नोबेल पारितोषिके : आल्फ्रेड बेअरनार्ड नोबेल या स्वीडिश रसायनशास्त्रज्ञांच्या नावे दरवर्षी देण्यात येणारी पारितोषिके. ही पारितोषिके जगात अत्युच्च सन्मानदर्शक मानली जातात. आल्फ्रेड नोबेल यांच्या पाचव्या पुण्यतिथीपासून (१०डिसेंबर १९०१ पासून) ही पारितोषिके देण्यास सुरुवात झाली असून भौतिकी, रसायनशास्त्र, शरीरक्रियाविज्ञान वा वैद्यक, साहित्य आणि आंतरराष्ट्रीय बंधुभावाचे संवर्धन (म्हणजे शांतता) या क्षेत्रांमध्ये मानवी कल्याणाच्या दृष्टीने गतवर्षात सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना (क्वचित संस्थांना) ही पारितोषिके दरवर्षी दिली जातात. १९६९ पासून आल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ स्वीडनच्या मध्यवर्ती बँकेने (रिक्स बँकेने) अर्थशास्त्रातील मौलिक कार्यासाठी असेच सहावे पारितोषिक देण्यास सुरुवात केली आहे.
नोबेल यांच्या मृत्युपत्रातील तरतुदी : आल्फ्रेड नोबेल यांचे मृत्युपत्र १८९७ साली उघडून पाहण्यात आले व चार वर्षांनंतर ते कायदेशीर असल्याचे सिद्ध झाले. त्यांच्या मृत्युपत्रानुसार त्यांनी कमाविलेल्या अमाप संपत्तीचा मोठा हिस्सा (सु. ३·१ कोटी स्वीडिश क्रोनार) नोबेल निधीसाठी ठेवलेला आहे. हा निधी सुरक्षित ठेवींमध्ये गुंतवून मिळणाऱ्या उत्पन्नाचा काही भाग विविध प्रशासकीय खर्चासाठी ठेवून उरलेल्या सु. ६० ते ७०% रकमेचे सारखे ५ भाग करून वरील प्रत्येक क्षेत्रातील पारितोषिकासाठी सारखी रक्कम देण्याचेही त्यांनी सुचविले आहे.
मृत्युपत्रामध्ये कोणकोणत्या कार्यक्षेत्रांत व कोणत्या निकषांवर पारखून पारितोषिके द्यावीत आणि ते कोणी व कसे ठरवावे याचे मार्गदर्शन केलेले आहे. त्यानुसार आवश्यक ते स्पष्टीकरण करणारे पूरक नियम व प्रशासनविषयक इतर तपशील हे मृत्यूपत्राचे विश्वस्त, खाली दिलेल्या पारितोषिके देणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी व नोबेल यांचे कुटुंबीय यांनी चर्चा करून तयार केले व स्वीडनच्या राजांनीही त्यांना १९०० साली मान्यता दिली, या नियमांत पुढे काही सुधारणाही झाल्या.
मृत्युपत्रान्वये पारितोषिके देण्याचा अधिकार पुढील चार संस्थांना असून कंसांमध्ये त्यांच्या पारितोषिकांची क्षेत्रे दिली आहेत : (१) द रॉयल स्वीडिश ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस (भौतिकी व रसायनशास्त्र) (२) द रॉयल कॅरोलीन मेडिके-चिरूर्जिकल इन्स्टिट्यूट (शरीरक्रियाविज्ञान वा वैद्यक) (३) द स्वीडिश ॲकॅडेमी (साहित्य) आणि (४) नॉर्वेच्या संसदेने (स्टोर्टिगने) नेमलेली द नॉर्वेजियन नोबेल कमिटी. यापैकी पहिल्या तीन संस्था स्टॉकहोम (स्वीडन) येथे व चौथी ऑस्लो (नॉर्वे) येथे आहे.
