निसर्गपूजा : निसर्गातील विशिष्ट पदार्थ, घटना, अवस्था किंवा एकत्रितपणे समग्र निसर्ग, यांची देवता मानून केलेली पूजा ही निसर्गपूजा होय. ती सर्व लोकांत आढळते. आदिम मानवाला आगळी अशी प्रत्येक निसर्गघटना देवता वाटे व तो तिच्यापुढे विनम्र होई. भयापोटी अनेक देवता निर्माण होत. उषेसारख्या देवता विस्मयामुळे, तर अग्नी, पृथ्वी, आप इ. देवता उपयुक्त म्हणून पूज्य ठरल्या. निसर्गाची निर्मिती व नियंत्रण करणाऱ्या शक्तीच्या रूपाने वा पदार्थातील अधिष्ठात्या देवतेच्या रूपानेही निसर्गदेवता मानल्या जात. विशिष्ट निसर्गपदार्थ सजीव आहे, त्यामध्ये अतिमानवी अशा ⇨ माना, शक्ती वा देवतेचा निवास आहे पूर्वजांचे मृत आत्मे त्यात राहतात, तो देवता आहे, साधू वा एखाद्या पवित्र वस्तूशी त्याचा संपर्क आहे इ. अनेक समजुतींनी त्या पदार्थाची पूजा केली जाते. या पूजेमागे वस्तुनिष्ठ दृष्टी असत नाही. श्रद्धा व कल्पना यांचेच प्राबल्य असते. शिवस्वरूपी देवतेची भक्तिभावाने, तर दुष्ट देवतेची पूजा भीतीपोटी केली जाते. कधी अग्नीसारख्या देवतेचे मूळ निसर्गरूप लुप्त झालेले नसते, तर कधी देवताविषयक कल्पना सदैव बदलत असल्यामुळे मूळ रूप लुप्त होऊन एक स्वतंत्र देवता बनते. उदा., विष्णू ही मूळची सूर्यदेवता होती. निसर्गघटकांचे मानवीकरण होऊन त्यांच्याविषयी अनेक पुराणकथा, लोककथा व काव्ये निर्माण होतात. निसर्गपूजा हेच सर्व धर्मांचे मूळ रूप होय, असे काही अभ्यासकांचे मत आहे परंतु निसर्गपूजा न करता अमूर्त देव, पूर्वज वा भुतेखेते यांची पूजा करणाऱ्या जमातीही आढळतात. निसर्गपूजेचा ⇨ देवकपूजा, ⇨ पितृपूजा यांच्याशीही काही बाबतींत संबंध आहे. देशव्यापी महत्त्वाच्या पदार्थांबरोबरच स्थानिक महत्त्वाच्या पदार्थांचीही पूजा होते. पूजेचे साहित्य, प्रार्थना, उत्सव, प्राण्यांचा बळी, मूर्ती, मंदिरे इ. मार्गांनीही पूजा होते. पूजा केली नाही तर देवतेचा कोप होईल, पूजेशिवाय निसर्गाचे कार्य व्यवस्थित होणार नाही इ. समजुती त्यांमागे असतात. विहिरी व निर्झर यांच्या पूजेवर बंदी घातल्याचे उल्लेख ट्यूटॉनिक संस्कृतीत आढळतात, हा एक विशेष होय.
भारतात ऋग्वेदकालापासून तो आजतागायत निसर्गपूजा मोठ्या प्रमाणात चालत आली आहे. ऋग्वेदात इंद्र, अग्नी, सूर्य, वरुण, मरुत, सोम, पृथ्वी इ. निसर्गदेवताच होत्या. अजूनही भूमी, हिमालयादी पर्वत, गंगादी नद्या, सूर्य, चंद्र, शनिमंगलादी ग्रह, देवांचे मत्स्यकूर्मादी अवतार व गरुडादी वाहने, तुळस, वड, पिंपळ, उंबर, गाय, बैल, हंस, नाग इ. असंख्य निसर्गपदार्थांची पूजा होते. वृत्र, राक्षस इ. दुष्ट शक्तींची आणि नदीचा भोवरा, डोह, गावाची शीव इ. ठिकाणच्या देवांचीही पूजा होते. विशिष्ट दगड, खडक, स्वयंभू आकृती इत्यादींचीही पूजा होते. बौद्ध धर्मात देवाला फारसे स्थान नसले, तरी बुद्धाने वज्रपाणी गुह्येश्वर आणि हारिती या दुष्ट निसर्गदेवतांना शिवस्वरूपी बनविल्याची आणि वनदेवतांनी बुद्धाला अन्नवस्त्र दिल्याची कथा सांगितली जाते. आदिवासी लोक दगडांच्या ढिगावर झाडांच्या फांद्या ठेवून ‘वनस्पती माँ ’ या वनदेवतेची तसेच इतर अनेक निसर्गदेवतांची पूजा करतात.
