नॉर्थ डकोटा : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी उत्तर-मध्य विभागातील राज्य. क्षेत्रफळ १,८३,०२२ चौ. किमी. पैकी पाण्याखाली सु. ३,१२९ चौ. किमी. लोकसंख्या ६,३५,००० (१९७५ अंदाज). विस्तार ४५° ५५′ उ. ते ४९° उ. आणि ९६° २५′ प. ते १०४° ३′ प. यांदरम्यान. याच्या दक्षिणेस साउथ डकोटा आणि पश्चिमेस माँटॅना ही राज्ये, उत्तरेस कॅनडा देशाचे सस्कॅचेवन व मॅनिटोबा प्रांत आणि पूर्वेस मिनेसोटा राज्य आहे. राजधानी बिस्मार्क (लोकसंख्या ३४,७०३–१९७०) आहे.
भूवर्णन : राज्यप्रदेश पूर्वेकडून पश्चिमेकडे गवताळ मैदानांच्या तीन पायऱ्यांनी एकूण पाऊण किमी. उंचीपर्यंत चढत गेला आहे. पूर्वेकडचा समुद्रसपाटीपासून सु. ३०० मी. उंचीचा रेड नदीकाठचा सपाट भाग जगातील अत्यंत सुपीक जमिनींपैकी एक असून दक्षिणेस सोळा किमी. रुंदीपासून उत्तरेत ८० किमी. पर्यंत रुंदावत गेलेला आहे. याच्या पश्चिमेस ९० ते १२५ मी. उंचीच्या पेंबिना भृगूवर ‘ड्रिफ्ट प्रेअरी’ हा हिम अपोढांमुळे बनलेला सु. ४०० ते ५०० मी. उंचीचा सपाट भूमीचा दुसरा पट्टा आहे. पेंबिना भृगू हा उत्तर टोकला पेंबिना डोंगराचा वनाच्छादित प्रदेश बनतो आणि दक्षिण टोकाला तो ‘कोतो दे प्रेअरीझ’ हा डोंगराळ भाग होतो. ड्रिफ्ट प्रेअरीच्या उत्तर भागात झाडीने वेढलेली डेव्हिल्स लेकसारखी कित्येक सरोवरे, सुरिस नदीचे खोरे व कॅनडा सीमेवर २,०७२ चौ.किमी. क्षेत्र व्यापणारा टर्टल पर्वत आहे. ड्रिफ्ट प्रेअरीच्या पश्चिमेस वायव्येकडून आग्नेयीकडे गेलेल्या ९० ते १२५ मी. उंचीच्या मिसूरी भृगूच्यावर महामैदान वा मिसूरी पठार ही ५५० ते ७७५ मी. उंचीची तिसरी सपाटी आहे. तिच्या आणि मिसूरी नदीदरम्यानच्या भागाला ‘कोतो द मिसूरी’ आणि नदीपलीकडच्या पश्चिम भागाल ‘मिसूरी उतार’ म्हणतात. या उंचसखल डोंगराळ प्रदेशाच्या नैर्ऋत्येस लिटल मिसूरी व तिच्या उपनद्यांनी जमिनीची धूप करून रंगीत गाळ थरांतून असंख्य टेकाडे कोरुन काढली आहेत. त्या भागाला उत्खातभूमी (बॅड लॅँड्स) हे नाव आहे. त्यातील दोन टेकाडे ‘ब्लॅक ब्यूट’ व ‘व्हाइट ब्यूट’ ही राज्यातील सर्वोच्च शिखरे (१,०५७ मी. व १,०६९ मी.) आहेत. यांच्या उत्तर भागातील किलडिअर डोंगर म्हणजे भोवतालच्या भूमीपेक्षा १८० मी. उंचीची अशी अनेक टेकाडेच आहेत. राज्यात मिसूरी, लिटल मिसूरी, रेड व सुरिस या प्रमुख नद्या व त्यांच्या उपनद्या आहेत. त्यांवरील धरणांमुळे शेतीस पाणी मिळून विजेचे उत्पादन आणि मासेमारीही चालते.
राज्यात नद्या व नैसर्गिक सरोवरांखेरीज अनेक मानवनिर्मित जलाशय असून त्यांपैकी सर्वांत मोठा मिसूरीवरील धरणाने निर्माण झालेला गॅरिसन जलाशय होय.