मृत्युपत्रातील तरतुदींनुसार नोबेल प्रतिष्ठान (फाउंडेशन) स्थापण्यात आले असून ही संस्था नोबेल निधीची कायदेशीर मालक आहे. वरील चार संस्थांच्या सहकार्याने ही संस्था सर्व प्रशायकीय कामेही संयुक्त रीत्या पाहते. तयेच इतरही सर्व नोबेल संस्था प्रतिष्ठानाच्या नियंत्रणाखाली आहेत. मात्र पारितोषिकांच्या निवाड्याशी आणि त्यासंबंधीच्या कार्याशी प्रतिष्ठानाचा काहीही संबंध नसतो. पारितोषिकांसंबंधीचा निर्णय घेण्याचे व तो जाहीर करण्याचे काम फक्त वरील चार संस्थाच करू शकतात.
पारितोषिके देण्याचा निर्णय घेण्यासाठी प्रत्येक संस्थेच्या मदतीसाठी ३-५ सदस्यांची समिती नेमण्यात येते. याच नोबेल समित्या होत. या समित्या जरूर वाटल्यास इतर तज्ञांनाही चर्चेसाठी पाचारण करू शकतात. या समित्यांची कामे पारितोषिके देणाऱ्या संस्थांच्या दृष्टीने पूर्वतयारीची व सल्लावजा स्वरूपाची असतात. सुचविण्यात आलेल्या उमेदवारांच्या कार्याचे मूल्यमापन करून आपली मते या समित्या देऊ शकतात. सामान्यतः नोबेल समित्यांच्या शिफारशी पारितोषिके देणाऱ्या संस्था मानतात तथापि समित्यांचे निर्णय या संस्थांवर बंधनकारक नसतात. या समित्यांशिवाय उमेदवारांच्या कार्याची सखोलपणे पाहणी करणे सुकर व्हावे या दृष्टीने पारितोषिके देणाऱ्या संस्थांना साहाय्य करण्यासाठी वरील समित्यांशिवाय संशोधन संस्था, ग्रंथालये इ. उभारण्यात आली आहेत, त्यांना नोबेल संस्था म्हणतात.
अर्थशास्त्राचे पारितोषिक : स्वीडनच्या मध्यवर्ती बँकेच्या त्रिशताब्दी महोत्सवाच्या उद्घाटनाच्या वेळी (१५ मे १९६८ रोजी) बँकेने आल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक सुरू करण्याचे जाहीर केले. राजकीय अथवा सामाजिक दृष्टिकोनापेक्षा शास्त्रीय आणि विशेषतः गणितीय वा सांख्यिकीय विचार या पारितोषिकासाठी प्रथमतः आधारभूत धरला होता नंतर यात जास्त व्यापकता आणण्यात आली. हे पारितोषिक देण्यास १९६९ मध्ये सुरुवात झाली. या पारितोषिकाची व्यवस्थाही द रॉयल स्वीडिश ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस या संस्थेकडे असून नोबेल पारितोषिकांच्या नियमांनुसारच या पारितोषिकाचा निवाडा ही संस्था करते. त्यासाठी ही संस्था ५ सदस्यांची एक खास समिती नेमते. हे पारितोषिक सुरू करण्यासाठी खास कायदे करण्यात आले. नोबेल पारितोषिके सुरू झाल्यापासून त्यांचे क्षेत्र विस्तारण्याची ही पहिलीच वेळ आहे.
