नृत्यताल लेखनपद्धती : नृत्यातील तालांची चिन्हांद्वारे नोंद करण्याची पद्धती. या नोंदीत भारतीय अभिजात नृत्यशैलींतील तालांचे विवेचन केले आहे. गीत, वाद्य व नृत्य ह्या तीनही प्रकारांनी मिळून संगीत बनते. या तिन्हींच्या रूपांना समन्वित करण्याचा आधार ताल आहे. ताल हेच त्यांचे आसन असून तालामुळेच त्यांचे स्वरूप यथार्थपणे प्रगट होते. नृत्यातील पदन्यास तालाच्या साहाय्याने मोजले जातात. ताल हे काळ मोजण्याचे परिमाण तर मात्रा हे ताल मोजण्याचे परिमाण होय. [→ तालविचार].
भारतीय नृत्यात⇨ भरतनाट्यम् नृत्य, ⇨कथकळी नृत्य, ⇨ कुचिपूडी नृत्य, ⇨ ओडिसी नृत्य,⇨ कथ्थक नृत्य आणि ⇨ मणिपुरी नृत्य या सहा अभिजात नृत्यपरंपरा रूढ आहेत. ह्यांपैकी अनुक्रमे पहिल्या चार दाक्षिणात्य तालपद्धतींवर आधारलेल्या आहेत तर उरलेल्या दोन कथ्थक व मणिपुरी ह्या हिंदुस्थानी तालपद्धतीवर बांधलेल्या आहेत.
दाक्षिणात्य तालपद्धती : भरताच्या नाट्यशास्त्रात तालांच्या पाच जाती दिल्या आहेत :
(१) तिश्र (तीन मात्रा) :बोल – त-कि-ट.
(२) चतुश्र (चार मात्रा) : बोल – त-क-धि-मि.
(३) खंड (पाच मात्रा) : बोल – त-क-त-कि-ट.
(४)मिश्र (सात मात्रा) : बोल – त-कि-ट-त-क-धि-मि.
(५) संकीर्ण (नऊ मात्रा) : बोल – त-क-धि-मि-त-क-त-कि-ट.
नाट्यशास्त्रात सप्ततालांचाही उल्लेख आढळतो. हे सात ताल पुढीलप्रमाणे होत : ध्रुव, मत्तताल, रूपक,झंपा किंवा चंपा,त्रिपुटा किंवा तृपुटा,अडताल व एकताल. ह्यावरून असे दिसून येईल की पाच जाती आणि सात ताल ह्यांची संमिश्र बांधणी करून एकंदर पस्तीस ताल सध्या प्रचलित झाले आहेत. नाट्यशास्त्रात मात्र १०८ तालांचा उल्लेख आहे.
हिंदुस्थानी तालपद्धती: ‘आघात’, ‘मात्रा’ आणि ‘ताल’ह्यांची कल्पना दोन्ही पद्धतीत सारखीच आहे. ‘ठेका’ह्या संज्ञेचे वर्णन मात्र ह्या पद्धतीत जरा वेगळे आहे. तबला, पखावज यांसारख्या तालवाद्यांवर वाजवण्यास योग्य अशी जी विशिष्ट रचना किंवा बंदिश असते, तिला त्या तालाचा ‘ठेका’म्हणतात. या पद्धतीतील प्रमुख ताल पुढीलप्रमाणे होत : (१) त्रिताल (आदितालाच्या ८ मात्रांचे वाढविलेले प्रचलित स्वरूप)–मात्रा १६ (२) झपताल–मात्रा १० (३) एकताल व चौताल–मात्रा १२ (४) धमार व आडाचौताल–मात्रा १४ (५) सवारी–मात्रा १५ (६) रुद्रताल–मात्रा ११ (७) अष्टमंगल–मात्रा २२ (८) दादरा–मात्रा ६ (९) केरवा–मात्रा ४ (१०) तेवरा व रूपक–मात्रा ७ आणि (११) शिखरताल–मात्रा १७.
भरतनाट्यम् नृत्यतालपद्धती : (१) आडवु : नर्तकाच्या मूल हस्तासहित पदन्यासाचे नाव (२) तिरमानम् : विशिष्ट तालबद्ध बोलांची एका साखळीने बांधलेली गुंफण. (३) मृदगांचे बोल : भरतनाट्यम् नृत्यपरंपरेत नर्तकाचे बोल वेगळे असून त्या अनुरूप तालवाद्यावरील बोल वेगळे आहेत. त्याची लिपी चिन्हांसह खाली दिली आहे.
सर्व परंपरांना सोयीकरिता समान चिन्हे (हिंदुस्थानी तालपद्धती प्रमाणे) दिलेली आहेत :
तिरमानम् – आदिताल-तिश्र (तक्ता १).
भरतनाट्यम् मधील ३५ तालांचा एक आराखडा सोबत जोडलाआहे. (तक्ता २).
कथकळी नृत्यतालपद्धती: या नृत्यशैलीत पाच प्रमुख ताल प्रचारात आहेत (तक्ता ३).
त्रिपुटा या तालाचा उपयोग युद्धाचे नृत्य करताना केला जातो.
कथकळीमधील एक कलाशम् वा ‘कलासम्’ (नृत्तबोल) सोबत दिलेला आहे (तक्ता ४).
कूचिपूडी नृत्यतालपद्धती: कूचिपूडी व भरतनाट्यम् या नृत्यांच्या तालपद्धतींमध्ये बरेच साधर्म्य असले, तरी कूचिपूडीचे तंत्र भरतनाट्यम् इतके विकसित नाही. नमुन्यादाखल कूचिपूडीतील एक नृत्यबोल दर्शविला आहे (तक्ता ५).
