नोव्हेंबर : ग्रेगरियन पंचांगामधील [→ पंचांग] अकरावा महिना. आधीच्या रोमन पंचांगामध्ये मार्च पहिला म्हणून हा नववा महिना होता व त्यामुळे नोव्हेम म्हणजे नऊ या अर्थाच्या लॅटिन शब्दावरून नोव्हेंबर हे नाव पडले व तेच पुढेही चालू राहिले. रोमन संसदेने (सीनेटने) या महिन्याला त्या वेळच्या टिबेरिअस या सम्राटांचे नाव देण्याचा प्रस्ताव मांडला होता, पण सम्राटांनीच त्याला विरोध केला. ‘तेरा सम्राट (सीझर्स) झाले, तर तुम्ही काय कराल ?’ असा त्यांनी सवाल टाकला होता. अँग्लोसॅक्सन याला विंड मंथ किंवा ब्लड मंथ म्हणतात. रोम्युलस यांच्या दहा महिन्यांच्या वर्षात नोव्हेंबर हा महिना होता व त्याचे ३० दिवस होते. रोमच्या कायदे करणाऱ्या दहा जणांच्या मंडळाने नोव्हेंबरचे २९ दिवस केले. ज्यूलियस सीझर यांनी याचे ३१ दिवस केले. ऑगस्टस यांनी ऑगस्ट या आपल्या नावाच्या महिन्याचे दिवस ३१ केले तेव्हा त्यांनी नोव्हेंबरचे पुन्हा ३० दिवस केले आणि अजून हेच कायम आहेत. काही ख्रिश्चन लोक १ नोव्हेंबर हा ‘सर्व संतांचा दिवस’ व २ नोव्हेंबर हा ‘सर्व आत्म्यांचा दिवस’ म्हणून साजरा करतात. अमेरिकेच्या अध्यक्षांची निवडणूक नोव्हेंबरच्या पहिल्या सोमवार नंतरच्या पहिल्या मंगळवारी होते. ११ नोव्हेंबर हा अमेरिकेत व्हेटरन्स डे, कॅनडात रिमेंब्रन्स डे म्हणून व पहिल्या महायुद्धाच्या समाप्तीचा व हुतात्म्यांचा स्मृतिदिन म्हणून मानला जातो. रोमन लोक या दिवशी हिवाळ्यास प्रारंभ होतो, असे मानीत. हिंदू पंचांगाप्रमाणे नोव्हेंबर महिना कार्तिक-मार्गशीर्ष महिन्यांत येतो. १४ नोव्हेंबर हा पंडित जवाहरलाल नेहरूंचा जन्मदिन बालदिन म्हणून पाळला जातो.
ठाकूर, अ. ना.