निवेदिता, भगिनी: (२८ ऑक्टोबर १८६७–१३ ऑक्टोबर १९११). विवेकानंदांच्या शिष्या आणि भारतीय स्वातंत्र्याच्या व संस्कृतीच्या एक निष्ठावंत पुरस्कर्त्या. मूळ नाव मार्गारेट नोबल. वडील सॅम्युअल व आई इझॅबेला या आयरिश दांपत्यापोटी आयर्लंडमधील उनगॅनन गावी जन्म. वडील ख्रिस्ती धर्मोपदेशक होते. चर्चतर्फे चालविण्यात येणाऱ्या हॅलिफॅकस महाविद्यालयात त्यांचे शिक्षण झाले. वडिल निवर्तल्यानंतर लंडनमध्ये त्यांनी शिक्षिकेचा व्यवसाय पतकरला. पेस्टालोत्सी व फ्रबेल यांच्या नवीन शिक्षणपद्धतीच्या प्रभावामुळे १८९२ साली विंबल्डन येथे शाळा काढली. १८९५ मध्ये त्यांची विवेकानंदांशी भेट झाली विवेकानंदांच्या या भेटीने त्यांची संपूर्ण जीवनदृष्टीच बदलली. परिणामतः विवेकानंदांच्या आवाहनानुसार त्यांच्या कार्यास वाहून घेण्याकरिता त्या १८९८ साली २८ जानेवारी रोजी भारतात आल्या. परकीय म्हणून त्यांच्या कार्यात प्रथम पुष्कळ अडथळे आले परंतु विवेकानंदांनी विरोधकांची समजूत पटवून ते दूर केले. प्रथम शारदामाता (रामकृष्ण परंमहसांची पत्नी) यांसारख्या महिलांकडून हिंदू धर्माचे अनेक संस्कार त्यांनी आत्मसात करून घेतले. कलकत्त्याच्या ‘बोस पारा लेन’ मध्ये कर्मठ लोकांच्या वस्तीत राहून आपल्या विनयशील, सालस व प्रेमळ वागणुकीने तेथील कर्मठ लोकांनाही आपलेसे करून घेतले. ११ मार्च १८९८ रोजी कलकत्त्याच्या स्टार रंगमंदिरात आयोजित केलेल्या सभेत धर्मशिक्षण व हिंदभूमीची सेवा करण्याचे आपले उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. २५ मार्च १८९८ रोजी त्यांना विधिपूर्वक ब्रहाचारिणीव्रताची दीक्षा स्वामी विवेकानंदानी दिली व त्यांचे नाव निवेदिता ठेवले. स्वामीजींबरोबर प्रवास केल्यामुळे हिंदू लोक व त्यांच्या चालीरीती, धर्मकल्पना आणि इतिहास यांची त्यांना जवळून कल्पना आली. १२ नोव्हेंबर १८९८ रोजी दिवाळीच्या दिवशी त्यांनी कलकत्त्यातील बागबाजार येथे एका बालिका विद्यालयाची स्थापना करून राष्ट्रीय शिक्षणकार्यास आरंभ केला. फेब्रुवारी १८९९ साली कलकत्त्यात उद्भवलेल्या प्लेगच्या साथीत त्यांनी सेवाकार्य केले. त्याच साली अमेरिकेत गेल्या व तेथे त्यांनी रामकृष्णसाहाय्य संस्था स्थापन केली.पॅरिस व लंडन येथील प्रवासानंतर १९०२ साली त्या भारतात परतआल्या. त्याच वर्षी विवेकानंदांचे निधन झाले व निवेदितांनी रामकृष्ण मंडळाबाहेर पडून राष्ट्रीय स्वातंत्र्य आंदोलनास वाहूनघेतले. १९०२ ते १९०४ या काळात सर्व भारतात प्रचारदौराकरून लोकांत जागृती निर्माण केली. जुन्या व नव्या उपयुक्त आचारविचारांचा समन्वय करून स्वतंत्र, संघटित व समर्थ भारत बनविण्याचे विवेकानंदांचे ध्येय साकार करण्याकरिता त्यांनी जिद्दीने प्रयत्न केला. त्याकरिता त्यांनी देशप्रेमी व स्वार्थत्यागी तरूणांची संघटना उभारली. त्या काळातील प्रमुख राजकीय पुढाऱ्यांशी व सशस्त्र क्रांतिवादी संघटनांशीही त्यांचा संबंध होता. १९०२ साली पुण्याला जाऊन हुतात्मे झालेल्या चाफेकर बंधूच्या मातेची पायधूळ डोक्यासलावली. १९०५ साली बनारसला भरलेल्या काँग्रेस अधिवेशनात भाग घेतला व स्वदेशी चळवळीला पाठिंबा देऊन स्वदेशीचे व्रत अंगीकारले. त्याच साली लॉर्ड कर्झनच्या बंगाल-फाळणीच्या योजनेला त्यांनी कडवा विरोध केला. जामिनाकरिता हवी असलेली रक्कम काही तासात जमा करून भूपेंद्रदत्त यास त्यांनी जामिनावर सोडविले. १९०६ साली पूर्व बंगालमध्ये दुष्काळाने व पुराने थैमान घातले असताना, त्यांनी अविश्रांत परिश्रम घेऊन लोकांना मदत केली., यूरोपात व अमेरिकेत असलेल्या भारतीयांना इंग्रज राजवटीविरूद्ध संघटित करण्याचाही त्यांनी प्रयत्न केला.
निवेदिता भारतात येण्यापूर्वीही लेखन करीत होत्याच भारतात आल्यानंतर त्यांचे अनेक लेख रिव्हू ऑफरिव्हूज, द प्रबुद्ध भारत, मॉडर्न रिव्हू इ. नियतकालिकांतून प्रसिद्ध झाले. काली द मदर (१९००), द वेब ऑफ इंडियन लाइफ (१९०४ ), क्रेडल टेल्सऑफ हिंदूइझम (१९०७), इंडियन स्टडीज ऑफ लव्ह अँड डेथ (१९०९) आणि द मास्टर ॲज आय सॉ हिम (१९१०) ही त्यांची महत्त्वाची पुस्तके होत. त्यांचे समग्र लेखन चार खंडांत प्रसिद्ध झाले आहे (१९६७). निवेदितांचे हे सर्वच लेखन भारतीय संस्कृतीची, विशेषतः पाश्चिमात्यांना, यथार्थपणे ओळख करून देणारे आहे. जगदीशचंद्र बोस, अवनींद्रनाथ टागोर यांसारख्यांना प्रोत्साहन व मदत देण्याचे कार्यही त्यांनी पार पाडले.
त्यांची बुद्धिमत्ता, हिंदू धर्मावरील व भारतावरील निष्ठा, ध्येयवादित्त्व व त्याग इ. गुणविशेषांमुळे त्या भारतीयांच्या कायमच्या आदरास पात्र ठरल्या.
संदर्भ : Pravrajika, Muktiprana, Bhagini Nivedita, Calcutta, 1968.
खोडवे, अच्युत
“