निद्रारोग : (ट्रिपॅनोसोमियासिस). प्रोटोझोआ संघाच्या ⇨ ट्रिपॅनोसोमा या वंशातील परजीवींच्या (दुसऱ्यावर उपजीवीका करणाऱ्या जीवांच्या) संक्रामणापासून होणाऱ्या रोगाला निद्रारोग म्हणतात. हा रोग आफ्रिकेच्या विषववृत्तीय प्रदेशातच (१२ उ. व २५ द. या अक्षांशांच्या दरम्यानच्या प्रदेशात) आढळतो म्हणून तो ‘आफ्रिकी निद्रारोग’ म्हणूनही ओळखला जातो. ट्रिपॅनोसोम परजीवींच्या अग्र टोकावर एकच कशाभिका (दोऱ्यासारखी लांब निमुळती संरचना) असते आणि ते मानव व इतर काही प्राण्यांच्या रक्तरसावर वाढतात म्हणून त्यांना ‘रुधिर कशाभिकायुत’ असेही म्हणतात. त्यांच्यापैकी (१) ट्रि. गँबिएन्स, (२) ट्रि. ऱ्होडेसिएन्स व (३) ट्रि. क्रूझाय या तीन जाती मानवात रोग उत्पन्न करतात. पहिल्या दोन प्रकारचे परजीवी फक्त आफ्रिकेतच सापडतात व त्यांचे रोगवाहक निरनिराळ्या प्रकारच्या त्सेत्से माश्या असतात [⟶ त्सेत्से माशी].ढेकूण तिसऱ्या प्रकारचे परजीवी वाहून नेतात आणि ते दक्षिण व मध्य अमेरिका तसेच मेक्सिको या भागांतच आढळतात. त्यांच्यामुळे होणाऱ्या विकृतील ‘अमेरिकन ट्रिपॅनोसोमियासिस’ किंवा ‘शागास रोग’ (कार्लूस शागास या ब्राझीलमधील शरीरक्रियावैज्ञानिकांच्या नावावरून) असे म्हणतात. या रोगाचा समावेश या नोंदीत केलेला नाही.

त्सेत्से माश्यांपैकी ग्लॉसिना पॅल्पॅलिस ही ट्रि. गँबिएन्स वाहून नेते व ग्लॉ. मॉर्सिटान्स ही ट्रि. ऱ्होडेसिएन्स वाहून नेते. पहिल्या जातीची माशी पाण्याच्या जवळपास म्हणजे नद्या, सरोवरे, तळी वगैरेंच्या काठच्या प्रदेशात वास्तव्य करते म्हणून रोगही या भागातील रहिवाशांमध्येच होतो. दुसऱ्या जातीची माशी कोरड्या भागातून व विशिष्ट प्रकारच्या झुडपांतून आढळते व अशा प्रदेशातील रहिवाशांमध्ये रोग फैलावते. टांझानियात रोग पसरविण्यास जी माशी कारणीभूत असते तिला ग्लॉ. स्वायनेरटोनी म्हणतात व ती याच भागापुरती मर्यादित असते. त्सेत्से माश्यांचे काही प्रकार जंगली प्राणी आणि दुभत्या जनावरांतही रोग फैलावण्यात कारणीभूत असतात. मानवी जीवन पुष्कळ अंशी (दूध व मांस यांकरिता) या प्राण्यावर अवलंबून असल्यामुळे दोघांनाही हानिकारक अशा या माशीमुळे आफ्रिकेतील अनेक भाग ओसाड बनल्याची इतिहासात नोंद आहे.

आ. १. ट्रिपॅनोसोमांचे जीवनचक्र : (अ) त्सेत्से माशीमधील : (१) लांब व बारीक आकार, (२) द्विभाजन होताना, (३) आखूड आकाराचा, (४) माशीच्या लाला ग्रंथीतील आकार (आ) मानव व इतर प्राण्यांमधील : (१) लांब व बारीक आकार, (२) मधला प्रकार, (३) द्विभाजन होताना [ट्रि. गँबिएन्सी इतर प्राण्यांतही, उदा. झीब्रा, डुक्कर, काळवीट इ. वाढतो ].

