नियतकालिके : जे प्रकाशन एकाच शीर्षकाखाली किमान एक आठवड्याच्या किंवा त्याहून अधिक कालावधीने सामान्यत: नियमितपणे प्रसिद्ध होते आणि ज्यात अनेक लेखकांचे विविध विषयांवरचे (किंवा प्रकाशन विशिष्ट विषयाला वाहिलेले असल्यास त्या एकाच विषयावरचे) साहित्य संकलित केलेले असते ते नियतकालिक, अशी सर्वसाधारणपणे नियतकालिकाची व्याख्या करता येईल. दैनिक वृत्तपत्रांचा अंतर्भाव सामान्यत: या संज्ञेत करीत नाहीत. स्थानिक, देशांतर्गत आणि जागतिक स्वरूपाच्या विविध घटनांच्या बातम्या ताबडतोब पुरविणे, हा वृत्तपंत्राचा मुख्य हेतू असतो तेव्हा वृत्तपत्राप्रमाणे बातम्या न पुरविता मनोरंजक वा ज्ञानवर्धक मजकूर जी प्रकाशने नियमित कालावधीने पुरवितात, त्यांनाच नियतकालिक ही संज्ञा आहे.
नियतकालिकांचे वर्गीकरण अनेक दृष्टिकोनांतून करता येते. प्रसिद्धीच्या नियतकालानुसार साप्ताहिक, पाक्षिक, मासिक, द्वैमासिक, त्रैमासिक, षण्मासिक आणि वार्षिक असे नियतकालिकांचे प्रकार होऊ शकतात. मुलांची, स्त्रियांची अशी विशिष्ट वाचकवर्गानुरूप किंवा मनोरंजक, वैचारिक, संशोधनात्मक अशी आशयानुरूप वर्गवारीही करता येते.
नियतकालिक या वाङ्मयप्रकाराचा उदय युरोप खंडात सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात झाला. १६६३ साली जर्मनीत हँबर्गला प्रसिद्ध झालेले Erbauliche Monaths–Unterre–dungen हे जगातील पहिले ज्ञात नियतकालिक समजले जाते. पुढील दोनचार वर्षांच्या अवधीतच फ्रान्स, इंग्लंड आणि इटली या देशांत नियतकालिक निघू लागली. या सर्वांची प्रेरणा ज्ञानप्रसार हीच एक होती. यानंतर १० वर्षांनी फ्रान्समध्ये नियतकालिकांतून रंजक स्वरूपाचा मजकूर समाविष्ट होण्यास सुरुवात झाली. १६७२ साली Mercure gallant या नियतकालिकात आख्यायिका, कविता अशा तऱ्हेचे साहित्य संगृहित केले जाऊ लागले. यथाकाल त्याचे अनुकरण होऊन यूरोपमधील इतर देशांतही त्याच धर्तीवर नियतकालिके निघू लागली. १६९० साली इंग्लडमध्ये जॉन डंटन हा प्रकाशक अथेनिअन मर्क्युरी हे रंजक नियतकालिक प्रकाशित करू लागला. स्त्रीवर्गातील वाढता शिक्षणप्रसार ध्यानात घेऊन या मासिकाचे काही अंक त्याने खास स्त्रीवाचकांसाठी प्रसिद्ध केले. त्या प्रयोगाला अपेक्षेपेक्षाही अधिक अनुकूल प्रतिसाद मिळाल्यामुळे १६९३ साली त्याने लेडीज मर्क्युरी या नावाचे स्वतंत्र नियतकालिक स्त्रियांसाठी सुरू केले. स्त्रियांसाठी निघणाऱ्या नियतकालिकांचा हा आद्य अवतार समजता येईल.
अठराव्या शतकाच्या आरंभी निबंध या वाङ्मयप्रकाराचा उदय व विकास होण्यास नियतकालिकाचे माध्यम फार उपयुक्त ठरले. रिव्ह्यू, टॅटलर, स्पेक्टॅटर इ. नियतकालिकांतून डॅन्येल डीफो, रिचर्ड स्टील व जोसेफ ॲडिसन या तीन निबंधकारांनी इंग्लंडमध्ये लक्षणीय सामाजिक आणि राजकीय जागृती घडवून आणली. त्याबरोबरच आपल्या भाषाशैलीने अभिजात वाङ्मयाविषयी अभिरूचीही सर्वसामान्य लोकांत निर्माण केली. याच शतकाच्या अखेरच्या दशकात जर्मनीत केवळ वाङ्मयीन विषयांना वाहिलेली नियतकालिके प्रथम निघाली. शिलर व गटे या विश्वविख्यात साहित्यिकांनी संपादन केलेली वाङ्मयीन नियतकालिके जर्मन साहित्यात अत्यंत प्रभावी ठरली.
अमेरिकेत नियतकालिकांचा आरंभ १७४१ च्या सुमारास झाला व या अठराव्या शतकाच्या अखेरपर्यंत तेथे सु. १०० नियतकालिके सुरू झाली. पुढे अमेरिकन नियतकालिकांची जी भरभराट झाली, ती देशातील तत्कालीन सर्वांगीन प्रगतीचा एक भागच समजता येईल. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापासून मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण अमेरिकेत बहुतेक सर्व घटक राज्यांतून सुरू झाले. त्याचा परिणाम नियतकालिकांसाठी एक मोठा वाचकवर्ग निर्माण होण्यात झाला. त्या काळात जी वैज्ञानिक आणि औद्योगिक प्रगती झाली तीसुद्धा नियतकालिकांच्या प्रसाराला फार उपयुक्त ठरली. मुद्रणकलेत झालेल्या तांत्रिक सुधारणांमुळे छपाईच्या खर्चात बचत होऊ लागली. कागदाचे उत्पादन मुबलक होऊन तो स्वस्त दराने मिळू लागला. करमणूक आणि ज्ञानसंवर्धन या क्षेत्रातील नियतकालिकांची परिणामकारकता जाणून १८७९ सालापासून टपालाच्या दरात त्यांना खास सवलत दिली गेली. या सर्वांचा परिणाम नियतकालिके बहुजनसमाजाला परवडण्याइतकी स्वस्त होण्यात झाला. त्यांची संख्या झपाट्याने वाढली आणि त्यांचा प्रसार समाजामधील सर्व थरांपर्यंत पोहोचला.
एकोणिसाव्या शतकात ज्ञानाची अपूर्व प्रगती होऊन त्याच्या नव्या नव्या शाखोपशाखा विकसित झाल्या. विविध विषयांच्या अभ्यासकांनी आणि संशोधकांनी आपापल्या विषयांच्या संवर्धनासाठी विद्वत्परिषदा आणि संघटना स्थापन करून विशिष्ट विषयाला वाहिलेली नियतकालिके प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली. नवविचारप्रवर्तक आणि व्यासंगपूर्ण साहित्यासाठी आज जगन्मान्य झालेल्या नेचर, लॅन्सेट, ब्रिटिश मेडिकल जर्नल, जर्नल ऑफ द रॉयल स्टॅटिस्टिकल सोसायटी, इकॉनॉमिक जर्नल या इंग्लंडमधून प्रसिद्ध होणाऱ्या आणि पॉप्युलर सायन्स मंथली, सायंटिफिक अमेरिकन, अमेरिकन इकॉनॉमिक रिव्ह्यू, पॉलिटिकल सायन्स क्वॉर्टर्ली, नॅशनल जिओग्राफिक जर्नल, देदलस या अमेरिकेतून प्रसिद्ध होणाऱ्या नियतकालिकांची सुरुवात याच काळातील आहे.
विसाव्या शतकात नियतकालिकांचे काही अभिनव प्रकार अमेरिकेत सुरू झाले. विविध क्षेत्रांतील महत्त्वपूर्ण जागतिक घटनांची बातमी समयोचित छायाचित्रांसह पुरविणारे टाइम मॅगझिन हे साप्ताहिक १९२३ साली प्रसिद्ध होऊ लागले आणि वृत्तनियतकालिक या एका नव्या प्रकाराचा नियतकालिकसृष्टीत उदय झाला. या साप्ताहिकाला सुरुवातीपासून मिळालेले भरघोस यश पाहून त्याचे अनुकरण होणे स्वाभाविकच होते. अल्पावधीत अमेरिकेत टाइमच्याच धर्तीवर न्यूजवीक, यू. एस. अँड वर्ल्ड रिपोर्ट ही साप्ताहिके निघू लागली. आपले कुशल बातमीदार आणि छायाचित्रकार जगभर नेमून त्यांच्याकरवी मिळालेल्या सामग्रीवर आपल्या खास भाषाशैलीचा संपादकीय संस्कार करून बातम्या गोष्टसदृश स्वरूपात सादर करणे, हे या नियतकालिकांचे वैशिष्ट्ये आहे. फ्रान्समधील L’Express, जर्मनीतील Der spiegel, इटलीतील Panorama व मेक्सिकोतील Tiempo ही या प्रकारातील इतर नावाजलेली नियतकालिके आहेत. वृत्तनियतकालिकांतील टाइमचे अद्वितीयत्व आजतागायत अबाधित आहे. निरनिराळ्या देशांसाठी त्याच्या २०० स्वतंत्र आवृत्त्या प्रसिद्ध होतात आणि त्यांचा एकूण खप ५५ लक्ष प्रतींचा आहे.
लेखी मजकुरांपेक्षा छायाचित्रांना अधिक प्राधान्य देऊन छायाचित्रांतून घडलेला प्रसंग जणू प्रत्यक्ष पाहिल्याचे समाधान वाचकांना देणाऱ्या छायाचित्र-नियतकालिकांचा प्रारंभ लाइफ या साप्ताहिकाने १९३६ साली केला. जगातील लक्षवेधक प्रसंगांची कलात्मदृष्ट्या उत्तम आणि अत्यंत परिणामकारक छायाचित्रे प्रसिद्ध करून या साप्ताहिकाने, आर्थिक अडचणींमुळे ते १९७३ साली बंद पडेपर्यंत, नियतकालिकसृष्टीत एक अनन्यसाधारण स्थान मिळविले होते. विद्यमान छायाचित्र नियतकालिकांत फान्समधील Paris-Match, जर्मनीतील Stern व इटलीतील Oggi ही श्रेष्ठ दर्जाची समजली जातात.
निरनिराळ्या नियतकालिकांत प्रसिद्ध झालेले विविध विषयांवरील निवडक लेख संक्षिप्त करून एकत्र छापण्याचा उपक्रम अमेरिकेत लिटररी डायजेस्ट आणि रिव्ह्यू ऑफ रिव्ह्यूज या नियतकालिकांनी एकोणिसाव्या शतकाच्या अखेरच्या दशकात सुरू केला होता पण या कल्पनेची खरी परिपूर्ती १९२२ साली रीडर्स डायजेस्ट नियतकालिकाच्या सुरूवातीने झाली. प्रत्येक वाचकाला त्याच्या आवडीनुरूप प्रत्येक अंकात भरपूर साहित्य मिळाल्याचे समाधान होईल, अशा योजकतेने संक्षेपासाठी लेख निवडणे हे त्याच्या अभूतपूर्व लोकप्रियतेचे मर्म दिसते. करमणूक, ज्ञान, बहुश्रुतता यांसाठी उत्सुक असलेल्या वाचकवर्गावर याचा इतका पगडा पडला, की अवघ्या वीस वर्षांत अनेक देशांत आणि अनेक भाषांत त्याच्या स्वतंत्र आवृत्त्या निघू लागल्या. भारतातही त्याची स्वतंत्र आवृत्ती सुरू झालेली आहे (१९५४). त्याच्या इतर १३ आवृत्त्या निघतात आणि त्यांचा एकूण खप ३ कोटींच्या आसपास आहे. नियतकालिकसृष्टीत हा विक्रम अभूतपूर्व आहे.
भारतीय नियतकालिकांच्या उदयाचे श्रेय सामान्यत: भारतात आलेल्या यूरोपीय लोकांकडे जाते. त्यामुळेच इंग्लंडमधील प्रस्थापित नियतकालिकांचा आदर्श भारतातही आदर्श ठरला. भारतातील पहिल्या नियतकालिकांचे मुद्रण व प्रकाशनही परकियांनीच केले. भारतात मुद्रणकलेचे बीजारोपण पोर्तुगीजांनी सोळाव्या शतकात केले होते खरे, पण स्थानिक भाषांतून पुस्तकांचे आणि नियतकालिकांचे मुद्रण इंग्रजी राजवटीच्या सुरूवातीपासून होऊ लागले. भारतातील ख्रिस्ती मिशनऱ्यांनी धर्मप्रसारासाठी बायबलची निरनिराळ्या प्रादेशिक भाषांमधून भाषांतरे केली व नियतकालिकेही सुरू केली.
बंगालमधील श्रीरामपूर मिशनच्या डॉ. विल्यम कॅरी यांनी १८१८ साली समाजदर्पण नावाचे पहिले बंगाली साप्ताहिक आणि दिग्दर्शन नावाचे पहिले बंगाली मासिक सुरू केले. त्यानंतर चौदा वर्षांनी म्हणजे १९३२ साली पहिले मराठी नियतकालिक दर्पण हे बाळशास्त्री जांभेकर यांच्या संपादकत्वाखाली सुरू झाले. ते सुरुवातीला (६ जानेवारी ते एप्रिल १८३२) पाक्षिक आणि पुढे मे १८३२ पासून शेवटपर्यंत (जून १८४०) साप्ताहिक होते. त्यांनीच १८४० साली दिग्दर्शन नावाचे मराठी मासिकही सुरू केले असा समज असला, तरी त्या मासिकाचे संपादक राघोबा जनार्दन (वसईकर) हे होते, असे साधार प्रतिपादन गं. दे. खानोलकरांनी केले आहे. [अर्वाचिन मराठी वाङ्मय सेवक, पंचम खंड, पृष्ठ २४–२५ व षष्ठ खंड, पृष्ठ ७१]. पहिल्या बंगाली व पहिल्या मराठी नियतकालिकांचे हे नामसादृश्य हा एक योगायोग समजण्यापेक्षा ते नियतकालिकांच्या तत्कालीन उद्दिष्टांचे निदर्शक समजणेच अधिक उचित वाटते.
बंगाली आणि मराठी या भाषांप्रमाणे इतरही भारतीय भाषांत एकोणिसाव्या शतकात कमीअधिक कालांतराने वृत्तपत्रांचा व नियतकालिकांचा उदय झाला. त्यांपैकी काही भाषांतील नियतकालिकांचे स्थूल ऐतिहासिक दिग्दर्शन या लेखात पुढे दिले आहे.
नियतकालिकांच्या विविध प्रकारांचा वाचकवर्ग ठरून गेल्यासारखा असतो आणि त्या त्या वाचकवर्गाला रुचेल असाच मजकूर पुरविणे त्या त्या नियतकालिकाला व्यवहारिक दृष्ट्या परवडणारे असते त्यामुळे प्रत्येक प्रकारातील मजकुराचे स्वरूपही रूढ झाले आहे. रंजनात्मक साप्ताहिकांचा वाचक हा फावल्या वेळात मुख्यत: करमणुकीसाठी व त्याचबरोबर शक्य झाल्यास चारचौघांच्या बैठकीत आपण उणे न पडण्याइतपत जरूर असलेले ज्ञान मिळविण्यासाठी वाचणारा असतो. त्यामुळे शृंगारकथा, रहस्यकथा, कविता, प्रवासवर्णन, बोलपट, नाट्यप्रयोग आणि क्रिडाविश्वातल्या घटना यांचे समालोचन, वैज्ञानिक किंवा सामाजिक विषयावरचा एखादा लेख ही या साप्ताहिकांची साहित्यसामग्री झालेली आहे. रंजनात्मक मासिकेही मुख्यत: याच प्रकारच्या मजकुराने सजलेला असतात पण ललित साहित्याच्या जोडीला त्यांत साप्ताहिकापेक्षा वैचारिक लेख अधिक असतात. त्यांच्या लेखकवर्गात नव्या लेखकांप्रमाणे प्रतिष्ठित लेखकही असतात. साहजिकच त्यातल्या साहित्याची वाङ्मयीन आणि वैचारिक पातळी साप्ताहिकापेक्षा अधिक वरची असू शकते. मासिकापेक्षा अधिक कालावधीत प्रसिद्ध होणाऱ्या नियतकालिकांची भूमिका बहुधा रंजनाची नसून वैचारिक असते. इंग्रजीत हा भेद रंजनात्मक नियतकालिकांना ‘मॅगझिन’ आणि वैचारिक नियतकालिकांना ‘जर्नल्स’ अथवा ‘रिव्ह्यूज’ ही संज्ञा वापरून व्यक्त करतात. द्वैमासिके, त्रैमासिक, षण्मासिके ही साधारणत: कोणत्या तरी विषयाशी अथवा विचारप्रणालीशी निगडित असतात आणि त्या विषयाच्या विद्वत्परिषदेमार्फत वा तत्सम संघटनेमार्फत ती चालविलेली असतात. ज्ञानाच्या शाखोपशाखांतील नव्या कल्पना, नवे संशोधन, सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक आणि धार्मिक समस्यांची मीमांसा अशा तऱ्हेचे साहित्य त्यांत प्रकर्षाने आढळते. त्यांचा वाचक वर्ग चिकित्सक असतो व लेखकवर्ग आपापल्या क्षेत्रात मान्यता पावलेला असतो. आपल्या क्षेत्रात या नियतकालिकांचा अधिकार इतका मोठा असतो, की त्यांचे नियमित परिशीलन केले नाही, तर आपण मागे पडू अशी सार्थ भीती संशोधकांना आणि अभ्यासकांना वाटते. अध्यापकवर्गाला आपल्या संशोधनसंबंधित विचारांचा प्रसार करण्याची संधी मिळावी व विद्यार्थ्यांची भीड चेपून त्यांना लेखनप्रवृत्त करावे या हेतूने विद्यापीठे, महाविद्यालये व विद्यालये आपापली स्वतंत्र नियतकालिके चालवितात.
आरंभीच्या काळात ज्ञानप्रसार हीच भारतीय नियतकालिकांची प्रेरणा होती. द्रव्यार्जनाच्या व्यावहारिक विचाराचा त्या ध्येयवादाला स्पर्शही झाला नव्हता. किंबहुना पदराला खार लागल्याखेरीज ध्येयपूर्ती साधारण नाही अशीच भावना फार प्रबल होती, मराठी ज्ञानप्रसारकात सुरुवातीच्या काही वर्षी ‘गरीब लोकांनीदेखील घ्यावे म्हणून किंमत फार थोडी ठेवली आहे’, असा जाहीर निर्वाळा दिला होता व विविधज्ञानविस्ताराच्या व्यवस्थापकांनी ‘या पुस्तकापासून द्रव्य उत्पादन करून त्यावर आपला चरितार्थ चालविण्याची या पुस्तककारांची मुळीच इच्छा नसल्यामुळे हे कृत्य केवळ निर्लोभपणे सर्वांच्या हितास्तव चालविले आहे’, असे घोषित केले होते तथापि नियतकालिकप्रकाशन हा एक व्यवसाय आहे आणि इतर कोठल्याही व्यवसायात जमाखर्च व नफातोटा यांकडे जसे लक्ष द्यावे लागते, तसेच काटेकोर लक्ष त्यात दिले नाही, तर व्यवहार आतबट्ट्याचा होऊन नियतकालिके अल्पायुषी ठरतात, हा कटू अनुभव आरंभापासून आजतागायत प्रत्येक प्रकाशकाला येत राहिला आहे.
नियतकालिकांच्या आर्थिक व्यवस्थेत जमेची फक्त तीन अंगे आहेत : वर्गणीदारांकडून येणारे उत्पन्न, किरकोळ अंकांच्या विक्रीतून मिळणारी रक्कम आणि जाहिरातदारांकडून येणारे उत्पन्न परंतु यापेक्षा खर्चाचे तपशील अधिक आहेत. उदा., कागद आणि छपाईचा खर्च, अंकबांधणीचा खर्च, टपालखर्च, लेखकांचा मोबदला, संपादकीय व इतर कर्मचाऱ्यांचे वेतन इत्यादी. जमेच्या बाजूला किरकोळ अंकविक्रीपासून मिळणारी रक्कम ही तुलनेने सर्वांत गौण आवक आहे. वर्गणी व जाहिराती यांपासून मिळणाऱ्या उत्पन्नावरच नियतकालिकांना खर्चाशी तोंडमिळवणी करावी लागते. जाहिरातींचे उत्पन्न हा या एकूण उत्पन्नाचा फार मोठा घटक आहे तथापि वर्गणीचे उत्पन्न व जाहिरातीचे उत्पन्न ही परस्परावलंबी आहेत, याचे कारण असे, की जाहिरातदारांच्या दृष्टीने नियतकालिकांचा वाचकवर्ग म्हणजे आपल्या मालासाठी एक बाजारपेठच असते. वाचकवर्ग जितका विस्तृत तितकीच त्यांची बाजारपेठही मोठी. वाढत्या वाचकवर्गाच्या नियतकालिकांना अधिक जाहिराती मिळतात, एवढेच नव्हे, तर त्या अधिक दरानेही मिळण्याची शक्यता असते, म्हणूनच आपल्या खपाचे आकडे नियतकालिके वारंवार प्रसिद्ध करीत असतात. संपन्न देशांतील नियतकालिकांच्या अर्थव्यवस्थेत जाहिरातींचे स्थान व प्रभावही मोठा आहे. त्यांच्या एकूण उत्पन्नाचा किमान निम्मा व अनेकदा ७५ ते ८० टक्के हिस्सा जाहिरातींपासून मिळवलेला असतो. मराठी नियतकालिकांच्या व्यवस्थापनेत गेल्या अर्धशतकापासून मूलगामी फरक होऊ लागला आहे. आरंभी नियतकालिकांचा प्रपंच एकेका व्यक्तीवर, कधी संपादकावर, तर कधी व्यवस्थापकांवर अवलंबून असे. वैयक्तिक कर्तृत्वाचे महत्त्व आता संपुष्टात येत चालले असे नव्हे पण संपादनकौशल्याला भांडवलाची व व्यवस्थापकीय कौशल्याची जोड ज्या प्रमाणात लाभेल, त्यावर नियतकालिकाची आयुर्मर्यादा अवलंबून असते, ही अनुभवजन्य जाणीव आता रुजली आहे. आपल्या संपादनाखाली निघणाऱ्या नियतकालिकाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी योग्य त्या प्रतिष्ठित लेखकांकडून सातत्याने साहित्य मिळविणे, नव्या लेखकांच्या शोधात राहून त्यांचे साहित्य मिळविणे, आपल्या उद्दिष्टाला पूरक असे नवे नवे विषय शोधणे, हाती आलेल्या लिखाणाचा यथोचित परामर्ष घेणे ही अनेकांगी संपादकीय जबाबदारी यशस्वी रीतीने पार पाडावयाची असेल, तर संपादकीय सूत्रे एकापेक्षा अधिक व्यक्तींमध्ये विभागून संपादक मंडळ स्थापण्याची आवश्यकता भासू लागली आहे. संपादकीय व्यवसायाचे शास्त्रीय शिक्षण मिळण्याची सोयही आता भारतातील काही विद्यापीठांतून झालेली आहे. या अभ्यासक्रमात वृत्तपत्रकारांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष दिले गेले असले, तरी समाजाशी संपर्क साधण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व माध्यमांचा त्यात अंतर्भाव केला असल्यामुळे नियतकालिकांच्या संपादनालासुद्धा हे शिक्षण उपयुक्त ठरू शकते. व्यवस्थापकीय कामकाजाचीही तीच अवस्था आहे. प्रसिद्धीचा वक्तशीरपणा, अंकाची अंतर्बाह्य सजावट, वर्गणीदार व जहिरातदार यांच्या वाढीचे प्रयत्न यांपैकी कशातही कुचराई झाली, तर वाढत्या स्पर्धेच्या जगात निभाव लागणार नाही, हे उमजून सामूहिक व्यवस्थापना अमलात येऊ लागली.
