करणे भाग पडते. कायद्याप्रमाणे अशा व्यक्तीला तिच्या कृत्याबद्दल जबाबदार धरता येत नाही. म्हणजे वेड्या माणसाने केलेला गुन्हा शिक्षापात्र ठरत नाही. कायद्याप्रमाणे प्रत्येक व्यक्ती मानसिक दृष्ट्या निरोगीच मानली जाते. म्हणून ती वेडी असल्याचे निःसंदिग्धपणे सिद्ध व्हावे लागते. कधीकधी शिक्षा चुकविण्याच्या किंवा कमी करण्याच्या दृष्टीने गंभीर गुन्ह्यातील गुन्हेगार वेडाचे ढोंग करतात. अनेक वेळा मालमत्ता लुबाडण्याकरिता नातेवाईक वेडाचा खोटा आळही आणतात. नको असलेली व्यक्ती मार्गातून दूर सारण्याच्या उद्देशाने तिच्यावर वेडाचा आळ घेतला जातो.

वरील कारणांमुळे न्यायवैद्यकशास्त्रात मानसिक विकृतींची कारणे व प्रकार, वेड्यांच्या संबंधी वैद्यकीय व्यावसायिकांचे कर्तव्य, वेड्यांची दिवाणी व फौजदारी जबाबदारी, खरे वेड आणि वेडाचे ढोंग यांमधील फरक, वेड्याचे नियंत्रण वगैरे विषयांचा अभ्यास केला जातो.

वेड्यासंबंधीच्या भारतीय कायद्यातील तरतूदीप्रमाणे वेडाचा दाखला देताना पुढील विशेष काळजी घ्यावी लागते कारण हा दाखला वैध दस्तऐवज मानतात. (१) दाखला विशिष्ट नमुन्याप्रमाणेच दिलेला असावा. (२) वरवर आणि उथळ तपासणी करून केव्हाही दाखला देता कामा नये. (३) एकदाच केलेल्या तपासणीवर विसंबून दाखला देऊ नये. तीन निरनिराळ्या वेळी व निरनिराळ्या दिवशी केलेल्या तपासण्या विचारात घेऊन मगच दाखला द्यावा. (४) कायद्याप्रमाणे दोन निरनिराळ्या दाखल्यांची गरज असते. दोन्ही डॉक्टरांनी स्वतंत्रपणे, एकमेकांशी विचारविनिमय न करता दाखला दिलेला असावा. या दाखल्यामध्ये ‘व्यक्ती वेडी असून तिची काळजी घेण्यात येऊन तिला बंदिस्त करावे’ असे शब्द असावयास हवेत.

वेडाबद्दलचा दाखला देण्याची डॉक्टरांना सक्ती करता येत नाही व ते असा दाखला देण्याचे नाकारू शकतात.

वैद्यकीय व्यवसायासंबंधी कायदे : जनतेला योग्य अशा प्रशिक्षित वैद्यकीय व्यावसायिकांची माहिती व्हावी व तिने भोंदू व्यावसायिकांपासून सावध रहावे या हेतूने प्रत्येक राज्यात वैद्यकीय कायद्याप्रमाणे वैद्यकीय मंडळ स्थापण्यात आले आहे. हे मंडळ पुढील कार्य करते : (१) वैद्यकीय शिक्षण योग्य व समान पातळीवर दिले जात आहे किंवा नाही यावर लक्ष ठेवणे. (२) प्रशिक्षित व्यावसायिकांची नोंदवही ठेवणे. (३) एकूण व्यवसायावर नियंत्रण ठेवणे व जरूर तेथे शिस्तभंगाबद्दल कारवाई करणे. (४) भोंदू व्यावसायिकांचा योग्य तो बंदोबस्त करणे.

भारतीय वैद्यकीय पदवी अधिनियम (१९१६) या कायद्याद्वारे सबंध देशातील पाश्चिमात्य वैद्यकशास्त्रातील पदवीदानावर नियंत्रण ठेविले जाते. खोट्या पदव्या किंवा मान्य पदव्यांशी अनुकृत पदव्या धारण करणारास शासन करण्याची तरतूद या कायद्यात आहे. १९३३ मध्ये भारतीय वैद्यकीय मंडळ अधिनियम संमत करण्यात आला असून १९५६ आणि १९६४ मध्ये त्यात बदल करण्यात आले आहेत. राज्य सरकारांनी आपापल्या राज्यापुरते मर्यादित असे काही वैद्यकीय कायदेही केले आहेत.


वैद्यकीय नीतिशास्त्र : वैद्यकीय व्यावसायिकांचे एकमेकांशी असणारे संबंध, रोग्याशी करावयाची वर्तणूक आणि राज्यकर्त्यासंबंधीची कर्तव्ये यांचा समावेश वैद्यकीय नीतिशास्त्रात होतो. हिपॉक्राटीझ शपथ [→ हिपॉक्राटीझ] नावाचा फार जुना संकेत वैद्यकीय नीतिशास्त्राचा पाया मानला जात असे. जागतिक वैद्यकीय संघटनेने त्याला आधुनिक स्वरूप दिले असून ते ‘जिनीव्हा घोषणा’ म्हणून ओळखले जाते. भारतीय वैद्यकीय मंडळाने याच संकेतास मान्यता दिली आहे. प्रत्येक नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकास अशा संकेताबद्दल लेखी आणि स्वाक्षरीसहित पत्रक भरून द्यावेच लागते [→ वैद्यक].

