नॉर्मंड, चार्ल्‌स विल्यमब्लीथ : (१० सप्टेंबर १८८९ – ). भारतात केलेल्या वातावरणविज्ञानविषयक संशोधन, विकसन व संघटनात्मक कार्यामुळे प्रसिद्धी पावलेले ब्रिटिश वातावरणविज्ञ. ते १९२७–४४ या काळात भारत सरकारच्या वातावरणवैज्ञानिक खात्याचे प्रमुख होते. या खात्याचा आमूलाग्र विकास करण्याचे व त्याला सध्याचे स्वरूप देण्याचे बहुतेक श्रेय नॉर्मंड यांच्याकडे जाते.

त्यांचा जन्म स्कॉटलंडमध्ये झाला. एडिंबरो विद्यापीठाची रसायनशास्त्राची एम्. ए. ही पदवी मिळविल्यानंतर ते १९११–१३ या काळात विद्यापीठात संशोधक विद्यार्थी होते. १९१३ साली त्यांची इंपिरियल मिटिऑरॉलॉजिस्ट या हुद्यावर भारतीय वातावरणवैज्ञानिक खात्यात नेमणूक झाली. जॉर्ज सिम्पसन व गिल्बर्ट वॉकर ह्या वातावरणविज्ञांच्या सहवासात नॉर्मंड यांनी अभ्यास करून आपल्या भावी संशोधनाचा पाया घातला. पहिले महायुद्ध सुरू झाल्यावर १९१६ मध्येनॉर्मंड यांची भारतीय सेनेच्या राखीव दलातील एक अधिकारी म्हणून नेमणूक झाली. १९१७ मध्ये त्यांना मेसोपोटेमियात जावे लागले. सैन्याच्या हालचालींच्या बाबतीत वातावरणवैज्ञानिक दृष्ट्या सल्ला देण्याचे काम त्यांच्यावर सोपविले होते. महायुद्ध संपल्यावर १९१९ मध्ये भारतात येऊन ते परत आपल्या पूर्वीच्या जागी रुजू झाले. मेसोपोटेमियात असताना त्यांनी मध्यपूर्वेतील जलवायुमानाचा (दीर्घकालीन सरासरी हवामानाचा) विशेषत: इराकच्या जलवायुमानाचा अभ्यास केला होता. उच्च तापमान, आर्द्रता व गतिमान वारे यांचा मानवी शरीरावर काय परिणाम होतो, तसेच बाष्पीभवन व ओल्या फुग्याने दर्शविलेले तापमान यांचे कशा प्रकारचे परस्परसंबंध असतात यांचा सूक्ष्म अभ्यास त्यांनी केला होता. या सर्वांचा समावेश त्यांनी आपल्या प्रबंधात केला आणि त्यावर १९२० मध्ये एडिंबरो विद्यापीठाची डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी मिळविली. १९२७ मध्ये ते भारतीय वातावरणवैज्ञानिक खात्याचे सरसंचालक झाले. १९४४ मध्ये ते सेवानिवृत्त झाले. त्यावेळी दुसरे महायुद्ध जवळजवळ संपण्याच्या अवस्थेत होते. तेव्हा भारतीय वातावरणवैज्ञानिक खात्याची युद्धोत्तर काळात पुनर्रचना करण्यासाठी ब्रिटिश सरकारने त्यांची मे १९४५ पर्यंत खास नेमणूक केली.

