निषिद्धे : (ताबू). जगातील प्राथमिक व उच्च अशा सर्व धर्मांमध्ये आढळणारी एक मूलभूत संकल्पना. विहित व निषिद्ध अशा दोन परस्परविरुद्व कर्मांनीच धर्म व अधर्म यांचे स्वरूप निश्चित केले जाते. ‌‌‌धर्मग्रंथ, धर्मगुरू, राजा, अधिकारी व्यक्ती, परंपरा अथवा रूढी यांच्यातर्फे व्यक्तीला जे कर्म करण्यास धर्माच्या आधारे मनाई केलेली असते, ते कर्म निषिद्ध होय. उदा., मद्य पिऊ नये, गरोदर स्त्रीने ग्रहणाच्या वेळी भाजी चिरू नये, गोमांस खाऊ नये, दाराची कडी वाजवू नये इत्यादी. ‌‌‌असे निषिद्ध कर्म करणे हा अधर्म असून त्यामूळे पाप लागते व अनर्थ कोसळतो असे मानले जाते म्हणूनच सर्व पापकर्मे ही निषिद्ध मानलेली असतात. इंग्रजीमध्ये या अर्थाने वापरला जाणारा ‘ताबू’ हा शब्द कॅप्टन जेम्स कुक याला १७७७ साली पॉलिनीशियामधील ‘टाँगा’ येथे स्थानिक जमातीत प्रथम आढळला व आता तो सामान्य नाम, विशेषण, क्रियापद इ. अनेक रूपांत वापरला जातो. ‘निषिद्ध’ हा शब्द पदार्थवाचक सामान्य नाम म्हणूनही वापरला जातो उदा., मद्य, गोमांस, परस्त्री इ. गोष्टी या नामाने निर्दिष्ट होतात.‌‌‌

निषेध ही देवाची आज्ञा असून ती मोडल्यास देव शिक्षा देतो, अशी समजूत असल्यामूळे निषेधाचा धर्माशी निकटचा संबंध आहे. म्हणूनच धर्माचे बीज या निषिद्धकल्पनेत आहे, असे काही जण मानतात. अनेक धार्मिक कल्पनांचा व आचारांचा उगम निषेधांतच असतो. उदा., मानवी रक्त जमिनीवर सांडू नये, या निषेधामुळे काही ऑस्ट्रेलियन जमातींत मुलाची सुंता करतात अनेक लोकांना जमिनीवर झोपवून त्यांच्या अंगावर त्या मुलाची सुंता करतात उपवास हे एक धर्माचे अंग असून त्या वेळी विशिष्ट अन्न खाणे हे निषिद्ध मानलेले असते ‌‌‌धर्माशी संबंधित व्रते, यज्ञ, पूजा इत्यादींच्या बाबतीत अनेक प्रकारचे निषेध असतात आणि त्यांतूनच कोणत्याही धर्माला विशिष्ट स्वरूप प्राप्त होण्याला मदत होते. विविध संस्कृतींमध्ये आढळणारे अनेक आचार हे निषेधाधिष्ठित असतात. ‌‌‌उदा., ‘गाठ’ निषिद्ध मानलेली असल्यामुळे प्रसूतीच्या वेळी स्त्रीच्या अंगावरील वस्त्रांच्या गाठी सोडल्या जातात आणि घरातील सर्व कुलपे काढली जातात. समाजातील अनेक शिष्टाचारांचा संबंध निषेधाशी असतो. ‌‌‌उदा., स्त्री जेवत असताना पुरुषाने तिच्याकडे पाहू नये कारण लाजल्यामुळे ती पोटभर जेवू शकणार नाही, असे मानले जाते. निषेधांचा जादूटोण्याशीही निकटचा संबंध असतो. उदा., उष्टे अन्न, कापलेले केस, नखे इ. शत्रूला सापडली, तर तो जादूटोणा करून आपल्यावर संकट आणू शकेल, ‌‌‌या भीतीने ते पदार्थ उघड्यावर टाकणे निषिद्ध असते ते जाळून वा पूरून टाकले जातात. जेवताना तोंडातून आत्मा बाहेर जाईल वा बाहेरचे दुष्ट पिशाच तोंडात जाईल, या भीतीने जेवताना घराची दारे व खिडक्या उघड्या ठेवणे निषिद्ध असते. ‌‌‌युद्धावर जाण्यापूर्वी स्त्रीशी कोणत्याही प्रकारे संबंध ठेवला, तर त्यामुळे तिचा दुबळेपणा आपल्यात येईल किंवा विशिष्ट प्राण्यांचे मांस खाल्ले तर त्यांचे गुणधर्म आपल्यात येतील, अशाही समजुती असतात.