शिफारस व निवड : कायदेशीरपणे नमूद केलेल्या व पारितोषिके देणाऱ्या संस्थांनी नेमून दिलेल्या व्यक्तीच पारितोषिकांसाठी उमेदवारांची नावे सुचवू शकतात. स्वतःच आपले नाव सुचविलेल्यास ती व्यक्ती आपोआपच पारितोषिकासाठी अपात्र ठरते. उमेदवारांची नावे सुचविण्यासाठी पुढील व्यक्ती पात्र असतात. आधीचे नोबेल पारितोषिक विजेते, पारितोषिके देणाऱ्या संस्थांचे सभासद, खास उल्लेखिलेल्या विद्यापीठांचे आणि महाविद्यालयांचे तसेच पारितोषिके देणाऱ्या संस्थांनी खास निमंत्रित केलेले त्या त्या क्षेत्रातील इतर संस्थांमधील प्राध्यापक. साहित्याच्या पारितोषिकासाठी लेखकांच्या काही प्रातिनिधक संघटनांचे (उदा., पेन P.E.N.) सभासद आणि द स्वीडिश ॲकॅडेमीशी तुल्य अशा संस्थांचे (उदा., स्वीडिश ॲकॅडेमी ऑफ लिटरेचर, स्पॅनिश ॲकॅडेमी, फ्रेंच ॲकॅडेमी) सभासद शांततेच्या पारितोषिकासाठी आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या काही संसदीय व इतर संस्थांचे सभासद उमेदवारांची शिफारस करू शकतात. उमेदवारांच्या नावाची शिफारस केवळ व्यक्तीलाच करता येते, संस्थेला नाही मात्र अनेक पात्र व्यक्ती संयुक्तपणे शिफारस करू शकतात.
आधीच्या वर्षीच्या शरद ऋतूत (सप्टेंबर ते डिसेंबरपर्यंत) पारितोषिके देणाऱ्या संस्थांकडून अशा पात्र व्यक्तींना नावे सुचविण्याविषयी विनंतिपत्रे पाठविली जातात. त्यांनी उमेदवाराचे प्रकाशित झालेले साहित्य आणि संबंधित कागदपत्रांसह आपल्या शिफारशी १ फेब्रुवारीच्या आत पाठवावयाच्या असतात. १ फेब्रुवारीपासून नोबेल समित्यांचे काम सुरू होते व सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये समित्या आपल्या शिफारशी पारितोषिके देणाऱ्या संस्थांकडे पाठवितात. या संस्था १५ नोव्हेंबरपर्यंत अंतिम निर्णय जाहीर करतात. नावे सुचविली जाण्यापासून ते अंतिम निर्णयापर्यंत होणारे वादविवाद, चर्चा, मतदान इ. बाबतींत गुप्तता राखली जाते.
नोबेल पारितोषिकाच्या निर्णयाविरुद्ध दाद मागता येत नाही. पारितोषिके देणाऱ्या संस्था या देशातील असल्याने एखाद्या विशिष्ट उमेदवाराच्या बाबतीत राजकीय वा आर्थिक दबावाचा त्यांच्या निर्णयावर परिणाम होऊ शकत नाही. सामान्यतः वैज्ञानिक आणि वैद्यकीय पारितोषिकांच्या निर्णयाविषयी कमीत कमी मतभेद झालेले आढळतात परंतु साहित्य व शांतता या क्षेत्रांचे स्वरूपच असे आहे की, त्यांतील पारितोषिकांच्या निर्णयाबद्दल तीव्र मतभेद होऊ शकतात. आतापर्यंत शांततेचे पारितोषिक सर्वाधिक वेळा राखून ठेवलेले आढळते.
पारितोषिकाचे स्वरूप : प्रत्येक पारितोषिक हे एक सुवर्णपदक, विजेत्याचे कार्य व त्या क्षेत्रातील अधिकार दर्शविणारी पत्रिका आणि काही द्रव्य (रक्कम) यांच्या रूपात दिले जाते. या सुवर्णपदकाच्या एका बाजूवर आल्फ्रेड नोबेल यांची प्रतिमा आणि दुसऱ्या बाजूवर त्या त्या क्षेत्राचे दर्शक चिन्ह असते. पारितोषिकाची रक्कम सामान्यतः ३१,००० ते ७२,००० डॉलर (सु. २·७० ते ६·२५ लक्ष रुपये) इतकी असते. सर्वसाधारणपणे विजेत्याला या रकमेवर आयकर द्यावा लागत नाही. अर्थशास्त्राच्या पारितोषिकाची रक्कमही इतकीच असून स्वीडनची मध्यवर्ती बँक तेवढी रक्कम दरवर्षी नोबेल प्रतिष्ठानाला देते. निधीच्या गुंतवणुकीवर मिळणाऱ्या उत्पन्नात बदल होत असल्याने पारितोषिकाची रक्कम बदलत असते. न दिलेल्या, नाकारलेल्या वा ठराविक मुदतीमध्ये न स्वीकारलेल्या पारितोषिकाची रक्कम निधीत जमा होते. तसेच नोबेल प्रतिष्ठानाला वेळोवेळी मिळणाऱ्या पारितोषिकांची (उदा., बाल्झन फाउंडेशन आणि द न्यूयॉर्क ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस यांची पारितोषिके, एम्प्रेस मेनेन पारितोषिक) रक्कमही निधीत जमा होऊन निधीची एकूण रक्कमच वाढते.
