नेमिचंद्र : (बारावे शतक). कन्नड भाषेत रचना करणारा प्रसिद्ध जैन कवी. बाराव्या शतकाच्या शेवटी चंपूपद्धतीच्या काव्याचे पुनरुज्जीवन करणाऱ्या पंडित कवींमध्ये नेमिचंद्राचा समावेश होतो. नेमिचंद्राने लीलावती प्रबंध व नेमिनाथपुराण ही दोन चंपूकाव्ये रचली. सौंदत्तीचा रट्टराज लक्ष्मीधर (११७०) याने नेमिचंद्राला आश्रय दिला व होयसळ राजा वीर बल्लाळ (कार. ११७३–१२२०) याचा मुख्य प्रधान सेज्जवळू पद्मनाभ याने नेमिचंद्राकडून नेमिनाथ पुराण (सु. ११७०) लिहून घेतले, असा उल्लेख आढळतो. नेमिचंद्राला ‘कविराजकुंजर’, ‘साहित्य विद्याधर’ इ. बिरुदे होती. लीलावती प्रबंध हे चौदा आश्वासांचे शृंगाररसप्रधान काव्य आहे. स्वप्नात एकमेकांना पाहून प्रेमबद्ध झालेल्या आणि नंतर ताटातूट होऊन परत मीलन झालेल्या प्रियकर-प्रेयसींची कथा त्यात आलेली आहे. सुबंधूच्या वासवदत्ता ह्या संस्कृत गद्यकाव्याची प्रेरणा ह्या चंपूकाव्यास लाभली असावी असे दिसते. कथेपेक्षा वर्णनांनाच त्यात प्राधान्य मिळाले आहे. स्त्रीचे सौंदर्य हेच खरे सौंदर्य होय आणि शृंगार हाच खरा रस होय, या भूमिकेतून नेमिचंद्राने हे काव्य लिहिले. वर्णनांचा अतिरेक व विसंगती यांमुळे ह्या काव्यास कलात्मक उंची प्राप्त होऊ शकली नाही. नेमिनाथपुराण ह्या चंपूकाव्यात बाविसाव्या तीर्थंकराचे चरित्र वर्णिले असून त्यात आलेली हरिवंश-कुरुवंशांची कथा मुख्यतः कृष्णाचीच कथा होय. कृष्णकथेस कवीने दिलेले प्राधान्य हा या काव्याचा विशेष होय. ही कथा अपूर्ण असून तीत कंसवधापर्यंतचाच भाग आहे. कवीच्या मृत्युमुळे हे काव्य पूर्ण होऊ शकले नाही, म्हणून या काव्यास अर्धनेमिपुराण असेही म्हटले जाते. यातील कंसवधाचा प्रसंग सरस उतरला आहे. या काव्यातील जिवंत व्यक्तिरेखा, शब्दकळा, कल्पकता, प्रसन्न शैली इ. गुणवैशिष्ट्यांतून नेमिचंद्राच्या प्रतिभासामर्थ्याचा प्रत्यय येतो.
मळगी, से. रा. (क.) कायकिणी, गौरीश (म.)