काही गोष्टी पवित्र, अपवित्र, समर्थ, महान, प्राचीन, भीषण, दैवी इ. वाटतात व त्यांच्याविषयी दरारा वाटल्यामुळे निषेध निर्माण होतात. उदा., राजा, देव, पुरोहित, पहिले फळ, प्रेत, रक्त–विशेषतः स्त्रीच्या जननेंद्रियातील रक्त–इत्यादींना स्पर्श वगैरे करणे हे निषिद्ध असते. ‌‌‌त्या पदार्थांत एक प्रकारची गूढशक्ती वा ⇨ माना आहे, अशी समजूत असते. त्या वस्तूशी संपर्क साधणे अत्यावश्यक असेल, तर तो विधिपूर्वकच साधला जातो. पवित्र आणि अपवित्र अशा दोन्ही प्रकारच्या पदार्थांविषयी निषेध असतात. उदा., देव, मंदिर, पुरोहित, धर्मग्रंथ इत्यादींशी ‌‌‌संबंधित निषेध हे पवित्र पदार्थांविषयीचे, ‌‌‌तर प्रेत, मृत्यू, संभोग, रजस्वला स्त्री, शूद्र इत्यादींशी संबंधित निषेध हे अपवित्र पदार्थांविषयीचे निषेध असल्याचे मानले जाते. ब्राम्हणाला स्पर्श करणेही निषिद्ध आणि शूद्राला स्पर्श करणेही निषिद्ध वा गायत्री मंत्राचा उच्चारही निषिद्ध आणि अश्लील शब्दांचा उच्चारही निषिद्ध, ‌‌‌अशी स्थिती असते. आदिम जमातींचे लोक निषिद्ध वस्तू पवित्र की अपवित्र याचा विचार करीत नसत. ती वस्तू निषिद्ध आहे, एवढेच त्यांना माहीत असे. उदा., सिरियामध्ये डुक्कर निषिद्ध मानले होते. काही जणांच्या मते अस्वच्छ असल्यामुळे, ‌‌‌तर काही जणांच्या मते पवित्र असल्यामुळे ते निषिद्ध मानले गेले. निषिद्ध पदार्थ हा संसर्गजन्य रोगाप्रमाणे स्वतः तर दुष्परिणाम करतोच पण त्याच्या संपर्कात येणारी वस्तूही भयप्रद व निषिद्ध बनते. उदा., रजस्वला स्त्रीला स्पर्श करणे निषिद्ध ‌‌‌आणि तिने स्पर्श केलेल्या वस्त्रादींना स्पर्श करणेही निषिद्ध असते. युगांडामध्ये रजस्वला वा प्रसूत स्त्रीने स्पर्श केलेली भांडी नष्ट केली जातात.