पात्रता : नोबेल पारितोषिके सर्वांना खुली असून राष्ट्रीयत्व, वंश, धर्म (संप्रदाय) व विचारसरणी या गोष्टी विजेत्याची निवड करताना विचारात घेतल्या जात नाहीत. एका क्षेत्रातील पारितोषिक एका व्यक्तीला वा अनेक व्यक्तींना संयुक्तपणे देता येते (प्रत्यक्षात जास्तीत जास्त तिघांना संयुक्तपणे पारितोषिक मिळालेले आहे). त्याचप्रमाणे एकाच व्यक्तीला एकापेक्षा अधिक क्षेत्रांतील कार्यासाठी आणि अनेक वेळाही पारितोषिक देता येते. उदा., (१) मारी क्यूरी : भौतिकी (१९०३) व रसायनशास्त्र (१९११) (२) लायनस कार्ल पॉलिंग : रसायनशास्त्र (१९५४) व शांतता (१९६२) (३) जॉन बारडीन : भौतिकी (१९५६ व १९७२). पुरेशी अधिकारी व्यक्ती आढळली नाही किंवा जागतिक परिस्थितीमुळे आवश्यक माहिती मिळविता आली नाही, तर पारितोषिके दिली जात नाहीत. अशा प्रकारे पहिल्या महायुद्धामुळे १९१४ ते १९१९ या काळात काही विषयांची पारितोषिके आणि दुसऱ्या महायुद्धामुळे १०४० ते १९४२ या वर्षी कोणतेही नोबेल पारितोषिक देता आले नाही. एखाद्या क्षेत्रातील विचारार्थ आलेल्या सर्व व्यक्तींच्या कार्याची गुणवत्ता योग्य तेवढी नसल्यास कधीकधी ते पारितोषिक पुढील वर्षासाठी राखून ठेवतात. त्यापुढील वर्षीही अशीच परिस्थिती आढळली, तर राखून ठेवलेल्या पारितोषिकाची रक्कम परत निधीत जमा करावी, अशी तरतूद आहे. राखून ठेवण्यात आलेल्या पारितोषिकामुळे एकाच वर्षी एकाच क्षेत्रातील दोन पारितोषिकेही (गतवर्षीचे व चालू वर्षाचे) दिली जाऊ शकतात. उदा., आंरी बेर्गसाँ यांना १९२७ सालचे साहित्याचे नोबेल पारितोषिक १९२८ साली देण्यात आले. तसेच १९७६ चे शांततेचे नोबेल पारितोषिक राखून ठेवले होते. त्यामुळे १९७७ साली शांततेची दोन पारितोषिके (१९७६ चे आणि १९७७ चे) देण्यात आली. कोणतेही पारितोषिक ५ वर्षांतून एकदा तरी दिले जावे, असा दंडक आहे.