भारतातील समग्र नियतकालिकांची शासनप्रणीत खानेसुमारी १९५७ सालापासून दरवर्षी मिळू लागली आहे. रजिस्ट्रार ऑफ न्यूज पेपर्स फॉर इंडिया यांच्या द प्रेस इन इंडिया या वर्षिक अहवालात विद्यमान नियतकालिकांची तपशीलवार सूची आणि विविध दृष्टिकोनातून केलेली वर्गीकृत आकडेवारी मिळते. त्यांच्या १९७४ सालच्या अहवालातून भारतीय नियतकालिकसृष्टीच्या रूपरेखा प्रतीत होतात. १९६९–७४ या पाच वर्षांत नियतकालिकांच्या आणि त्यांच्या खपाच्या संख्येत चढउतार आढळत असला, तरी त्यांत अनुक्रमे १७·९% आणि २३·८% वाढ झालेली आहे. एकूण नियतकालिकांत मासिके सर्वाधिक (३९·७%) आणि साप्ताहिके व पाक्षिके त्यांच्या खालोखाल (अनुक्रमे ३२·५ आणि १२·५%) आहेत. हिंदी ही बहुसंख्याकांची भाषा असल्यामुळे हिंदी नियतकालिकांची संख्या आणि खप (अनुक्रमे २,९१८ व ५,६४,९००) अग्रक्रमवार आहेत, हे स्वाभाविकच आहे पण १९७३ साली या दोन्ही बाबतींत इंग्रजी अग्रेसर होती आणि इतर कोणत्याही प्रांतिक भाषेपेक्षा इंग्रजीत दुपटीहून अधिक संख्येने नियतकालिके प्रसिद्ध होतात आणि त्यापेक्षाही अधिक प्रमाणात खपतात, ही परिस्थिती त्या भाषेच्या भारतातील भवितव्याच्या संदर्भात बोलकी आहे. इतर दृष्टिकोनातून इंग्रजीचे वर्चस्वच आढळून येते. ज्यांच्या प्रत्येक अंकाचा खप १ लक्ष प्रतींपेक्षा अधिक आहे, अशा २५ नियतकालकांमध्ये इंग्रजी नियतकालिके सर्वाधिक (८) आहेत आणि विषयांनुसार केलेल्या वर्गीकरणात २१ विषयांपैकी १४ विषयांत सर्वांत अधिक खप इंग्रजी नियतकालिकांचाच आहे. नियतकालिकप्रकाशनात महाराष्ट्र अखिल भारतात अग्रेसर आहे. महाराष्ट्रात १,६१८ नियतकालिके प्रसिद्ध होतात आणि त्यांचा एकूण खप ४७,९६,००० प्रतींचा आहे.
ज्यांच्या दरेक अंकांच्या १ लक्षाहून अधिक प्रती खपतात अशा सर्वच नियतकालिकांचा हेतू फावल्या वेळात मनोरंजन करणे हा दिसतो. लोकशिक्षण, समाजप्रबोधन हे आपले प्रयोजन मानून त्यासाठी विचारप्रवर्तक, कसदार लेखन प्रसिद्ध करणारी गंभीर प्रकृतीची नियतकालिके कोठल्याही भाषेत तुलनेने अल्पसंख्यच आढळतात कारण त्यांचा वाचकवर्ग फार मर्यादित असतो. मराठीत प्रसिद्ध होणाऱ्या ६३० नियतकालिकांच्या संदर्भात हीच परिस्थीती आहे, असे समजण्यात काही प्रत्यवाय नसावा. श्रेष्ठ दर्जाच्या मजकुराच्या मागणीचे दडपण वाचकांकडून नसल्यामुळे हिणकस मजकुरांनी भरलेली नियतकालिके निघतात व जगतात. ही परिस्थिती मागणी तसा पुरवठा या न्यायाचे द्योतक आहे हे खरे, पण समाजशिक्षणाचे आणि समाजाच्या सदभिरुचीचे संवर्धन करण्याचे एक प्रभावी माध्यम या दृष्टीने नियतकालिकांचा विचार केला, तर सद्य:स्थिती काहीशी असमाधानकारक आहे, असा अभिप्राय समीक्षणवाङ्मयातून प्रतीत होतो.
भारतातील इंग्रजी नियतकालिके : ईस्ट इंडिया कंपनीतील नोकरीच्या निमित्ताने आणि तिच्या आसऱ्याने व्यापार करण्याच्या उद्देशाने आलेल्या इंग्रजांची मोठी वसाहत कलकत्त्याला अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात निर्माण झाली होती. या समाजाला इंग्लंडमधील तसेच भारतातील राजकीय, सामाजिक घडामोडींची माहिती पुरवण्यासाठी १७८० च्या जानेवारीत जेम्स ऑगस्टस हिकी याने बेंगॉल गॅझेट् हे साप्ताहिक सुरू केले. हिकी कंपनीच्या नोकरीत होता व तो कंपनीचा पहिला अधिकृत मुद्रक म्हणून मानला जाई. या साप्ताहिकात राज्यकारभार व व्यापार यांसंबंधीच्या सरकारी अधिसूचना छापल्या जाऊ लागल्या इतकेच नव्हे, तर कंपनीच्या कारभारावर त्यात टीकात्मक चर्चाही होऊ लागली. ही टीका कित्येक वेळा वैयक्तिक स्वरूपाची असे. वारंवार अशा टिकेचा विषय झाल्यामुळे गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्ज याचा रोष ओढवून बेंगॉल गॅझेट् मार्च १७८२ मध्ये बंद पडले. या शतकाच्या उर्वरित काळात कलकत्त्याला इंडिया गॅझेट्, कलकत्ता गॅझेट्, बेंगॉल जर्नल, कलकत्ता क्रॉनिकल मद्रासला मद्रास कोरियर, हुर्कारु, मद्रास गॅझेट् आणि मुंबईला बाँबे हेराल्ड, बाँबे कोरियर व बाँबे गॅझेट् ही साप्ताहिके निघू लागली. या सर्वांचे उद्देश व स्वरूप हिकीच्या बेंगॉल गॅझेट्प्रमाणेच होते, त्यांपैकी कोणतेच १०–१२ वर्षांपेक्षा जास्त टिकले नाही.
भारतीय नियतकालिकांच्या इतिहासात या साप्ताहिकांचे स्थान, त्यांनी नियतकालिकांची परंपरा सुरू केली, एवढ्यापुरतेच मर्यादित आहे परंतु भारतीय जनतेला व्यासंगपूर्ण आणि विचारप्रवर्तक मजकूर पुरवणाऱ्या नियतकालिकांचा वारसा देणाऱ्या इंग्रजी नियतकालिकांचा उदय याच काळात झाला. ईस्ट इंडिया कंपनीच्या नोकरीत काही हाडाचे विद्याव्यासंगी आणि संशोधक वृत्तीचे अधिकारीही होते. व्यापाराच्या निमित्ताने आपण ज्या देशात आलो आहोत, त्याला पुरातन संस्कृतीची फार उज्ज्वल परंपरा आहे, याची त्यांना जाणीव होती. भारतीय संस्कृतीच्या विविध अंगांचा सखोल अभ्यास करण्यासाठी त्यांनी आपल्या फावल्या वेळेचा उपयोग करण्याचे व्रत घेतले. अशा प्रवृत्तीच्या काही अधिकाऱ्यांनी विशेषत: सर विल्यम जोन्स यांनी १५ जानेवारी १७८४ रोजी कलकत्त्याला एशियाटिक सोसायटी स्थापन केली. त्यांचा उद्देश या देशाचा पुरातन इतिहास, साहित्य, कला, विद्या, निरनिराळ्या जातीजमाती, त्यांच्या चालीरीती इ. विषयांचा शास्त्रशुद्ध अभ्यास करून आपले विचार व निष्कर्ष यांचा एतद्देशीय व परदेशीय संशोधकांना परिचय करून देण्याचा होता. त्यासाठी संस्थेने एशियाटिक् रिसर्चेस् नावाचे नियतकालिक सुरू केले आणि त्याचा पहिला अंक १७८८ मध्ये प्रसिद्ध झाला. त्याचे २० अंक निघून ते १८३९ मध्ये बंद पडले. दरम्यान १८३२ साली एशियाटिक सोसायटीने जर्नल ऑफ द एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल हे नियतकालिक सुरू केले. एशियाटिक सोसायटीच्या स्थापनेनंतर २० वर्षांनी मुंबईला यूरोपीय नागरिकांनी बाँबे लिटररी सोसायटी सुरू केली होती. पुढे १८२९ साली त्या संस्थेचे बाँबे ब्रॅच ऑफ द रॉयल एशियाटिक सोसायटी म्हणून रूपांतर झाले. या संस्थेनेही आपले स्वत:चे नियतकालिक (जर्नल) १८४१ साली सुरू केले. प्राच्यविद्या आणि भारतविद्या यांत समाविष्ट होणाऱ्या विविध विषयांवर या नियतकालिकांतून यूरोपीय आणि भारतीय विद्वानांचे मौलिक साहित्य आजतागायत प्रसिद्ध होत आहे.
यानंतर एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात पुरातन संशोधनाला वाहिलेली आणखी काही उल्लेखनीय नियतकालिके निघू लागली. १८७२ साली इंडियन अँटिक्कॉरी निघू लागले. त्यात मूळ इंग्रजी संशोधन-लेखाबरोबरच फ्रेंच, जर्मन इ. भाषांतील यूरोपीय नियतकालिकांतून प्रसिद्ध झालेल्या लेखांचे इंग्रजी भाषांतर व कलकत्ता आणि मुंबई येथील एशियाटिक सोसायटीच्या नियतकालिकांतील निवडक लेखांचा सारांश प्रसिद्ध होई. १८९२ साली पुरालेखांच्या संशोधनाला वाहिलेले एपिग्राफिया इंडिया हे नियतकालिक सुरू झाले. १८८६ साली मानवशास्त्राला वाहिलेले जर्नल ऑफ द अँथ्रॉपॉलॉजिकल सोसायटी ऑफ बाँबे निघू लागले. या खाजगी संस्थांबरोबरच शासकीय यंत्रणेचाही नियतकालिकनिर्मितीला हातभार लागू लागला. भूविज्ञान संशोधन खात्यातर्फे मेम्वार्स आणि रेकॉर्ड्स आणि वनविज्ञान संशोधन खात्यातर्फे इंडियन फॉरेस्टर ही त्या शास्त्रांतली बहुमोल ठरलेली नियतकालिके प्रसिद्ध होऊ लागली. शासनाच्या जवळजवळ प्रत्येक खात्यामार्फत आपल्या क्षेत्राशी संबंधित असलेली जी नियतकालिके सांप्रत प्रसिद्ध होतात, त्याची ही सुरुवात होती.
भारतात प्रसिद्ध होणाऱ्या नियतकालिकांपैकी इंग्रजी नियतकालिकांची संख्या १९७३ सालापर्यंत सर्वाधिक होती. त्यानंतर ती दुसऱ्या क्रमांकावर आली. इंग्रजी नियतकालिके आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळ्यांवर वाचली जात असल्याने त्यांची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होणे स्वाभाविक ठरते.
इतक्या विपुल प्रमाणात प्रसिद्ध होणाऱ्या इंग्रजी नियतकालिकांतून नामनिर्देशासाठी काही निवडणे अवघड असले, तरी काही विषयांवरील निवडक नियतकालिकांचा उल्लेख उदाहरणांदाखल करणे इष्ट ठरेल. प्रामुख्याने आपल्या राष्ट्रातील, परंतु प्रसंगोपात्त जागतिक महत्त्वाच्या घटनांची माहिती ब्लिट्झ् (१९४१), करंट (१९४९), हिम्मत (१९६४) ही साप्ताहिके इंडिया टुडे (१९७५) हे पाक्षिक आणि फोरम (१९५६) हे मासिक यांतून दिली जाते. प्रासंगिक विषय व इतरही मनोरंजक मजकूर भरपूर छायचित्रांसह इलस्ट्रेटेड वीकली (१९२९) या साप्ताहिकात प्रसिद्ध होतो. प्रसंगोचित व्यंगचित्रांबरोबर अशाच स्वरूपाचा मजकूर शंकर्स वीकली (१९४८) मध्ये आढळतो. राजकीय, आर्थिक आणि सामाजिक सद्य:परिस्थितीबाबत पूर्वीच्या प्रजा समाजवादी पक्षाचा दृष्टिकोन जनता (१९४६), पूर्वीच्या भारतीय जनसंघाचा ऑर्गनायझर (१९४७), भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा न्यू एज (१९५३), भारतीय कम्युनिस्ट (मार्क्सिस्ट) पक्षाचा पीपल्स डेमॉक्रसी (१९६५), व इंडियन नॅशनल काँग्रेसचा सोशॅलिस्ट इंडिया (१९७०) या त्या त्या पक्षाशी निगडित असलेल्या नियतकालिकांतून व्यक्त होतो. आंतरराष्ट्रीय राजकारण, आर्थिक व सामाजिक घटनांचे व समस्यांचे नामवंत व्यक्तींनी केलेले विश्लेषण इंडिया क्वार्टर्ली (१९४५), इंटर-नॅशनल स्टडीज (१९५०) आणि फॉरेन अफेअर्स रिपोर्टस् (१९५२) या नियतकालिकांतून वाचावयास मिळते. आफ्रिका क्वार्टर्ली (१९६१), ॲफ्रोएशियन अँड वर्ल्ड अफेअर्स (१९६४), चायना रिपोर्ट (१९६४), इंडियन जर्नल ऑफ अमेरिकन स्टडीज (१९६९), साऊथ एशियन स्टडीज (१९६५), ही नियतकालिके त्या प्रदेशांच्या सर्वांगीण अभ्यासास वाहिलेली आहेत. कॅपिटल (१८८८), कॉमर्स (१९१०), ईस्टर्न इकॉनॉमिस्ट (१९४३), इकॉनॉमिक अँड पोलिटिकल वीकली (१९६५) या साप्ताहिकांत प्रामुख्याने आर्थिक प्रश्नांची चर्चा केली जाते. इंडियन जर्नल ऑफ इकॉनॉमिक्स (१९१६), अर्थनीति (१९४७), इंडियन इकॉनॉमिक रिव्ह्यू (१९५२), इंडियन इकॉनॉमिक जर्नल (१९५३), अर्थविज्ञान (१९५९) या नियतकालिकांतून आर्थिक प्रश्नांच्या बरोबरच अर्थशास्त्रातील सिद्धांतांची तात्त्विक चिकित्साही केलेली आढळते. अर्थशास्त्रातील शाखोपशाखांसाठी स्वतंत्र नियतकालिकेदेखील निघतात. कृषि अर्थशास्त्राला वाहिलेली ॲग्रिकल्चरल सिच्युएशन इन इंडिया (१९४८) आणि इंडियन जर्नल ऑफ ॲग्रिकल्चरल इकॉनॉमिक्स (१९४६), बँकिंगच्या तात्त्विक आणि व्यावहारिक अंगांची माहिती देणारे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकर्स जर्नल (१९३०), कामगारवर्गाच्या समस्यांना वाहिलेले इंडियन जर्नल ऑफ लेबर इकॉनॉमिक्स (१९६२), आंतरराष्ट्रीय व्यापारविषयक प्रश्नांचा परामर्श घेणारे फॉरेन ट्रेड रिव्ह्यू (१९६६), राष्ट्रीय आर्थिक नियोजनाविषयी व तदंतर्गत विविध प्रकल्पांविषयी सविस्तर वृत्तांत देणारे योजना (१९५७), सरकारी उद्योगधंद्यांच्या कार्याचा आढावा घेणारे लोक उद्योग (१९६७), विम्याचे महत्त्व व विविध विमायोजनांची माहिती समाजाला व्हावी या उद्देशाने निघत असलेले योगक्षेम (१९५७) ही नियतकालिके उल्लेखनीय आहेत. विधी व न्यायशास्त्र यांत जर्नल ऑफ द इंडियन लॉ इन्स्टिट्यूट (१९५८), इंडियन जर्नल ऑफ इंटरनॅशनल लॉ (१९६०), ईस्टर्न जर्नल ऑफ इंटरनॅशनल लॉ (१९६९) ही नियकालिके त्यांतील लेखनाच्या उच्च दर्जाबद्दल विख्यात आहेत. इंडियन लिग्विस्टिक्स (१९३१) या भाषाशास्त्रातील नियतकालिकाला आंतरराष्ट्रीय कीर्ती लाभली आहे. भारतातील निरनिराळ्या भाषांतील साहित्याचा परिचय साहित्य अकादेमीतर्फे प्रकाशित होणाऱ्या इंडियन लिटरेचर (१९५७) आणि सेंटर फॉर इंडियन रायटर्सतर्फे प्रकाशित होणाऱ्या इंडियन रायटिंग टुडे (१९६७) या नियतकालिकांतून घडतो. विविध कलांच्या अभ्यासाला वाहिलेले मार्ग (१९४९), कलाक्षेत्र (१९५९) आणि ललितकला अकादेमीमार्फत निघणारे ललितकला कॉन्टेम्पोररी (१९६२) ही नियतकालिके प्रसिद्ध आहेत. धर्म आणि संस्कृती या विषयांना वाहिलेल्या नियतकालिकांत वैदिक धर्माचा विचार करणारे आर्यन पथ (१९३०), बौद्ध धर्माचा विचार करणारे महाबोधी (१८९२), इस्लाम धर्माचा विचार करणारी इस्लामिक कल्चर (१९२७), स्टडीज इन इस्लाम (१९६४), इस्लाम इन द मॉडर्न एज (१९७०), जैन धर्माचा विचार करणारी जैन अँटिक्कॉरी (१९४१) आणि जैन जर्नल (१९६६) ही महत्त्वाची नियतकालिके मानली जातात.
कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिचर्स या केंद्रीय शासकीय संस्थेतर्फे विज्ञानविषयांशी निगडित अशी अनेक नियतकालिके प्रकाशित होतात. उदा., शास्त्रीय ज्ञान सामान्य जनतेला सुबोध स्वरूपात उपलब्ध करून देण्यासाठी सायन्स रिपोर्टर (१९६४), वैज्ञानिक प्रगतीचा आणि संशोधनाचा फायदा राष्ट्रातील उद्योगधंद्यांना लाभावा यासाठी जर्नल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च (१९४१) आणि रिसर्च अँड इंडस्ट्री (१९५५) ही त्या संस्थेची नावाजलेली नियतकालिके आहेत. यांव्यतिरिक्त इंडियन जर्नल ऑफ केमिस्ट्री (१९६३), इंडियन जर्नल ऑफ प्युअर अँड अप्लाइड फिजिक्स (१९६३), इंडियन जर्नल ऑफ एक्सपरिमेंटल बायॉलॉजी (१९६३), इंडियन जर्नल ऑफ बायोकेमिस्ट्री अँड बायोफिजिक्स (१९६४), इंडियन जर्नल ऑफ रेडिओ अँड स्पेस फिजिक्स (१९७२) आणि इंडियन जर्नल ऑफ मरीन सायन्सेस (१९७२) ही नियतकालिकेदेखील त्याच संस्थेतर्फे प्रसिद्ध होतात.
विशिष्ट वाचकवर्गासाठी निघणाऱ्या नियतकालिकांत स्त्रियांसाठी ईव्हज् वीकली (१९४७) आणि फेमिना (१९५९) तसेच युवकांसाठी यूथ टाइम्स् (१९७२) लोकप्रिय आहे. क्रीडाविश्वातील घडामोडींची हकीकत स्पोर्टस् वीक (१९६८), स्पोर्टस् डायजेस्ट (१९६९), स्पोर्टस् जर्नल (१९७०) इ. नियतकालिकांतून कळते. चित्रपटसृष्टीची माहिती पुरविणाऱ्या नियतकालिकांत फिल्म फेअर (१९५२), फिल्म मिरर (१९६४), स्टार परेड (१९६६) इ. प्रसिद्ध आहेत.
विविध विषयांचा परामर्ष घेणारी संकीर्ण स्वरूपाची जी इंग्रजी नियतकालिके भारतात प्रकाशित होतात, त्यांमध्ये कलकत्ता रिव्ह्यू (१८४४) आणि मॉर्डन रिव्ह्यू (१९०७) यांचे सातत्य अनन्यसाधारण आहे. निरनिराळ्या देशांतील विचारवंतांचे आणि कलावंतांचे वाङ्मय संकलित करणाऱ्या व रवींद्रनाथ टागोरांनी स्थापन केलेल्या विश्वभारती क्कॉर्टर्लीला (१९२३) आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त झालेला आहे. समाजाच्या सर्वांगीण प्रगतीला बाधक ठरणाऱ्या विचारांची तर्कशुद्ध चिकित्सा करणारे आणि मानवेंद्रनाथ रॉय यांनी प्रथम इंडिपेंडंट इंडिया (१९३७) या नावाने सुरू केलेले सध्याचे रॅडिकल ह्यूमॅनिस्ट, दरमहा एखादा विशिष्ट प्रचलित विषय घेऊन त्यावर साधकबाधक चर्चा प्रसिद्ध करणारे सेमिनार (१९५९) आणि सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, साहित्यिक इ. विविध क्षेत्रांतील समस्यांचा बुद्धिवादी दृष्टिकोनातून शोध घेणारे पूर्वीचे क्वेस्ट (१९७१) व त्याचा नवा अवतार न्यू क्वेस्ट (१९७७) ही नियतकालिके समाजातील विचारवंत वर्गांचे प्रतिनिधित्व करतात.