भीती ही मानवाची अत्यंत प्रबळ भावना असून निषेधांची निर्मिती व पालन यांच्या मुळाशी तीच भावना असते. निषेध मोडल्यामुळे काहीतरी अनर्थ होईल, अशी लोंकाना भीती वाटत असते. म्हणूनच त्या अनर्थाला प्रतिबध करण्यासाठी व आत्मसंरक्षणासाठी माणसे ‌‌‌आज्ञाधारकपणे निषेधांचे पालन करतात. कित्येकदा ही भीती काल्पनिक असते. सृष्टीतील कार्यकारणभावाचे ज्ञान नसल्यामुळे आपल्या विशिष्ट कृत्याने निसर्गाची व्यवस्था बिघडेल, असे मानले जाते. उदा., गर्भवती स्त्रीने वा तिच्या पतीने दोऱ्या गुंडाळल्या, तर मुलाची आतडी गंडाळली जातील, ‌‌‌असे मानतात. ब्रह्मदेशात मद्य तयार करणाऱ्या स्त्रियांनी ते तयार करण्यापूर्वी काही आंबट खाल्ले वा संभोग केला, तर ते मद्य आंबट होते, असे मानतात. माणसांचे कापलेले केस उघड्यावर टाकले व पक्ष्यांनी त्यात घरटी बांधली, तर त्या माणसांची डोकी दुखू लागतात, अशी समजूत जर्मनीत आहे. ‌‌‌अशा समजुतींमुळेच निषेधांच्या कारणांची चिकित्सा करण्याचे भान माणसांना रहात नाही. समूहमन हे विचार न करता अनुकरण करीत असल्यामुळे निषेधांचा प्रसार होत जातो. निषेध मोडल्यामुळे मानवाचा अधःपात होऊन मृत्यू, आजारपण, दु:ख व इतर संकटे निर्माण झाली, ‌‌‌अशा अर्थाच्या ⇨ पुराणकथा जगभर आढळतात. उदा., अमर असलेल्या निंगपो लोकांनी निषिद्व सरोवरात स्नान केल्यामुळे ते मर्त्य बनले, अशी कथा बंगालमध्ये प्रसिद्ध आहे. महत्त्वाच्या व्यक्तींचा नाश जवळ आला, की त्यांच्याकडून निषेध मोडले जातात, ‌‌‌अशा कथा केल्टिक लोकांत रूढ आहेत. निषेध मोडणारांना समाजाचा बहिष्कार व शिक्षा यांना तोंड द्यावे लागते. उदा., १७७२ साली मॅरिअन आणि त्याचे साथीदार खलाशी यांनी पॅसिफिकमध्ये पवित्र ठिकाणी मासे पकडल्याबद्दल त्यांना ठार मारण्यात आले होते.

आदिम काळात हुकूमशाही वृत्तीचा पिता घरातील सर्व स्त्रिया स्वतःच्या उपभोगासाठी ठेवून मुलांना त्यांच्याशी संबंध ठेवणे निषिद्व करीत असे. फ्रॉइडच्या मते निषेध हे प्राचीन काळात अधिकारी व्यक्तींनी जबरदस्तीने लादलेले असत. ‌‌‌ते मानवाच्या प्रबळ अशा स्वभाविक इच्छांना दडपून टाकतात. व्यक्तीला परिणामांची भीती वाटत असल्यामुळे निषेधांचे पालन करावेसे वाटते ‌‌‌परंतु त्याच वेळेला तिच्या अंतर्मनात मात्र निषेध मोडण्याची इच्छाही प्रबळ झालेली असते. त्याच्या मते मानवी दंडविधीची उगम निषेध कल्पनेत शोधता येईल. कारण निषेध मोडला तर प्रथम निषिद्ध पदार्थ सूड उगवी, नंतर दुखावलेले देव शिक्षा करीत व शेवटी समाज शिक्षा देई.‌‌‌


निषेधांमुळे माणसावर अनेक कठोर व असह्य नियंत्रणे लादली जातात आणि त्याचे स्वातंत्र नष्ट होते, असे दिसून येते. कित्येकदा निषेधपालनासाठी हालअपेष्टा भोगाव्या लागतात, मानसिक व शारीरिक कुचंबणा सहन करावी लागते आणि भ्रामक समजूतींमुळे कित्येक दुष्परिणामांना तोंड द्यावे लागते. उदा., एका ऑस्ट्रेलियन आदिवासीने आपली रजस्वला पत्नी आपल्या कांबळ्यावर झोपली हे पाहताच तिला ठार मारले आणि तिने केलेल्या निषेधभंगाच्या परिणामांची भीती वाटून तो ‌‌‌स्वतःही एका पंधरवड्यात मरण पावला. राजा, धर्मगुरू इ. महत्त्वाच्या व्यक्तींना इतरांवर निषेध लादण्याचा अधिकार असल्यामुळे ते कित्येकदा कामापभोग, धनलाभ, वर्चस्व, प्रतिष्ठा इ. स्वार्थी हेतूंनी त्यांचा उपयोग करून घेत, असे आढळून येते. ‌‌‌निषेधव्यवस्थेमुळे स्त्रियांना पुरुषांची, तरुणांना वृद्वांची, हीनवर्णीयांना उच्चवर्णीयांची व प्रजेला राजाची गुलामी पतकरावी लागते. राजा, पुरोहित, सरदार इत्यादींची धर्मशाही निर्माण होते. समाजात श्रेष्ठ-कनिष्ठता निर्माण होते. राजाचे नाव उच्चारले तर मृत्युदंड देणे, शुद्राने वेदश्रवण ‌‌‌केल्यास त्याच्या कानांत तप्त शिसे ओतणे, पुरुषांनी जेवल्याखेरीज स्त्रियांनी न जेवणे इ. प्रथा विषमतेच्याच द्योतक आहेत. निषेधामुळे इतरही काही दुष्परिणाम होतात. उदा., मृतांचे नाव घेणे निषिद्ध असल्यामुळे काही जमातींत इतिहासलेखन अशक्य झाले आहे.

