सिंग, रिचर्ड लॉरेन्स मिलिंग्टन : (२८ ऑक्टोबर १९१४–१८ ऑगस्ट १९९४). ब्रिटिश जीवरसायनशास्त्रज्ञ. वर्णलेखनाद्वारे मूलद्रव्ये ओळखण्याची व ती अलग करण्याची पद्घती विकसित केल्याबद्दल सिंग यांना ⇨ आर्चर जॉन पोर्टर मार्टिन यांच्याबरोबर १९५२ सालचे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक विभागून देण्यात आले. यातून विभाजन वर्णलेखन व विशेषेकरुन कागद वर्णलेखन विकसित होऊन ⇨ वर्णलेखना त महत्त्वाची भर पडली.

सिंग यांचा जन्म लिव्हरपूल (इंग्लंड) येथे झाला. विंचेस्टर आणि ट्रिनिटी कॉलेज, केंब्रिज येथे त्यांचे शिक्षण झाले. वुल इंडस्ट्रीज रिसर्च ॲसोसिएशन, लीड्स (आर्चर मार्टिन यांच्यासमवेत १९४१–४३) लिस्टर इन्स्टिट्यूट ऑफ प्रिव्हेंटिव्ह मेडिसीन, लंडन (१९४३–४८) रॉवेट रिसर्च इन्सिटट्यूट, ॲबर्डीन (१९४८–६७) आणि फूड रिसर्च इन्सिटट्यूट, नॉर्विच (१९६७ –७६) इ. संस्थांमध्ये त्यांनी संशोधनकार्य केले. ते १९६८ पासून युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट अँग्लिया येथे जीवविज्ञानाचे सन्माननीय प्राध्यापक झाले. सिंग व इतर चार शास्त्रज्ञांनी ‘सायन्स फॉर पीस ’ समिती स्थापन केली होती (१९५१).

सिंग व मार्टिन यांनी विभाजन वर्णलेखन पद्घतीला परिपूर्ण रुप दिले (१९४१). या पद्घतीत विश्लेषण करावयाच्या विद्रावाचा एक थेंब कागदी पट्टीवर सुकू देतात. नंतर विद्रावक पदार्थाने सदर पट्टी भिजवितात. कागदात शिरणाऱ्या विद्रावकामार्फत विद्रावातील गुंतागुंतीच्या मिश्रणातील संयुगे अलग होतात. कारण विशिष्ट विद्रावकातून निरनिराळ्या संयुगांचे स्थानांतरण (विसरण) निरनिराळ्या वेगांनी होते. या विश्लेषण पद्घतीला अत्यल्प पदार्थ चालतो तसेच या पद्घतीने थोड्या वेळात कमी श्रमात शेकडो पदार्थांचे विश्लेषण करता येऊ लागले. जटिल रासायनिक संघटन असणाऱ्या पदार्थांची (प्रतिजैव – अँटिबायॉटिक – पदार्थ, ॲमिनो अम्ले, पेप्टाइडे, घटसर्पाची लस) शुद्घता ठरविणे या पद्घतीमुळे शक्य झाले. किरणोत्सर्गी समस्थानिकांचा (तोच अणुक्रमांक परंतु भिन्न द्रव्यमानांक असलेल्या त्याच मूलद्रव्याच्या भेदक कण वा किरण बाहेर टाकणाऱ्या प्रकारांचा) ⇨ मार्गण मूलद्रव्ये (किरणोत्सर्गी गुणधर्मांमुळे ज्यांचे स्थान ठरविणे व जांचा मागोवा घेणे शक्य होते अशी मूलद्रव्ये) म्हणून उपयोग करुन संयुगांचे वर्णलेखनातील स्थान ठरविणे सहज शक्य होते. ⇨ विरल मृत्तिका मूलद्रव्ये अलग करण्यासाठी अकार्बनी रसायनशास्त्रातील कामांतही विभाजन वर्णलेखन वापरता येते.

सिंग व मार्टिन यांनी १९४१ मध्ये काही ॲमिनो अम्ले अलग करण्याचे काम सुरु केले. यासाठी पूर्वीचे वर्णलेखन तंत्र निरुपयोगी असल्याचे त्यांना दिसून आले. त्यामुळे त्यांनी नवीन तंत्र शोधून काढले व त्याद्वारे ॲमिनो अम्ले अलग केली. बॅसिलस ब्रेव्हिस या सूक्ष्मजंतूपासून तयार होणाऱ्या ग्रॅमिसिडीन या पॉलिपेप्टाइड प्रतिजैविक पदार्थाचे (प्रथिनाचे) सिंग यांनी संशोधन केले (१९४२–४८). याचा उपयोग ⇨ फ्रेडरिक सँगर यांना इन्शुलिनाची संरचना ठरविण्याकरिता झाला. सच्छिद्र व घन पदार्थांवर रासायनिक बाष्पांचे भिन्न प्रकारे शोषण होऊन ती अलग करणे शक्य होते. त्यांनी या परिपूर्ण वायुवर्णलेखन पद्घतीविषयीचे महत्त्वपूर्ण कार्य १९५३ मध्ये केले.

सिंग यांचे नॉर्विच येथे निधन झाले.

जमदाडे, ज. वि.