गर्दे, पु. कृ.
संस्कृत नियतकालिके : एकोणिसाव्या शतकात भारतीय भाषांतील वृत्तपत्रसृष्टीचा उदय झाला. परिणामत: संस्कृत भाषेच्या अभिमानी विद्वानांनी बरेच परिश्रम घेऊन संस्कृत वृत्तपत्रसृष्टीची उभारणी करण्याचा प्रयत्न केला. १८५० मध्ये पंजाबात वास्तव्य करणाऱ्या प्रा. हृषिकेश भट्टाचार्य या वंगीय विद्वानाने विद्योदय: हे संस्कृत मासिक लाहोर येथून सुरू केले, संपादक कलकत्त्यास गेल्यानंतर तेथून ते प्रकाशित होऊ लागले. सुमारे ५० वर्षे या मासिकाने विविध प्रकारच्या आधुनिक विषयांवरील लिखाण प्रसिद्ध केले. या मासिकातील वैशिष्ट्यपूर्ण लेखांचा संग्रह प्रबन्धमंजरी या नावाने प्रकाशित झाला आहे. दक्षिण भारतात कांचीपुरम्च्या प्रतिवादी भयंकर मठाचे अधिपती श्री. अनन्ताचार्य यांनी आपल्या मताचा प्रचार करण्यासाठी मंजुभाषिणी ही मासिकपत्रिका सुरू केली. मद्रासचे आर्. कृष्णम्माचार्य यांनी पौर्वात्य व पाश्चात्त्य विद्यांचा समन्वय करण्याच्या उद्देशाने सहृदया ही मासिकपत्रिका चालविली. संस्कृत पंडितांना शेक्सपिअरच्या काव्याचा परिचय करून देण्याची कामगिरी या पत्रिकेने उत्तम प्रकारे पार पाडली.संस्कृत नियतकालिकांच्या क्षेत्रात महाराष्ट्रातील पंडित आप्पाशास्त्री राशिवडेकर यांचे कर्तृत्व विशेष उल्लेखनीय आहे. कलकत्त्यातली संस्कृतचन्द्रिका ही मासिकपत्रिका पं. राशिवडेकरांच्या संपादकत्वाखाली कोल्हापूरातून प्रकाशित होऊ लागली. शिवराजविजयम् हे राजस्थानातील पं. अम्बिकादत्त व्यासांचे प्रसिद्ध गद्यकाव्य या मासिकातून क्रमशः प्रकाशात झाले. सुनृतवादिनी नावाची साप्ताहिक पत्रिकाही आप्पाशास्त्रांनी यशस्वीपणे चालविली. त्यांच्या देहान्तानंतर (१९१३) ही दोन्ही नियतकालिके बंद पडली. वाराणसीमध्ये सुप्रभातम्, अच्युतम्, अमरभारती, सूर्योदय:, संस्कृतभारती, पण्डितपत्रिका यांसारखी नियतकालिके उदयास आली. त्यांपैकी संस्कृतभारतीमध्ये रवींद्रनाथ टागोरांच्या प्रसिद्ध गीतांजलीचा संस्कृत अनुवाद प्रथम प्रकाशित झाला. भारतीय धर्ममण्डलाचे सूर्योदय: मासिक पन्नास वर्षांपासून चालू आहे.
जयपूरच्या संस्कृत-रत्नाकर मासिकाने वेद, दर्शने, आयुर्वेद इ. विविध विषयांवर दर्जेदार विशेषांक प्रकाशित करून संस्कृत वाङ्मयाची फार मोठी सेवा केली. ओरिसामधील ब्रह्मपुर या गावाहून निघणारे मनोरमा हे मासिक बरेच गाजले. बिहारमध्ये पाटण्याच्या संस्कृत-संजीवन समाजाने मित्रम् हे मासिक चालविले होते. यांव्यतिरिक्त बंगलोरची अमृतवाणी, सिंध-हैदराबादची (हल्ली पाकिस्तानात) कौमुदी, प्रयागच्या आर्यसमाजाचा आर्यसिद्धान्तः कलकत्त्याच्या ब्राह्यसमाजाची श्रुतप्रकाशिका, सिमल्याची दिव्यज्योती यांसारख्या अनेक मासिकपत्रिका गेल्या शंभर वर्षांत विविध प्रदेशांत उदयास आल्या व काहींचा अपवाद वगळल्यास इतर देशी नियतकालिकांप्रमाणे यथावसर अस्तास गेल्या.
संस्कृतचा प्रसार करण्याच्या उद्देशाने अनेक द्वैभाषिक नियतकालिके उदयास आली. त्यांमध्ये द्वैभाषिकम् (संस्कृत-बंगाली), भारतदिवाकरः व बहुश्रुता (संस्कृत-गुजराती), मिथिलामोद, (संस्कृत-मैथिली), मंजुषा व लोकानन्ददीपिका (संस्कृत-इंग्रजी) संस्कृतभारती (संस्कृत-हिंदी) ही नियतकालिके उल्लेखनीय आहेत. नागपूरचे संस्कृतभवितव्यम् (साप्ताहिक), जयपूरचे भारती (मासिक) पुण्याचे शारदा (पाक्षिक), मुंबईचे संविद् आणि बालसंस्कृतम् इ. नियतकालिकांनी विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात संस्कृत नियतकालिकांची परंपरा पुढे चालविली आहे. संस्कृत भाषेच्या अध्ययनाचा क्रमशः ऱ्हास होत असताना तिचे पुनरुत्थान करण्याच्या महत्त्वाकांक्षेने प्रेरित होऊन अनेक संपादकांनी आणि संचालकांनी संस्कृत नियतकालिके चालविली. अयोध्येचे पं. कालीप्रसाद त्रिपाठी यांनी ‘अस्यामेव शताब्द्यां संस्कृतराष्ट्रभाषा भवतु’ हे ब्रीदवाक्य शीर्षकी घालून संस्कृतम् हे साप्ताहिक सर्वस्व पणास लावून १९३० पासून आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत चालविले.
अर्वाचीन संस्कृत वाङ्मयातील बहुतांश उत्तम भाग या शेकडो संस्कृत नियतकालिकांतून यथावसर प्रकाशित झाला आहे. साहित्य अकादेमीने पुरस्कार देऊन गौरविलेले डॉ. श्री. भा. वर्णेकर यांचे शिवराज्योदयम् हे ६८ सर्गांचे संस्कृत महाकाव्य पुण्याच्या शारदा पाक्षिकांतून (संपादक : वसंत गाडगीळ) क्रमशः प्रसिद्ध झाले. देशभर प्रकाशित झालेल्या नियतकालिकांतील कथा, कविता, नाटके, निबंध इ. विविध वाङ्मयप्रकारांचे उत्तम संकलन आणि संपादन करून ते ग्रंथरूपाने प्रकाशित होणे आवश्यक आहे.
वर्णेकर, श्री. भा.
बंगाली नियतकालिके : अठराव्या शतकाच्या अखेरीज बंगालमध्ये प्रथम छापखाने निघाले. ज्ञान आणि शिक्षण यांचा प्रसार होण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण झाली. वृत्तपत्रे व नियतकालिके यांचे प्रकाशन ओघानेच आले. पहिले बंगाली मासिक श्रीरामपूर येथील बॅप्टिस्ट मिशनने काढलेले दिग्दर्शन हे होय. एप्रिल १८१८ मध्ये याचा पहिला अंक निघाला. संपादक होते क्लार्क मार्शमन. श्रीरामपूर मिशननेच काढलेले समाचार दर्पण हे साप्ताहिक बंगालीतील पहिले वृत्तपत्र म्हणता येईल. २३ मे १८१८ रोजी याचा प्रथम अंक प्रकाशित झाला. याचेही संपादक मार्शमनच होते. ही दोन्ही नियतकालिके मात्र अल्पजीवी ठरली.
याच सुमारास एतद्देशीय व्यक्तीने काढलेले पहिले बंगाली साप्ताहिक बांगाल गेझेटी हे होय पण जेमतेम वर्षभर चालून ते बंद पडले. याचे संपादक होते गंगाकिशोर भट्टाचार्य. एकोणिसाव्या शतकाच्या प्रथम चरणीतील उल्लेखनीय नियतकालिकांत ब्राह्मणप्रबोध-ब्राह्मण ओ मिशिनरी संवाद (राजा राममोहन रॉय याचे प्रकाशन), संवाद कौमुदी (संपादक : भवानीचरण बंदोपाध्याय), समाचार चंद्रिका (सनातनी हिंदू मंडळींचे मुखपत्र, संपादक : भवानीचरण बंदोपाध्याय) यांचा समावेश आहे.
संवादप्रभाकर या २८ जानेवारी १८३१ रोजी निघालेल्या या साप्ताहिकाचा प्रभावशाली नियतकालिक म्हणून उल्लेख करावा लागेल. पुढे त्याचेच दैनिकात रूपांतर झाले.
ईश्वरचंद गुप्त यांच्या संपादनामुळे अल्पावधीतच या नियतकालिकास प्रतिष्ठा लाभली. राजा राधाकांत देव, प्रसन्नकुमार ठाकूर, राजकमल सेन, जयगोपाल तर्कालंकार इ. तत्कालीन मान्यवर व्यक्ती त्या नियतकालिकात नियमितपणे लेखन करीत. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, दीनबंधू मित्र, राखालदास बंदोपाध्याय इ. नंतर गाजलेल्या साहित्यिकांचे आरंभीचे लेखनही याच नियतकालिकात प्रसिद्ध झाले.
यानंतरचे सुविख्यात नियतकालिक म्हणून तत्त्वबोधिनी पत्रिका या ब्राह्मसमाजाच्या मुखपत्राचे नाव घ्यावे लागेल. १६ ऑगस्ट १८४३ रोजी मासिक म्हणून ते प्रथम प्रकाशित झाले. संपादक होते अक्षयकुमार दत्त. या मासिकाच्या प्रगतीस प्रकाशित पुढे अनेक श्रेष्ठ ब्राह्म विचारवंतांचा हातभार लागला. त्यांत रवींद्रनाथ टागोरांचाही अंतर्भाव होतो. ऑक्टोबर १८५१ मध्ये राजेंद्रलाल मित्र यांच्या पुढाकाराने विविधार्थसंग्रह प्रसिद्ध झाले. राजेंद्रलाल मित्र यांच्यानंतर कालिप्रसन्न सिंह हे संपादक झाले. या मासिकाची दोन वैशिष्ट्ये होती, ती म्हणजे ते पहिले सचित्र बंगाली मासिक होते आणि पुस्तकाच्या परीक्षणास त्यातच पहिल्यांदा स्थान मिळू लागले. ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या मार्गदर्शनाखाली दर सोमवारी प्रसिद्ध होणारे साप्ताहिक सोमप्रकाश (१५ नोव्हेंबर १८५८ पासून) हेही उल्लेखनीय आहे. त्याचे संपादक होते द्वारकानाथ गंगोपाध्याय. याच सुमारास प्यारीचांद मित्र आणि राधानाथ शिकदार यांच्या संपादकत्वाखाली मासिक पत्रिका निघू लागले. स्त्रियांसाठी उपयुक्त मजकूर त्यातच प्रथम येऊ लागला, पुढे लवकरच (ऑगस्ट १८६३) बामाबोधिनी पत्रिका प्रसिद्ध झाली. उमेशचंद्र दत्त हे तिचे संपादक होते. तत्त्वप्रबोधिनी पत्रिकेचा आदर्श पुढे ठेवून चाललेले हे मासिक दीर्घजीवी ठरले. भारतवर्षीय ब्राह्मसमाजाचे धर्मतत्त्व मासिकही एकोणिसाव्या शतकात नावाजलेले होते.
बंगाली नियतकालिकसृष्टीत मन्वंतर घडून आले, ते बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या बंगदर्शन मासिकाने (एप्रिल १८७२). बंगदर्शनमध्ये लेखन छापून येणे त्या काळात गौरवास्पद मानले जाई. या मासिकाभोवती एक समर्थ साहित्यिक प्रभावळ जमली. पुढे त्याच्या पुनरुज्जीवनासाठी रवींद्रनाथ टागोर व मोहितलाल मजुमदार यांनी खटपट केली होती. रवींद्रनाथांचे आगमन हाही बंगाली नियतकालिकांच्या दुनियेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरावा. ते स्वतः प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे विविध नियतकालिकांशी संपादक म्हणून संबंधित होते. त्यांपैकी साधना, भारती, बालक ही काही नियतकालिके होत. हितवादी (१८९१–१९०६) या साप्ताहिकाच्या साहित्यविभागाची धुराही त्यांनी काही काळ सांभाळली. सखाराम गणेश देउसकर हे महाराष्ट्रीय गृहस्थ याच हितवादी साप्ताहिकाचे काही काळ संपादक होते. प्रसिद्ध नाटककार द्विजेंद्रलाल राय यांनी काढलेले भारतवर्ष मासिक, रामानंद चट्टोपाध्याय यांनी काढलेले प्रवासी मासिक व सुरेशचंद्र समाजपती यांचे साहित्य मासिक ही बंगाली साहित्येतिहासात चिरस्मरणीय ठरणारी आणखी काही नियतकलिके. शरच्चंद्र चट्टोपाध्याय हे भारतवर्षाचे व रवींद्रनाथ टागोर हे प्रवासीचे नियमित लेखक होते. वसुमती मासिकाचा ग्रामीण भागात अधिक प्रसार होता.
यानंतर युगप्रवर्तक मासिकांचा जमाना येतो. त्यांत कालानुक्रमे सबुजपत्र हे पहिले होय. प्रमथ चौधुरी (‘बिरबल’ या टोपणनावाने प्रसिद्ध) या तीक्ष्णबुद्धीच्या अभिरुचिसंपन्न संपादकाच्या चोखंदळ दृष्टीमुळे या मासिकाने साहित्यात नवे वारे खेळविले. बांगाली भाषा व साहित्य यांच्या विकासास या सबुजपत्रने चांगलीच गती दिली. अतुलचंद्र गुप्त, धूर्जटीप्रसाद मुखोपाध्याय, सुनीतिकुमार चट्टोपाध्याय इ. अनेक श्रेष्ठ लेखक त्यायोगे प्रकाशात आले.
कल्लोल आणि कालि ओ कलम ही नंतरची युगंधर मासिके. अचिन्यकुमार सेनगुप्त, बुद्धदेव बसु, प्रेमेन्दर मित्र, मोहितलाल मजुमदार, नज्रुल इस्लाम, शैलजानंद मुखोपाध्यय इ. मंडळी या युगात पुढे आली. सजनीकान्त दास यांच्या शनिबारेर चिठी साप्ताहिकाने बंगालीत उपरोध, विनोद, व्यंग यांची वाटिका फुलवली. निरद चौधरी त्यात लिहीत असत. त्यानंतरच्या काळात नियतकालिकांची संख्या खूपच वाढली. त्यांत उल्लेखनीय म्हणजे हुमायून कबीर यांचे चतुरंग, सुधींद्रनाथ दत्तांचे परिचय, बुद्धदेव बसूंचे कविता ही होत. विश्वभारती पत्रिका, आनन्दबाजार पत्रिका, देश व अमृत इ. नियतकालिके त्यानंतरच्या काळात प्रसिद्धीस आली. उपेन्द्रकिशोर रायचौधुरीचे सन्देश मासिक बालनियकालिकांत अग्रेसर ठरले. यांचे नातू सत्यजित राय ते हौसेने चालवितात. प्रचलित नियतकालिकांत देश व अमृत या लोकप्रिय साप्ताहिकांखेरीज शिलादित्य, कृत्तिवास, प्रबंधपत्रिका, कथासाहित्य, सारस्वत इ. नियतकालिके उल्लेखनीय आहेत. आनन्दमेळा आणि शिशुसाथी ही बालमासिकेही लोकप्रिय आहेत. वाराणशीहून प्रसिद्ध होणारे सुरेशचंद्र चक्रवर्तीचे उत्तरा मासिक वैशिष्ट्यपूर्ण साहित्यासाठी प्रसिद्ध आहे.
बंगालीत लघु नियतकालिकांची संख्या बरीच आहे. १९६० नंतरच्या काळातील ही नवीन घटना होय. कलकत्त्यासारख्या शहरातच नव्हे, तर खेडोपाडी, बंगाल बाहेरून तसेच देशाबाहेरूनही बंगाली नियतकालिके निघत असतात. जेथे जेथे बंगालीभाषिकांची वस्ती आहे, तेथे तेथे एखादी मासिकपत्रिका निघतेच. साहित्यप्रेमाखेरीज विविध विषयांस वाहिलेल्या नियतकालिकांचीही बंगालीत वाण नाही. चाषओ चाषी, वसुन्धरा, नवान्नभारती, सारसमाचार ही शेतीविषयक हैनिमान, होमिओपाथी, होमिओपाथिक चिकित्सा इ. वैद्यकिय इतिहास हे ऐतिहासिक अभिनय, बहुरूपी इ. नाट्यविषयक उद्बोधन, विश्ववाणी, प्रणव इ. धार्मिक फुटबॉल, गडेर माठ इ. क्रीडाविषयक उलटोरथ, सिनेमाजगत्, आनंदलोक, जलसाघर इ. चित्रपटविषयक, अशी अगणित नियतकालिके वाचकांच्या खास आवडीनिवडी पुरवीत असत.
जोशी, श्री. बा.
हिंदी नियतकालिके : भारतीय प्रबोधनाची लाट बंगालमध्ये प्रथम निर्माण झाली व हिंदी नियतकालिकांचा जन्म आणि आरंभीचा विकास कलकत्त्यामध्ये झाला. हिंदी प्रदेशाकडून रोजगारासाठी आलेल्या हिंदी भाषिकांच्या पिढीने इंग्रजी आत्मसात करुन घेतले आणि ज्ञानदानाची व ज्ञानप्रसाराची निकड लक्षात घेऊन नियतकालिके काढण्यास प्रारंभ झाला. हिंदीचे पहिले साप्ताहिके उदन्त मार्तण्ड हे पं. युगलकिशोर शुक्ल यांनी ३० मे १८२६ रोजी प्रकाशित केले व आर्थिक अडचणींमुळे ४ सप्टेंबर १८२७ च्या शेवटच्या अंकाबरोबर ते बंद पडले. पुढे दैनिके, साप्ताहिके, मासिके यांची एकच लाट बंगालमध्ये आली व हिंदी पत्रकारितेची भक्कम पायाभरणी झाली. सामान्यपणे ही नियतकालिके सामाजिक सेवेच्या व राष्ट्रप्रेमाच्या ऊर्मीने काढली जात आणि उत्कट ध्येयवादही आर्थिक अडचणींवर मात करू शकला नाही, की ती बंद होत. कलकत्त्यात अनेक हिंदी नियतकालिके निघाली व बंद पडली. मात्र १७ मे १८७८ रोजी निघालेले पाक्षिक भारत मित्र (नंतर साप्ताहिक व दैनिक) १९३५ पर्यंत चालू होते. १९२३ पासून निघालेल्या मतवाला या मासिकाने साहित्यक्षेत्रात मोठी कामगिरी केली. कवी निराला, उग्र यांसारख्या कवींनी मतवालाला मोठी प्रतिष्ठा मिळवून दिली. देवनागरी लिपीच्या समर्थनासाठी निघालेले देवनागर (१९०७), रवींद्रनाथ टागोरांच्या आशीर्वादाने निघालेले हजारीप्रसादांच्या संपादकत्वाखालील विश्वभारती (१९४२), पं. बनारसीदास चतुर्वेदी यांच्या संपादकत्वाखाली निघालेले आणि अनेक साहित्यिक वादविवादांना तोंड फोडणारे विशाल भारत मासिक (१९२८) ही काही उल्लेखनीय नियतकालिके होत. लक्ष्मीचंद जैन यांच्या संपादनाखाली निघणारे ज्ञानोदय (१९४८–७०) या वाङ्मयीन मासिकाने हिंदीतील नवलेखनाला भरपूर वाव दिला.