या दुष्परिणामांबरोबरच निषेधांमुळे काही फायदेही होतात. कित्येकदा एखादी समाजोपयोगी गोष्ट कठोर कायदे करूनही साध्य होत नाही परंतु निषेधांनी ती सहजपणे साधता येते. व्यावहारिक उद्देश साधण्यासाठी दैवी आज्ञेचे रूप देऊन निषेध तयार केले, की लोक आपोआपच त्यांचे पालन करतात. शासनाचे स्थैर्य, खाजगी ‌‌‌संपतीचे रक्षण, विवाहाचे पावित्र व जीवितरक्षण या गोष्टी निषेधांसारख्या अंधश्रद्धांतूनच समाजाला लाभल्या आहेत, असे जे. जी. फ्रेझरला वाटते. कारण आज्ञाभंग, चोरी, व्यभिचार व हत्या या कृत्यांच्या निषेधांचे सर्व समाजांतून पालन होत असते. असत्य, हिंसा, व्यभिचार इत्यादींचे निषेध नैतिक ‌‌‌मूल्यांना दृढ करणारे असतात. त्यांतून सामाजिक जबाबदारीची जाणीवही निर्माण होते. त्यांमध्ये एक शैक्षणिक मूल्य गर्भित असून संस्कार करण्याचे सामर्थ्य असते. आत्महत्येचा निषेध नैराश्य दूर करून जीवनावरचा विश्वास वाढविणारा असतो. संभोग, अन्न इ. विषयीच्या निषेधांनी संयम व त्याग यांचे ‌‌‌महत्त्व समजते आणि माणूस स्वतःला व जगाला जिंकण्याचे सामर्थ्य प्राप्त करतो. अगम्य आप्तसंभोगावरील निषेधामुळे कौटुंबिक जिव्हाळा, सुप्रजनन आणि सामाजिक ऐक्यही साधते. इंडोनेशियामध्ये घरच्या उघड्या दरवाज्यावर पाम वृक्षाची फांदी लटकवून ते घर निषिद्ध करणे, हा चोरीपासून संरक्षण करण्यासाठी ‌‌‌अनेक कड्याकुलपांपेक्षा अधिक प्रभावी उपाय मानला जातो. शेत, वृक्ष, होडी इत्यादींचे रक्षण करण्यासाठी रंगीत पानांचे गुच्छ, नारळाच्या झावळ्या इ. निषेधचिन्हे ठेवली जातात. निषेधांचा अर्थव्यवस्थेवरही प्रभाव असतो. उदा., टाँगा येथे निषेधपद्धतीचा अध्यक्ष हा अन्नधान्य नियंत्रकही असतो. तो प्रत्येकाकडून ठराविक असे अन्नधान्य निर्माण करून घेतो आणि कुणी काय खावे व काय खाऊ नये, हे ठरवून दुष्काळावर मात करतो. त्यामुळे उधळपट्टीही टाळता येते. पाण्यामध्ये मलमूत्रविसर्जन करू नये, भरदूपारी सूर्याकडे पाहू नये, प्रेतधूमाचे सेवन करू नये इ. निषेध हे आरोग्य, स्वच्छता इ. दृष्टींनी उपयुक्त असतात. उष्टे ‌‌‌अन्न उघड्यावर टाकू नये हा निषेध जादूटोण्याशी संबंधित असला, तरी आरोग्य उत्तम राहण्याला त्याची मदत होते. तोंडाने अग्नीला वारा घालू नये, उन्मत पशूच्या वाहनात बसू नये इ. निषेध सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे असतात. पाणी पिणाऱ्या गाईला हाकलू नये इ. निषेधांतून भूतदयेचे दर्शन होते. तात्पर्य, ‌‌‌दैवी अनर्थाचे निवारण हा निषेधपालनामागचा उद्देश असतो परंतु काही वेळा त्यामुळे ऐहिक अनर्थाचे निवारण होऊन समाजाचे व व्यक्तीचे खरोखरच हित ‌‌‌साधते. म्हणूनच हे निषेध समाजाने आत्मसंरक्षणार्थ तयार केलेले आहेत आणि दुःख, हानी, रोग व मृत्यू यांच्या मोबदल्यात मिळविलेले कित्येक पिढ्यांचे शहाणपण त्यांत समाविष्ट झालेले आहे. ही लोकांची समजूत काही अंशी योग्यच आहे.

