नेबुकॅड्नेझर : बॅबिलोनियाच्या दोन राजांचे नाव. यांपैकी पहिला नेबुकॅड्नेझर (इ. स. पू. का. ११२४– ११०३) याने ईलमचा पराभव केला व काही काळ तो ॲसिरियाचा सर्वसत्ताधीश होता.
दुसरा नेबुकॅड्नेझर (इ. स. पू. का. ६०५–५६२) हा बॅबिलोनियातील खाल्डियन वंशाचा संस्थापक. नेबोपोलॅसरचा मुलगा त्याच्या मृत्युनंतर बॅबिलनच्या गादीवर आला. तत्पूर्वी त्याने कारकेमीश येथे ईजिप्शियनांचा पराभव करून सिरिया व पॅलेस्टाईन हे प्रदेश जिंकले त्यावर खंडणी बसविली. दमास्कस, टायर, सायडन व ज्यूडा येथील राजांनी त्याचे मांडलिकत्व मान्य केले. इ. स. पू. ६०१ मध्ये ईजिप्तने त्याचा पराभव केला आणि ज्यूडाने बंड केले. तथापि त्याने इ. स. पू. ५९७ मध्ये जेरूसलेमवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. यानंतर आठ वर्षांनी हिब्रूंनी पुन्हा बंड केले. त्यावेळी त्याने जेरूसलेम शहर उद्ध्वस्त करून हिंब्रूंना कैद केले व बॅबिलनला आणले. त्याने साम्राज्यविस्तार करून कला आणि विद्यांना आश्रय दिला. शहरे वसविली व राज्याला तटबंदी केली. बॅबिलन शहरात अनेक मंदिरे, राजप्रासाद व वास्तू बांधल्या राज्यात कालवे खणून शेतीस उत्तेजन दिले.त्याने आपल्या एमिटिस या राणीसाठी एक सुंदर उद्यान तयार केले व राजवाडा बांधला. तो वयाच्या ऐंशीव्या वर्षी मरण पावला. त्याच्या मृत्यूनंतर काही वर्षांतच त्याचे साम्राज्य मोडकळीस आले.
पहा: खाल्डिया.
संदर्भ : Wiseman, D. J. Ed. & Trans. Chronicles of Chaldaean Kings (626–556B. C.), in the British Museum, London, 1956.
देशपांडे, सु. र.