उत्तर प्रदेशात बनारस अखबार हे पहिले हिंदी साप्ताहिक १८४५ च्या जानेवारीत प्रकाशित झाले. राजाशिवप्रसाद सितारे हिंद यांच्या आश्रयाने गोविंद रघुनाथ थत्ते यांच्या संपादकत्वाखाली निघणाऱ्या या नियतकालिकात उर्दू शब्दांचा वापर अधिक असे. त्यामुळे १८५० मध्ये बनारसहून निघालेले सुधाकर साप्ताहिक हिंदीतील पहिले साप्ताहिक मानले जाते. त्याचे संपादक तारामोहन मित्र नावाचे बंगाली गृहस्थ होते. भारतेन्दु हरिश्चंद्र यांनी १५ ऑगस्ट १८७४ रोजी काशीहून कविवचन सुधा नावाचे मासिक सुरू केले. ते पुढे पाक्षिक-साप्ताहिक अशी स्थित्यंतरे होऊन १८८५ मध्ये बंद पडले. प्राचीन कवींचा परिचय करून देण्याचे कार्य या पत्रिकेने केले. भारतेन्दूंनी हरिश्चंद्र मैगजीन नावाचे मासिक १५ ऑक्टोबर १८७३ रोजी सुरू केले. त्याद्वारे हिंदी गद्यशैलीचा विकास घडून आला. स्त्रियांसाठी भारतेन्दूंनी बालबोधिनी नावाचे मासिक सुरू केले (१८७४). भारतेन्दु मंडळातील एक लेखक पं. बाळकृष्ण भट्ट यांनी हिन्दी प्रदीप हे मासिक आर्थिक संकटास तोंड देत मोठ्या जिद्दीने सु. ३३ वर्षे सातत्याने चालविले. १९१० मध्ये ते सरकारी रोषास बळी पडले. सचित्र हिंदी मासिक सरस्वती (१९००) मध्ये काशी नागरी प्रचारिणी संस्थेतर्फे सुरू झाले. या पत्राने महावीरप्रसाद द्विवेदी यांच्या संपादकत्वाखाली हिंदी साहित्याची मोठीच सेवा केली. सरस्वतीमध्ये लेख छापून येणे हा मोठ्या लेखकांनाही गौरव वाटत असे. १९१३ पासून सम्मेलन पत्रिका हे त्रैमासिक निघू लागले. संशोधनात्मक व समीक्षात्मक लेख या पत्रिकेत प्रामुख्याने छापले जातात. त्याआधी १८९६ पासून नागरी-प्रचारिणी-पत्रिका मासिक रूपात सुरू झाली. पुढे तिचे त्रैमासिकात रूपांतर झाले. राष्ट्रोन्नतीच्या हेतूने बाबूराव पराडकरांनी आजचा पहिला अंक ५ सप्टेंबर १९२० रोजी प्रकाशित केला. पुढे १९३८ च्या जुलैमध्ये ते साप्ताहिक स्वरूपात प्रकाशित होऊ लागले. हिंदी भाषा, साहित्य व समाज यांच्या विकासासाठी या साप्ताहिकाने मोठे कार्य केले. लखनौहून माधुरी (१९२१), प्रयागहून चाय (१९२२) व सुधा (१९२७), काशीहून हंस (१९३०) तसेच रूपाभ (१९३४) ही साहित्यिक मासिके प्रकाशित होत. हंसचे संपादक प्रेमचंद होते, तर रुपाभचे सुमित्रानंदन पंत. १९३८ पासून निघणाऱ्या साहित्य संदेश मासिकाने गुलाबराय यांच्या संपादकत्वाखाली उत्कृष्ट समीक्षात्मक मासिक म्हणून लौकिक मिळविला. आध्यात्मिक विषयाला वाहिलेले कल्याण मासिक गेली ५० वर्षे अध्यात्मिक क्षेत्रात मोलाची कामगिरी करीत आहे. मिर्झापूरहून पं. बदरीनारायण चौधरी यांनी काढलेले आनंद कादंबिनी मासिकही गाजले. १९३८ मध्ये भक्तदर्शन यांनी काढलेले साप्ताहिक कर्मभूमि हे १९३८–४२ या काळात महत्त्वाचे मानले जात होते. पुढे ते बंद पडले, पण १९४६ मध्ये पुन्हा सुरू करण्यात आले. साम्यवादी विचारांना वाहिलेले साप्ताहिक नया जमाना हे डेहराडूनहून प्रकाशित होते.
पूर्वीच्या मध्य प्रांतातून १८४९ मध्ये प्रकाशित झालेले मालवा अखबार हे पहिले नियतकालिक. त्याआधी बनारस अखबार (१८४५) निघाले होते असे म्हणतात. मालवा अखबार १८७२ पर्यंत चालले. इंदूरमधून प्रकाशित होणारे पहिले हिंदी मासिक नवजीवन (१९१५) हे होय. त्याचे संपादक द्वारकाप्रसाद सेवक हे होते. कल्पवृक्ष (१९२२) हे आध्यमिक विषयाला वाहिलेले मासिक पुढे तीस वर्षे सातत्याने प्रकाशित होत राहिले. माखनलाल चतुर्वेदी यांचे प्रखर साप्ताहिक नियतकालिके कर्मवीर (१९१९, जबलपूर) माधवराव सप्रे यांच्या संपादनाखाली निघत असे. मध्य भारत हिंदी साहित्य समितीने १९२६ पासून सुरू केलेले साहित्यिक मासिक वीणा आजही निघत असून वीणेने हिंदी साहित्याची सरस्वती सारखीच सेवा केली. क्रीडाविषयांना वाहिलेले खेलयुग १९७२ मध्ये निघू लागले. जबलपूरहून निघालेल्या वसुधा मासिकाने फार मोलाची साहित्यिक कामगिरी केली, पण ते बंद पडले. भोपाळच्या साहित्य परिषदेच्या विद्यामाने निघणारे मासिक पूर्वाग्रह (१९७५) व त्रैमासिक साक्षात्कार (१९७६) यांनी संपूर्णपणे साहित्यिक आणि सांस्कृतिक विषयांना वाहून घेतले आहे.
अजमीरहून निघणारे मासिक लहर (१९४७), उदयपूरहून निघणारे मासिक मधुमति, पिलानीहून निघणारे तटस्थ व बेआवरचे क्यों ही मासिके नवसाहित्याचा हिरिरीने पुरस्कार करणारी आहेत. जयपूरच्या राष्ट्रदूत या दैनिकाचा दीपावली विशेषांक दर्जेदार मानला जातो.
बिहार प्रांतात पाटण्याहून १८७४ मध्ये बिहारबंधु साप्ताहिक निघू लागले. तत्पूर्वी १८७३ मध्ये ते कलकत्त्यात प्रकाशित होत असे. १९१५ पर्यंत ते चालले. उद्योग, शिक्षा, योगी, ज्योत्स्ना, पाटला, अवंतिका, हिमालय, नई धारा या साहित्यिक मासिकांची कामगिरी उल्लेखनीय आहे. पाटण्याहून १९६६ पासून निघणारे त्रैमासिक (आता मासिक) समीक्षा महत्त्वाचे असून हिंदीत प्रकाशित होणाऱ्या महत्त्वाच्या पुस्तकांची समीक्षा त्यात आढळते.
दिल्ली येथे १८५७ मध्ये अजीमुल्लाखां यांचे उर्दू नियतकालिक पयामे-आजादी प्रसिद्ध होऊ लागेल. पुढे ते हिंदीत निघू लागले पण इंग्रजांच्या रोषामुळे बंद पडले. लाला श्रीनिवासदास यांनी १८७४ मध्ये सदादर्श साप्ताहिक सुरू केले. १८७६ साली कविवचन सुधामध्ये त्याचे विलीनीकरण झाले. १९२५ मध्ये निघालेले रामचंद्र शर्मा यांचे महारथी मासिक उल्लेखनीय आहे. दिल्लीहून निघाणाऱ्या साप्ताहिक हिंदुस्थान या महत्त्वाच्या साप्ताहिकाचा पहिला अंक २ ऑक्टोबर १९५० रोजी निघाला. साहित्यिक, सांस्कृतिक व राजकीय घडामोडींच्या दृष्टीने ते अव्वल दर्जाचे नियतकालिक म्हणून लोकप्रिय आहे. टाइम्स ऑफ इंडिया गटाचे दिनमान साप्ताहिक इंग्रजी टाइम्सच्या धर्तीवर निघते व हिंदी बुद्धिजीवी वर्गात ते प्रतिष्ठित मानले जाते. हिंदीचे अष्टपैलू लेखक सच्चिदानंद हीरानंद वात्स्यायन ‘अज्ञेय’ यांनी १९६५ मध्ये त्याला संपादक या नात्याने आकार दिला. दिल्लीकडून निघणाऱ्या संचेतना त्रैमासिकाला (संपादक : महीपसिंह) साहित्यिक प्रतिष्ठा आहे. स. ही. वात्स्यायन यांनी नया प्रतीक नावाचे उच्च दर्जाचे मासिक १९७३ मध्ये सुरू केले. साहित्य व संस्कृती हे त्याचे विषय होत. १९६० पासून निघालेल्या कादंबिनी मासिकानेही लोकप्रियता मिळविली आहे. नामवर सिंहाच्या संपादकत्वाखाली निघत असलेल्या आलोचना (१९५०) त्रैमासिकाने साहित्यिक-वैचारिक नियतकालिक म्हणून प्रतिष्ठा मिळविली आहे. प्रकर या मासिकात हिंदी आणि अन्य भारतीय भाषांतील उत्तम ग्रंथांचा समीक्षात्मक परिचय दिला जातो. दिल्लीहून चित्रपटविषयक नियतकालिके बरीच निघतात. त्यांत सुषमाचा दर्जा बऱ्यापैकी आहे. मुलांसाठी निघणाऱ्या मासिकांपैकी प्रिया, बालभारती, पराग, नंदन ही मासिके लोकप्रिय आहेत. गांधीवादी विचारांचा प्रचार करणारी मंगल प्रभात व जीवन-साहित्य उल्लेखनीय आहेत तर विज्ञान की प्रगति, अविष्कार यांसारखी वैज्ञानिक माहिती देणारी नियतकालिकेही सुरू झालेली आहेत.
हिंदी नियतकालिकांच्या इतिहासात महाराष्ट्राची कामगिरी मोलाची आहे. महाराष्ट्राने हिंदीला प्रखर व तेजस्वी पत्रकार दिले. बाबु गोपाल गहमरी यांनी १८९३ मध्ये भारतभूषण मासिक प्रकाशित केले. १८९६ मध्ये निघालेल्या साप्ताहिक श्रीव्यंकटेश्वर समाचारनेही लौकिक मिळविला. १९०५ मध्ये केसरीचे हिंदी संस्करण निघू लागले ते १९०९ मध्ये बंद झाले. माधवराव सप्रे यांनी हिंदी-ग्रंथमाला मासिक १९०५ मध्ये सुरू केले. नंतर मुंबई, नागपूर येथून पुष्कळ हिंदी नियतकालिके निघू लागली. १९४७ मध्ये महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा, पुणे या संस्थेतर्फे गो. प. नेने यांच्या संपादकत्वाखाली निघू लागलेल्या राष्ट्रवाणीने नवलेखनाला खूपच उत्तेजन दिले तर राष्ट्रभाषा प्रचार समिती, वर्धा या संस्थेचे राष्ट्रभारती मासिकही उल्लेखनीय आहे. मुंबईहून निघणाऱ्या धर्मयुग या साप्ताहिकाने धर्मवीर भारती यांच्या संपादकत्वाखाली लोकप्रियतेचा व दर्जेदारपणाचा उच्चांक गाठला आहे. नारायण दत्त यांच्या संपादकत्वाखाली प्रसिद्ध होत असलेले नवनीत मासिक (१९५२) लोकप्रिय आहे. कथासाहित्यास वाहिलेले सारिका मासिक (१९६०) नुकतेच (१९७७) पाक्षिक झाले असून त्यानेही खूप प्रतिष्ठा मिळविली आहे. राजकीय साप्ताहिक ब्लिट्झ (१९६२) हेही लोकप्रिय आहे. टाइम्स ऑफ इंडिया गटाचे चित्रपटविषयक मासिक माधुरी (१९६४) दर्जेदार मानले जाते. महाराष्ट्र सरकारने २ ऑक्टोबर १९७५ रोजी सुरू केलेल्या महाराष्ट्र मानस या पाक्षिकाने जनमानसात चांगली प्रतिमा निर्माण केली आहे.
तमिळनाडूमध्ये हिंदी पत्रकारितेचा प्रारंभ डॉ. एन्. एस्. हर्डीकर यांच्या स्वयंसेवकने केला. ते इंग्रजी व हिंदी दोन्ही भाषांत प्रकाशित होई. १९२१ मध्ये निघालेले हे नियतकालिक सु. १० वर्षे चालले. हिंदी प्रचारक (१९२३), दक्षिण भारत व दक्खिनी हिंद या मासिकांनी हिंदी प्रचाराचे काम केले पण त्यांना स्थैर्य लाभले नाही. चंदामामा हे मुलांसाठी निघणारे मासिक खूप लोकप्रिय झाले. युगप्रबोध (१९५५) हे त्रैमासिक व निर्मला (१९५७) यांनी प्रारंभी खूप उत्साह दाखविला. लक्ष्मीकांत सरल यांनी त्यांच्यासाठी अनेक प्रकारे प्रयत्न केला पण त्यांना फारसे यश आले नाही. त्यांचे त्रैमासिक अंकन (१९६७) मात्र प्रकाशित होत आहे.
केरळच्या अनेक नियतकालिकांपैकी युगप्रभात या पाक्षिकाने १९५६ ते १९७४ या काळात हिंदी साहित्याची व भाषेची मोठी सेवा केली. कर्नाटकमध्ये सध्या धीर (१९७०) हे साप्ताहिक सुरू आहे. काश्मीरमध्ये महावीर (१९३६), चंद्रोदय (१९३९), ज्योति (१९४७) या मासिकांनी चांगला लौकिक मिळविला होता. योजना (१९५६) या मासिकाने वेद राही यांच्या संपादकत्वाखाली सर्वांगीण प्रगती केली तर जम्मूच्या गीराजा (१९६४) त्रैमासिकाने मोठी प्रतिष्ठा मिळविली. पाँडिचेरीहून १९४२ पासून निघणाऱ्या अदितिने सु. २०–२२ वर्षे अरविंदांच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार केला. १९६२ मध्ये पुरोधा हे त्रैमासिक चांगल्या प्रकारे निघू लागले होते, पण पुढे बंद पडले. आसाममधून १९४२ मध्ये निघालेले साप्ताहिक अकेला व दिब्रुगडहून निघत असलेले नव जागृति ही उल्लेखनीय आहेत. गुजरातमध्ये मात्र हिंदी नियतकालिकांची प्रगती फारशी समाधानकारक नाही. १९ ऑगस्ट १९२१ रोजी हिंदी नवजीवन साप्ताहिक गांधीजींनी सुरू केले. हरिजन सेवक २३ फेब्रुवारी १९३३ ते १९५६ पर्यंत चालू राहिले.
हैदराबादमध्ये १९४३ पर्यंत हिंदी नियतकालिके काढण्यास मनाई होती. आर्य समाजाचे कार्य सुरू झाल्यापासून हिंदीविषयी उत्साह वाढला. १९४८ मध्ये बदरी विशाल पित्ती यांचे कल्पना मासिक सुरू झाले. या मासिकाने केलेली हिंदी साहित्याची सेवा अपूर्व आहे. या मसिकाने हिंदीतील साहित्यिक, कलात्मक, सांस्कृतिक व वैचारिक चळवळींचे मुखपत्र म्हणून मोलाची कामगिरी बजावली. हिंदी प्रचार सभा, हैदराबाद या संस्थेतर्फे निघालेल्या अजंता मासिकाचे सात-आठ वर्षांचे कार्यही उल्लेखनीय आहे तर आर्यभानु आणि संगम ही साप्ताहिकेही प्रशंसनीय आहेत.
विदेशांत हिंदी भाषिक लोकांची संख्या मोठी आहे. इंग्लंड, आफ्रिकी देश, सुरिनॅम, त्रिनिदाद, फिजी, मॉरिशस तसेच नेपाळ, ब्रह्मदेश, श्रीलंका, पाकिस्तान, बांगला देश या देशांतही हिंदी नियतकालिके निघतात.
बांदिवडेकर, चंद्रकांत
मराठी नियतकालिके : एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभापासून मराठी भाषिकांना इंग्रजी भाषेचा आणि तीमधील संपन्न विचारांचा जवळून परिचय होऊ लागला. देशातील इतर भागांप्रमाणेच महाराष्ट्रात सांस्कृतिक प्रबोधनाची लाट निर्माण झाली. या प्रबोधनाचे एक प्रभावी साधन म्हणून वृत्तपत्रे व नियतकालिके हळूहळू सुरू झाली. बाळशास्त्री जांभेकर यांच्या संपादकत्वाखाली दिग्दर्शन या मासिकाचा पहिला अंक बाहेर पडला [तथापि या मासिकाचे संपादक राघोबा जनार्दन (वसईकर) होते, असे मत मांडले गेले आहे व त्याचा उल्लेख यापूर्वीच करण्यात आला आहे.] आणि मराठी नियतकालिकांच्या नवीन युगाला प्रारंभ झाला (१८४०).
या सुरुवातीनंतर एकोणिसाव्या शतकाच्या उरलेल्या सहा दशकांत मराठी नियतकालिकांची स्पृहणीय वाढ झाली. शतकाच्या अखेरीस सु. ३४१ नियतकालिके अस्तित्वात आली. त्यांपैकी कित्येक अल्पायुषी ठरली होती, त्यामुळे कोणत्याही एका वर्षी किती नियतकालिके चालू होती, ते निश्चित सांगणे शक्य नाही.
या साऱ्या नियतकालिकांचा उद्देश स्वभाषेतून नव्या पाश्चात्त्य ज्ञानाचा परिचय बहुजन समाजाला करून देण्याचा होता. ज्ञानप्रसाराची ही प्रेरणा एतद्देशियांच्या ज्ञानप्रकाश (१८४९), मराठी ज्ञानप्रसारक (१८५०), ज्ञानदर्शन (१८५४), ज्ञानविस्तार (१८६०), ज्ञानाकर (१८६२), ज्ञानसंग्रह (१८९०) अशा नावांत स्पष्टपणे प्रतीत झालेली दिसते तर ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या नियतकालिकांची ज्ञानोदय (१८४२), प्रभोदय (१८५६), उदयप्रभा (१८५६), सत्यदीपिका (१८७३) या तऱ्हेची नावे त्यांच्या हेतूशी त्यांच्या दृष्टीने अन्वर्थकच होती. मिशनऱ्यांच्या प्रचाराला प्रत्युत्तर म्हणूनच हिंदू धर्मभिमान्यांनी विचारलहरी (१८५२), चंद्रिका (१८५४), सद्धर्मदीपिका (१८५६), दंभहारक (१८७१) इ. नियतकालिके सुरू केली.
कालांतराने ज्ञानप्रसाराच्या बरोबरच अन्य दृष्टींनीही नियतकालिकांचा उपयोग करण्यात येऊ लागला आणि नियतकालिकांची सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने वाटचाल सुरू झाली. महाराष्ट्राच्या जीवनात त्या काळात नवीन वैचारिक आंदोलने निर्माण होत होती. त्यांचे पडसाद तत्कालीन नियतकालिकांत उमटणे अपरिहार्य होते. असेही म्हणता येईल, की १८५० पासून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात जे जे विचारप्रवाह निर्माण झाले, त्यांचे मंडन किंवा खंडन करण्याच्या प्रयत्नामध्ये मराठी नियतकालिकांनी उल्लेखनीय कामगिरी बजाविली आणि आधुनिक महाराष्ट्राच्या उभारणीला मोठा हातभार लावला.
त्या काळात दैनिकांचा विशेष प्रसार नव्हता. केसरी, मराठा, सुधारक, ज्ञानप्रकाश इ. त्या काळातील विशिष्ट मतांची आघाडीची मुखपत्रे ही सामान्यत: साप्ताहिकाच्या स्वरूपातच बाहेर पडत. त्या वृत्तपत्रांपेक्षा मासिक स्वरूपाच्या नियतकालिकांचा जो पसारा वाढला तो, त्यांची संख्या, विषयांची विविधता आणि प्रतिपादनातील वैचित्र्य या सर्वच अंगांनी अभ्यासनीय आहे.
या काळात मराठी नियतकालिके केवळ संख्येनेच वाढली नाहीत तर विषयांच्या विविधतेच्या दृष्टीनेही ती प्रगल्भ झाली. प्राचीन मराठी काव्य संपादन करून ज्ञानचंद्रोदय (१८४०) आणि सर्वसंग्रह (१८६०) यांनी ते पुनर्मुद्रित केले. काव्येतिहाससंग्रहाने (१८७८–८८) जुन्या काव्याबरोबरच बखरी व पत्रे यांसारख्या ऐतिहासिक साधनांचे प्रकाशन केले. न्यायप्रकाश (१८७६) आणि न्यायाश्रम (१९११) यांनी कायद्याच्या संदर्भातील उपयुक्त माहिती बहुजन समाजाला पुरविली. शिक्षणक्षेत्रात पुणे पाठशालापत्रकाने (१८६१) शिक्षकांनाच नव्हे, तर पालकांनाही मार्गदर्शक ठरणारे लेख प्रसिद्ध केले. विचारकल्पतरूने ज्ञानकोशाच्या धर्तीवर नाना प्रकारच्या विद्या, कला, कौशल्य यांचा विचार करून प्रत्येक वस्तूचे अनुभवसिद्ध निरूपण केले. केरळकोकिळने (१८८६) मनोरंजनासाठी कथा, कविता, प्रवासवर्णन या स्वरूपाचे वाङ्मय पुरविले.
अशा विविध विषयांबरोबरच समाजातील विशिष्ट गटांसाठी स्वतंत्र नियतकालिके निघू लागली. बालबोध (१८८१) व बालमित्र (१८९३) या मासिकांनी मुलामुलींना मनोरंजनाच्या जोडीनेच उपयुक्त ज्ञान दिले. स्त्रीवर्गात बहुश्रुतपणा वाढेल आणि त्यांना विचारप्रवृत्त करील असे वाङ्मय अबलामित्र (१८७६), सुमित्र (१८५५), स्त्रीभूषण (१८६४), स्त्रीशिक्षणचंद्रिका (१८९९) यांनी प्रसिद्ध केले. मुलांना आणि स्त्रियांना ख्रिस्ती धर्माकडे आकृष्ट करण्याच्या कार्यात उपदेशापेक्षा मनोरंजन अधिक प्रभावी होईल या अपेक्षेने मिशनऱ्यांनीसुद्धा त्यांच्यासाठी बालबोधमेवा (सु. १८७३) व स्त्रियांची मैत्रिण (सु. १८८८) ही नियतकालिके सुरू केली होती.
ज्या काही नियतकालिकांच्या नावांचा निर्देश वर केला आहे तो विषयवैचित्र्याच्या संदर्भात केवळ वानगीदाखल आहे पण ज्यांच्या उल्लेखाखेरीज मराठी नियतकालिकांच्या उदयकाळाचा आढावा, तो कितीही धावता असो, परिपूर्ण होणार नाही अशी दोन नियतकालिके म्हणजे विविधज्ञानविस्तार (१८६७–१९३७) आणि (१८७४–८१). तत्कालीन इतर नियतकालिकांच्या तुलनेने दीर्घ म्हणाव्या लागणाऱ्या आपल्या आयुष्यात विविधज्ञानविस्ताराने भौतिक व सामाजिक शास्त्रांतील शाखोपशाखांवर अभ्यासपूर्वक केलेले लेखन प्रसिद्ध करून मराठी वाचकांची ज्ञानलालसा तृप्त केली. या शास्त्रीय लेखनाव्यतिरिक्त विविधज्ञानविस्तारने वाङ्मयसमीक्षा व वाङ्मयविचारांवर मौलिक लेखन सातत्याने प्रसिद्ध केले. त्याच्या विद्वान आणि व्यासंगी लेखकवर्गाने त्याला विद्यापीठाच्या तोडीची प्रतिष्ठा प्राप्त करून दिली होती. मराठी समाजाच्या वैचारिक जीवनावर विविधज्ञानविस्ताराने केलेला संस्कार चिरकालीन ठरला.
