निवृत्तिनाथ : (तेरावे शतक). ज्ञानेश्वरांचे ज्येष्ठ बंधू आणि गुरू. आपेगाव येथे यांचा जन्म झाला. ज्ञानदेवादी चार भावंडांच्या जन्मसनांबदल दोन मते आहेत. निवृत्तिनाथांचे जन्मवर्ष १२७३ किंवा १२६८ असे सांगितले जाते. पांगारकर, रा. द. रानडे, भिंगारकर ह्यांसारखे अभ्यासक पहिल्या मताचे समर्थक असून नामदेवांनी ‘आदि’, ‘तीर्थावळी’ व ‘समाधी ’ ह्या तीन प्रकरणांतून सांगितलेले ज्ञानेश्वरचरित्र हा त्यांचा एक मुख्य आधार आहे. महाराष्ट्र सारस्वतकार भावे आणि सोनोपंत दांडेकर ह्यांनी जनाबाईच्या एका अभंगाधारे दुसऱ्या मताचा पुरस्कार केलेला आहे. तथापि जनाबाईचा हा अभंग प्रक्षिप्त असावा, असे दिसते कारण ह्याच अभंगाचा एक भिन्न पाठही उपलब्ध आहे. पहिल्या मताला परंपरेचा आधार आहे.
नाथपंथाचे विख्यात सत्पुरुष गैनीनाथ वा गहिनीनाथ हे निवृत्तिनाथांचे गुरू होते. ‘निवृत्तिचे ध्येय कृष्ण हाचि होय । गायिनीनाथे सोय दाखविली ॥’, असे निवृत्तिनाथांनीच आपल्या एका अभंगात म्हणून ठेविले आहे. गैनीनाथांपासून आपणास कृष्णभक्तिरसायन मिळाले व गोरक्षनाथांनी त्याचे रहस्य आपणास सांगितले असेही एके ठिकाणी त्यांनी सांगितले असल्यामुळे परमगुरू गोरक्षनाथांचीही भेट त्यांना घडली असावी, असे दिसते.
सु. तीन-चारशे अभंग आणि एक हरिपाठ ऐवढी रचना, निश्चितपणे निवृत्तिनाथांची म्हणता येईल, अशी आहे. योगपर, अद्वैतपर आणि कृष्णभक्तिपर असे हे अभंग आहेत. रसवत्तेच्या दृष्टीने ते काहीसे उणे वाटतात तथापि निवृत्तिनाथांची ख्याती आणि महत्त्व कवी म्हणून नाही, तर ज्ञानेश्वरांचे मार्गदर्शक म्हणून आहे. त्यांनी ‘आपले संपूर्ण अध्यात्मधन ज्ञानेश्वरांना देऊन त्यांना यश दिले व आपण त्या यशापासूनही निवृत्त झाले’ असे निवृत्तिनाथांबद्दल म्हटले जाते. ज्ञानेश्वरांनी त्यांच्याबद्दलचा आदर अनेक ठिकाणी व्यक्त केलेला आहे. ज्ञानेश्वरांनी संतंमंडळींसह केलेल्या अनेक तीर्थांच्या यात्रेतही निवृत्तिनाथ त्यांच्या सोबत होतेच.
निवृत्तिदेवी, निवृत्तिसारआणि उत्तरगीताटीका असे तीन ग्रंथही निवृत्तिनाथांनी लिहिल्याचे म्हटले जाते तथापि ते अनुपलब्ध आहेत. रा. म. आठवले यांनी निवृत्तेश्वरी असा एक ग्रंथ संशोधिला आहे. ज्ञानेश्वरीप्रमाणेच हेही गीतेवरील एक भाष्य आहे. तथापि हा ग्रंथ निवृत्तिनाथांचाच आहे, असे अद्याप सिद्ध झालेले नाही. धुळ्याच्या श्रीसमर्थवाग्देवतामंदिरात ‘सटीक भगवद्गीता’ आणि ‘समाधि बोध’ अशी दोन हस्तलिखिते निवृत्तिनाथांची म्हणून ठेविली आहेत.
ज्ञानेश्वर आणि सोपानदेव समाधिस्त झाल्यानंतर मुक्ताई ‘अन्नपाणी सकळ’ त्यागून परलोकवासी झाली व पुढे लवकरच निवृत्तिनाथांनीही त्र्यंबकेश्वरी देह ठेविला. त्यांची समाधी तेथेच बांधण्यात आलेली आहे.
सुर्वे, भा. ग.