नेपल्स विद्यापीठ : इटलीतील एक जुने विद्यापीठ. त्याची स्थापना नेपल्स येथे १२२४ मध्ये रोमन सम्राट दुसरा फेड्रिक याने आपल्या सनदेद्वारा केली. लोकांना मोठ्या प्रमाणावर शिक्षणाची संधी मिळावी, हा त्याचा उद्देश होता. त्याचबरोबर आपला धार्मिक विशेषाधिकारी हा पोपच्या अधिकाऱ्यासारखाच आहे, हे प्रस्थापित करण्याचा व बोलोन्या, पॅड्युआ व पाव्हिया या विद्यापीठांच्या साम्राज्यविरोधी धोरणाचा मुकाबला करण्याचाही त्याचा विचार होता. सुरुवातीस या विद्यापीठात धर्मशास्त्र, विधी, कला आणि वैद्यक हे विषय शिकविले जात. फ्रेड्रिकच्या मृत्यूनंतर (१२५०) राजसत्तेच्या परिवर्तनाबरोबर या विद्यापीठाचे स्थानांतर झाले आणि अधूनमधून ते दीर्घकाळ बंदही राहिले. फ्रेंच राज्यक्रांतीनंतरच्या कालखंडात जहाल शिकवणीमुळे १७९९ साली ते पुन्हा बंद पडले. बूर्बाँ अंमल संपुष्टात आल्यानंतर (१८०६) फ्रांचेस्को दे सांक्तिस या त्याच विद्यापीठातील प्रसिद्ध इटालियन प्राध्यापकाने त्याची पुनर्रचना करून विधी–वैद्यक यांच्या शाखा विस्तृत केल्या व विद्यापीठात एक बहुचिकित्सालय उभारले.
विद्यमान विद्यापीठात विधी, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, वाणिज्य, रसायनशास्त्र, तत्त्वज्ञान, वैद्यक, गणित, निसर्गविज्ञाने, औषधनिर्माणशास्त्र, अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, कृषी, पशुविकारविज्ञान आदी विद्याशाखा आहेत. विद्यापीठाच्या ग्रंथालयाची स्थापना १६१५ साली झाली असून १९६१ साली विद्यापीठात १४,००,००० ग्रंथ होते. एक पुरावस्तू संग्रहालयही तेथे आहे. १९७६ साली अध्यापकांची संख्या ३,००० व विद्यार्थ्यांची संख्या ४०,००० होती. सागरी प्राणिविज्ञानाच्या पदव्युत्तर अभ्यासाचे केंद्र म्हणून या विद्यापीठाची ख्याती आहे.
संकपाळ, ज. बा.
“