परजीवींचे जीवनचक्र व संक्रामण : ट्रिपॅनोसोमा बहुरूपी (अनेक आकारांचे) असतात. त्यांची सर्वसाधारण लांबी १५ ते ३०µ (µ मायकॉन = १०-३ मिमी.) असते. ते तीन प्रमुख आकारांत आढळतात. (१) लांब, बारीक, तर्कूच्या आकाराचे आणि एकाच मोकळी कशाभिका असलेले, (२) आखूड, जाड आणि कशाभिकाविरहित व (३) मधला प्रकार. मानवी रक्तात किंवा लसीका- ग्रंथींतील [रक्तद्रवाशी साम्य असलेला आणि ऊतकांकडून–म्हणजे पेशीसमूहांकडून–रक्तात मिसळणारा द्रव म्हणजे लसीका वाहून नेणाऱ्या सूक्ष्म नलिकांतील ग्रंथिसदृश पुंजातील ⟶ लसीका तंत्र] द्रवात मधला प्रकार आढळतो. प्रत्येक ट्रिपॅनोसोम अनुदैर्घ्य (उभ्या) द्विभाजनाने गुणित होतो म्हणजे एकाचे दोन बनत जातात.

या परजीवींच्या जीवनचक्रातील एक भाग त्सेत्से माशीमध्ये पूर्ण होतो. ही माशी त्यांचा मध्यस्थ पोषक (ज्याच्या शरीरात राहून प्राणी संरक्षण व अन्न मिळवितो तो) असते. परजीवी रक्तात असलेल्या व्यक्तीला ही माशी चावली म्हणजे त्याच्या रक्तातील परजीवी तिच्यात शिरतात. माशीच्या आंत्रमार्गात (आतड्याच्या मार्गात) त्यांच्या संस्थेत वाढ होते व ते तिच्या लाला ग्रंथीत येतात. अशा माशीच्या चावण्याबरोबर तिच्या लाळेतून ते माणसाच्या किंवा प्राण्याच्या रक्तात उतरतात. माशीतील वाढ पूर्ण होण्यास १० ते ३० दिवस लागतात. नर आणि मादी दोन्ही रोगवाहक असतात. क्वचित वेळा रोग एका व्यक्तीमधून मध्यस्थाशिवाय नेला जातो व याला ‘यांत्रिक संक्रामण’ म्हणतात. माशीच्या चाव्यापासून रोग फैलावण्यात ‘अंत:क्रामणजन्य संक्रामण’ म्हणतात. पहिल्या प्रकारचे संक्रामण अधिक गंभीर स्वरूपाचे असते.

प्राणी किंवा मानव अंतिम पोषक असतो. माशीच्या चाव्याबरोबर तिच्या लाळेतील परजीवी ज्या जागी शिरतात त्या जागीच त्यांचे गुणन होते. त्यानंतर ते लसीकावाहिन्या व रक्तवाहिन्या यांच्याद्वारे सर्व शरीरभर पसरतात. माशी चावल्यापासून १० किंवा अधिक दिवसांनंतर रोगलक्षणांना सुरुवात होते.


आ. २. काचपट्टीवर दिसणारा रक्तातील ट्रिपॅनोसोम : (१) तांबड्या रक्त कोशिका, (२) ट्रिपॅनोसोम.

लक्षणे : त्सेत्से माशीचा चावा बहुधा वेदनाकारक असतो. रोगवाहक माशीच्या चाव्यानंतर सु. १० दिवसांनंतर चावल्याजागी १·२५ सेंमी. व्यासाची पृष्ठभागावर असलेली गाठ उत्पन्न होते व तिचा मध्यभाग काळपटलेला असतो. याला ‘ट्रिपॅनोसोम व्रण’ म्हणतात. ही गाठ सु. १५ दिवसांनंतर कमी होते. या व्रणातील स्त्राव सूक्ष्मदर्शकाखाली तपासल्यास ट्रिपॅनोसोम स्पष्ट दिसतात. रोगाची सुरुवात बहुधा अलक्ष्य (लक्षात न येण्यासारखी) असते. गँबिएन्सी प्रकारात रोग हळूहळू वाढतो. अधून मधून अनियमित प्रकारचा ताप येतो व लसीका ग्रंथीची वाढ होते. ही ग्रंथिवाढ विशेषेकरून मानेतील मागच्या बाजूच्या ग्रंथींत होते व ग्रंथी हाताला कठीण, रबरासारख्या व अलग अलग लागतात. त्या वेदनारहित असतात. गोरी त्वचा असणाऱ्या व्यक्तीमध्ये सुरुवातीच्या काही आठवड्यांत पाठीवर व छातीवर त्वक्‌रक्तिमा (कातडी लाल होणे) व अवसंवलित (भोवती वर्तुळाकार व्रण असलेले) उत्स्फोट (फोड) दिसतात. आठवडाभर टिकणारा व नंतर उतरून पुन्हा येणारा ताप, जलद नाडी (केवळ तापातच नव्हे तर ताप नसतेवेळीसुद्धा), प्लीहा व यकृत वृद्धी या लक्षणानंतर काही महिन्यांनी केंद्रीय तंत्रिका तंत्रावरील [⟶ तांत्रिका तंत्र] दुष्परिणाम दिसू लागतात. डोकेदुखी, प्रवृत्तीतील बदल, दिवसात सतत झापड व रात्री निद्रानाश (केवळ झापड असल्यामुळेच या रोगाला निद्रारोग म्हटले आहे, झोप असते म्हणून नव्हे), मानसिक गोंधळ, कंप, अंशघात (अंशत: पक्षाघात), पाणी व अन्न यांचे सेवन बंद झाल्यामुळे येणारी क्षीणता आणि शेवटी बेशुद्धी व मृत्यू येतो.