सामान्यपणे नोबेल पारितोषिक व्यक्तीला अथवा व्यक्तींना देण्यात येते मात्र काही वेळा शांततेचे पारितोषिक संस्थांनाही देण्यात आले आहे (उदा., १९०४ चे शांततेच पारितोषिक इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल लॉ या संस्थेला मिळाले). नोबेल पारितोषिकासाठी एखाद्या व्यक्तीच्या कार्याची शिफारस तिच्या मृत्यूनंतर करता येत नाही परंतु पारितोषिकासाठी निवड झाली असून ते स्वीकारण्यापूर्वीच ती व्यक्ती मृत्यू पावल्यास पारितोषिक मरणोत्तर देण्यात येते. उदा., एरिक ए. कार्लफेल्ट (१९३१ चे साहित्याचे नोबेल पारितोषिक) डाग हामारशल्ड (१९६१ चे शांततेचे नोबेल पारितोषिक). क्वचित पारितोषिके नाकारलीही जातात. उदा., झां पाल सार्त्र (१९६४ चे साहित्याचे नोबेल पारितोषिक). पारिताषिक नाकारले गेले, तर अशा वेळी सन्मान्य नोबेल पारितोषिक विजेत्यांच्या यादीत त्या व्यक्तीचें नाव येतेच, फक्त त्यापुढे ‘नाकारले’ असा उल्लेख करतात. पारितोषिके नाकारण्यामागील कारणे वेगवेगळी असली, तरी बहुतेक वेळा बाह्य (राजकीय) दबावामुळे ती नाकारली गेली आहेत (उदा., कार्ल फोन ओसिएट्स्की यांना १९३५ चे शांततेचे नोबेल पारितोषिक दिल्याने उपमर्द झाला, असे वाटल्याने हिटलर यांनी १९३७ साली एक हुकूम काढून जर्मनांना नोबेल पारितोषिक स्वीकारण्यास मनाई केली होती). त्या वेळेनंतर पारितोषिक नाकारले त्यावेळेची परिस्थिती स्पष्ट करून अर्ज केलेल्या व्यक्तीला पारितोषिक म्हणजे सुवर्णपदक आणि कार्य व अधिकार दर्शविणारी पत्रिका देण्यात येते परंतु पारितोषिकाची रक्कम आधीच नोबेल निधीत जमा झालेली असल्याने ती देता येत नाही.
वितरण समारंभ : नोबेल पारितोषिकांचा वितरण समारंभ दरवर्षी स्टॉकहोम येथे स्वीडनच्या राजांच्या हस्ते आणि शांततेच्या नोबेल पारितोषिकाचा ऑस्लो येथे आल्फ्रेड नोबेल यांच्या पुण्यतिथीला (१० डिसेंबर रोजी) होतो. बहुधा विजेते समक्ष हजर राहून पारितोषिके स्वीकारतात. विजेता समक्ष हजर राहू न शकल्यास त्याच्या देशाचा तेथील राजदूत पारितोषिक स्वीकारू शकतो.
प्रत्येक विजेत्याला आपल्या पारितोषिकपात्र कार्याविषयी निवेदन करणारे एक व्याख्यान या स्मृतिदिनापासून ६ महिन्यांच्या आत द्यावे लागते. या व्याख्यानांना ‘नोबेल लेक्चर्स’ म्हणतात आणि ती नोबेल प्रतिष्ठानाच्या Les Prix Nobel या वार्षिक प्रकाशनात प्रसिद्ध केली जातात. शांतता पारितोषिक विजेत्यांच्या कार्याची माहिती ऑस्लो येथील पारितोषिक देणारी संस्था ग्रंथमालेच्या रूपात प्रसिद्ध करते. सोबतच्या कोष्टकामध्ये १९०१ पासून १९७७ पर्यंतच्या नोबेल पारितोषिक विजेत्यांची नावे, देश व काहींच्या कार्याची थोडक्यात माहिती दिलेली आहे. पारितोषिक जेव्हा मिळाले त्या वेळी विजेता ज्या देशाचा नागरिक होता तो देश कोष्टकात दिलेला आहे. बहुतेक पारितोषिक विजेत्यांवर विश्वकोशामध्ये स्वतंत्र नोंदी असून तेथे त्यांच्या कार्याचे अधिक विवरण केले आहे. (चित्रपत्र ४५).
पाहा : नोबेल, आल्फ्रेड बेअरनार्ड.
संदर्भ : 1. Schiick, H. and others, Nobel Foundation, Ed. Nobel : The Man and His Prizes, Amsterdam, 1962.
2. Swedish Institute, Alfred Nobel and Nobel Prizes, Stockholm.
ठाकूर, अ. ना.