मृदा व खनिजे: राज्याच्या पूर्व व उत्तर भागांत चुन्याचा अंश असलेली उत्तम काळी माती व पश्चिम भागात चुनखडीच्या थरावरील तपकिरी रंगाची जमीन आहे. शेकडो वर्षे उगवून, वाळून, कुजून पुन:पुन्हा उगवणाऱ्या गवताचा खच पडून मैदानी माती अत्यंत सुपीक बनली आहे. लिग्नाइट अथवा नरम कोळशाचा अतिप्रचंड साठा या राज्यात आहे. त्याच्या खाणींच्या आसपासच युरेनियम आढळले आहे. १९५१ पासून खनिज तेल आणि खनिज वायूही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहेत. शिवाय पांढरा शाडू, बेंटनाइट, सोडियम सल्फेट, वाळू, बांधकामाचा दगड व रेतीही खाणीतून काढण्यात येते.
हवामान: हवामान महाद्वीपीय असले तरी कोरड्या हवेमुळे सुसह्य असते. किमान सरासरी तापमान १३·३° से. व कमाल सरासरी तापमान २६·६° से. आणि वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४३ सेंमी. असते. राज्यात वनप्रदेश फक्त १,७५४ चौ. किमी. असून उत्तरेकडील पर्वतप्रदेशात व रेड नदीखोऱ्यात पॉप्लर, बॉक्स एल्डर, ॲश, एल्म, बर्च हे वृक्ष व क्रॅनबेरी, चॉकबेरी, वनद्राक्षे ही फळे आहेत. मिसूरी नदीखोऱ्यात कॉटनवुड, विलो, एल्म, ॲश, बॉक्स एल्डर ही झाडे व पूर्वेकडे उंच व विपुल तर पश्चिमेस जाड व दाट गवत आहे. मिसूरी उतारभागात यलो पाइन, रेड सीडार, जूनिपर, बर्च हे वृक्ष आहेत. केसाळ कातड्याचे बॅजर, मिंक, रॅकून, चिंचुद्री, स्कंक, वीझल, बीव्हर आणि कॉयॉट, खोकड, ससा, खार, हरिण व ‘प्रेअरी डॉग’ हे प्राणी तसेच ग्राउज, रानबदक, रानकोंबडा, महोका इ. अनेक पक्षी असून त्यांच्या शिकारीस दूरदूरचे लोक येतात.
इतिहास व राज्यव्यवस्था: दे ला व्हेरांद्री या फ्रेंच कॅनडियन शोधकाने या प्रदेशात १७३८ मध्ये प्रथम पाऊल टाकले. नंतर १७९७ पर्यंत ब्रिटिशांनी केसाळ कातड्यांच्या व्यापारासाठी राज्याच्या ईशान्य भागात फोर्ट पेंबिना व अन्य ठिकाणी ठाणी उभारली. १८०३ च्या ‘लुइझिॲना खरेदी’त या प्रदेशाचा काही भाग अमेरिकेकडे आला, पण सीमा अनिश्चित असल्यामुळे ब्रिटिशांशी तंटा चालू झाला. १८०४ मध्ये दहाव्या भूमीचा शोध घेणाऱ्या ल्यूइस–क्लार्क मोहिमेचा मुक्काम राज्याच्या पश्चिम भागात स्टॅंटन येथे पडला होता. १८१२ नंतर सीमा ठरविण्यासाठी ब्रिटिशांशी बोलणी सुरू होऊन १८१८ मध्ये तडजोड झाली व ४९° उ. अक्षवृत्तावर सीमा निश्चित झाली. १८१९ मध्ये पेंबिना येथे पहिली कायम वसाहत ब्रिटिश उमराव सेलकर्कचा अर्ल याने स्थापन केली. १८२३ मध्ये अमेरिकन सरकारने रेड नदीखोऱ्याची आणि १८३९ मध्ये फ्रीमाँटने बाकीच्या प्रदेशाची पाहणी केली. या प्रदेशातील आदिवासी रेड इंडियनांची उपजीविका गवताळ मैदानात चरणाऱ्या रानरेड्यांची शिकार करून चालत असे. वसाहतवाल्यांनी येथे येऊन शेती व गुरचराईसाठी जमिनी व्यापल्यामुळे साहजिकच इंडियनांनी स्वसंरक्षणार्थ लढा सुरू केला. त्यांच्याकडून १८५१ मध्ये काही जमीन अमेरिकन सरकारने विकत घेऊन शेतकऱ्यांना दिली. तोपर्यंत मिनेसोटा व नेब्रॅस्काचा