भूकंप, चक्री वादळे, महापूर, दुष्काळ, अवर्षणे अशा अनेक नैसर्गिक आपत्तींमुळे उद्‌भवलेल्या समस्या सोडविण्याच्या दृष्टीने नॉर्मंड यांनी उत्तरोत्तर भारतीय वातावरणवैज्ञानिक खात्याचा विकास करून घेतला. १९३२ मध्ये पुणे येथे कृषि-वातावरणवैज्ञानिक विभाग स्थापन केला गेला. दोन महायुद्धांमुळे भारतातील नाविक व हवाई वाहतूक वाढली. नॉर्मंड यांनी याकरिता हवामानाचे अंदाज वर्तविणारी कार्यालये अनेक ठिकाणी स्थापन केली. अनेक भारतीय वातावरणविज्ञ हवाई दलात दाखल करून घेऊन त्यांच्या खास प्रशिक्षणाची सोय केली. शिलाँग येथे भूकंपवैज्ञानिक मुख्य केंद्र स्थापन करून अनेक महत्त्वाच्या ठिकाणी भूकंपवैज्ञानिक वेधशाळा उभारल्या व १९३९ मध्ये क्कार्टर्ली सिस्मॉलॉजिकल बूलेटीन (भूकंपवैज्ञानिक विवरण पत्रिका) नावाचे त्रैमासिक सुरू केले. वातावरणवैज्ञानिक संशोधनाला प्रोत्साहन देऊन त्यांनी स्वतःच्या मार्गदर्शनाखाली १९२७ पासून ११५ वैज्ञानिक टिपणे प्रसिद्ध केली. वातावरणविज्ञानाच्या अनेक शाखांत त्यांनी बहुमोल संशोधन केले तसेच इतरांनाही संशोधनासाठी भरपूर वाव दिला. वातावरण भौतिकी, वातावरणीय स्थैर्य आणि अस्थैर्य, उच्चतर वातावरणातील परिसंचरण, वातावरणीय विद्युत्, भूचुंबकत्व, सौर भौतिकी, भूकंप, चक्री वादळांची आणि चक्रवातांची ऊष्मागतिक व गतिक संरचना, पश्चिमी अभिसारी चक्रवात, मॉन्सून चक्रवात, भारतीय सागरांवरील चक्रवातांचे व चक्री वादळांचे गमनमार्ग [→ चक्रवात], मृद्‌भौतिकी, जमिनीचे तापमानीय गुणधर्म, सूक्ष्म वातावरणविज्ञान ह्यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर त्यांनी संशोधन करवून घेतले. वातावरणवैज्ञानिक उपकरणांचा एक स्वतंत्र विभाग निर्माण करून प्रचलित वातावरणवैज्ञानिक उपकरणांत नवनवीन सुधारणा घडवून आणल्या तसेच नवीन प्रकारची उपकरणे तयार करण्यास प्रोत्साहन दिले.

त्यांचे वैयक्तिक संशोधनही मूलभूत स्वरूपाचे व मौलिक आहे. ओल्या फुग्याच्या तापमापकाने दाखविलेल्या तापमानाचा उपयोग वातावरणातील अस्थैर्य निश्चित करण्यासाठी कसा करता येतो, हे त्यांनी सोदाहरण व सप्रमाण दाखवून दिले. याबाबतीत त्यांच्या नावाने ओळखण्यात येणारा नॉर्मंड सिद्धांत आता मान्यता पावला आहे. जलवायुविज्ञान, हंगामी (दीर्घावधीच्या) हवामानाचे पूर्वानुमान या विषयांतही त्यांनी संशोधन केले. त्यांनी सुचविलेल्या कार्यमान कसोटीचा अजूनही उपयोग करण्यात येतो.

युद्धोत्तर काळात भारतीय वातावरणवैज्ञानिक खात्याच्या झालेल्या विस्ताराचे बहुतेक श्रेय नॉर्मंड यांच्या दूरदर्शी व कुशल व्यवस्थापनाकडे जाते. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी ब्रिटिश सरकारने त्यांना १९३८ मध्ये सी. आय. ई. व १९४५ मध्ये नाईट हे किताब दिले. ब्रिटनच्या रॉयल मिटिऑरॉलॉजिकल सोसायटीने १९४४ मध्ये त्यांना सिमॉन्स सुवर्णपदक अर्पण केले. १९५२ मध्ये ते लंडनच्या रॉयल सोसायटीचे सदस्य झाले. १९३८ मध्ये इंडियन सायन्स काँग्रेसच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात गणित आणि भौतिकी विभागाचे अध्यक्षस्थान नॉर्मंड यांनी भूषविले होते. अनेक भारतीय वैज्ञानिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. ते ब्रिटनच्या हवाई खात्याच्या वातावरणवैज्ञानिक संशोधन समितीचे सदस्य (१९४५–५५) व नंतर अध्यक्ष (१९५५–५८) होते, तसेच आंतरराष्ट्रीय ओझोन समितीचे ते सचिव होते. (१९४८–५९). 

चोरघडे, शं. ल.