नोबेलियम : एक मानवनिर्मित मूलद्रव्य. रासायनिक चिन्ह No अणुक्रमांक (अणुकेंद्रातील प्रोटॉनांची संख्या) १०२ अणुभार २५४ आवर्त सारणीतील (इलेक्ट्रॉन रचनेनुसार केलेल्या मूलद्रव्यांच्या कोष्टकरूप मांडणीतील) ३ ब गटातील ॲक्टिनाइड श्रेणीतील तेरावे किरणोत्सर्गी (भेदक कण वा किरण बाहेर फेकणारे) व युरेनियमानंतरचे दहावे जड धातुरूप मूलद्रव्य. संयुजा (इतर अणूंशी संयोग पावण्याची क्षमता दर्शविणारा अंक) २, ३ विद्युत् विन्यास (इलेक्ट्रॉनांची अणूतील मांडणी) २, ८, १८, ३२, ३२, ८, २.

या मूलद्रव्याला आल्फ्रेड नोबेल यांनी विज्ञानाच्या प्रगतीसाठी केलेल्या कार्याच्या स्मरणार्थ ‘नोबेलियम’ हे नाव सुचविले गेले. इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड ॲप्लाइड केमिस्ट्री या संस्थेने तसेच कॅलिफोर्निया विद्यापीठातील शास्त्रज्ञांनीही या नावास संमती दिली आहे.

आर्गॉन नॅशनल लॅबोरेटरी (अमेरिका), ॲटॉमिक एनर्जी रिसर्च एस्टॅब्लिशमेंट (इंग्लंड) व नोबेल इन्स्टिट्यूट फॉर फिजिक्स (स्वीडन) ह्या संस्थांतील शास्त्रज्ञांनी १९५७ मध्ये असे जाहीर केले की, क्यूरियम (२४४) वर नोबेल इन्स्टिट्यूटमधील सायक्लोट्रॉनाच्या साहाय्याने [→ कणवेगवर्धक] प्रवेगित केलेल्या कार्बन (१३) च्या आयनांचा (विद्युत् भारित अणूंचा) भडिमार केला, तेव्हा सु. दहा मिनिटे अर्धायुकाल (किरणोत्सर्गी पदार्थाची मूळची क्रियाशीलता निम्मी होण्यास लागणारा काळ) असणारा, १०२ अणुक्रमांकाच्या मूलद्रव्याचा समस्थानिक (अणुक्रमांक एकच पण अणुभार निराळा असलेला त्याच मूलद्रव्याचा प्रकार) आपणास मिळाला आहे पण वरीलप्रमाणेच प्रयोग करूनही इतर प्रयोगशाळांना असा समस्थानिक तयार करता आला नाही. बर्कली येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातील जी. टी. सीबॉर्ग, ए. घिओर्सो, जे. आर्. वॉल्टन आणि टी. सिक्केलँड यांनी १९५८ मध्ये क्यूरियम (२४६) वर कार्बन (१२) च्या आयनांचा भडिमार करून

96Cm246 + 6C12 → 102No254 + 46n1 (न्यूट्रॉन)

१०२ क्रमांकाचा २५४ द्रव्यमानांक असलेला समस्थानिक तयार केला. त्याचा अर्धायुकाल सु. १ मिनिट आहे. रशियातही जी. एन्. फ्लेरॉव्ह यांनी हाच समस्थानिक शोधून काढला.

या मूलद्रव्याच्या समस्थानिकांचे अर्धायुकाल अल्प आहेत व समस्थानिक तयार होताच त्यांचे जलद विघटन होते. म्हणून हे मूलद्रव्य तयार होताच ते ओळखण्यासाठी विशिष्ट प्रकारचे तंत्र वापरणे आवश्यक ठरते. अमेरिकेतील बर्कली येथील लॉरेन्स रेडिएशन लॅबोरेटरीने हे मूलद्रव्य ओळखण्यासाठी वापरलेले प्रतिक्षेप (रिकॉइल) तंत्र आता सर्वत्र वापरले जाते.

समस्थानिक

अर्धायुकाल (सु.) 

२५१ 

०·७ सेकंद 

२५२ 

३ सेकंद 

२५३ 

१·७ सेकंद 

२५४ 

१ मिनिट 

२५५ 

३ मिनिटे 

२५६ 

३ सेकंद 

२५७ 

२० सेकंद 

या मूद्रव्याच्या समस्थानिकांमधून आल्फा कण बाहेर फेकले जाऊन त्यांचा क्षय होतो. ही क्रिया पुढीलप्रमाणे होते.

102No 254 100 Fm 250 + 2 He 4 (आल्फा कण)

डूबनॉ प्रयोगशाळा (रशिया) व कॅलिफोर्निया विद्यापीठ येथील शास्त्रज्ञांनी त्याचे अनेक समस्थानिक तयार केले आहेत. त्या समस्थानिकांचे अणुभार व अर्धायुकाल कोष्टकात दिल्याप्रमाणे आहेत.

यांपैकी २५५ हा समस्थानिक जलीय विद्रावात स्थिर असून त्या वेळी त्याची संयुजा २ असते, तर क्रमांक ८९–१०१ मधील इतर ॲक्टिनाइड मूलद्रव्यांची जलीय विद्रावातील संयुजा ३ वा त्यापेक्षा जास्त असते.

संदर्भ : Seaborg, G. T. Man-Made Transuranium Elements, Englewood Cliffs, N. J., 1963.

कारेकर, न. वि.