व्यावसायिक दुराचरण : रोग्यावर इलाज करीत असताना योग्य ती काळजी न घेणे किंवा जाणूनबुजून दुर्लक्ष करणे, ज्यामुळे रोग्याचे स्वास्थ्य किंवा जीवन धोक्यात येते अशा वर्तणुकीला व्यावसायिक दुराचरण म्हणतात. प्रत्येक नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकाने जिनीव्हा घोषणेतील नियमांना अनुसरून वर्तणूक करावयाची असते. जाहिरात अवास्तव प्रमाणात करणे, धंद्याकरिता दलाल वापरणे, अप्रशिक्षित व्यावसायिकाबरोबर संबंध ठेवणे, खोटे शिफारसपत्र देणे यांसारख्या गोष्टी ‘नैतिक दुराचरणा’त समाविष्ट आहे.

व्यावसायिक दुराचरण म्हणजे केवळ निष्काळजीपणा नव्हे पण जेव्हा काळजी घेणे हे कर्तव्य असते आणि जेव्हा अशा कर्तव्यात कसूर केली जाते व ती हानिकारक असते तेव्हा व्यावसायिक दुराचरण झाल्याचा ठपका ठेवला जाऊन त्याविरुद्ध न्यायालयात फिर्याद होणे शक्य असते. व्यावसायिक दुराचरणाचा दिवाणी आणि फौजदारी अशा दोन्ही कामांशी संबंध येऊ शकतो. जेव्हा रुग्ण किंवा तो मेल्यास त्याचे नातेवाईक दिवाणी न्यायालयात नुकसान-भरपाईकरिता डॉक्टराविरुद्ध दाद मागतात किंवा रोगी अगर त्याच्या नातलगाविरुद्ध फी वसूलीकरिता डॉक्टर दाद मागतो तेव्हा या प्रकारांना ‘दिवाणी दुर्लक्ष’ म्हणतात. जेव्हा साध्या नुकसान-भरपाईपेक्षा अधिक गंभीर प्रकारचे दुर्लक्ष झाले असेल, डॉक्टरचे पूर्ण अज्ञान, संपूर्ण निष्काळजीपणा व संपूर्ण दुर्लक्ष झाल्यामुळे रोग्याच्या जीवनालाच गंभीर धोका उत्पन्न झाला असेल, तेव्हा डॉक्टरावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा केल्याचा आरोप ठेवता येतो. कधीकधी पोलिसही डॉक्टराविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ३०४ (अ) अन्वये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करतात. डॉक्टराच्या काही कृतींचा संपूर्ण व्यावसायिक दुर्लक्षात समावेश केला जातो. त्यांपैकी पुढील महत्त्वाच्या आहेत : (१) अपूर्ण शुद्धिहारकाचे मारक ठरणारे किंवा अयोग्य ऊतकात अंतःक्षेपण (इंजेक्शन) देणे. (२) चुकीच्या बोटाचे अवच्छेदन करणे चुकीच्या अवयवावर शस्त्रक्रिया करणे चुकीचा अवयव शरीरातून काढून टाकणे चुकीचे रसवाहिनी बंधन करणे. (३) मूळ रोगी सोडून भलत्याच रोग्यावर शस्त्रक्रिया करणे. (४) शस्त्रक्रियेनंतर उदरगुहेत हत्यार किंवा रक्त टिपण्याचे फडके तसेच ठेवणे. (५) रक्तस्रावरोधक फार काळपर्यंत तसाच बांधून ठेवणे. (६) रक्ताधानात अयोग्य रक्त देणे. (६) प्लॅस्टर ऑफ पॅरिसमध्ये अवयव बांधून ठेवल्यामुळे किंवा बंधफलक अतिघट्ट आवळल्यामुळे हातापायांच्या बोटांत कोथ (ऊतकनाश) उद्‍भवणे. (८) जखमेवर सौम्य द्रवाऐवजी संक्षारक (नाशकारक) द्रवाची पट्टी बांधणे. (९) बेकायदेशीर गर्भपात करणे. (१०) अस्थिभंगाचे क्ष-किरण चित्रणाच्या साह्याने निदान न करणे.

न्यायवैद्यक हा बराच विस्तृत विषय असून त्यातील काही महत्त्वाच्या विषयांचीच माहिती प्रस्तुत नोंदीत दिलेली आहे. क्लैब्य, वंध्यत्व, कौमार्य, गर्भावस्था, प्रसूती, बलात्कार, अनैसर्गिक संभोग, गर्भपात, भ्रूणहत्या व शिशुहत्या इ. अनेक विषय या शास्त्रात मोडतात. तसेच या शास्त्राचा ‘विषविज्ञान’ हा मोठा भाग असून त्यावर स्वतंत्र नोंद आहे.

संदर्भ : 1. Modi, N. J., Ed. Modi’s Textbook of Medical Jurisprudence and Toxicology, Bombay, 1977.

  2. Parikh, C. K., Parikh’s Simplified Textbook of Medical Jurisprudence and Toxicology, Bombay, 1976.

जोशी, मा. पु. भालेराव, य. त्र्यं.