निवाड्याचा दिवस: ज्यू,ख्रिस्ती व इस्लाम धर्मांतील एक संकल्पना. ज्यू भविष्यवाद्यांचे असे भाकित आहे, की एका ठराविक वेळी येहोवा (परमेश्वर) येणार आहे आणि धार्मिक व अधार्मिक, चांगले व वाईट ह्यांचा निवाडा स्वतः करणार आहे. केवळ येहोवाच्या इच्छेवरच हा निवाडा अवलंबून असेल, ही घटना जगाच्या अंतःसमयी घडणार आहे.त्यासमयी अधर्माचरणी व दुष्ट लोकांचा नायनाट करून परमेश्वर सर्व जगभर आपले राज्य (देवाचे राज्य) स्थापन करील (एमस वा अमोस – ५ : १८·२४). हा निवाड्याचा दिवस चालू काळातच येईल, असा नव्या कराराचा सूर आहे. नव्या करारातील ‘प्रेषितांची कृत्ये’–१७:३१ ‘रोमकरास पत्र’ –२:५, १६ ‘करिंथकरास दुसरे पत्र – ५:१० ‘प्रकटीकरण –२०:११–१५इ.उताऱ्यांत ह्या अर्थाची वचने आढळतात.
इस्लाममध्येही ह्या अंतिम निवाड्याच्या दिवसाची संकल्पना असून तिला ‘अल्-कियाम’ वा ‘कियामत’ अशा संज्ञा आहेत. हा सृष्टीचा प्रलयकाल अथवा शेवटचा दिवस असून या दिवशी सर्व मृतात्मे आपापल्या कबरींतून बाहेर येऊन ईश्वरासमोर आपापल्या पापपुण्याचा हिशेब देतील आणि त्यानुसार त्यांना गती प्राप्त होईल, अशी समजूत आहे. इस्लाममधील ही संकल्पना ज्यू व ख्रिस्ती धर्मांतील संकल्पनेवर आधारलेली आहे. ह्या तिन्ही धर्मांतील ह्या संकल्पनेचे मूळ पारशी धर्मांतील संकल्पनेत असण्याची बरीच शक्यता अभ्यासक मानतात.
जीवाच्या मरणोत्तरस्थितीबाबतचा विचार सर्वच धर्मांत कमी-अधिक प्रमाणात केल्याचे दिसते. सृष्टीची उत्पत्ती, स्थिती व लय अथवा प्रलय ह्यांपैकी प्रलयाशी सर्व जीवांच्या मरणोत्तरस्थितीचा घनिष्ट संबंध जोडला गेला व पूर्व कर्मानुसार जीवाची चांगली वा वाईट मरणोत्तरस्थिती कल्पिली गेली. [→मरणोत्तरस्थितीविज्ञान प्रलय]. पाप-पुण्य, स्वर्ग-नरक ह्या कल्पनांचाही जीवाच्या बऱ्यावाईट पूर्वकर्मांशी संबंध निगडित करून त्याला त्यानुसार ती ती गती प्राप्त होते, असे मानण्याकडे सर्वच धर्मांचा कल आहे.
आयरन, जे. डब्ल्यू. साळवी, प्रमिला