भाग असलेला डकोटा आता डकोटा टेरिटरी म्हणून (१८६१) वेगळा झाला. त्यात उत्तर-दक्षिण डकोटाखेरीज माँटॅना व वायोमिंगचेही भाग होते. १८८९ मध्ये या प्रदेशाचे उत्तर व दक्षिण डकोटा विभाग होऊन त्यांना संघराज्यात प्रवेश मिळाला. इंडियनांच्या हल्ल्यांचा धोका रहिवाशांना चालूच होता. १८७६ मध्ये सू इंडियनांनी शेजारच्या राज्यातील ‘लिटल बिग हॉर्न’ येथे सेनापती कस्टरचा संपूर्ण पराभव करून त्याचे सर्व सैन्य कापून काढले. या राज्यात वस्ती वाढल्यावरदेखील इंडियनांशी लढाया चालूच होत्या. शेवटी १९०० साली शेवटच्या लढाईत त्यांचा नेता सिटिंग बुल मारला गेला, तेव्हा लढाया थांबल्या. वसाहतीसाठी येणाऱ्यांना जमिनी देण्याचे सरकारचे धोरण १८६२ पासूनच चालू होते. सैन्याने इंडियनांना मिसूरी नदीपार घालवले, तरी त्यांचे अचानक छापे संपूर्णपणे थांबले नव्हते. त्याखेरीज कडक थंडी व उन्हाळा, अवर्षण, अखंड सोसाट्याचे वारे आणि एकलकोंडे जीवन या आपत्तींना तोंड देत वसाहतवाले पस्तावत राहिले. तथापि १८७२–८७ दरम्यान लोहमार्ग झाले पिके बाजारपेठेत पाठवावयाची सोय झाली नवे वसाहतकरी येऊ लागले परिस्थिती थोडी सुधारली, पण आता रेल्वेकंपन्या वाहतुकीचे दर वाढवून आणि धान्य व्यापारी भाव पाडून शेतकऱ्यांना अडवू लागले. अखेर शेतकऱ्यांनी संघटित होऊन ‘पॉप्युलिस्ट’ पक्ष काढला आणि रेल्वे व व्यापारी यांच्यावर राजकीय नियंत्रण आणण्यासाठी जोराची चळवळ केली. तो पक्ष जरी नंतर बंद पडला, तरी शेतकऱ्यांना संरक्षण देणारे कायदे झाले. १९१५ नंतर शांततेचा व प्रगतीचा काळ सुरू झाला. शेतीचे यांत्रिकीकरण, शेतविस्तार व स्वयंचलित वाहनांचा वापर, तसेच ग्रामीण विद्युत् पुरवठा यांमुळे भरभराट सुरू झाली. पहिल्या व दुसऱ्या महायुद्धांत मनुष्यबळाखेरीज अन्नपुरवठाही भरपूर करून नॉर्थ डकोटाने आपले कर्तव्य केले. गव्हाचे उत्पादन आणि पोसलेल्या जनावरांची पैदास मोठ्या प्रमाणात होऊ लागल्याने कृषिक्षेत्रात राज्य आघाडीवर आले. कारखानदारीलाही सुरुवात झाली.
प्राथमिक निर्वाचन पद्धती (१९०५), सावमत (१९१४) आणि प्रत्यावाहन (१९२०) या सुधारणा राज्यघटनेत करणारे हे एक पुरोगामी व जागरूक राज्य आहे. १८८९ मध्ये पहिली घटना सम्मत झाली होती. ४ वर्षांसाठी निवडलेला राज्यपाल व खातेप्रमुख यांच्याकडे कार्यकारी सत्ता असते. ६ वर्षांसाठी निवडलेल्या ३ सभासदांच्या लोकसेवा आयोगाकडून इतर नेमणुका केल्या जातात. विधिमंडळे पाळीपाळीने ४ वर्षांसाठी निवडलेल्या ४९ सीनेटर व २ वर्षांसाठी निवडलेल्या ९८ प्रतिनिधींची असतात. राजधानी बिस्मार्क येथे विषमांकी वर्षी ६० दिवसांची अधिवेशने भरतात. सर्वाच्च न्यायालयाचे ५ न्यायमूर्ती १० वर्षांसाठी निवडलेले असतात. शिवाय न्यायव्यवस्थेत ६ वर्षांसाठी १६ जिल्हा न्यायाधीश, परगणेवार इच्छापत्र न्यायालये, पोलीस आणि शांती न्यायालये यांची तरतुद आहे. नॉर्थ डकोटातर्फे राष्ट्रसंसदेवर २ सीनेटर व १ प्रतिनिधी निवडून जातो.
