देवदासी : एखाद्या देवतेला वाहिलेली मुलगी. अपत्यप्राप्तीकरिता किंवा अपत्य जगण्याकरिता पहिले मूल देवाला वाहण्याचा नवस करीत. प्राचीन भारतात पूजेच्या वेळी देवतेला फुले, धूप, धान्य, शिजविलेले अन्न, पेय इ. अर्पण करण्यात येई. ईश्वराने भौतिक सुखांचाही उपभोग घ्यावा, असेही मानले जाई. म्हणून देवतेसमोर नृत्य करण्याकरिता व गाणे म्हणण्याकरिता त्याचप्रमाणे देवतेकरिता होणाऱ्या समारंभात भाग घेण्याकरिता सुंदर मुली ईश्वराला अर्पिल्या जात. पुराणांनी या दृष्टिकोनास पुष्टी दिली. देवाची पत्नी म्हणून मुलींना देण्यात येई. काळाच्या ओघात पुजाऱ्यांनी त्यांचा आपल्या विषयोपभोगाकरिता उपयोग केला. जुन्या ग्रीक लोकांतही त्याचप्रमाणे बॅबिलोनियातील ईस्टर मंदिरातही अशीच प्रथा असलेली दिसून येते. बॅबिलोनियातील प्रत्येक स्त्रीने एकदा तरी ॲफ्रोडाइटीच्या मंदिरात प्रथम चांदीचे नाणे देणाऱ्या पुरुषाशी मंदिराबाहेर जाऊन संग करून त्यास तृप्त केले म्हणजे देवी प्रसन्न होते, अशी त्यांची समजूत असल्याचे हिरॉडोटसचे म्हणणे आहे. मंदिरात सकाळ–संध्याकाळ दोन्ही वेळी नृत्य करणे व गाणे म्हणणे, त्याचप्रमाणे सर्व सार्वजनिक समारंभांत भाग घेणे, ही देवदासींची अधिकृत कर्तव्ये आहेत. त्यांना विवाहसमारंभाच्या वेळी व इतर धार्मिक कौटुंबिक मेळाव्यास बोलावण्यात येई. त्या काळात वाचन, नृत्य व गाणे शिकण्याचा विशेष अधिकार असणाऱ्या ह्याच एकमेव स्त्रिया होत्या.

देवदासींना मंदिराकडून ठराविक रक्कम मिळे. केव्हा केव्हा मंदिराशी संलग्न असलेली जमीन देवदासींना उदरनिर्वाहाकरिता देण्यात येई. देवदासीच्या मुलीला आईकडून वारसा मिळे आणि तीसुद्धा देवदासी बने, तर मुलगा मंदिराचा गवई वा वादक बने. मंदिराच्या नृत्यांगना अत्यंत लावण्यपूर्ण असत. त्या सुगंधी द्रव्य वापरीत, सुंदर पोशाख आणि सुवासिक फुलांनी सुशोभित असलेली केशभूषा करीत, रत्नांचे व सोन्याचे दागिने वापरीत व पुरुषवर्गास कुशलतेने आकर्षित करीत. ज्यावेळी त्या वेश्या बनल्या, त्यावेळी त्यांची प्रतिष्ठा घसरली. सामान्यपणे देवदासींना विवाह करण्यास परवानगी नसते.

दक्षिण भारतात नवव्या–दहाव्या शतकांत मंदिरे उभारण्याचे कार्य चालू होते. त्या काळात पुष्कळशा देवदासींना भरती करण्यात आले. त्यांना मूर्तीला चामराने वारा घालणे, कुंभारतीची पवित्र ज्योत नेणे तसेच मिरवणुकीच्या वेळी ईश्वरासमोर नृत्य–गान करणे, अशा प्रकारची कामे करावी लागत. मदुरा, कांजीवरम् व तंजावर येथील मंदिरांत अनेक देवदासी होत्या. त्या ठिकाणच्या मोठ्या मंदिरांच्या स्थायी दानातून त्यांना भत्ता मिळत असे.

कर्नाटकात देवदासी ‘बसवी’ म्हणून ओळखली जाते. बसव्या म्हणून देवदासींना अर्पण करणे, विशेषतः लिंगायत व होलेया लोकांत प्रचारात होते. त्यांना वारांगना म्हणून राहावे लागत असे. लिंगायत बसव्यांना स्थलनामाव्यतिरिक्त आडनाव नसे. बसवेश्वर व मल्लिकार्जुन हे त्यांचे देव होते. त्यांची मुख्य कामे जातीच्या बैठकीला, विवाहाला आणि इतर समारंभांना उपस्थित राहणे, धार्मिक विधी आचरण्यात स्त्रियांना मदत करणे व वधूवरांना आरती ओवाळणे अशा प्रकारची होती. बसव्यांना आपल्या मातापित्यांकडून धनाचा वारसा मिळे.