निबंधमालेने आपल्या अल्पायुष्यात मराठी भाषेच्या अभिवृद्धीला राजकीय आणि सामाजिक प्रश्नांच्या ऊहापोहाइतकेच महत्त्व दिले. निबंध, चरित्र, ग्रंथपरिक्षण, सुभाषितसंग्रह, विनोद, महदाख्यायिका अशा गद्य प्रकारांचे लेखन आपल्या शैलीदार भाषेत करून मराठी भाषेचे माहात्म्यच सिद्ध केले.
अनेक विषयांचा अभ्यासपूर्ण रीतीने परामर्श घेणारी आणि प्रदीर्घ काळ मराठी भाषेची सेवा करणारी जी नियतकालिके झाली त्यांत विविधज्ञानविस्ताराप्रमाणेच वऱ्हाडशालापत्रक (१८७६–१९४८), मासिक मनोरंजन (१८९५–१९३५), मनोरंजन आणि निबंधचंद्रिका (१८८७) ही अस्तंगत झालेली आणि ज्ञानोदय (१८४४– ), सृष्टिज्ञान (१९२८– ), किर्लोस्कर (१९२९– ) अशी चालू राहिलेली वैशिष्ट्यपूर्ण नियतकालिके महत्त्वाची ठरतात. समाजजीवनाला उपयुक्त अशा भिन्नभिन्न शास्त्रांचा सुबोध आणि प्रौढ भाषेत ऊहापोह करून आणि त्याचबरोबर साहित्य-नाट्य-संगीत अशा ललितकलांच्या सापेक्षी चिकित्सेला नित्यनियमाने स्थान देऊन या नियतकालिकांनी सांस्कृतिक जीवनाचे भरण-पोषण करण्याचे कार्य सातत्याने चालू ठेवले.
काही नियतकालिकांनी एकाच विषयाला वाहून घेऊन त्या विशिष्ट क्षेत्रातील ज्ञानभांडार मराठी भाषेत आणण्यासाठी प्रयत्न केले. या संदर्भात मराठी शिक्षक (१९११), शेतकी आणि शेतकरी (१९१०), भिष्ग्विलास (१८९२), उद्यम (१९१९), व्यायाम (१९१५), रंगभूमी (१९०७), तत्त्वज्ञानमंदिर (१९१९) इ. नियतकालिके सहज आठवणारी आहेत. विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या स्वरूपात एक स्फूर्तिस्थान निर्माण झाल्यानंतर भाषा, वाङ्मय, इतिहास यासंबंधी पुनरुज्जीवनाची भावना बळावून तत्संबंधीची दुर्मिळ व बहुमोल साम्रगी प्रकाशात आणण्याचा उद्योग काही नियतकालिकांतून चालू झाला. त्यांपैकी काव्येतिहाससंग्रहाचा उल्लेख वर आलेला आहेच. त्याशिवाय मुमुक्षु (१९०७–३३), रामदास आणि रामदासी (१९१५–६३) यांची कामगिरी विशेष उल्लेखनीय आहे. भारत इतिहास संशोधक मंडळाचे त्रैमासिक (१९२०– ) हे कार्य अखंडपणे करीत आहे. ग्रंथमाला (१८९४–१९०६), भाषांतर (१८९४–९६) यांतून तर अनेक पाश्चात्त्य ग्रंथांची मराठी भाषांतरे–रूपांतरे आणि स्वतंत्र लेख प्रकाशात आले.
महाराष्ट्र साहित्य परिषद स्थापन झाल्यानंतर काही काळाने महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांत प्रातिनिधिक साहित्यसंस्था उदयाला आल्या. त्यांनी आपापल्या भागातील लेखक-संशोधकांना पुढे आणून मराठीची विविध दालने समृद्ध करण्याचे कार्य चालू ठेवले आहे. महाराष्ट्र साहित्य पत्रिका (१९२८, म. सा. परिषद, पुणे), युगवाणी (१९४६, विदर्भ साहित्य संघ, नागपूर), मराठी संशोधन-पत्रिका (१९५२, मराठी संशोधन मंडळ, मुंबई), प्रतिष्ठान (१९५३, मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबाद) या मुखपत्रांचा त्या दृष्टीने मुद्दाम निर्देश करणे अगत्याचे आहे. वाङ्मयविषयक लेखनाला विशेष प्रोत्साहन देणाऱ्या मराठी नियतकालिकांची संख्या अन्य कोणत्याही प्रकारच्या नियतकालिकांहून अधिक आहे, हे मराठी नियतकालिकांचे एक वैशिष्ट्य म्हटले पाहिजे. महानुभाव, प्रसाद, ज्ञानेश्वर, नामदेव, सज्जनगड मासिक पत्रिका, माऊली इ. नियतकालिकांतून प्राधान्याने प्राचीन संत कवींच्या जीवनकार्यासंबंधी विचारमंथन होत असते, तर अभिरुची, प्रतिभा, रत्नाकर, ज्योत्स्ना, साहित्य, सत्यकथा, आलोचन, वैखरी इ. मासिकांना वाङ्मयसृष्टीत मोठा दर्जा प्राप्त झाला आहे. वैखरी, ऋचा इ. वाङ्मयीन नियतकालिकांनीही आपला वाचकवर्ग निर्माण केला आहे. साहित्य व कला यांपुरताच आणखी विचार केला, तर रंगभूमी (१९०७–१६), प्रतिमा (१९३३–३७), रत्नाकर (१९२५–३३), अभिरुची (१९४३–५१), छंद (१९५४–६०), जोत्स्ना (१९३६–४१), पारिजात (१९३४– ) व साहित्य (१९४७–) यांचे आयुर्मान अल्पकालीन असले, तरी त्यांनी त्या अवधीत मराठी भाषेला भूषणभूत ठरेल, अशी सामग्री अभ्यासकांच्या हाती दिलेली आहे. तसेच नवभारत, समाजप्रबोधन पत्रिका यांनी अनेक क्षेत्रांतील घटनांचा आणि विचारांचा अभ्यासपूर्ण मागोवा घेण्याचे कार्य केलेले आहे, तर लोकशिक्षण आणि सह्याद्रि या नियतकालिकांचेही कार्य उल्लेखनीय आहे.
दिवाळी अंकाची एक ठराविक चाकोरी निर्माण झालेली असली, तरी काही विशिष्ट क्षेत्र निवडून वाचकांना विचारप्रवण करण्याची योजकताही त्यांतून दिसून येते. विशेषतः काही दिवाळी अंकांतून महत्त्वपूर्ण परिसंवादांचे पद्धतशीर संयोजन केले जाते व त्यामुळे त्यांची उपयुक्तता कायम स्वरूपाची ठरते. याखेरीज, जनमनावर आपल्या जीवनाची किंवा वाङ्मयीन कार्याची मुद्रा उमटविणाऱ्या काही महापुरूषांच्या षष्ट्यब्दि-शताब्दीसारख्या प्रसंगांच्या किंवा दुसऱ्या काही कारणांनिमित्त जे विशेषांक योजनापूर्वक सिद्ध होतात, त्यांना तर अभ्यासकांच्या दृष्टीने संग्राह्य ग्रंथाचीच योग्यता प्राप्त होते. दिवाळी विशेषांकाची आणि एखाद्या विवक्षित विषयावरील खास अंकाची प्रथा प्रथमतः मासिक मनोरंजनने १९०९ पासून सुरू केली. यादृष्टीने मासिक मनोरंजन (दिल्ली दरबार विशेषांक), ब्राह्मणपत्रिका (राजवाडे तिलांजली विशेषांक), लोकशिक्षण (डॉ. केतकर व माधव जूलियन विशेषांक), पुरुषार्थ (गणेश व श्रीसद्गुरु विशेषांक), नवभारत (टिळक-आगरकर विशेषांक) असे काही विशेषांक अभ्यासकांना संग्राह्य वाटणारे आहेत. प्रसाद मासिकाचे धार्मिक स्वरूपाचे वार्षिक अंक किंवा महाराष्ट्र साहित्य पत्रिकेचे केळकर, कोल्हटकर, तांबे व खाडिलकर या थोर साहित्यिकांवरील विशेषांक म्हणजे तद्विषयक छोटे ग्रंथच होत.
नियतकालिकांतून वेळोवेळी प्रसिद्ध होणाऱ्या पांडित्यपूर्ण लेखमाला हे मराठी नियतकालिकांचे एक गौरवास्पद उपांग आहे. गं. बा. सरदारकृत ‘मानकरी’, श्री. ना. बनहट्टीकृत ‘देवलांची नाटके’ (म. सा. पत्रिका) द. के. केळकरकृत ‘संस्कृतिसंगम’ (वाङ्मयशोभा) पु. ग. सहस्रबुद्धेकृत ‘लोकसत्ता आणि महाराष्ट्र संस्कृति’ (वसंत) बापुराव नाईककृत ‘नाट्यवास्तुरचना’ (नाटक) इ. लेखमाला या दृष्टीने उल्लेखनीय आहेत. ‘माझे पहिले नाटक व माझे कथालेखन’ (हंस), ‘नवे कथाकार’ (सत्यकथा) अशा साहित्यविषयक लेखमालाही अभिनव आणि उद्बोधक ठरल्या.
बहुसंख्य नियतकालिकांसमोर प्रौढ स्त्रीपुरूषांचा वाचकवर्ग असला, तरी थोड्या वेगळ्या वाटेने जाणारीही काही नियतकालिके आहेत. केवळ स्त्रीवर्गासाठी निघालेली गृहिणी, प्रपंच, मानिनी, संजीवनी व अनुराधा अशी अनेक नियतकालिके प्रसिद्ध केली जातात. स्त्री मासिक पूर्वीपासून लोकप्रिय आहे. छोट्या मुलांसाठी शालापत्रक (आता बंद) आनंद व मुलांचे मासिक ही अनेक वर्षांपासून काम करीत आहेत. खेळगडी, कुमार, किशोर आणि मद्रासहून प्रकाशित होणारे चांदोबा यांची नावे कुमारांच्या जगात विशेष लोकप्रिय झाली आहेत. अस्मितादर्श, निकाय, अस्तित्व यांसारख्या नियतकालिकांतून दलितवर्गाच्या वेदनांना आणि बंडखोरीला शब्दरूप देण्याचा प्रयत्न दिसून येतो. दलित साहित्याच्या प्रगतीत त्यांचा वाटा मोठा आहे.
शासकीय पातळीवरून प्रकाशित होणारे शेतकरी व लोकराज्य यांसारख्या नियतकालिकांचे स्वरूप एका ठराविक पद्धतीचे राहणे स्वाभाविक असले, तरी खाडिलकर, ज्ञानेश्वर, गाडगे महाराज हे लोकराज्याचे विशेषांक खरोखरीच अल्पमोली आणि बहुगुणी ठरले.
निव्वळ करमणूक हेच ज्यांचे प्रयोजन आहे, अशी नियतकालिके वगळता इतिहासाच्या अभ्यासाचे साधन म्हणून नियतकालिकांचे महत्त्व मोठे आहे. एखाद्या कालखंडातील सामाजिक, राजकीय, आर्थिक, धार्मिक अशा कोणत्याही विचारप्रवाहांचा ठाव घेण्यासाठी साक्षेपी संशोधकांना त्या काळातील नियतकालिकांचाच आश्रय घ्यावा लागतो. आपल्या विषयाशी संबंधित असलेले वाङ्मय शोधण्यात संशोधकांच्या वेळेचा आणि कार्यशक्तीचा अपव्यय होऊ नये, यासाठी दिवंगत व विद्यमान नियतकालिकांची आणि त्यांतील लेखांची सूची उपलब्ध असणे आवश्यक ठरते. महाराष्ट्रातील थोर सूचिकार शंकर गणेश दाते यांनी आरंभिलेले १८००–१९५० या काळातील मराठी नियतकालिकांची आणि त्यातील ज्ञानवाहक लेखांची वर्गीकृत सूची तयार करण्याचे महत्त्वाचे कार्य मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या शं. ग. दाते सूचिमंडळातर्फे आता पूर्ण होत आले आहे. याच्या पुढील काळातील लेखांची सूची करून ती अद्ययावत राखली, तर या स्वरूपाचा ग्रंथ लाभलेली एकमेव भारतीय भाषा असा सार्थ अभिमान मराठीला मिरविता येईल. जुन्या नव्या अभ्यासकांना नियतकालिकांतील लेख, नवी पुस्तके यांची माहिती हवी असते. हे किचकट परंतु अत्यंत उपयुक्त ठरणारे सूचिकार्य साहित्यसहकार, ललित, इये मराठीचिये नगरी, वाचनालय या नियतकालिकांच्या द्वारा होत आहे.
महाराष्ट्राबाहेरही प्रसिद्ध होणाऱ्या काही मराठी नियतकालिकांचे कार्यदेखील उल्लेखनीय आहे. त्यांपैकी मांडवी (गोवा), मालव साहित्य (इंदूर), पंचधारा व स्वाध्याय संशोधन पत्रिका (हैदराबाद), मायमराठी (दिल्ली) आणि पुरुषार्थ (पारडी) इ. नियतकालिके महत्त्वाची आहेत.
नियतकालिकांच्या बरोबरीनेच परंतु विशेषत: दुसऱ्या महायुद्धानंतर अनियमितपणे प्रकाशित होणारी व लघु आकाराची नियतकालिके सुरू झाली. अशा अ-नियतकालिकांची किंवा लघु नियतकालिकांची मराठी भाषेतही बरीच निर्मिती झालेली आहे. संतप्त तरुण लेखकांनी प्रस्थापितांविरुद्ध केलेली बंडखोरी, असे तिचे स्वरूप सांगण्यात येते. साऱ्याच परंपरेला झुगारणाऱ्या या नियतकालिकांचे जग बहुसंख्य वाचकांना मात्र पुरेसे परिचित झालेले नाही.
गर्दे, पु. कृ. कानडे, मु. श्री.
उर्दू नियतकालिके : सु. १८३६ पासून म्हणजे भारतात मुद्रणस्वातंत्र्याची सुरुवात झाल्यापासून वृत्तपत्रे, साप्ताहिके आणि नियतकालिके उर्दू भाषेत प्रकाशित होऊ लागली. मुनशी हरसुखराय यांनी लाहोर येथून १८५० मध्ये कोहिनूर हे साप्ताहिक आणि नवल किशोर यांनी १८५८ मध्ये अवध अखबार हे वृत्तपत्र प्रसिद्ध केले. प्रारंभी ते साप्ताहिक होते.
सर सय्यद यांच्या संपादकत्वाखाली निघालेले तहझीब-उल-अखलाक हे पहिले महत्त्वपूर्ण नियतकालिक होय (१८७०–७६). १८७० ते १८७६, १८७९ ते १८८१ व १८९४ ते १८९७ अशा खंडित कालावधीत ते प्रकाशित होई. सर सय्यद हेच त्याचे प्रमुख लेखक होते. आपल्या लेखांमधून पाश्चात्त्य शिक्षण आणि संस्कृती यांचा आणि धार्मिक बाबतीत विवेकनिष्ठ विचारसरणीचा त्यांनी पुरस्कार केला. शरर यांनी आपले दिलगुदाझ हे वाङ्मयीन व ऐतिहासिक मासिक लखनौ व हैदराबाद येथून १८८७ ते १९०१ या कालखंडात मधूनमधून अल्पविराम घेत प्रसिद्ध केले. मुनशी दयानारायण निगम यांचे जमाना (कानपूर) हे १९०४ ते १९४४ या प्रदीर्घ कालखंडात भरभराटीस आले. सर अब्दुल कादिर यांच्या मखझन् या लाहोर येथे १९०२ मध्ये सुरू झालेल्या नियतकालिकाला इक्बालसारखे प्रथितयश लेखक लाभले होते. ओरिएंटल कॉलेज मॅगझिन, अदबी दुनिया व हुमायून यांसारखी प्रख्यात मासिके लाहोरहून प्रकाशित होत होती. उर्दू हे अंजुमन-ई-तरक्की-ई-उर्दू, इंडिया या संस्थेचे मुखपत्र १९२१ मध्ये अब्दुल हक यांच्या संपादकत्वाखाली औरंगाबादहून प्रसिद्ध झाले. स्वातंत्र्यानंतर हे त्रैमासिक उर्दू अदब या नावाने सुरुर यांच्या संपादकत्वाखाली निघू लागले. त्यातील संशोधनवर लेखांनी उर्दू साहित्याच्या इतिहासात मोलाची भर घातली. नियाझ फतेहपुरी यांनी १९२३ मध्ये सुरू केलेले निगार हेदेखील फार प्रभावी नियतकालिक होते. १९३८ मध्ये डॉ. झोर यांनी सुरू केलेले सबरस हे मासिक हैदराबाद येथून प्रकाशित होते. १९५९ मध्ये महमूद अयाज यांनी बंगलोरहून सौघात या नियतकालिकाचे प्रथम प्रकाशन केले. या प्रकाशनाने काही आधुनिक जागतिक वाङ्मयीन प्रवाह प्रथम उर्दू साहित्यात आणले. एस्. आर्. फरुकी यांनी १९६६ साली स्थापन केलेल्या आपल्या शब्खून (अलाहाबाद) मधून या नवीन प्रवाहांचा प्रभावी पुरस्कार केला. आबिद सुदैल यांनी स्थापिलेल्या किताबमध्ये नव्या साहित्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन शब्खूनपेक्षा थोडा सौम्य दिसून येतो. काव्याला वाहिलेले शेरो हिकमत हे त्रैमासिक (हैदराबाद) १९७० मध्ये मुगनी तबस्मूम यांनी सुरू केले. आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या आधुनिक पाश्चात्त्य कवींच्या कृतींचा अनुवादही त्यातून देण्यात येतो. असरी अदब (दिल्ली) व गुफ्तगू (मुंबई) ही मुख्यत: पुरोगामी लेखकांची प्रातिनिधिक नियतकालिके होत. नवा-ई-अदब (मुंबई), तहरीर (दिल्ली) व हिंदुस्थानी जबान (मुंबई) या संशोधनपर पत्रिका होत. जुन्या हिंदीच्या व उर्दूच्या भाषाशास्त्रीय अभ्यासाला वाहिलेले हिंदुस्थानी जबान हे महात्मा गांधी संशोधन केंद्राचे मुखपत्र उल्लेखनीय आहे. शाइर (मुंबई) हे लोकप्रिय मासिक १९३० मध्ये सुरू झाले. बाकर मेहदी व फुझैल जाफरी यांच्या संपादकत्वाखाली निघणाऱ्या इझहारमध्ये नवीन वाङ्मयीन प्रवाहांचे दर्शन होते. बिहार व ओरिसा या राज्यांतील नियतकालिकांत मेयार, मुआसिर व शाखसार ही उल्लेखनीय आहे. इलस्ट्रेटेड वीकलीच्या धर्तीवरचे झोए अन्सारी यांनी संपादिलेले आइना हे एकेकाळचे सर्वोत्कृष्ट चित्रमय साप्ताहिक मानता येईल. भारताबाहेर नुकूश, फुनून, ओराक आणि सहीफा ही लाहोरची आणि कराची येथील उर्दूनामा, अफकार व नया दौर ही पाकिस्तानमधील प्रमुख नियतकालिके होत.
शासकीय मासिकांमध्ये कौमिराज (मुंबई), रिसाला-ए-आंध्र प्रदेश (हैदराबाद), नया दौर (लखनौ) आणि आजकल (दिल्ली) ही विशेष प्रसिद्ध आहेत. उत्कृष्ट उर्दू विभाग असलेली विद्यापीठेदेखील नियतकालिकांचे प्रकाशन करीत असतात. मजल्ला-ए-उलूमे इस्लामिया व फिक्रो नजर यांसारखी दर्जेदार नियतकालिके एकेकाळी अलीगढ विद्यापीठाकडून प्रसिद्ध होत असत. या विद्यापीठाचे अलीगढ मॅगझिन हे वाङ्मयविषयक नियतकालिक महत्त्वाचे असून याच पद्धतीचे दुसरे मासिक जामिअ-ई-मिल्लिया इस्लामिया, दिल्ली या संस्थेचे जामिआ हे होय. हुमा व बीसवी सदी (दिल्ली) आणि नक्श व शहकार ही डायजेस्टच्या पद्धतीची लोकप्रिय वाङ्मयीन मासिके होत.
सियासत या नावाचे एक राजनैतिक त्रैमासिक युसुफ हुसेनखान यांच्या संपादकत्वाखाली हैदराबाद येथून निघत होते. तथापि १९१५ ते १९२७ या कालावधीत कलकत्त्याहून प्रकाशित होणारे आणि मधूनमधून खंड पडणारे मौलाना अबुलकलाम आझाद यांचे अल् हिलाल हे साप्ताहिक हेच प्रत्यक्ष राजकीय प्रश्नांशी निगडित असलेले पहिले नियतकालिक होय. आध्यात्मिक मूल्यांबद्दलच्या निष्ठांचा पुरस्कार करण्याबरोबरच राजकीय स्वातंत्र्यासाठी हिंदूंशी सहकार करून ब्रिटिशांशी संघर्ष करण्याबद्दल त्यात मुस्लिमांना आवर्जून आवाहन असे.
नशेमन (बंगलोर) आणि उर्दू ब्लिट्झ ही आजची उल्लेखनीय राजकीय साप्ताहिके होत. अंजूमन-ई-तरक्की-ई-उर्दू, इंडिया यांच्यामार्फत सायन्स या नावाचे एक विज्ञानविषयाला वाहिलेले मासिक १९२८ साली आणि मआशियात हे अर्थशास्त्रविषयक नियतकालिक १९४६ मध्ये सुरू झाले, पण ही दोन्ही फार अल्पजीवी ठरली.
नफसियात (मानसशास्त्र) आणि जिनसियात (लैंगिक विषयावरील ) या शीर्षकांची वृत्तपत्रे कराची येथून प्रकाशित होत. १९५२ मध्ये जिनसियातचा संततिप्रतिबंधक विशेषांक प्रसिद्ध झाला होता.
बुर्हान (दिल्ली) व मआरिफ (आझामगढ) या दर्जेदार मासिकांबरोबरच उर्दूत अनेक लोकप्रिय धार्मिक नियतकालिके आहेत. दिल्लीचे मुनादी (१९२६– ), रामपूरचे अल् हसनात (१९४७– ), तजल्ली (१९४८– ), कराचीचे फारान (१९४९– ) आणि लखनौच्या नदवतुल उलेमा या संस्थेचे तामीर ए हयात हे पाक्षिकही व इतर काही लोकप्रिय धार्मिक स्वरूपाची नियतकालिके होत.