निषेधांचे क्षेत्र इतके व्यापक असते, की मानवाच्या प्रत्येक कृतीला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात काही निषेध हे सांगितलेले असतातच. हे निषेध लिखित धर्मग्रंथाबरोबरच अलिखित चालीरीती, लोकव्यवहार इत्यादींमध्येही रुजलेले असतात. काही निषेध प्राचीन असतात, तर काही बदलत्या संस्कृतीबरोबर नव्याने ‌‌‌निर्माण होत असतात. काही निषेध संपूर्ण समाजासाठी, तर काही विशिष्ट व्यक्तींसाठी असतात. काही निषेध समाजोपयोगी वाटत असले, तरी काही निषेधांमागे केवळ लहरीपणा दिसतो. काही निषेधांत नैतिकतेपेक्षा कर्मकांडाला अधिक महत्त्व असते उदा., फ्रान्स व इटलीमध्ये शनिवारी कबूतर खाणे हे खून व व्यभिचार ‌‌‌यांपेक्षा मोठे पाप मानले जाई. काही निषेध हे केवळ हास्यास्पद असतात उदा., नीआस बेटात प्राण्याची शिकार करण्यासाठी खड्डा खणताना हसू नये, नाही तर खड्ड्याच्या कडा ढासळतील, अशी समजूत आहे. काही निषेधांमागेच नेमके कारण अनाकलनीय असते उदा., इंद्रधनुष्य पाहू नये, घरात शीळ घालू नये, केरसुणी उभी ठेवू नये ‌‌‌इत्यादींसारखे असंख्य निषेध दैनंदिन जीवनात आढळतात. काही वेळा ज्या जमातीत निषेधांची संख्या जास्त व कठोरता अधिक ती जमात स्वतःला श्रेष्ठ समजते उदा., द. आफ्रिकेत मासे न खाणाऱ्या झुलू जमातीचा मुलगा मासे खाणाऱ्या थोंगा जमातीपेक्षा स्वतःची जमात श्रेष्ठ मानतो. काही निषेध सार्वत्रिक असले, तरी ‌‌‌भिन्नभिन्न संस्कृतींमध्ये भिन्नभिन्न निषेधांना कमी जास्त महत्त्व दिलेले असते उदा., काही लोक अन्नाविषयीच्या निषेधांना अधिक महत्त्व देतात, तर काही लोक संभोगाविषयीच्या निषेधांना.

