निर्देश क्षण : खगोलीय ज्योतींच्या (उदा., ग्रह, धूमकेतू इ.) गति-स्थितीच्या अभ्यासाला (किंवा नुसत्या उल्लेखाला) जे कालमापन आवश्यक असते, ते ज्या एखाद्या विशिष्ट सोयीच्या क्षणापासून धरतात, त्या विशिष्ट क्षणाला निर्देश क्षण म्हणतात. या क्षणी एखाद्या विशिष्ट ज्योतीचे स्थान किंवा दोन विशिष्ट ज्योतींची परस्परसंदर्भातील स्थाने निश्चित असतात. उदा., एखाद्या ग्रहाच्या गतीची व कक्षेची माहिती मिळाली, तरी त्याचे कोणत्याही वेळेचे स्थान निश्चित करण्यासाठी तो आपल्या कक्षेत आणखी केव्हा कोठे होता हे कळणेही आवश्यक आहे. ग्रह, धूमकेतू अशा ज्योतींच्या बाबतीत ती ज्योती आपल्या कक्षेच्या उपसूर्य बिंदूत (सूर्यापासून सर्वांत जवळच्या बिंदूत) येते त्या क्षणाला निर्देश क्षण म्हणतात. युग्मताऱ्यांच्या बाबतीत दोन घटक ताऱ्यांत कमीतकमी अंतर असण्याच्या क्षणाला निर्देश क्षण म्हणतात. ज्योतीच्या विशिष्ट क्षणाचा भोग यासाठी सुद्धा हा शब्द संक्षिप्त संज्ञा म्हणून वापरतात [⟶ भोगांश]. कक्षेची संपूर्ण माहिती होण्यासाठी जी सात अंगे माहीत असावी लागतात त्यांत निर्देश क्षण हे एक अंग आहे [⟶ कक्षा]. निर्देश क्षणावरून कोणत्याही वेळी ज्योतीचे स्थान निश्चित करता येते.

काजरेकर, स. ग.