ईजिप्तमधील लोकांनी बहुधा निसर्गात पहिले देवरूप पाहिले. त्यांनी आकाशदेव व धरतीदेव असे परस्परांशी स्पर्धा करणारे देवांचे दोन वर्ग मानले होते. रा हा सूर्यदेव प्राचीन काळापासून तेथे पूज्य होता. ओसायरिस हा मूळचा नाईल नदीचा दुष्टदेव क्रमाने पाणी, समुद्र व पृथ्वी यांचा देव बनला. हापी हा नाईल नदीचा आणि मिन हा निसर्गाच्या जननक्षमतेचा देवही तेथे पूज्य होता.
ग्रीक लोकांत सूर्य (हीलिऑस), चंद्र (सीलीनी) आणि पृथ्वी (जीवाजीआ) यांची पूजा चाले. टाइटन येथे वायूंना बळी अर्पण करण्यासाठी वेदी उभारलेली होती. ट्रॉयचे लोक नदीदेवतेला बळी म्हणून जिवंत घोडे नदीत टाकत. ट्रॉयच्या कुमारिका विवाहाच्या आदल्या दिवशी स्कॅमँड्रॉस या नदीदेवाला आपले कौमार्य अर्पण करीत. रोमन लोक ज्यूपिटर हा आकाशदेव आणि फॉनस हा अरण्यदेव यांना पूज्य मानत. रोममध्ये ज्यूपिटर फेरेट्रिअसचा ओक आणि फिकस समिनॉलिस या दोन वृक्षांची पूजा होती. बायबलच्या ‘जुन्या करारा’त मेघगर्जना हा देवाचा आवाज, प्रकाश हे त्याचे वस्त्र आणि वारे हे त्याचे दूत मानले आहेत. येशू ख्रिस्ताच्या मते देव आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी निसर्गाला आदेश देतो.
पारशी ‘गाथां’च्या मते वोहु मनह्, अष वहिष्ठ आणि आर्मइति हे अमॅष स्पँत अनुक्रमे गुरेढोरे, अग्नी व पृथ्वी यांवर नियंत्रण ठेवतात. ‘यश्त’मध्ये अनेक निसर्गदेव मानले आहेत. मिथ्र हा सूर्यदेव अपाँन पात् हा जलदेव आणि अर्द्वीसुरा अनाहिता ही जल व जननक्षमता यांची देवी होती. पृथ्वी, जल, अग्नी इ. महाभूतांचे मानवीकरण न करता त्यांची पूजा करण्याची प्रथा हे पारशांचे एक वैशिष्ट्य होय.
जपानच्या शिंतो धर्मावरील बहुतेक देवता निसर्गदेवता होत्या. सूर्य व अन्न यांच्या देवी तेथे अत्यंत पूज्य होत्या. ट्यूटॉनिक, स्लाव्ह, सेमेटिक इ. लोकही निसर्गपूजक होते. बाल्टिक लोकांमध्ये तर निसर्गपूजेला फार मोठे स्थान होते.
इस्लाममध्ये मात्र निसर्गपूजेला जवळजवळ स्थान नाहीच. वृक्ष, दगड इ. सर्व वस्तूंत देव पाहण्याच्या सूफी पंथास फारच थोडे अनुयायी मिळाले. काबा येथील दगडाचे चुंबन घेण्यालाही प्रारंभी तेथे विरोधच होता. चंद्राचीही पूजा तेथे होत नाही. जादूच्या काही विधींतून ग्रहपूजा आढळत असली, तरी ती मूळची इस्लामी नव्हे. जी ⇨ वृक्षपूजा आढळते, ती वृक्षाशी संबंधित संतांचीच असते.
साळुंखे, आ. ह.