राजा, धर्मगुरू इ. महत्त्वाच्या व्यक्तींना समागम, अन्न, पेय, वस्त्र इ. बाबतींत सामान्यांपेक्षा अधिक कठोर निषेधांचे पालन करावे लागते उदा., जपानच्या मिकॅडो याने जमिनीला पाय लावू नयेत, त्याच्या डोक्यावर सूर्यप्रकाश पडू नये इ. निषेध असत. न्यूझीलंडमध्ये राजाने अग्नीला फुंकर घातली, तर तो अग्नी ‌‌‌इतरांच्या स्वयंपाकाला निषिद्ध होई. पॉलिनीशियामध्ये राजा ज्या वस्तूला स्पर्श करतो किंवा जी वस्तू खातो ती इतरांना निषिद्ध होते. म्हणून इतरांना त्रास होऊ नये यासाठी राजाला स्वतःच अनेक निषेध पाळावे लागतात. व्रतस्थ, ब्राम्हण, पुजारी इत्यादींना इतरांपेक्षा अधिक निषेध पाळावे लागतात. ‌‌‌जगात सर्वत्र स्त्रियांवर नाना प्रकारचे निषेध लादून त्यांचा दर्जा दुय्यम बनविलेला असतो. विशेषतः त्यांच्या जननक्षम काळात तर त्यांना निषेध अधिकच पाळावे लागतात. वयात येणे, रजस्वला होणे, विवाह, गर्भावस्था, गर्भपात, प्रसूती, मृत मुलाला वा जुळ्याला जन्म देणे इ. गोष्टींशी संबंधित अनेक निषेध असतात. ‌‌‌शेवटी निषेधपालन हे स्त्रियांच्या इतके अंगवळणी पडते, की त्याकडे पुरूषांपेक्षा त्यांचाच अधिक कल होतो. शिकार, मासेमारी व युद्ध यांसाठी जाणारांना अनेक निषेध असतात उदा., देवमासे मारायला जाणारांनी एक आठवडा संभोग वर्ज्य करावा, योद्ध्याने युद्धावर जाताना बोटांनी डोके खाजवू नये इत्यादी नात्यांच्या ‌‌‌बाबतींतील निषेध प्रामुख्याने विवाहविषयक असतात परंतु सासू व जावई किंवा सून व सासरा यांनी एकमेकांना पाहू नये वा एकमेकांशी बोलू नये, यांसारखे निषेधही असतात. ⇨ देवकपदार्थ खावयाचा नाही आणि समान देवक असलेल्या व्यक्तींनी परस्परांशी विवाह करावयाचा नाही, असे देवकांविषयीचे निषेध असतात.


कामवासना ही मानवाची अत्यंत प्रबळ भावना असल्यामुळे संभोगाच्या बाबतीत अनेक निषेध असतात. विशेषतः ⇨ अगम्य आप्तसंभोग (इन्‌सेस्ट) हा सर्वत्र धिक्कारण्यात आला आहे. रक्तसंबंधाने संबंधित व्यक्तीचे रक्त कौमार्यभंग, प्रसूती वा हत्या यांपैकी कोणत्याही कारणाने सांडले, तर भीषण परिणाम होतात या ‌‌‌समजुतीमुळे ती कृत्ये निषिद्ध ठरली, असे ⇨ एमील द्यूरकेमचे मत होते. सामान्यतः कोणतेही विशेष कृत्य करण्यापूर्वी संभोग निषिद्ध मानलेला असतो. विशिष्ट स्थलकाली व विशिष्ठ व्यक्तींशी संभोग करू नये, संभोगानंतर स्नान केल्याखेरीज पूजादी कृत्ये करू नयेत इ. निषेध असतात. ‌‌‌मृताच्या रक्ताला स्पर्श करू नये राजाचे, रजस्वलेचे वा प्रसूत स्त्रीचे रक्त जमिनीवर सांडू नये इ. रक्तविषयक निषेध असतात. पुरुष जे खातो ते स्त्रीने खाऊ नये गोमांस, लसून, कांदा इ. खाऊ नये यांसारखे अन्नविषयक निषेध असतात. ‌‌‌मद्यासारखी पेये, काळ्या रंगाची वस्त्रे इ. काहींना निषिद्ध असतात. डोक्यावर वस्त्र असल्याखेरीज विशिष्ठ कृत्ये करू नयेत, शिकाऱ्याने मृत व्यक्तीचा पोशाख घालू नये इ. वस्त्रविषयक निषेध असतात. पती, पत्नी, मोठी व्यक्ती, विशिष्ट देवता, मृत, ज्येष्ठपुत्र, भीषण प्राणी इत्यादींची नावे घेऊ ‌‌‌नयेत स्वतःचे नाव उच्चारू नये इ. निषेधांतून पर्यायवाचक शब्द तयार होतात. नवरा वगैरेंच्या नावांचे शब्द इतर अर्थांनीही वापरावयाचे नसल्यामुळे काफिर स्त्रियांची एक वेगळी भाषाच तयार झाली आहे. पहिले पीक, पहिले फळ, पहिले मूल जन्म, दीक्षा, वयात येणे, विवाह इ. पहिल्या वस्तू व नव्या अवस्था ‌‌‌यांविषयी अनेक निषेध असतात. डाव्या हातात प्रसाद घेऊ नये, शुभकार्यास जाताना डावे पाऊल आधी टाकू नये, पायांना तिढी घालून बसू नये, डोक्याला इतरांच्या हाताचा स्पर्श होऊ देऊ नये इ. अवयवांशी संबंधित निषेध असतात. आपल्या डोक्यावर दुसऱ्याने हात ठेवला म्हणून त्याची कत्तल केल्याची उदाहरणे आहेत. ‌‌‌आपल्या डोक्यावर इतरांनी असू नये म्हणून घराला दुसरा मजला न बांधण्याची पद्धत कंबोडिया, जावा इ. ठिकाणी आढळते. तिघांनी शुभकार्याला जाऊ नये, रजोदर्शनानंतर अकरावी व तेरावी रात्र स्त्रीगमनास निषिद्ध इ. अंक आणि तिथी यांच्याबद्दलचे निषेध असतात. हाजच्या यात्रेला जाणाऱ्याने आपल्या वस्त्रांना ‌‌‌गाठी मारू नयेत वा बोटांत अंगठ्या घालू नयेत, असा नियम असतो. काही निषेध सार्वकालिक, तर काही शनिवार, ग्रहण इ. विशिष्ट कालांपुरते असतात. काही निषेध जगात सर्वत्र आढळणारे, तर काही स्थानिक असतात. यांखेरीज ब्राह्मणादी वर्ण, ब्रह्मचर्यादी आश्रम, मृत्यू, मंदिरप्रवेश, प्रदक्षिणा, विशिष्ट रंग, ‌‌‌दिशा, मीठ, खनिजे, दागिने, पशुपक्षी, प्रवास, निद्रा, श्राद्ध, स्नान, नृत्य, गायन, सजावट, धूम्रपान, जुगार, पादत्राणे इत्यादींविषयी अक्षरशः अनंत निषेध असतात.