डॉ. आबिद हुसैन यांच्या संपादकत्वाखाली १९६९ पासून दिल्लीतील इस्लाम आणि मॉडर्न एज सोसायटी या संस्थेमार्फत इस्लाम और असरे जदीद हे मुखपत्र प्रसिद्ध होते.
शशिदुल खैरी यांनी स्थापिलेले इस्मत (दिल्ली आणि आता कराची) हे स्त्रियांचे कदाचित सर्वांत जुने मासिक असावे. हरीम (लखनौ), खातूने मशरिक् (दिल्ली), वानो (दिल्ली) ही स्त्रियांची इतर काही उल्लेखनीय मासिके होत. मुलांचे फूल (लाहोर) हे साप्ताहिक १९०९ ते १९५७ पर्यंत सुरू होते. अख्तर शीरानी यांच्यासारख्या प्रथितयश कवींनी व लेखकांनी त्यात लेखन केले. नवी दिल्ली येथील पयामे तालीम हे सचित्र मासिक १९२६ पासून प्रकाशित होत आहे. खिलौना, हिलाल आणि नूर ही इतर काही लोकप्रिय बालमासिके होत. शमा, रूबी आणि कहकशा ही लोकप्रिय चित्रपट नियतकालिके असून त्यांतील दिल्लीचे शमा हे विशेष आकर्षक आहे.
नईमुद्दीन, सय्यद
गुजराती नियतकालिके : भारतातील अन्य भाषिक वृत्तपत्रांप्रमाणेच गुजराती वृत्तपत्रे सुरू करण्याचे श्रेय ख्रिस्ती मिशनऱ्यांकडेच जाते. ड्रमंडनामक एका ख्रिस्ती धर्मोपदेशकाने १८०८ मध्ये गुजराती भाषेतील व्याकरण तयार केले. पुढे १८१८ मध्ये गुजराती मुद्रणालयाची स्थापना झाली व १८२२ मध्ये फर्दुनजी मर्झबान यांनी मुंबई समाचार या साप्ताहिकाची सुरुवात केली. पुढे त्याचे रूपांतर दैनिकात करण्यात आले. याप्रमाणे सुरुवातीच्या काळात गुजराती साहित्य-प्रसार व नियतकालिक प्रकाशन यांतील बराच मोठा वाटा ख्रिस्ती मिशनरी व पारशी लोकांनी उचललेला दिसून येतो. त्यानंतर सुधारक आणि आंग्लविद्याविभूषित नर्मदाशंकर लालशंकर दवे यांनी आपले डांडिओ नियतकालिक सुरू करून त्यातून सुधारणावादी साहित्य प्रकाशित केले. तथापि नवरोजी फरदुंजी यांनी सुरू केलेले विद्यासागर हेच गुजरातीमधील आद्य मासिक मानले जाते. गुजराती साहित्याच्या दृष्टीने १८५० ते १८८५ हा काळ नवचैतन्याचा असल्यामुळे या काळात अनेक साहित्यिक सुधारणावाद्यांनी पुढे येऊन विविध संस्थांची स्थापना केली, तसेच नवनवीन ध्येय-धोरणे समोर ठेवून निरनिराळी नियतकालिकेही सुरू केली. त्यामध्ये बुद्धिवर्धक हिंदूसभेचे रणछोडदास गिरधरभाई यांनी सुरू केलेले बुद्धिवर्धक मासिक (१८५६) व द गुजरात व्हर्नॅक्युलर सोसायटीचे फॉर्ब्झ या इंग्रज गृहस्थाने सुरू केलेले आणि दलपतराम डाह्याभाई यांनी २३ वर्षे संपादिलेले बुद्धीप्रकाश मासिक (१८५४) ही नियतकालिके अग्रगण्य मानली जातात.
प्राचीन व अर्वाचीन विचारांचा समन्वय साधण्याच्या उद्देशाने १८८५ पासून १९२० पर्यंतच्या कालखंडात विविध नियतकालिके उद्यास आली. उदा., डॉ. आनंदशंकर बापूभाई ध्रुव यांच्या संपादकत्वाखाली निघणारे वसंत मासिक, प्रार्थना समाजाचे सर रमणभाई नीलकंठ ‘मकरंद’ यांनी संपादिलेले ज्ञानसुधा मासिक (१८८७), मणिलाल नथुभाई यांचे सुदर्शन मासिक (१८८५), चुनीलाल वर्धमान शाह यांचे प्रजाबन्धु साप्ताहिक (१८८७), खेडा वर्तमान साप्ताहिक (१८६१), कैसर-ई-हिन्द साप्ताहिक (१८८१), गपसप मासिक (१८८६), वैद्य कल्पतरु मासिक (१८९६), गुजरात समाचार साप्ताहिक, (१८९८) व साहित्य मासिक (१९२०) इ. साहित्यिक तसेच ईस्ट इंडिया कंपनीनु चोपानियुं, (१८६६), इतिहासमाला (१८९६), नुरे एलम (१८७१), पारसी मित्र साप्ताहिक (१८५५), विज्ञान विलास (१८७६), स्त्रीबोध (१८५७) व ज्ञानप्रसारक (१८४९) अशी विविध विषयक मासिक साप्ताहिकांनी कधी रूढीवादावर हल्ले चढवून, तर कधी सुधारणावादी दृष्टिकोन बाळगून आणि कधी समन्वयात्मक भूमिका घेऊन मोलाचे कार्य केले. पुढे त्यांपैकी काही बंद पडली. काहींचे दैनिकांत रूपांतर झाले, तर काहींनी आपले अस्तित्व दीर्घकाळ टिकवून धरले.
गांधीजी आफ्रिकेहून भारतात १९१४ मध्ये परत आल्यावर त्यांनी आपल्या प्रचार कार्याचे प्रमुख कार्यक्षेत्र अहमदाबाद हेच केल्यामुळे त्यांच्या विचारांचा प्रभाव गुजराती नियतकालिकसृष्टीवरही पडल्याखेरीज राहिला नाही. हिंदी, इंग्रजी व गुजराती अशा तीनही भाषांतून ते आपले विचार प्रकट करीत असल्याने त्यांचा प्रभाव पडून धार्मिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व व्यापारी-औद्योगिकविषयक अशा विविध क्षेत्रांतील गुजराती नियतकालिकांमध्येही आमूलाग्र बदल घडल्याचे दिसून येते. विशेषतः गांधीजींनीच सुरू केलेले नवजीवन (१९१९) व हरिजन बंधू (१९३३) ही साप्ताहिके विशेष प्रभावी ठरली. तत्पूर्वी इंदुलाल याज्ञिक यांनी नवजीवन अने सत्य हे मासिक (१९१५–१९) चार वर्षे चालविले होते.
स्वातंत्र्योत्तर काळात साप्ताहिके, पाक्षिके, मासिके, त्रैमासिके इत्यादींच्या संख्येत व विषयांत लक्षणीय भर पडली. साहित्य, समीक्षा, शिक्षण, रंगभूमी, धर्म, तत्त्वज्ञान, समाजकल्याण, वाणिज्य, व्यापार, उद्योग, विज्ञान, तंत्रज्ञान, कायदा, वैद्यक, आरोग्य, कृषी, पशुसंगोपन, चित्रपट, फलज्योतिष, क्रीडा अशा कितीतरी क्षेत्रांतील विषयांवरील अनेक नियतकालिकांची त्यात सतत भर पडत गेली. त्यांतील काही नियतकालिके साधारणतः अग्रगण्य मानली जातात. उदा., अखंड आनंद (१९४७), जनकल्याण (१९५०), समर्पण (१९६०), कोडियुं, (१९४५), कौमुदी (१९४७) इ. पूर्वीपासून चालत आलेली आणि अलीकडे जयंती दलाल, सुरेश जोशी, चुनीलाल मडिया, रे माथ, उमाशंकर जोशी, श्रीमती उषा जोशी आणि राजेंद्र शाह या नवसाहित्यिकांच्या संपादकत्वाखाली निघणारी अनुक्रमे रेखा, क्षीतिज, रुचि, कृती (१९६७), संस्कृती (१९४७), उहापोह (१९६९) ही वाङ्मयीन स्वरूपाची दर्जेदार मासिके असून मधुकर रांदेरियासंपादित गुजराती नाट्य हे रंगभूमी विषयाला वाहिलेले महत्त्वाचे नियतकालिक आहे.
यांखेरीज बालकांसाठी निघणारे बालजीवन (१९२०), बालमित्र (१९२०), बालवाडी (१९२७), शिशुमंगल (१९६५), फूलवाडी (१९६७) स्त्रियांसाठी निघणारे स्त्रीजीवन (१९३९), अमृता (१९६०) शेतीसंबंधी कृषिगोविंद (१९४८), सहकार विषयावरील ग्रामसहयोगी (१९६४) व सहकार (१९५४) चित्रपटविषयक चित्रज्योती (१९५९), चित्रलोक (१९५८) अशी विविध विषयांवरील अनेक मासिके-साप्ताहिके लोकप्रिय आहेत. कुमारांचे कुमार (१९२३), गुजराती डायजेस्ट नवनीत (१९६२), गांधीवादाचा व शिक्षणाचा पुरस्कार करणारे शिक्षण अने साहित्य, सामान्य वाचक व साहित्य यांतील दुवा साधणारे प्रजाबन्धु साप्ताहिक, मुंबईहून निघणारे जन्मभूमि प्रवासी (१९३९), पारसी समाजाचे पारसी आवाज (१९४७) ही आपल्या विषयांसाठी, तर कथा-कादंबऱ्यांना वाहिलेली बहुरूपी साप्ताहिक (१९३०) आणि स्वाध्याय (१९६३) व आलोचना ही त्रैमासिके अभ्यासपूर्ण तसेच वेचक लिखाणासाठी नावाजलेली आहेत. गुजरातीमधील बहुतेक नियतकालिके प्रारंभी मुंबईहून निघाली असून आजही ती बऱ्याच मोठ्या प्रमाणावर मुंबईहूनच निघत आहेत.
गोडबोले, शशिकला
असमिया नियतकालिके : असमिया भाषेतील पहिले मासिक अरुणोदय हे १८४६ साली अमेरिकन बॅप्टिस्ट मिशनरी सोसायटीने काढले. त्याचा मुख्य उद्देश ख्रिस्ती धर्मप्रसार हा होता. प्रथम शिवपूर व नंतर गौहाती येथून ते निघत असे. १८८२ पर्यंत ते चालू होते. निधीराम फेरवेल, दयानंद चालिहा इ. लेखक त्यांतून पुढे आले. असमिया भाषेची स्वतंत्र अस्मिता जागविण्याच्या दृष्टीने व बंगाली भाषेचा वरचष्मा कमी करण्यात या मासिकाने मोठी कामगिरी बजावली. १८८६ मध्ये पहिल्यांदा प्रकाशित झालेल्या मौ (मधु) या मासिकाचाही उल्लेख करावयास हवा. बलिनारायण बरा हे त्याचे संपादक होते. यातील विनोदी कवितांनी त्या काळी बरीच धूम माजविली. यानंतर १८८९ मध्ये चंद्रकुमार आगरवाला यांच्या जोनाकी मासिकाचे नाव घेता येईल. लक्ष्मीनाथ बेझबरुआ व हेमचंद्र गोस्वामी हे या मासिकाचे आधारस्तंभ होते. असमिया साहित्यातील सर्व आधुनिक प्रवृत्तींचा उद्गम प्रथम याच मासिकातून झाला. जोनाकी हे नियतकालिक प्रथम कलकत्त्याहून निघत असे. ते १९०१ पर्यंत चालले.
कलकत्त्याहूनच १८९० मध्ये बिजुली हे मासिक निघाले. पद्मनाथ गोहाइन-बरुआ हे त्याचे संपादक होते. कृष्णप्रसाद दोवेरा आणि बेणुधर राजखोवा यांच्यासारख्या प्रतिष्ठित व्यक्ती या मासिकामागे होत्या, असमिया साहित्याच्या प्रगतीस त्याचाही हातभार लागला. १९०९–२९ या काळात कलकत्त्याहून निघणारे बाँही हे मासिक विशेष गाजले. लक्ष्मीनाथ बेझबरुआ हे त्याचे संपादक होते. बंद पडल्यानंतरही त्याचे दोनदा पुनरुज्जीवन झाले. नंतरच्या संपादकांत अमियकुमार दास व माधव बेझबरुआ हे प्रमुख होते. १९४५ पर्यंत ते चालले. आधुनिक असमिया साहित्याच्या घडणीत या मासिकाचा वाटा मोलाचा आहे.
नगेंद्र नारायण चौधरी या जमीनदाराच्या आश्रयाने १९२९ साली कलकत्ता येथून निघालेले आवाहन मासिक बराच काळ चालू राहिले. दीनानाथ सर्मा हे त्याचे संपादक होते. १९१०–१९ या अवधीत चालू राहिलेले आलोचनी हे साहित्यिक मासिक प्रसन्नकुमार बरुआ व राधानाथ छांगकाकती यांनी चालविले होते. अंबिकागिरी रायचौधरी यांच्या चेतना (१९१९–२६) मासिकाने राष्ट्रीय आंदोलनाचा जोरदार पुरस्कार केला. असम साहित्यसभेचे मुखपत्र असम साहित्यसभा पत्रिका प्रथम १९२६ मध्ये निघाले. मध्यंतरी काही काळ ते बंद होते. १९५० पासून ते नियमित प्रसिद्ध होत आहे. इतिहास, संस्कृती, भाषा व समाज यांसबंधी भारदस्त लेखन हे या पत्रिकेचे वैशिष्ट्ये होय.
पाक्षिक म्हणून १९३६ साली निघालेले व नतंर मासिकरूपाने निघणारे जयंती नव्या विचारांना पुरस्कार करणारे म्हणून महत्त्वाचे आहे. १९४९ पर्यंत ते चालू होते. कमलनारायण देव, अमूल्य बरुआ, हेम बरुआ इ. साहित्यिकांचा या मासिकाशी जवळचा संबंध होता.
प्रचलित नियतकालिकांत रामधेनू हे नियतकालिक महत्त्वाचे आहे. १९५१ मध्ये ते सुरू झाले. बीरेंद्रकुमार भट्टाचार्य हे त्याचे संपादक आहेत. स्वातंत्र्योत्तरकाळातील आघाडीचे लेखक या मासिकाने घडविले असे म्हणता येईल. नवकांत बरुआ, हेम बरुआ, महेंद्र बरुआ, कमलनारायण चौधुरी, भावनानंद दत्त, चक्रेश्वर भट्टाचार्य, अमूल्य बरुआ असे अनेक लेखक या मासिकातून गाजले. १९४२ नंतर रघुनाथ चौधरी हे त्याचे संपादक झाले. याशिवाय मणीदीप, पाछोवा, आमार प्रतिनिधी ही मासिके व नवयुग साप्ताहिक यांची कामगिरी उल्लेखनीय आहे.
शिशुसाहित्यास वाहिलेली बरीच मासिके असमिया भाषेत निघाली. आकन, मैना, अरुण, पाखीला, परिजात, दीपक इ. मासिकांनी वेळोवेळी साहित्याची अभिरुची निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले. पशुपालन, असम कृषक, विज्ञान जेऊटी इ. वैज्ञानिक मासिकांनी शास्त्रीय विषयांतील माहितीपूर्ण लेखन प्रसिद्ध करण्याचा उपक्रम केला परंतु ती सारी अल्पजीवी ठरली.
ओडिया नियतकालिके : बंगालप्रमाणे ओरिसातही नियतकालिकांचा पाया मिशनऱ्यांनीच घातला. १८३७ मध्ये कटक मिशन प्रेसची स्थापना झाली. १८४९ मध्ये ज्ञानारुण हे मासिक या प्रेसतर्फे सुरू करण्यात आले. धर्मप्रसार हे त्याचे उद्दिष्ट होते. त्यांना प्रत्युत्तर म्हणून हिंदूंची नियतकालिके निघाली. त्यांत अरुणलोक, कुजिबर पत्रिका आणि परमार्थी ही प्रमुख होती परंतु १८९३ मध्ये निघालेले उत्कल दर्पण हे मासिक मात्र तेथील जीवनाचे खरेखुरे प्रतिनिधत्व करणारे वाङ्मयीन मासिक ठरले. त्यातील साहित्य बहुधा गद्य, निबंध, प्रबंध व अनुवाद या स्वरूपाचे असे. राधानाथ राय व मधुसूदन राव हे त्यांचे प्रमुख लेखक होते. त्यानंतर पाच वर्षांनी उत्कल सभा या सांस्कृतिक संस्थेचे मुखपत्र उत्कल मधुप (१८७८) हे प्रकाशित होऊ लागले. त्यांतून कथा-कांदबऱ्या व इंग्रजी कवितांचे अनुवाद तसेच ग्रंथसमीक्षण प्रकाशित होई. या दोन्ही नियतकालिकांच्या प्रभावी कार्यामुळे ओडियावरील बंगालीचा प्रभाव कमी होण्यास साहाय्य झाले.
यानंतरच्या काळात उत्कलदीपिका (१८६६), बालेश्वर संवादवाहिका (१८६८), उत्कल हितैषिणी (१८६९), उत्कल पुत्र (१८७३), विदेशी (१८७३) इ. पाक्षिके एकामागून एक प्रकाशित होऊ लागली. त्यांचीही साहित्यसेवा व लोकप्रियता उल्लेखनीय आहे. तथापि ओडिया साहित्याच्या विकसित अवस्थेचे उत्कृष्ट दर्शन उत्कल प्रभा (१८९१) या मासिकातून घडते.
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात निघालेले इंद्रधनु व बिजुली (१८९३–९४) या दोन समकालीन वाङ्मयीन नियतकालिकांनी राधानाथ राय आणि उपेंद्र भंज यांचे साहाय्य घेऊन प्राचीन व अर्वाचीन ओडिया साहित्याच्या अभ्यासाला व प्रगतीला हातभार लावला परंतु पुढे पुढे त्यांचे स्वरूप पालटत जाऊन कादंबरी, नाटक, गल्फ, प्रबंध व गीतिकाव्य इ. आधुनिक साहित्यप्रकारांवर त्यांनी भर दिला. त्यांच्या या कार्याचीच धुरा उत्कल साहित्य या १८९७ मध्ये निघालेल्या मासिकाने सांभाळली.
मुकुर (१९०५), सहकार (१९१९) या मासिकांनंतर नीळकंठ दास या कवीने आपल्या नवभारत (१९३४) मासिकातून साहित्यसमीक्षेची एक समर्थ परंपरा सुरू केली. तसेच समाजसुधारणा आणि राजकारण हे विषयही त्यांनी त्यातून हाताळले. याच काळात लक्ष्मीकांत महापात्र यांच्या डगर (१९३६) सारखी काही नियतकालिके प्रकाशित होऊ लागली होती परंतु डॉ. हरेकृष्ण मेहताब यांनी १९४८ मध्ये सुरू केलेल्या झंकार या मासिकाने ओडिया साहित्यसृष्टीत फार मोठी प्रतिष्ठा संपादन केली. या मासिकाने ओरिसातील अनेक श्रेष्ठ साहित्यिकांना लेखनास प्रवृत्त केले व साहित्याच्या दालनात एक नवे विश्व उभे करण्याची किमया करून दाखविली. त्यानंतरचे आसन्तकालि (१९५०), नवजीवन (१९५६–७५), पौरुष (१९६७) व अलीकडचे नबरबी (१९७०–७६) ही तेथील काही वाङ्मयीन स्वरूपाची प्रसिद्ध नियतकालिके होत.
जोशी, श्री. बा.
कन्नड नियतकालिके : कन्नड भाषेतील वृत्तपत्रे १८८० पर्यंत निघू शकली नाहीत. उत्तर कर्नाटकात (त्या वेळच्या सदर्न मराठा कंट्रीमध्ये) मराठीचे वर्चस्व असल्याने बेळगाव समाचार (१८६२), धारवाड वृत्त (सु. १८८०) ही वृत्तपत्रे मराठीच होती.
पूर्वीच्या म्हैसूर संस्थानात कन्नड भाषेत प्रतिष्ठा लाभली असल्याने कन्नड वृत्तपत्रे तेथूनच निघणे स्वाभाविक होते. त्यांपैकी देशाभिमानी (१८८०), मैसूर हेराल्ड, वृत्तांत चिंतामणी, मैसूर स्टँडर्ड, नाडगन्नडि ही वृत्तपत्रे उल्लेखनीय होत. म्हैसूरकडील बोलीभाषा आणि इतर भागातील भाषा यांत पुष्कळच फरक असल्याने वृत्तपत्रांचा प्रसार कर्नाटकात सर्वत्र होऊ शकला नाही. १९०० साली प्रसिद्ध झालेल्या वृत्तपत्रांच्या अहवालात धारवाडचे कर्नाटकवृत्त व म्हैसूरचे वृत्तांतपत्रिके या साप्ताहिकांचा खप अनुक्रमे ८०० व ३,३०० प्रती असा नोंदविलेला आढळतो. पुढे १९२४ मध्ये बेळगावला महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस अधिवेशन भरले. त्यामुळे झालेल्या लोकजागृतीमुळे कन्नड नियतकालिकांना चालना मिळाली. विसाव्या शतकाच्या प्रारंभी गोरक्षण (१९०२), कॅनेरा न्यूज (१९१६), सत्यवादि (१९१७) इ. नियतकालिके उदयास आली. सद्बोध चंन्द्रिके हे मासिक अगडीहून (जि. धारवाड) भि. प. काळे संपादित करीत. कर्मवीर (१९२१) हे साप्ताहिक रा. श्री. हुक्केरीकर व रं. रा. दिवाकर यांनी १९२१ मध्ये सुरू केले. कोडगु (१९२१), नवयुग, उडिपी (१९२१), मैसुरु सहकार पत्रिके (१९२५) व संयुक्त कर्नाटक (१९२४/१९३३) ही नियतकालिके त्या काळात सुरू झाली. त्या काळी कन्नड नियतकालिके चालविणे हे आर्थिक दृष्ट्या जोखमीचे होते. अशा परिस्थितीत कन्नड नियतकालिके लोकप्रिय बनविण्याचा प्रयत्न अण्णाचार्य होसकेरी (दैनिक विजय, धारवाड), वामनराव–शंभुराव जठार (राजहंस मासिक), आलूर वेंकटराव (जयकर्नाटक) आणि फ. गु. हळकट्टी (साप्ताहिक कर्नाटक वैभव) यांनी केला. याच सुमारास राघवेंद्रराव कडपा (धारवाड), कपटराल कृष्णराव (गुलबर्गा) यांनी कर्नाटकाच्या एकीकरणाची मोहीम हाती घेतली. कन्नड भाषा समृद्ध बनविण्याचे प्रयत्न होऊ लागले. म्हैसूरमध्ये बी. एम्. श्रीकंठय्या, मास्ती वकटेश अयंगार, तिरुमले ताताचार्य शर्मा, के. व्ही. पुट्टप्प, टी. पी. कैलासम यांनी आणि धारवाडमध्ये शं. बा. जोशी, द. रा. बेंद्रे (गेळेयर गुंपु–मित्रमंडळ– १९२६) यांनी कन्नड भाषेच्या आणि साहित्याच्या थोर परंपरेविषयी बरीच जागृती केली. राजकीय आणि भाषासाहित्यविषयक लिखाण मुख्यत: जयकर्नाटक, जयंति (१९३८), कन्नड साहित्य परिषदेचे नुडिगन्नडि (१९३८) आणि बंगलोरचे प्रजामत (१९३१), प्रबुद्ध कर्नाटक, ताइनाडु (१९२७) इ. नियतकालिकांतून होत असे. सद्बोध चंन्द्रिके या मासिकातून ह. ना. आपटे यांच्या कादंबऱ्यांचे अनुवाद, गळगनाथ, यल्लोगुड्डो कुलकरणी यांच्या स्वंतत्र कादंबऱ्या क्रमशः प्रसिद्ध होत. याशिवाय बिन्दुमाधव बुर्लि यांची ‘मनोहर ग्रंथमाला’, भालचंद्र घाणेकर यांची ‘समाज पुस्तकमाला’ यांतून नियमित साहित्य प्रकाशित होत असे. १९५६ च्या भाषावार प्रांतरचनेनंतर मुंबईहून ताइनुडि, बैरागि प्रेक्षक आणि कोल्हापूरवरून सन्मति अशी कन्नड नियतकालिके प्रसिद्ध होत.