कर्नाटकात बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती येथे दर पौर्णिमेला देवदासींची जत्रा भरते. त्यात माघी पौर्णिमेला (रांड पुनव) मोठी जत्रा भरते. जत्रेत यल्लमा देवतेला मुली वाहण्याची प्रथा पूर्वापार चालत आली आहे. या देवदासींना ‘जोगतिणी ’ म्हणतात. केस गुंतल्यावर (‘जट’ आल्यावर) तो देवीचा कोप मानून ती मुलगी देवीला वाहण्यात येते. या जोगतिणी गळ्यात मण्यांच्या किंवा कवड्यांच्या माळा घालतात, डोक्यावर ‘जग’ (देवीचा पितळी मुखवटा ठेवलेली परडी) वाहून नेतात व कपाळावर भंडारा लावतात. चोंडक, टाळ व तुणतुणे यांच्या साथीने त्या देवतेच्या स्तुतिपर गाणी गातात. त्या उपजीविकेकरिता जोगवा मागतात. काळाच्या ओघात बहुतेक जोगतिणींना वेश्याव्यवसाय पतकरणे भाग पडले तो त्यांच्यावर समाजाकडून लादला गेला, असे दिसून येते.

महाराष्ट्रामध्ये खंडोबाला मुरळी म्हणून मुली वाहिल्या जातात. पुरुष वाघ्या म्हणून ओळखले जातात. मुरळी नाचते, तर वाघ्या गाणे गातो व तुणतुणे वाजवतो. ते जागरणाचा विधी करतात. तमाशा आणि ग्रामीण नाटके यांतही ते कामेही करतात. काही मुरळ्याही वेश्याजीवन पतकरतात [→ वाघ्या-मुरळी].


कदंब अंमलात गोव्यात मंदिरे बांधण्यास सुरुवात झाली. अशा तऱ्हेने बौद्ध काळापासून गोव्यात देवदासी होत्या. सुरुवातीला देवदासी ईश्वरस्तुतिपर गाणे गात, उपवास करीत आणि ईश्वराच्या वार्षिक समारंभाच्या वेळी फक्त भाग घेत. परंतु हळूहळू त्या नृत्य करणाऱ्या व गाणाऱ्या मुली बनल्या. त्या फक्त धार्मिक समारंभातच भाग घेत नसत, तर सामाजिक समारंभातही भाग घेत. राजमहालाशीही त्यांचा नर्तकी म्हणून संबंध असे. देवदासी अर्पण करण्याचा समारंभ ‘शेंस’ विधी म्हणून ओळखला जाई. शेंस विधी हा लग्नसमारंभासारखाच असे. फरक फक्त इतकाच, की वर म्हणून पुरुषवेषातील मुलगी असे. केव्हाकेव्हा लग्न हे एका तलवारीशी किंवा कट्यारीशी होत असे. काळाच्या ओघात त्या रखेल्या म्हणून राहत. त्यांना नृत्य–गायनाचे विशेष शिक्षण देण्यात येत असे. त्यांच्यापैकी काही यशस्वी आकाशवाणी गायिका, चित्रतारका व नाट्य–अभिनेत्री झाल्या. अशा तऱ्हेने देवदासींचे दोन गट पडले : कलांवतिणी वा नायकिणी आणि भाविणी. पुरुष हे नाईक आणि देवली म्हणून ओळखले जात.

कलावंतिणी गायिका व नर्तकी असत. साधारणतः त्या रखेल्या म्हणून राहत. भाविणींपेक्षा त्यांचा दर्जा वरचा असे. भाविणी कमी शिकलेल्या असत व नृत्य–गायनात प्रवीण नसत. त्या मंदिरांची झाडलोट करीत, दिवे लावीत व ईश्वराच्या पूजेत भाग घेत. त्या पुष्कळदा वेश्याव्यवसाय करीत. महाराष्ट्र राज्यात रत्नागिरी जिल्ह्यातील सावंतवाडीमध्ये भाविणी आढळून येत. देवदासींना त्यांच्या उपजीविकेकरिता मंदिराची जमीन देत.

देवदासी प्रथा बंद करण्याचा प्रथम प्रयत्न त्यावेळच्या म्हैसूर संस्थानाने १९१० साली एक कायदा करून केला. नंतर त्यावेळेच्या मुंबई प्रांताने १९३४ साली व मद्रास प्रांताने १९४७ साली अशाच प्रकारचे कायदे केले. १९७५ साली गडहिंग्लज येथे ‘म. फुले समता प्रतिष्ठान’ तर्फे देवदासी भगिनी परिषद भरविण्यात आली होती. निरनिराळ्या राज्यांनी देवतेला मुली वाहण्यास प्रतिबंध करणारे असे कायदे जरी केले असले, तरी देवदासी प्रथा पूर्णतया बंद झालेली नाही.

पुणेकर, स. द. फाटक, स्नेहल (इं.) खोडवे, अच्युत (म.)