ओडिसी नृत्यतालपद्धती: ओडिसी नृत्यातही दक्षिणात्य तालपद्धतीनुसार ताल घेतले जातात (तक्ता ६).
कथ्थक नृत्यतालपद्धती: ही परंपरा हिंदुस्थानी संगीतावर आधारलेली असून, तीत अभिनय अंगाचे महत्त्व असले, तरी ताल अंगाचेही बरेच विकसन आढळते. ह्या परंपरेतसुद्धा नर्तकाचे बोल वेगळे आणि चर्मवाद्यावरील बोल वेगळे पण परस्परांस अनुरूप आहेत. कथ्थकमध्ये मूल पदन्यास करताना नर्तक वाद्याच्या लयीपेक्षा मूलतः निम्म्या लयीत पदन्यास करतो.
ह्या नृत्यपद्धतीतील काही प्रमुख ताल पुढीलप्रमाणे होत :
ताल – त्रिताल – मात्रा १६, तोडा (तक्ता ७)
कथ्थकमध्ये नर्तक स्थायी लय वा गत (स्पीड) कल्पून तिच्या विविध पटी करतो (उदा., दुगुण, चौगुण, अष्टगुण). सोबतच्या (तक्ता ८) आराखड्यात(१) सर्वांत आतल्या वर्तुळात नर्तकाच्या पदन्यासाची लय दर्शविली आहे, (२) त्याबाहेरील वर्तुळात मूळ ठेक्याची लय व बोल दर्शविले आहेत व (३) सर्वांत बाहेरील वर्तुळात मूळ ठेक्याची दुगुण दर्शविली आहे. कुठल्याही तालाच्या संपूर्ण मात्रा तालवाद्यावर एकदा वाजविल्या, की त्यास ‘आवर्तन’ असे म्हणतात. नर्तकाचा नृत्तभाग ह्या आवर्तनांत मोजला जातो.
मणिपुरी नृत्यतालपद्धती : मणिपुरी बोल खालीलप्रमाणे आहेत :
तौलनिक अभ्यास : या सहा नृत्यपरंपरांचा अभ्यास करताना असे आढळून येते, की कथ्थक, कथकळी, भरतनाट्यम् व कूचिपूडी ह्या परंपरामध्ये नर्तकाचे बोल आणि तालवाद्याचे बोल वेगळे वेगळे आहेत. मणिपुरी व ओडिसी ह्या परंपरांमध्ये मात्र नर्तन व तालवाद्याचे बोल एकच आढळतात. तथापि ह्या दोन्ही बोलांमध्ये साधर्म्य व समानता आढळून येते.
कथ्थक ह्या परंपरेत ‘नृत्त’ (विशुद्ध नृत्यपदन्यास) अंगाचा विकास झालेला आढळतो. तसेच ताल-अंगांच्या विपुल छटा पहावयास मिळतात. कथकळी व भरतनाट्यम् ह्या प्रकारांमध्ये ‘नृत्या’ला (अभिनययुक्त नृत्य) जास्त वाव असून कथकळीमध्ये अभिनय पराकोटीस पोहोचल्याचे दिसते. मणिपुरी हा एक मुलायम नृत्यप्रकार आहे.
भरतनाट्यम्, कथकळी आदी परंपरांमध्ये एक मूल ताल कायम राखून, विविध तालांच्या मात्रांप्रमाणे ‘तिरमानम्’ व ‘कलासम्’ घेऊन नर्तक मूल तालाच्या पूर्वपदावर येतो. तथापि कथ्थकमध्ये विशिष्ट ताल चालू असताना इतर तालांच्या वजनाच्या लयीचे प्रकार [उदा., त्रिताल (मात्रा −१६) या तालामध्ये नृत्य करीत असताना, एकताल (मात्रा−१२), दीपचंदी (मात्रा−१४) वगैरे ताल] सहज रीत्या प्रदर्शित केले जातात. हे सर्व सिद्ध करण्याकरिता ‘लहरा’ (बांधीव स्वरसमूह) हे एक तालमापदर्शक साधन आहे.
कथकळी नृत्यपरंपरेमध्ये पदन्यासांचे प्रकार बांधीव असून, आयत्या वेळेस नायक व नायिका पूर्वी काहीही तालीम नसताना एकत्र नृत्य करू शकतात. तथापि जाणकार कथ्थक नर्तक पूर्वी परिचित नसलेल्या जाणकार तबलावादकाबरोबर उत्तम प्रकारे नृत्य करू शकतो. इतकेच नव्हे तर, नृत्यातील नवनवे आकृतिबंध (उपज) आयत्या वेळी उत्स्फूर्तपणे निर्माण करू शकतो.
ओडिसी नृत्यप्रकारातील बोलांमध्ये दाक्षिणात्य तालांचे बोल व हिंदुस्थानी तालपद्धतींचे बोल यांचा समन्वय आढळून येतो. तसेच आदिताल वा त्रिताल हे मूल ताल एकदा ठरल्यानंतर विविध परंपरांतील विविध ताल हे मानवी बुद्धिसामर्थ्याचे सूचक ठरतात.
सर्व नृत्यपरंपरांमध्ये घुंगरूतून निघालेला ध्वनी नृत्तबोलांशी साधर्म्य दाखवितो. तथापि कथ्थकमधील नृत्तबोल घुंगरू आणि पदन्यासांद्वारे स्पष्ट ओळखू येतात. कथ्थकमधील ‘तोडा’, ‘तुकडा’, ‘परन्’हे समेवर येतात. तसेच ओडिसीमधील ‘ओरसा’ (तोडा) व मणिपुरीतील बोलसुद्धा समेवर येतात. परंतु इतर परंपरांमध्ये शेवटच्या मात्रेवर बोल संपतात.
जोशी, दमयंती