स्वातंत्र्योत्तर काळात व विशेषत : भाषिक राज्यांच्या निर्मितीनंतर कन्नड नियतकालिकांना अधिक वाव मिळाला व त्यांच्यात विषयांची विविधताही निर्माण झाली. चित्रपट हा त्यातील एक प्रमुख विषय होय. याशिवाय वीरशैव, माध्व, ओक्कलिक बंट, कुरुब (धनगर) इ. धार्मिक-सामाजिक गटांची स्वतंत्र नियतकालिके निघू लागली. तसेच सार्वजनिक व शैक्षणिक संस्थांचीही नियतकालिके सुरू झाली. १९७३ च्या आकडेवारीनुसार कन्नड भाषेत ११६ साप्ताहिके, ३६ पाक्षिके, १०६ मासिके, १६ त्रैमासिके प्रसिद्ध होत. साहित्य व संस्कृती, धर्म व तत्त्वज्ञान यांना वाहिलेल्या नियतकालिकांची संख्या तिसांपेक्षा अधिक होती. चित्रपटविषयक ११ नियतकालिके प्रसिद्ध होत.
कर्नाटकात सर्वाधिक नियतकालिके बंगलोरवरून (२८१) निघतात. म्हैसूर, कोलार, हुबळी, धारवाड, मंगलोर, बेळगाव, विजापूर येथून प्रकाशित होणाऱ्या नियतकालिकांची संख्याही बरीच आहे. कन्नडमधील साप्ताहिक सुधा (१९६५) या नियतकालिकाचा खप सर्वाधिक आहे. त्याखालोखाल प्रजामत, कर्मवीर (१९२१) ही साप्ताहिकेही लोकप्रिय आहेत. चित्रपटविषयाला वाहिलेली रसरंग (१९६३, हुबळी) व तारे (१९६८, बंगलोर) ही नियतकालिके उल्लेखनीय आहेत. कस्तुरी व मल्लिगे ही डायजेस्टवजा मासिके देखील लोकप्रिय आहेत.
दिवेकर, गु. व्यं.
तेलुगू नियतकालिके : तेलुगू नियतकालिकांच्या प्रकाशनास एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात आरंभ झाला. ख्रिस्ती मिशनऱ्यांनी धर्मप्रसारासाठी नियतकालिकांचा उपयोग केला. ख्रिस्ती नियतकालिकांचे प्रकाशन १८३३ पासून मद्रास येथून सुरू झाल्याचे दिसते. १८३५ मध्ये या प्रकारचे सत्यदूत नावाचे मासिके बेल्लारीहून निघत असल्याची माहिती मिळते. १८३८ मध्ये वृत्तांतिनी मासिक मंडिगल वेंकटराम शास्त्री यांनी सुरू केले होते. १८४० मध्ये मद्रासहून वर्तमान तरंगिणी हे मासिक पोवाडा वेंकटरमणा यांच्या संपादकत्वाखाली निघाले. ते विविध विषयपर होते. १८६२ ते १८६९ या काळात सृजनरंजनी नावाचे वाङ्मयीन विषयांना वाहिलेले मासिक चालू होते. ते मद्रासहून प्रकाशित होई व त्याला मोठी प्रतिष्ठा लाभली होती. वेंजमोरि कृष्णमाचार्य हे त्याचे संपादक होते. या मासिकात प्रसिद्ध वैय्याकरणी चिन्नय सूरि यांचे लेख प्रकाशित होत. या मासिकाचे वर्णन त्यावेळी ‘विद्यापीठीय विद्यार्थ्यांचा सोबती’ असे केले जाई.
आंध्रभाषासंजीवनी हे मासिक महामहोपाध्याय कोकोंडा व्यंकटरत्नम् पंतुलू काढीत. त्याचा काळ १८७१ ते १८८३ व १८८४ ते १९०३ असा होता. त्यांत विविध विषयांचा परामर्श घेतला जाई. या मासिकाचे हास्यवर्धिनी हे धाकटे भावंड होते.
आधुनिक तेलुगू गद्य सारस्वताचे प्रवर्तक वीरेशलिंगम् पंतुलू हे राजमहेंद्रीहून विवेकवर्धिनी या मासिकाचे संपादन करीत. ते १८७४ पासून सुरू झाले होते. वीरेशलिंगम् पंतुलू यांना दक्षिणेचे विद्यासागर म्हणून पदवी होती. समाजसुधारणा व विद्यासेवा हे या मासिकाचे ध्येय होते. १८८५ मध्ये हे मासिक बंद पडले. सकलविद्यावर्धिनी नावाचे मासिक म. म. परवसु रंगाचार्य यांनी १८७३–७९ या काळात चालविले. तेही विविध विषयांना वाहिलेले होते. त्यातून प्रथम शाकुंतल नाटकाचा तेलुगू अनुवाद प्रकाशित झाला. पोंडला रामकृष्णय्या यांनी आमुद्रित ग्रंथ चिंतामणी नावाचे मासिक १८८५ मध्ये काढले. हे मासिक प्रामुख्याने वाङ्मयीन संशोधन, प्रकाशन, चर्चा, समीक्षा इ. विषयांना वाहिलेले होते. या मासिकातून अनेक ग्रंथही क्रमशः प्रकाशित झाले. पाठ्यपुस्तकेही या मासिकातून प्रकाशित होत. या मासिकाचा गौरव ‘एकोणिसाव्या शतकातील दीपस्तंभ’असा करण्यात येतो. याशिवाय वेदान्तादी पारमार्थिक विषयांना वाहिलेले राजयोगी (१८९१– ) नावाचे मासिकही उल्लेखनीय आहे. ते काकिनाडाहून निघत असे व गुरजाड श्रीराममूर्ती हे त्याचे संपादक होते. त्यात पहिल्यांदाच कविचरित्रमाला प्रकाशित झाली. तसेच प्रबोधनचंद्रोदय या वेदान्तविषयक ग्रंथाचे भाषांतरही त्यातून प्रकाशित झाले. याशिवाय यथार्थवादी (१८८१–८५), नीतिदर्पण (१८८५–८७), सरस्वती, कलावती, वाग्वल्ली, हितवादी, श्रियक्षणी, तत्त्वबोधिनी, सुधीरंजनी आणि हास्यसंजीवनी इ. मासिकेही एकोणिसाव्या शतकात प्रकाशित होत होती. विसाव्या शतकाच्या सुरुवातीसही त्यांपैकी बरीच मासिके चालू राहिली. त्यांना जोडून किंवा स्वतंत्रपणेही साप्ताहिके, पाक्षिके, अर्धसाप्ताहिके यांचे प्रकाशन होऊ लागले.
मुंबईहून १९०८ मध्ये काशीनाथुनी नागेश्वरराव पंतुलू यांनी आंध्र वारपत्रिका हे साप्ताहिक काढले. १९१४ मध्ये त्याचे मद्रासला स्थलांतर झाले. नंतर त्याच नावाचे दैनिकही प्रकाशित होऊ लागले. १९३८ मध्ये नागेश्वरराव यांच्या मृत्यूनंतर त्यांचे जामात शिवलिंका शंभुप्रसाद यांनी हे साप्ताहिक १९७२ पर्यंत चालविले. शिवलिंका राधाकृष्ण हे त्याचे विद्यमान संपादक होत. १९५६ पासून त्याची हैदराबाद आवृत्ती प्रकाशित होत आहे.
चित्तूर जिल्ह्यातील गोंडलापल्ली येथून १९५१ पासून आंध्रप्रभा वारपत्रिका हे साप्ताहिक प्रकाशित होऊ लागले. नीलमराजू र्वेकटशेषय्या हे त्याचे सुरुवातीचे संपादक होते. हे विविध विषयांवरील लोकप्रिय साप्ताहिक आहे.
तेलंगणमधील वरंगळ जिल्ह्यातील येनुगुर्तीहून १९२० पासून तेनुगू पत्रिका हे साप्ताहिक प्रकाशित होऊ लागले. त्यावेळचे संपादक राघव रंगाराव हे होते. १९२० पासून नलगोंडा येथून निलगिरी पत्रिका हे साप्ताहिक प्रकाशित होऊ लागले. १९२५ पर्यंत ते चालू होते. १९२५ पासून १९६६ पर्यंत गोलकोंडा पत्रिका हे साप्ताहिक चालू होते. सुखरम् प्रतापरेड्डी हे त्याचे सुरुवातीचे आणि नरोत्तम रेड्डी हे नंतरचे संपादक होते.
कृष्णा पत्रिका या सचित्र साप्ताहिकाचा आरंभ १९०२ मध्ये झाला. १९६९ पर्यंत ते चालू होते. मच्छलीपट्टम् येथून ते प्रसिद्ध होई. या साप्ताहिकांचे संपादक मट्नुरी कृष्णराव, काटुरी वेंकटेश्वरराव, कोलमवेडू रामकोटिश्वराव हे होते. १९५६ पासून ते हैदराबादहून प्रसिद्ध होऊ लागले. मुदीकोंडा सुब्रहमण्यम् शर्मा हे तेव्हापासून संपादक होते. विविध विषयांचा परामर्श घेणारे आंध्र ज्योति सचित्र वारपत्रिका हे साप्ताहिक लोकप्रिय ठरले. हे विजयवाड्याहून १९६६ पासून प्रकाशित होत आहे. पुराणम सुब्रहमण्यम् शर्मा हे त्याचे संपादक आहेत. विजयवाडा येथून १९४८ पासून विजयवाणी हे साप्ताहिक निघते. मल्लेला श्रीराममूर्ती हे त्याचे संपादक आहेत.
प्रजायुग पक्षपत्रिका हे साप्ताहिक १९६१ पासून हैदराबादहून प्रसिद्ध होते. त्याचे संपादक पी. ए. आचार्य हे आहेत. त्याशिवाय स्वतंत्र, पोलिकेला प्रजावाणी, दिव्यवाणी, भाग्यनगर पत्रिका, आंध्र केसरी ही साप्ताहिके उल्लेखनीय आहेत.
तेलुगू मासिकांपैकी काही उल्लेखनीय ठरतात. त्यांपैकी भारती हे मासिक १९२४ पासून मद्रासहून प्रसिद्ध होत आहे. त्याचे संस्थापक संपादक काशीनाथुनी नागेश्वरराव पंतुलु हे होते. विद्यमान संपादक गन्नावरपु सुब्बारामण्णा हे आहेत. हे मासिक विविध विषयाला वाहिलेले आहे. श्रवन्ति हे मासिक १९५१ पासून दक्षिण भारत हिंदी प्रचार सभा प्रकाशित करते. त्यात अनुवाद साहित्यावर भर दिला जातो. त्याचे संपादक वेपुरि राधाकृष्ण मूर्ती हे आहेत. १९४१ पासून ए. सुधाकरराव यांनी युवा हे मासिक सुरू केले. आध्रं साहित्य परिषद पत्रिका हे वाङ्मयीन प्रकाशन १९११ पासून सुरू आहे. काकिनाडा येथून ते प्रकाशित होते. त्याचे विद्यमान संपादक जयंती रामय्या पंतुलू हे आहेत. गृहलक्ष्मी हे स्त्रियांसाठी असलेले मासिक डॉ. के. एन्. केसरी संपादन करतात. मद्रासहून त्याचे प्रकाशन १९३० पासून होत आहे. पूर्वी मासिक हे उत्कृष्ट तेलुगू लेखनास सुवर्णकंकण पारितोषिक देत असे. तेलुगू भाषापत्रिका हे षण्मासिक असून परदेशस्थ संशोधकांचेच लेखन त्यातून प्रकाशित होते. १९७० पासून विजयवाड्याहून त्याचे प्रकाशन केले जाते. पुच्या वेंकटरामय्या हे विद्यमान संपादक आहेत.
तेलुगूत मुलांसाठीही काही मासिके निघत असातात. त्यांपैकी बालमित्र नावाचे मासिक १९४५ पासून मद्रास येथून प्रकाशित होत आहे. बुज्जाय्यी नावाचे दुसरे एक बालमित्र मासिक १९७४ पासून जे. वी. राव यांच्या संपादकत्वाखाली मद्रासहून प्रकाशित केले जाते. चंदामामा हे विशेष प्रसिद्ध असे मुलांचे मासिक चक्रपाणी यांनी १९४५ पासून सुरू केले. त्याच्या मराठीसकट इतरही काही भारतीय भाषांतील आवृत्त्या दरमहा प्रसिद्ध होत असतात.
यांशिवाय परिशोधन, प्रबुद्धांध्र, प्रतिभा, सृजन, विज्ञानम, विज्ञानवादी, वैज्ञानिक पत्रिका, तत्त्ववाद ही संशोधनात्मक, वैज्ञानिक व तत्त्वज्ञानात्मक विषयांना वाहिलेली तेलुगू मासिकेही उल्लेखनीय आहेत.
जोशी, द. पं.
मलयाळम् नियतकालिके : मलयाळम् नियतकालिकांच्या आरंभाचे श्रेयही मिशनऱ्यांकडेच जाते. बाझेल मिशनतर्फे भारतात आलेले डॉ. हेरमान गुंडर्ट हे या मलयाळम् नियतकालिकांचे जनक. त्यांनी पहिला मलयाळम्-इंग्रजी-मलयाळम् शब्दकोश तयार केला. त्याचप्रमाणे राज्यसमाचारम् (१८४७) व पश्चिमोदयम् ही नियतकालिकेही सुरू केली. ही नियतकालिके तेल्लीचरी येथून प्रसिद्ध होत. त्याच सुमारास ज्ञाननिक्षेपम् (१८४८), विद्यासंग्रहम् (१८६४) आणि संदिष्टवादी (१८६७) ही नियतकालिके कोट्टयम येथून प्रसिद्ध होऊ लागली. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यास मिशनऱ्यांनी काढलेल्या एतद्देशीय भारतीय भाषांतील अशा नियतकालिकांचा प्रमुख उद्देश धर्मप्रसाराचाच असे त्याला मलयाळम् भाषेतील ही आरंभीची नियतकालिकेही अपवाद नव्हती.
पुढे लवकरच हे स्वरूप बदलले व एतद्देशियांनीही या क्षेत्रात आपला वाटा उचलण्यास सुरुवात केली. त्यांच्या नियतकालिकांचे आरंभीचे स्वरूप अर्थातच धर्मसुधारणा, स्वभाषेची उन्नती व प्रकार, स्वभाषेतील वाङ्मयाची जोपासना, समाजप्रबोधनाची चळवळ व भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सहभाग या स्वरूपाचे होते. मलयाळम् नियतकालिकसृष्टीत हेच दृश्य प्रामुख्याने दिसते. तथापि मलयाळम्मध्ये वाङ्मयीन नियतकालिके ही इतर प्रकारच्या नियकालिकांपेक्षा संख्येने अधिक दिसतात. साहित्यविषयक पहिले मलयाळम् नियतकालिक विद्याविलासिनी (१८८१–८३) हे होय. विशाखम् तिरुनाळ् आणि केरळवर्मा वलियकोयिल तंपुरान यांच्या प्रोत्साहनाने हे नियतकालिक त्रिवेंद्रम येथून प्रसिद्ध होई. कोचीनहून देवजी भीमजी या एका गुजराती व्यापाऱ्याने सुरु केलेले केरळमित्रम् (१८८१) हे नियतकालिकही १५ वर्षे नियतमितपणे निघत होते. तरीपण वाङ्मयाला निष्ठापूर्वक वाहिलेल्या मलयाळ मनोरमा (१८९०) व भाषापोषिणी (१८९२–१९४०) या नियतकालिकांचे स्थान मलयाळम् साहित्यसृष्टीत मानाचे आहे. त्यांचे संपादक कंटत्तिल वर्गीस माप्पिळ हे होते. मलयाळम् कवींना संघटित करून ‘कविसमाजम्’ स्थापण्याचे श्रेयही त्यांच्याकडे जाते. ही नियतकालिके कोट्ट्यम येथून निघत. साहित्य प्रसार व प्रचार यांबरोबर अभिरुचिसंपन्न सुजाण वाचकवर्ग निर्माण करण्याचे भरीव कार्य या मासिकांनी केले. त्याशिवाय कोझिकोडे येथून निघणारे केरळसंचारी (१८८८ संपा. वेङ्यिल कुञ्ञुरामन् नायनार), क्विलॉनजवळील परुर येथून निघणारे सुजनानंदिनी (१८९१ संपा. केशवन् आशान), मितवादी (१९०७ संपा. सी. कृष्णन् व मुकोत्तु कुमारन), स्वदेशाभिमानी (१९०५ संपा. के. रामकृष्केण पिळ्ळै) व मंगलोदयम् (१९०७ संपा. अप्पन तंपुरान) ही नियतकालिकेही या दृष्टीने उल्लेखनीय आहेत.
मलयाळम् साहित्यातील कथा, काव्य, कादंबरी, निबंध इ. सर्वच साहित्यप्रकारांची जोपासना व संवर्धन या नियतकालिकांनी केलेले दिसते. काही नियतकालिके तर केवळ एखाद्या विशिष्ट साहित्यप्रकारासच वाहिलेली आढळतात. उदा., कवितेला वाहिलेली कवनकौमुदी (१९०६–३१) व कविताविलासिनी (१९१२–३७) ही अशा नियतकालिकांपैकी उल्लेखनीय होत. त्यांचे संपादक अनुक्रमे पंतळम् केरळवर्मा आणि पी. जी. नारायण पणिक्कर हे असून ती कायमकुलम् येथून प्रसिद्ध होतात. त्रिचूरहून अप्पन तंपुरान यांच्या संपादकत्वाखाली निघणारे रसिकरंजिनी (१९०३–०७) हे नियतकालिकही या स्वरुपाचेच होते. स्वातंत्र्योत्तर काळात विद्यापीठे व साहित्यसंस्था यांनीही असे प्रयत्न जाणीवपूर्वक केलेले दिसतात. केरळ विद्यापीठातून निघणारे व संशोधनास वाहिलेले पाक्षिक भाषासाहिती, त्रिवेंद्रम येथून लँग्वेज इन्स्टिट्यूटतर्फे निघणारे विज्ञानकैरळी, त्रिचूरहून केरळ साहित्य अकादेमीतर्फे निघणारी साहित्यलोकम् व साहित्यचक्रवाळम्, केरळ साहित्य समितीचे मनोराज्यम् (संपा. एम्. आर्. चंद्रशेखरन्) आणि त्रिवेंद्रमहून निघणारे ग्रंथालोकम् ही अशी काही प्रमुख नियतकालिके होत. मितवादी, भाषापोषिणी व विवेकोदयम् या जुन्या महत्त्वाच्या नियतकालिकांचेही पुन्हा नव्याने पुनरुज्जीवन करण्यात आलेले आहे.
वाङ्मयीन नियतकालिकांखेरीज सामाजिक, सांस्कृतिक उद्देशांना वाहिलेली नियतकालिकेही मलयाळम्मध्ये विपुल दिसतात. ए. बालकृष्णन् पिळ्ळै यांच्या संपादकत्वाखाली त्रिवेंद्रमहून निघणारे प्रबोधकम् व केसरी आणि कोचीनहून के. अय्यप्पन् यांच्या संपादकत्वाखाली निघणारे सहोदरन् ही त्यांपैकी उलेखनीय होत तर स्त्रियांसाठी चालविलेली केरळीय सुगुण बोधिनी (१८८७), महाराणी, शारदा (१९०५), महिलारत्नम् (१९१६) ही अशा स्वरूपाची नियतकालिके आहेत. केरळमधील ईळव नावाच्या अस्पृश्य जातीच्या उद्धारार्थ नारायण गुरुस्वामी यांनी स्थापन केलेल्या ‘श्री नारायण धर्म परिपालन योगम्’ या संस्थेचे विवेकोदयम् हे संघटनाकार्यास व सामुदायिक चळवळीस वाहिलेले मुखपत्र आहे. आधुनिक काळातील प्रसिद्ध मलयाळम् कवी व समाजसुधारक कुमारन आशान हे त्याचे काही काळ संपादक होते. युक्तिवादी हे एम्. सी. जोसेफ यांच्या संपादकत्वाखाली निघणारे ध्येयवादी नियतकालिक बौद्धिक चर्चेला वाहिले आहे.
आत्मपोषिणी (संपा. वळ्ळत्तोळ् नारायण मेनन), साहित्यपरिषत् (संपा. उळ्ळूर एस्. परमेश्वर अय्यर आणि जी. शंकर कुरूप), मद्रासहून निघणारे समीक्षा (१९६३ संपा. एम्. गोविंदन), त्रिवेंद्रमहून निघणारे केरळकविता (१९६७), एर्नाकुलम्हून निघणारे तिलकम् (१९६१ संपा. जी. शंकर कुरुप), तेल्लीचरीहून निघणारे मानदंडम्, केरळ डायजेस्ट (१९६७ संपा. के. व्ही. रामचंद्र पै), कौमुदी (संपा. के. बालकृष्णन्) व शलाका (संपा. कायिक्कर राजू) या सध्या बंद झालेल्या, परंतु दर्जेदार नियतकालिकांचा उल्लेखही येथे आवर्जून करावा लागेल.
