नेप्रोस्ट्रॉय : (नेप्रोगेस). यूरोपीय रशियाच्या युक्रेन प्रजासत्ताकातील, नीपर नदीच्या उजव्या काठावरील झापरॉझेचे उपनगर. पूर्वी किचकस या नावानेच हे गाव ओळखले जात असे. नेप्रोगेस धरणामुळे यास महत्त्व आले आहे. या धरणाच्या बांधणीनंतरच (१९२७–३२) हे गाव नेप्रोस्ट्रॉय या नावाने ओळखले जाऊ लागले. हे धरण नदीमुखापासून आत सु. ३२२ किमी.वर, दीड किमी. लांब व ६१ मी. उंच असून तेथे ६,५०,००० किवॉ. ता. क्षमतेचे जलविद्युत् उत्पादन केंद्र उभारण्यात आले आहे. धरणात १२,२३,२८० घ.मी. इतके पाणी साठविता येते. ह्या धरणामुळे नीपर नदीच्या पाण्याची पातळी ३५·५ मी. ने वाढल्यामुळे नदी नौसुलभ झाली आहे. तत्पूर्वी नदीतील द्रुतवाहांमुळे वाहतुकीस अडथळे येत असत. दुसऱ्या महायुद्धकाळात (१९४१) हे धरण व जलविद्युत् केंद्र उद्ध्वस्त झाले होते. १९४७ मध्ये याची दुरुस्ती करण्यात आली. देशाच्या दक्षिण भागातील खाणी व कारखान्यांना येथून विद्युत् पुरवठा केला जातो. नेप्रोस्ट्रॉयसमोरच नीपर नदीच्या डाव्या तीरावरील इमेनी लेनिना हे झापरॉझेचे बंदर आहे.
लिमये, दि. ह.