काही वेळा परिस्थितीमुळे निषेधांचा भंग करावाच लागतो उदा., प्रेतावर अंत्यसंस्कार करताना त्याला स्पर्श करावा लागतो, प्रसूत स्त्री पुर्णपणे एकटी टाकता येत नाही, परदेशी माणसांना भेटणे टाळता येत नाही. अशा वेळी निषेधभंगानंतर आत्मसंरक्षणार्थ काही विधी केले जातात व मगच सर्वसामान्य व्यवहार ‌‌‌करण्यास परवानगी मिळते. ‌‌‌निषिद्ध वस्तूपेक्षा अधिक सामर्थ्य वा माना शक्ती अंगी असलेली ‌‌‌⇨ शामान वा धर्मगुरू यांसारखी व्यक्ती काही विधी पार पाडून निषेधभंगाचे दुष्परिणाम दूर करू शकते. ‌‌‌पाणी, रक्त, अग्नी इत्यादींचा उपयोग करून शुद्ध होणे, निषिद्ध वस्तू हाताने पुसून नंतर हात धुणे किंवा कापडाने पुसून ते कापड पुरणे, दुष्परिणामाला एका वस्तूतून दुसऱ्या वस्तूत विधिपूर्वक पाठवणे, निषिद्ध अन्न खाल्ले असल्यास ‌‌‌ते ओकून टाकणे, प्रायश्चित घेणे इ. प्रकारे हे साधले जाते. निषेधाचा भंग केल्यामुळे विलक्षण पराक्रम करण्याचे सामर्थ्य प्राप्त होते, या समजुतीमुळे काही ठिकाणी मुद्दामच निषेध मोडले जातात उदा., ‌‌‌ब-ईल या जमातीमध्ये अगम्य आप्तसंभोग हा अत्यंत भीषण व निषिद्ध मानलेला असूनही साहसी कृत्यात सफल होऊ इच्छिणारा माणूस आपल्या बहिणीशी संभोग करतो. शिकार साधणे, युद्ध जिंकणे इ. उद्देशांनी आई, मुलगी इत्यादींशी संभोग करण्याची प्रथा इतर काही ठिकाणी आढळते.