ऱ्होडेसिएन्सी प्रकारात तापाचे प्रमाण अधिक असून ग्रंथिवाढ मोठ्या प्रमाणात नसते. रोगी लवकरच गंभीर आजारी बनून न्यूमोनिया किंवा आमांशासारखे उपद्रव उद्‌भवतात. विषरक्तता (शरीराच्या एका भागात सूक्ष्मजंतू गोळा होऊन त्यांच्यापासून तयार झालेली विषे रक्तपरिवहनाबरोबर शरीराच्या सर्व भागांत पसरल्यामुळे निर्माण होणारी अवस्था) किंवा हृद्‌निष्फलतेमुळे (हृदयक्रिया बंद पडल्यामुळे) रोगी दगावतो. क्वचित प्रसंगी रोग तीव्र नसल्यास तंत्रिका तंत्रजन्य विकृतीची लक्षणे उद्‌भवतात. या प्रकारात रक्त काचपट्टीवर घेऊन सूक्ष्मदर्शकाखाली तपासल्यास ट्रिपॅनोसोम दिसतात.

गँबिएन्सी प्रकारात चावल्या जागीच्या गाठीतील द्रव, वाढलेल्या लसीका ग्रंथीतील द्रव सुईने नलिकेमध्ये (सिरिंजमध्ये) ओढून घेऊन तपासल्यास तसेच रक्त तपासणीत ट्रिपॅनोसोम सापडतात. विशिष्ट पूरक बंधन परीक्षा [⟶ विकृतिविज्ञान] निदानास उपयुक्त असते.

प्रतिबंधात्मक उपाय : माश्या चावणार नाहीत याकडे लक्ष पुरविणे महत्त्वाचे असते. त्याकरिता या भूप्रदेशात वावरणाऱ्यांनी विशिष्ट कपडे, मच्छरदाण्या वगैरे वापराव्यात. शक्य त्या ठिकाणी कीटनाशके वापरून माश्यांचा नाश करावा.

पेंटामिडीन आयसेथिओनेट किंवा सुरामिनाची मांसातील अंतःक्षेपणे (इंजेक्शने) रासायानिक रोगप्रतिरोधके म्हणून उपयुक्त ठरली आहेत. सुरामीन १ ग्रॅ. मात्रेत किंवा पेंटामिडीन आयसेथिओनेट दर किग्रॅ. वजनास ४ ते ५ मिग्रॅ. मात्रेत एकदाच दिल्यास सहा महिने रोगापासून संरक्षण मिळते. ऱ्होडेसिएन्सी प्रकारात हा काळ बराच कमी असतो व म्हणून त्या प्रदेशात वारंवार रक्त तपासणी अधिक उपयुक्त असते.

उपचार : मेंदूवर परिणाम होण्यापूर्वीच इलाज करणे महत्त्वाचे असते. पेंटामिडीन आयसेथिओनेट किंवा सुरामीन हे तंत्रिका तंत्रावर परिणाम होण्यापूर्वी गुणकारी ठरतात. तसा परिणाम झाल्यानंतर आर्सेनिकयुक्त मेलॅर्सोप्रॉल किंवा मेलॅर्सोनिल पोटॅशियम ही औषधे वापरतात, कारण ती तंत्रिका ऊतकापर्यंत पोहोचू शकतात. आवर्ती प्रकारच्या (पुन:पुन्हा होणाऱ्या) रोगात नायट्रोफ्यूराझोन नावाचे औषध उपयुक्त असते. इतर औषधांनी गुण न आल्यासही हे औषध गुणकारी ठरले आहे.

संदर्भ : 1. Alstead, S. Girdwood, R. H., Eds. Textbook of Medical Treatment, Edinburgh, 1974.

            2. Davidson, S. McLeod, J., Eds. The Principles and Practice of Medicine, Edinburgh, 1973.

            3. Dey. N. C. Medical Parasitology, Calcutta, 1969.

भालेराव, य. त्र्यं.