आर्थिक स्थिती : राज्यात कृषिउद्योग सर्वांत महत्त्वाचा असून त्यात सर्वाधिक म्हणजे सु. ४०% कामगार गुंतले आहेत. या उद्योगापासून राज्यातील सर्वाधिक उत्पन्न मिळते. देशात राज्याचा क्रमांक बार्ली उत्पादनात पहिला, गहू व अळशी उत्पादनात दुसरा असून राय, ओट, बटाटे, साखरबीट, घेवडे, सूर्यफूल, मका, घासचारा ही पिकेही भरपूर निघतात. शेतीमालाला पूरक म्हणून पोसलेली गुरे, डुकरे, अंडी आणि दुभत्याच्या पदार्थांचे उत्पादन होते. १९७४ अखेर राज्यात २६,३५,००० गुरे, त्यांपैकी १,२३,००० दुभत्या गाई ३,१५,००० मेंढ्या व ३,२२,००० डुकरे होती. येथील कित्येक शेते ४,००० हे. पेक्षाही मोठी आहेत. सरासरी ४०० हे.चे शेत असते. यामुळे शहरांखेरीज इतरत्र लोकसंख्येची घनता दर चौ. किमी.ला जेमतेम १ इतकी असते. १९७० ह्या सालापासून शेतमजुरांची संख्या कमी होत असून इतर कामगारांची संख्या सु. सव्वापट झाली आहे. राज्यात १९७० च्या लोकसंख्येनुसार फार्गो (५३,३६५), ग्रँड फॉर्क्स (३९,०००), बिस्मार्क (३४,७०३) आणि मायनट (३२,२६०) ही मोठी शहरे आहेत. डबाबंद मांस व लोणी, तेल शुद्धीकरण, चिनी माती व काँक्रीटच्या वस्तू या मालांची कारखानदारी आहे. छपाई व प्रकाशन हेही व्यवसाय चालतात. तिओगामधील तेलाच्या शोधामुळे (१९५१) औद्योगिक वाढीस चालना मिळाली आहे. १९७५ मध्ये लोहमार्ग ८,४१९ किमी., रस्ते १,६७,८७८ किमी. पैकी सु. ४५% पक्के होते. १९७२ मध्ये १९३ विमानतळांपैकी ८८ सार्वजनिक मालकीचे होते. १९७१ मध्ये नभोवाणी केंद्रे ४२ व दूरचित्रवाणी केंद्रे १३ १० दैनिके व ९२ इतर वृत्तपत्रे अडीच लाखांवर दूरध्वनियंत्रे होती.
लोक व समाजजीवन : लोक ख्रिस्ती धर्माचे–ल्यूथरन, मेथडिस्ट, प्रेसबिटेरियन व रोमन कॅथलिक पंथाचे–असून अल्पसंख्य यहुदी धर्मीय आहेत. या राज्यातील बहुतेक लोक बाहेरच्या देशांतून आलेल्या स्थलांतरितांचे वंशज आहेत ते सर्वाधिक उ. यूरोपमधले, नॉर्वेतून जवळजवळ एकतृतीयांश, बाकी रशिया, जर्मनी, स्वीडन, नेदर्लंड्स, डेन्मार्क, फिनलंड, आइसलँडमधून तसेच हंगेरी, रूमानिया व कॅनडातूनही आलेले होते. येथील मूठभर रेड इंडियन राखीव प्रदेशातून राहतात. भाषा इंग्रजी असून शिक्षण ७ ते १६ वयापर्यंत मोफत व सक्तीचे आहे. १९७५ मध्ये प्राथमिक शाळांत २४,८८३ विद्यार्थी व ५,१०६ शिक्षक माध्यमिक शाळांत ५१,७४० विद्यार्थी व ३,२७९ शिक्षक उच्च शिक्षणसंस्थात २३,३३५ विद्यार्थी होते. २ विद्यापीठे, ५ शिक्षक प्रशिक्षणाची व ३ इतर महाविद्यालये होती. शिक्षणात वाङ्मय, कला, नाट्य व संगीत यांकडे लक्ष पुरविले जाते. १९७२–७३ मध्ये राज्याच्या एकूण ३६·१ कोटी डॉलर खर्चापैकी शिक्षणावर १३·१ कोटी डॉ. खर्च झाले. राज्यात १९७२ मध्ये ६३ रुग्णालये व ५,६०० रुग्णशय्या होत्या. वृद्ध, अंध आणि अपंग यांस राज्याकडून व केंद्राकडूनही साह्य केले जाते. राज्याच्या सुधारणागृहात १९७५ मध्ये १४८ लोक होते. मृत्युदंड नाही. ३५ गुन्हेगारांना राज्याच्या शेतीवर काम दिले होते. राज्यात २ वस्तुसंग्रहालये, ऐतिहासिक व निसर्गशोभेची ५ राज्य उद्याने असून त्यांपैकी उत्खातभूमी प्रदेश विशेष चमत्कृतिपूर्ण आहे. छंद म्हणून मासे पकडणे, स्केटिंग व बर्फावरील हॉकी हे खेळ खेळले जातात.
ओक, शा. नि.
“