कित्येक निषेध बुद्धिवादाच्या निकषावर टिकत नाहीत. त्यामुळे देशोदेशींच्या समाजसुधारकांनी रूढिप्राप्त निषेधांवर प्रखर हल्ले चढवून समाजात क्रांतिकारक बदल घडविले आहेत. अशा निषेधांचा भंग करणे हे नवसमाजनिर्मितीचे धोतक ठरते उदा., शूद्रांना स्पर्श करण्यासंबंधीचे निषेध मोडणे इत्यादी. ‌‌‌याउलट काही निषेधांचा भंग हा समाजधारणेसाठी आवश्यक असलेली व्यवस्था मोडून अराजक माजवू शकतो उदा., चोरी, व्यभिचार, हत्या इ. विषयींचे निषेध सर्रास मोडले जाऊ लागले, तर समाजव्यवस्था कोलमडून पडेल.

व्यवहाराचा विचार करून व ⇨ आपद्धर्म म्हणून काही वेळा निषेधांना अपवादही सांगितलेले असतात. ‘‌‌मांस खाऊ नये’ असा निषेध आहे परंतु विश्वामित्राने दुष्काळात कुत्र्याचे मांस खाल्ले ते आपद्धर्म म्हणून त्यामुळे तो अधर्म नव्हे. प्रेताचे मांस खाल्लेला पक्षी ज्या झाडावर बसतो ते झाड किंवा प्रेताला स्पर्श करून आलेल्या लांडगा, कोल्हा इत्यादींच्या पायांखालचे शेत स्पर्शाला निषिद्ध नाही, ‌‌‌असे पारशी लोक मानतात. असे अपवाद केले नाहीत, तर केवळ एका निषिद्ध वस्तुच्या संसर्गानेही क्रमाने सगळे जगच भ्रष्ट होईल. भारतात आपला नोकर असलेल्या शूद्राने ब्राह्मणाला दिलेले भोजन, दुकानात विक्रिसाठी ठेवलेल्या वस्तू, भिक्षान्न इ. पदार्थांचा स्वीकार निषिद्ध नव्हता. कोणत्याही प्राण्याने ‌‌‌वा माणसाने उष्टावलेले अन्न वा खाद्यपदार्थ अभक्ष्य मानले आहेत परंतु बछड्याने प्यालेल्या गाईच्या स्तनाचे दूध, शिकारी कुत्र्याने पकडलेले सावज, पक्ष्याने चोचीने खाल्लेले फळ वा रतिकालीन स्त्रीमुख निषिद्ध नव्हे. रजस्वलेने स्पर्श केलेल्या नागड्या मुलाला इतरांनी स्पर्श करणे निषिद्ध नाही. ‌‌‌सुतार व इतर कामगारांनी निषेधनियम पाळण्यासाठी आपले काम थांबवावयाचे नसते. दुष्काळासारख्या संकटप्रसंगी व तीर्थयात्रा, विवाह इ. प्रसंगी काही निषेध नियम बाजूला ठेवले जातात. मूर्तिस्थापना वा विवाहसमारंभ चालू झाल्यावर घरातील एखादी व्यक्ती प्रसूत, रजस्वला इ. झाली, तर निषेधांचे पालन करण्यासाठी ‌‌‌तो समारंभ स्थगित केला जात नाही.

कित्येकदा निषेधांच्या अतिरेकामुळे जगणेही अवघड बनते. तोडा लोकात उठता बसता प्रत्येक क्रियेत कोणतातरी निषेध पाळावाच लागतो. अशा समाजात खऱ्या धार्मिक वृत्तीचा ऱ्हास होतो. शिवाय निषेध हे भावनांशी निगडित असल्यामुळे ते सामाजिक बदल आणि वैज्ञानिक संशोधनाला अडथळे निर्माण करतात परंतु बुद्धिवाद ‌‌‌आणि वैज्ञानिक प्रगती यांच्यामुळे आधुनिक युगात निषेधांचा पगडा कमी होत आहे.

संदर्भ : 1. Cook, James, A Voyage to the Pacific Ocean, London, 1784.           2. Frazer, J. G. The Golden Bough, London, 1911.           3. Freud, Sigmund Trans, Strachey, James, Totem and Taboo, New York, 1952.           4. Steiner, Franz, Taboo, New York, 1956.           5. Wundt, Wilhelm Trans, The Elements of Folk Psychology, London, 1916.

साळुंखे, आ. ह.