आधुनिक काळात विविध विषयांना वाहिलेली जी अनेक नियतकालिके आहेत, त्यांमध्ये साप्ताहिकांचा उल्लेख आवर्जून करावा लागेल. कोट्टयम येथून निघणारे मलयाळ मनोरमा आणि कोझिकोडेहून निघणारे मातृभूमी (१९३२) ही त्यांपैकी प्रमुख साप्ताहिके असून त्यांचे संपादक के. पी. केशव मेनन हे आहेत. कलाकौमुदी हेही महत्त्वाचे साप्ताहिक असून ते त्रिवेंद्रम्हून निघते. सध्याच्या कालखंडातील उल्लेखनीय अशी नियतकालिके म्हणजे क्विलॉनहून निघणारी मलयाळनाडू व कुकुंमम्, मनश्यास्त्रम् आणि सैक्को ही मानसशास्त्रास वाहिलेली नियतकालिके, एम्. एम्. हसन यांच्या संपादकत्वाखाली कलाशाला, आर्. कृष्ण पिळ्ळै यांच्या संपादकत्वाखाली निघणारे योजना, चिन्त (संपा. ई. एम्. एस्. नंबुद्रीपाद), गुरुकुलम् (संपा. एम्. एन्. प्रसाद), योगनादम् (संपा. पी. एस्. वेलयुधन), देशाभिमानी, जनयुगम्, चंद्रिका, केली (संपा. एम्. आर्. भट्टतिरिप्पाट्) इ. होत.
वरील विविध नियतकालिकांचे संपादन मलयाळम्मधील नामवंत लेखक व विचारवंत यांनी केलेले आहे. इतर अनेक तज्ञांचीही मलयाळम् नियतकालिकसृष्टीत आदराने दखल घेतली जाते. श्रीकंठेश्वरम् पद्मनाभ पिळ्ळै, कट्टक्कयत्तिल चेरियान माप्पिळ, के. सी. मामन माप्पिळ, के. एम्. चेरियान्, के. एम्. मॅथ्यू, एन्. व्ही. कृष्णवारियर, बॅरिस्टर ए. के. पिळ्ळै, टॉमस पॉल, एम्. पी. पॉल, एम्. आर्. नायर, व्ही. सी. बालकृष्ण पणिक्कर, पालियत्तु चेरिय कुंजुण्णी अच्चन, आट्टूर कृष्णपिषारटी, काम्पीश्शेरी करुणाकरन् इ. त्यांपैकी महत्त्वाची नावे होत.
मलयाळम् नियतकालिकसृष्टी ही अतिशय समृद्ध व व्यापक अशी संस्थाच बनलेली असून संख्या व प्रकार यांचे तीत वैविध्य दिसून येते. परिणामतः प्रतिवर्षी त्यांच्या संख्येत सारखी भरच पडत असते. १९६४ मध्ये सु. ३०० नियतकालिके मलयाळम्मध्ये निघत होती, तर १९७४ मध्ये त्यांची संख्या ६८६ झाली आहे. शिक्षण, चित्रपट वा अन्य संकीर्ण विषय तसेच विडंबनात्मक अथवा बालकांची नियतकालिके यांचाही त्यांत समावेश असून, सर्व थरांतील वाचकवर्गांच्या विविध प्रवृत्तींना त्यांत अभिव्यक्ती लाभलेली दिसते. केरळबाहेर राहणाऱ्या भारतातील त्याचप्रमाणे परदेशांतील मलयाळम् भाषिकांनीही काही नियतकालिके प्रसिद्ध केलेली दिसतात. मलयाळम्–हिंदी, मलयाळम्–इंग्रजी अशी द्वैभाषिक नियतकालिकेही प्रसिद्ध होत आहेत. तथापि नियतकालिकांच्या प्रकाशनात झालेली ही संख्यात्मक वाढ गुणात्मक आहे, असे निर्विवादपणे म्हणता येणार नाही.
भास्करन्, टी. (इं.)., पोरे, प्रतिभा (म.)
तमिळ नियतकालिके : तमिळ भाषेतील मुद्रणाची सुरुवात व गद्यात्मक लेखनाचा प्रारंभ ख्रिस्ती धर्मोपदेशकांनीच केल्यामुळे त्या भाषेतील नियतकालिकांच्या निर्मितीचे श्रेयही त्यांच्याकडेच जाते. तमिळमधील सर्वांत पहिले नियतकालिक तमिळ मॅगझिन हे ‘ख्रिश्चन रिलिजीअस ट्रॅक्ट सोसायटी’ने १८३१ साली सुरू केले, तर १८५६ मध्ये मद्रासहून दिन वर्तमानी हे साप्ताहिक प्रकाशित होऊ लागले. या दोन्ही नियतकालिकांचे धोरण धार्मिक प्रसाराचेच होते. पुढे जी. सुब्रमण्यम् अय्यर यांच्या संपादकत्वाखाली १८८२ पासून दैनिक म्हणून स्वदेशमित्रन् प्रकाशित होऊ लागले. काही वर्षांनी ते साप्ताहिक व नंतर त्रैसाप्ताहिक या स्वरूपात सुरु राहिले. हिंदूचेही संपादन तेच करीत असत.
त्यानंतर १९०४ मध्ये जी. सुब्रमण्यम् अय्यर यांनी स्वदेशमित्रन्च्या सहसंपादकाच्या जागी सुब्रहमण्य भारती या तरुण विद्याविभूषित विद्वानाची नेमणूक केली. त्यांच्या संपादकत्वाखाली स्वदेशमित्रन्ने अद्ययावत स्वरूप धारण केले. त्यातून प्रखर राष्ट्रवादी विचार प्रकट होऊ लागले आणि तमिळ गद्याचे स्वरूपही विकसित झाले. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे काही अनुयायी तसेच ब्रह्मवानिन् या इंग्रजी मासिकाचे संपादक मांदयम तिरुमालचारियर यांच्या सहकार्याने इंडिया (इन्त्य) या तमिळ नियतकालिकाचा प्रारंभ १९०६ मध्ये झाला. त्यात सुब्रहमण्य भारती राजकारणावर लिहीत असत. ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या अवकृपेमुळे भारती यांना पाँडिचेरी येथे भूमिगत राहून तेथून त्याचे प्रकाशन करावे लागले. तथापि १२ मार्च १९१० रोजी सरकारने ते बंद करण्यास भाग पाडले.
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात मात्र ख्रिस्ती धर्मप्रसाराला वाहिलेली अनेक नियतकालिके उदयास आली. उदा., स्नेहबोधन् (१८७५), वेद विळक्कम् (१८९०) व वेधबोध मत मोषी इ. त्यांना प्रत्युत्तर म्हणून हिंदूधर्मसमर्थन करणारीही अनेक नियतकालिके सुरू करण्यात आली त्यांपैकी महत्त्वाची म्हणजे शैव उदय बोधिनी (१८८२), इंतु मत चीर तिरुत्ती (१८८३) इ. होत. इस्लाम् नेशन (१९०९), तत्तुव इस्लाम् (१९२१) व दारुल् इस्लाम् (१९२२) या नियतकालिकांनीही आपले इस्लाम धर्मप्रसाराचे कार्य सुरू ठेवले होतेच.
भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीचा आणि टिळक-गांधीप्रणीत राजकीय विचारांचा प्रसार करण्यात त्याकाळी तमिळ दैनिकांप्रमाणेच नियतकालिकांनीही भरीव कार्य केले होते. त्यांपैकी नवशक्ती (१९२०), कुटियरसू (१९२५), देशबंधू (१९२६), गांधी (१९३०), सुदंतिर चंकू (१९३०), काँग्रेस (कोणग्रस्) पेरिकै (१९३८) आणि अशोक (१९४७) ही साप्ताहिके अग्रगण्य होती.
स्वातंत्र्योत्तर काळात तमिळनाडूमध्ये पक्षप्रसारास वाहिलेल्या नियतकालिकांची वाढ विशेष वेगाने झाली. त्याचप्रमाणे सवर्ण हिंदूंच्या वर्णाश्रमव्यवस्थेला व जातिभेदाला विरोध करणाऱ्या ‘द्रविड कळघम’ व ‘द्रविड मुन्नेत्र कळघम’ या चळवळींची नियतकालिके सुरू झाली. पूंतोट्टम् (१९४७), तोषन् (१९४७), द्राविड येडू (१९५७) ही द्रविड कळघम संघटनेची आणि तमिषर् नाडू (१९४८) व पकुत्तरिवू ही द्रविड मुन्नेत्र कळघमची मुखपत्रे आहेत. या दोन संघटना एकत्रित करण्यासाठी १९५२ पासून द्राविडकूट्टरशू हे नवीन नियतकालिक उदयास आले.
यांखेरीज विविध सामाजिक प्रश्नांची चर्चा करणारी तमिळ नियतकालिके आपापल्या जातिजमातींच्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी झटतात. त्यांतील काही महत्त्वाची नियतकालिके अशी : सांडोर् कुलविवेकबोधिनी (१९०९), वन्नियकुल् क्षत्रियदीपम् (१९१२), विश्वकर्मन् (१९१३), नाट्टुक्कोट्टै वैशियम् (१९१४), आर्य वैश्याभिमानी (१९१४), चेंकुंत मित्रन् (१९२२), ब्राह्मणन् (१९२५), यादवमित्रन् (१९२९), कुलालमित्रन् (१९३१), आदि द्राविड मित्रन् (१९३४), वळ्ळुवर् (१९५०) व नूरुळ् हक् (१९४८) इत्यादी. स्त्रीवर्गाच्या न्याय्य हक्कांना व प्रगतीला जपणारी अनेक नियतकालिके तमिळमध्ये गेल्या शतकापासूनच सुरू झालेली होती. उदा., महाराणी (१८८७), मातर् मैत्री (१८८९), चक्कर वर्तिनी (१९०५), मातर् बोधिनी (१९११), मातर् मरुमणम् (१९३६), गृहलक्ष्मी (१९३७) आणि पुतुमैप्पेण् (१९४७) इ. तर मुलांसाठी प्रकाशित होणाऱ्या तमिळ नियतकालिकांत बलियार मित्रन् (१९११), बालविनोदिनी (१९१८), बालचिंतामणी (१९३५), अंबुलि माम् (१९४७), अंबि तंपी (१९४९), कण्णन् (१९५०) व कल्क्कंटू (१९५१) ही नियतकालिके अग्रेसर मानली जातात.
यांखेरीज शिक्षण, चित्रकला, स्थापत्यशास्त्र, संगीत, वैद्यक, योग, उद्योग, चित्रपट व विज्ञान अशा विविध विषयांना वाहिलेली दर्जेदार मासिके, साप्ताहिके, पाक्षिके इत्यादींनी तमिळ नियतकालिकांचे क्षेत्र बरेच विस्तारले असून विज्ञानावरील मोजक्या परंतु दर्जेदार ज्ञानपत्रिकांमधून वस्तुनिष्ठ शास्त्रीय माहिती आढळते. त्यांपैकी चिर्प्पक्कलै (१९४७), नाट्टियम् (१९४९), कलैक्कतिर् (१९४८), व विज्ञानी (१९५३) ही चित्रकलेवरील नियतकालिके आकाराने लहान असली, तरी ती उत्तरोत्तर विकसनशील आहेत. संगीतावरील संगीत अभिमानी (१९३४) व वास्तुशास्त्रावरील शिल्पश्री (१९३८) तसेच चित्रपटक्षेत्रातील सिनेमा उलहम् (१९३५), आटल् पाटल् (१९३५), ज्योती (१९३९), कलै (१९४७) व पार्वती (१९५०) ही नियतकालिके प्रसिद्ध आहेत. आयुर्वेदावरील आरोग्यबोधिनी (१९०८), सुखाधार बोधिनी (१९२३), आयुळ् वेदम् (१९२३), आरोग्यदीपकै (१९२४), आयुर्वेदजीवरक्षकम् (१९३२), वैद्य चंद्रिक (१९३८) व अगस्तियन् (१९४४) इ. नियतकालिकांतून त्या त्या संस्थेचा वृत्तांत आणि त्याच्या उत्पादनाची माहिती आढळते. तसेच योगासन आलय विजयम् (१९४९) व नल् वाषवू (१९५९) ही योगावरील आणि अच्चुतोशिल् (१९२६), चिर्पक्कलै (१९४७) व कलैक्कतिर् (१९४८) ही औद्योगिक क्षेत्रातील नियतकालिकेही उल्लेखनीय आहेत. विवेक चिंतामणी (१८९२), तमिळ नेशन् (१९१७) व विज्ञानी (१९५३) ही प्रारंभीची शास्त्रीय माहिती देणारी नियतकालिके अल्पजीवी ठरली असली, तरी कलैक्कतिर् हे वैज्ञानिक मासिक अग्रेसर मानले जाते.
विसाव्या शतकाच्या प्रारंभापासूनच तमिळ वाङ्मयविकासाची दृष्टी बाळगणारी अनेक मासिके उदयास आली. त्यांनी तमिळ संस्कृती, तमिळ साहित्य व तमिळ भाषा यांच्या विकासासाठी मोठेच कार्य केले. त्यातच तमिळ सांस्कृतिक संस्थांनी सुरू केलेल्या मासिकांचीही भर पडली. अशा नियतकालिकांतून प्रामुख्याने प्राचीन तमिळ साहित्य व संस्कृती यांसंबंधीचे संशोधन, प्राचीन तमिळ साहित्याचे विवेचन आणि भाषाशास्त्रीय व व्याकरणविषयक लेखन इत्यादींना चालना मिळाली. या दृष्टीने मद्रास येथील ‘मदुरै तमिळ संगम्’ द्वारे प्रकाशित होणारे चेंतमीळष्, शैवसिद्धांत कझकम् द्वारे प्रसिद्ध होणारे चेंतमिळष् चेल्वी (१९२३) व ‘तंजोर करंथै तमिळ संगम्’ द्वारे प्रसिद्ध होणारे तमिष पोषिल् (१९२५) यांचा उल्लेख करावा लागेल तर याच ध्येयधोरणाचा पाठपुरावा करणारे कोंकू, आरायची, पुलमै या नियतकालिकांचा नामनिर्देश आवश्यक ठरतो. त्यांचे स्वरूप अधिक वस्तुनिष्ठ व अत्याधुनिक आहे. आरायचीमधून मानवशास्त्र, समाजशास्त्र व लोकविद्या इ. विषयांवरील लेखन विशेषत्वाने असते, तर तेन् मोषी, मुल्लै (१९७०), चेंपरिती, माणाक्कन् ही चार केवळ तमिळ साहित्याला वाहिलेली नियतकालिके आहेत.
विवेक चिंतामणी व ज्ञानबोधिनी या नियतकालिकांनी प्रारंभ काळातील कादंबरीच्या विकासाच्या दृष्टीने बरेच भरीव कार्य केले. मातवय्या आणि राजम्अय्यर यांसारख्या प्रारंभीच्या कादंबरीकारांचे लेखनसहकार्य त्यांना लाभले होते. राणिमुत्तू या कादंबरी वाङ्मयाला वाहिलेल्या नियतकालिकाचाही उल्लेख करणे क्रमप्राप्त ठरते. दर महिन्याला एकतरी कादंबरी त्यातून प्रकाशित करण्यात येतेच.
कथावाङ्मयाच्या दृष्टीने रत्नाकारम् (१९१८), कथानिधी (१९३८) व कलावल्ली (१९५५) यांचा निर्देश करावा लागेल. यांतून लघुकथांप्रमाणेच अन्य प्रकारचे साहित्यही प्रकाशित करण्यात येते. तथापि निर्भेळ लघुकथांच्या दृष्टीने मणिक्कोटी (१९३३) हे मासिक महत्त्वाचे आहे. तमिळ लघुकथांचा विकास घडवून आणण्यात त्याला महत्त्वाचे स्थान आहे. अनेक नामवंत लेखकांना प्रथम प्रकाशात आणण्याचे कार्य याच मासिकाने केले आहे. याचे श्रेय त्या मासिकाचे संपादक के. श्रीनिवासन् व सहसंपादक व्ही. रामस्वामी यांनाच द्यावे लागेल. तसेच पुदुमैप्पित्तन या प्रसिद्ध तमिळ लघुकथा लेखकाचेही संपादनसहकार्य या मासिकाला लाभले होते.
केवळ कविता प्रकाशनाला वाहिलेली अनेक नियतकालिके तमिळमध्ये आहेत. उदा., श्री. सुब्रहमण्य भारती कविता मंडलम् (१९५५), कुयिल् (१९४०), सुरथ (१९६६) व कवितै (१९६४) इत्यादी. यांतून प्रकाशित होणारी कविता ही परंपरागत छंदोरचनेची आहे. त्यांपैकी पहिल्या दोन मासिकांचे संपादक भारतीदासन् हे एक प्रख्यात कवी आहेत. तमिळ साहित्यिकांनी मुक्तछंदाचादेखील अवलंब केलेला आहे. अशा कविता प्रमुख्याने वानम्पाटी या नियतकालिकातून प्रकाशित करण्यात येतात.
साहित्य-समीक्षेला वाहिलेल्या एषुत्तू या नियतकालिकाचा आरंभ १९५९ मध्ये झाला. त्याच्या प्रारंभापासूनच सी. एस्. चेलप्पा हे मान्यवर समीक्षक या मासिकाचे संपादक आहेत. त्यांनी अनेक नवोदित समीक्षकांना व कवींना प्रोत्साहन देऊन पुढे आणले परंतु १९७० मध्ये हे नियतकालिक बंद पडले व त्याची जागा इलक्विय वट्टम् (१९६३) याने घेतली. त्याचे संपादक के. एन्. सुब्रमण्यम् होते. तेही एक प्रसिद्ध टीकाकार मानले जातात. त्यांनी आपल्या मासिकातून जागतिक वाङ्मयाचे व लेखकांचे दर्शन घडविले. संस्कारवादी समीक्षेला त्यातून अधिक वाव मिळाला होता. तेही १९६५ मध्ये बंद पडले.
मणिक्कोट्टी हे मासिक बंद पडल्यानंतर त्याच्या प्रभावळीतील साहित्यिक मंडळींनी विवध नियतकालिके प्रकाशित करण्यास सुरुवात केली. त्यांपैकी काही पुढीलप्रमाणे होत. सूरावली (१९३४), हनुमान् (१९४०), क्राम ऊळीयन् (१९४३), कलामोहिनी (१९४५), चंद्रोदयम् (१९४५), तेनी (१९४८), भारत देवी (१९३९), चिंतनै (१९४७) इत्यादी. त्यांतून प्रामुख्याने लघुकथा व समीक्षणात्मक लेख इत्यादींना वाव देण्यात येई.
स्वातंत्र्योत्तर काळात ज्या काही पुरोगामी साहित्यिक नियतकालिकांची भर पडली त्यांत मुल्लै (१९४६), शक्ती (१९४९), शांती (१९५४), सरस्वती (१९५५) व तामरै (१९५८) यांचा निर्देश आवश्यक ठरतो. त्यांतूनही नवकाव्य, लघुकथा, समीक्षा इत्यादींचे प्रकाशन होते. त्यांपैकी तामरैचे संस्थापक प्रसिद्ध लेखक जीवानंतम् असून त्यातून लोकगीतांच्या प्रसिद्धीस वाव देण्यात येतो. ही आधुनिक नियतकालिके बहुधा अल्पायुषीच असतात त्यामुळे ती एकदोन वर्षेच सुरू राहतात. अपवाद म्हणूनच एखादे दीर्घकालीन ठरते. कथाकादंबऱ्याप्रमाणेच पण प्रामुख्याने विडंबनात्मक साहित्यासाठी प्रसिद्ध असलेली वैशिष्ट्यपूर्ण नियतकालिके म्हणून आनंद विकटन् (१९२८), आनंद विजय विकटन् (१९२८), प्रचंड महाविकटन् (१९२८), प्रचंड विकटन् (१९३३), वसंत विकटन् (१९३३), कुमार विकटन् (१९३३), कुरुंपन् (१९३३) आणि आन्द कूत्तन् (१९३५) यांचा उल्लेख करावा लागेल.
अनेक तरुण लेखक-समीक्षकांनी १९६० नंतरच्या काळात काही नियतकालिके सुरू केली. उदा., नटै, दीपम् (१९६५), कणैयाळी (१९६५) व ज्ञानरथम् (१९७०) इत्यादी त्यांपैकी दीपम् हे विशेष प्रसिद्ध होते. त्या सर्वांमधूनच मुक्तछंदातील कविता, लघुकथा व समीक्षा इत्यादींना स्थान देण्यात येई. ज्ञानरथम्चे प्रकाशक प्रसिद्ध तमिळ कादंबरी लेखक जयकांतन् आणि दीपम्चे विख्यात तमिळ कादंबरीकार व लघुकथालेखक एन्. पार्थसारथी हे होते तर प्रज्ञै व कन्नदासन् या नियतकालिकांचे संस्थापक प्रसिद्ध भावगीतकार कण्णदासन् असून त्यातून आधुनिक काव्य, लघुकथा आणि समीक्षा इत्यादींना चालना देण्यात आली. सांप्रत आनंद विकटन्, कल्की, कुमुदम्, कलैमकळ् व मंजरी ही लघुकथा, कादंबरी आणि तमिळ संस्कृती यांचे दर्शन घडविणारी नियतकालिके आघाडीवर आहेत. कल्कीचे संस्थापक आणि संपादक (१९४१–५४) प्रसिद्ध तमिळ कादंबरीकार कल्कि हे होत तर कलैमकळ्चे संपादक लोकप्रिय लेखक के. व्ही. जगन्नाथन् हे आहेत.
पहा : लघु नियतकालिके वृत्तपत्रे.
एलयपेरुमल, एम्. (इं.) जोशी, चंद्रहास (म.).
संदर्भ : 1. Natarajan, S. A History of the press in India, Bombay, 1962.
2. Sen, S. P. The Indian Press, Calcutta, 1967.
३. कानडे, रो. गो. मराठी नियतकालिकांचा इतिहास, मुंबई, १९३८.
४. वैदिक, वेदप्रताप, संपा. हिंदी पत्रकारिता विवध आयाम, दिल्ली, १९७६.
“