नील, ल्वी यूजीन फेलीक्स : (२२ नोव्हेंबर १९०४ – ). फ्रेंच भौतिकीविज्ञ. १९७० सालचे भौतिकीतील नोबेल पारितोषिक नील यांना व स्वीडिश खगोलीय भौतिकीविज्ञ ⇨ हान्नेस आल्फव्हेन यांना चुंबकत्वामधील संशोधनाबद्दल विभागून मिळाले. लोहचुंबकत्व, प्रतिलोहचुंबकत्व आणि लोहीचुंबकत्व [→ चुंबकत्व] यांमधील त्यांच्या संशोधनामुळे घन अवस्था भौतिकीमधील अनुप्रयुक्तींमध्ये प्रगती झाली व चुंबकत्वाबद्दल अधिक सखोल ज्ञान उपलब्ध झाले.

त्यांचा जन्म लीआँ येथे झाला. त्यांचे शिक्षण पॅरिसमधील एकोल नॉर्मल सुपेरिअर येथे झाले. १९३२ साली त्यांना डॉक्टरेट पदवी मिळाली. १९३७ साली ते स्ट्रासबर्ग विद्यापीठात व १९४७ मध्ये ग्रनॉबल विद्यापीठात प्राध्यापक झाले. त्यांनी ग्रनॉबल येथील पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट, सेंटर फॉर न्यूक्लिअर स्टडिज आणि लॅबोरेटरी फॉर इलेक्ट्रोस्टॅटिक्स अँड द फिजिक्स ऑफ मेटल्स या संस्थांत संचालक म्हणून काम केले.

इ. स. १९३० साली नील यांनी असे सुचविले की, दोन लगतच्या अणूंच्या चुंबकीय परिबल दिशा [→

  चुंबकत्व] एकाआड एक एकमेकींना प्रतिसमांतर (समांतर परंतु दिशा परस्परविरुद्ध असलेल्या) ठेवणाऱ्या परस्परक्रिया अस्तित्वात असू शकतात. यावरून अशी कल्पना करता येते की, अती नीच तापमान असताना स्फटिकांतील अणू दोन गटांमध्ये विभागले जातात. या गटांना उपजालक असे म्हणतात. दोन उपजालकांपैकी एकामध्ये अणूंची चुंबकीय परिबले एका दिशेत असतात आणि दुसऱ्यामध्ये उलट दिशेत असतात. तापमान वाढविले असता एका ठराविक तापमानास (θN) चुंबकीय परिबलांचा क्रमित दिक्‌विन्यास (दिशांची मांडणी) नाहीसा होतो. या θN तापमानास नील तापमान असे म्हणतात. ज्या वेळेस दोन उपजालकांमधील चुंबकीकरणाच्या दिशा एकमेंकीविरुद्ध असतात त्या वेळेस त्या एकमेकींचा निरास करतात. बाह्य चुंबकीय क्षेत्राची दिशा क्रिया काही प्रमाणात प्रतिसमांतर विन्यासात विकृती उत्पन्न करते व त्यामुळे समचुंबकत्व निष्पन्न होते. हे समचुंबकत्व तापमानावर अवलंबून नसते. अशा प्रकारे चुंबकीय पदार्थांचा एक नवीन प्रकार ‘प्रतिलोहचुंबक’ हा निष्पन्न झाला. १९४७ मध्ये त्यांनी लोहचुंबकत्वाचा शोध लावला.

नील यांनी अतिसूक्ष्म लोहचुंबकीय कणांच्या विशेष गुणधर्मांचा अभ्यास केला व बेसाल्ट, लाव्हा इ. पदार्थांत आढळणाऱ्या चुंबकीय ‘स्मृती’चा खुलासा केला. त्यामुळे भूवैज्ञानिक काळातील भूचुंबकीय क्षेत्रांच्या इतिहासाचा मागोवा घेता आला. १९४१ साली त्यांनी एल्. वाइल यांच्याबरोबर एका वेगळ्या प्रकारच्या चिरचुंबकाचा (चुंबकत्व कायम टिकणाऱ्या पदार्थाचा) शोध लावला. ह्या चिरचुंबकामध्ये असलेले गुणधर्म हे त्यातील लोहचुंबकीय पदार्थांचे अतिसूक्ष्म कणांमध्ये विघटन झाल्यामुळे प्राप्त होतात. घन अवस्था प्रयुक्त्यांमध्ये नील यांच्या कार्याचे अनेक उपयोग केलेले दिसून येतात. उदा., संगणक (गणित कृत्ये करणारे यंत्र) आणि फीत मुद्रकांमध्ये (टेपरेकॉर्डरमध्ये) सूक्ष्म चुंबकीय कणांच्या साहाय्याने एखादी माहिती मुद्रित व संग्रहित केली जाते.

दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीस फ्रेंच लढाऊ जहाजांचे चुंबकीय सुरुंगांपासून संरक्षण करणाऱ्या विभागाचे ते प्रमुख होते. त्यांनी शोधून काढलेल्या ‘उदासिनीकरण’ या नावाने ओळखण्यात येणाऱ्या पद्धतीवरून भूचुंबकीय क्षेत्राच्या विरुद्ध दिशेने जहाजाचे चिरचुंबकीकरण केले जात असे.

त्यांची पॅरिस, मॉस्को, ॲम्स्टरडॅम, हॅले व बूकारेस्ट येथील सायन्स ॲकॅडेमींवर, तसेच लंडनची रॉयल सोसायटी व अमेरिकन ॲकॅडेमी ऑफ आर्ट्‌स अँड सायन्सेस या संस्थांवर सदस्य म्हणून निवड झाली. त्यांना द नॅशनल सेंटर फॉर सायंटिफिक रिसर्चचे सुवर्णपदक, लंडनच्या द इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्सचे हॉल्‌वेक पदक व इतर कित्येक संस्थांच्या सन्माननीय पदव्या मिळाल्या आहेत. ग्रँड ऑफिसर ऑफ लिजन ऑफ ऑनर हा सन्मानही त्यांना मिळालेला आहे. चुंबकत्वावरील त्यांचे बरेच लेख विविध शास्त्रीय नियतकालिकांतून प्रसिद्ध झालेले आहेत.

सूर्यवंशी, वि. ल.