गमाल अब्दुल नासर

नासर, गमाल अब्‌दुल :(१५ जानेवारी १९१८–२८ सप्टेंबर १९७०). ईजिप्तचे पहिले राष्ट्राध्यक्ष, अरब लीगचे सूत्रधार व अलिप्ततावादाचे एक पुरस्कर्ते. त्यांचा जन्म ॲलेक्झांड्रिया येथे मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे वडील हुसेन हे एका स्थानिक टपाल खात्यात प्रभारी पोस्टमास्तर होते. आई फाहिमा ही परंपरागत मुस्लिम धार्मिक कुटुंबातील होती. हुसेन यांची बदली अल्खतातिबा येथे झाली. तेथेच नासर यांचे प्राथमिक शिक्षण झाले. पुढे ते कैरोला आपल्या काकांकडे राहिले. माध्यमिक शिक्षणानंतर त्यांनी काही महिने कायद्याचा अभ्यास केला व अखेर रॉयल मिलिटरी अकॅडेमीत नाव नोंदविले. तेथून ते सेकंड लेफ्टनंट ही लष्करी पदवी घेऊन बाहेर पडले (१९३८). विद्यार्थिदशेत त्यांनी ब्रिटिशांविरुद्धच्या अनेक निदर्शनांत भाग घेतला. याबद्दल त्यांना शिक्षा झाल्या व एकदा डोक्याला मारही बसला. त्याचा व्रण त्यांच्या कपाळावर होता. फरूकची भ्रष्ट राजवट आणि ब्रिटिशांचे वर्चस्व नष्ट करण्यासाठी त्यांनी चळवळ सुरू केली. या संघटनेस आर्थिक साहाय्य करणाऱ्या ताहिया काझेम या युवतीशी पुढे त्यांनी विवाह केला (२९ जून १९४४). तिच्यापासून त्यांना तीन मुले व दोन मुली झाल्या. अकादमीतून बाहेर पडल्यानंतर त्यांनी तरुण लष्करी अधिकाऱ्यांची एक गुप्तसंघटना (ऑफिसर्स रेव्होल्यूशनरी ऑर्गनायझेशन) स्थापन केली. तीत अन्वर सादात (सध्याचे ईजिप्तचे राष्ट्राध्यक्ष), अहंमद अन्वर (लष्कराचे प्रमुख) आणि झकेरिया मोही-इद्दीन (संयुक्त अरब प्रजासत्ताकाचे उपाध्यक्ष) हे तीन अधिकारी नासरांचे निकटवर्ती व विश्वासू कार्यकर्ते होते. ईजिप्तच्या लष्करात त्यांची नियुक्ती झाल्यावर त्यांना कॅप्टन, मेजर वगैरे वरचे हुद्दे मिळाले. पुढे ते काही वर्षे अकादमीत निदेशक होते (१९४६). यानंतर इस्राएलविरुद्ध युद्ध झाले, त्यावेळी फॅलूजा हे ठिकाण त्यांनी शस्त्रसंधी होईपर्यंत अत्यंत शौर्याने लढविले. त्याबद्दल त्यांना ‘फॅलूजाचा वाघ’ही उपाधी मिळाली (१९४८). इस्राएलने केलेल्या पराभवामुळे त्यांच्या गुप्तसंघटनेस चालना मिळाली व भ्रष्टाचाराविरुद्ध तरुण अधिकाऱ्यांनी चळवळीचा जोर वाढविला. अखेर १९५२ मध्ये रक्तशून्य अवचित सत्तांतरानेनासर यांनीराजा फरूकला हद्दपार केले आणि मे. ज. मुहंमद नगीब हा ईजिप्तचा नामधारी प्रमुख झाला. खरी सत्ता अकरा लष्करी अधिकाऱ्यांच्या मंडळाकडे व नासर यांच्या हातात होती. १९५४ मध्ये नगीबला सत्तेवरून काढून नजरकैदेत टाकण्यात आले आणि गमाल अब्दुल नासर पहिले पंतप्रधान झाले. तत्पूर्वी नासर यांना मारण्याचा कट काही धर्मवेड्या मुसलमानांनी केला. त्यांची सर्व कारस्थाने त्यांनी हाणून पाडली. नासर यांनी १९५६ मध्ये ईजिप्तचे नवीन संविधान तयार केले. त्यानुसार ईजिप्त हे इस्लामी अरब कल्याणकारी राज्य बनले. संविधानानुसार एकपक्ष राज्यपद्धतीचा अवलंब करण्यात आला. संविधानानुसार निवडणुका झाल्या व नासर बहुमताने राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. या पदावर ते अखेरपर्यंत म्हणजे सु. १४ वर्षे होते.

ईजिप्तच्या सर्वांगीण प्रगतीसाठी त्यांनी अनेक सुधारणा केल्या आणि त्या राबविण्यासाठी लष्करी स्थैर्य व शांतता लाभावी म्हणून अलिप्ततावादी परराष्ट्रीय धोरण अवलंबिले. ईजिप्त लष्करी दृष्ट्या बलवान व्हावा म्हणून चेकोस्लोव्हाकियाशी लष्करी साहित्य पुरवठ्याचा गुप्त करार केला. आस्वान प्रकल्पासाठी अमेरिका आणि ग्रेट ब्रिटन यांनी मदतीचे अभिवचन देऊनही ती मदत २० जुलै १९५६ रोजी रद्द केली. तेव्हा नासर यांनी सुएझ कालव्याचे राष्ट्रीयीकरण केले व कर बसविला. याचा परिणाम म्हणून इस्राएल, ग्रेट ब्रिटन व फ्रान्स यांनी ईजिप्तवर हल्ला केला पण अमेरिकेच्या मध्यस्थीने हे युद्ध टळले आणि काही भागांत पराभव होऊनही नासरांची अरब जगतात लोकप्रियता वाढली.

नासर यांनी ईजिप्तची सर्वांगीण प्रगती करण्याच्या दृष्टीने ईजिप्तचे औद्योगिकीकरण व आधुनिकीकरण करण्यास सुरुवात केली. याशिवाय त्यांना संपूर्ण अरब जगतात एकता निर्माण करावयाची होती. या दृष्टीने १९५८ मध्ये सिरिया व ईजिप्त मिळून संयुक्त अरब प्रजासत्ताक निर्माण झाले आणि नासर त्याचे अध्यक्ष झाले पण ही युती फार काळ टिकली नाही. त्यांनी आस्वान प्रकल्प रशियाच्या मदतीने पूर्ण केला. शेकडो हेक्टर जमीन पाण्याखाली आली व वीज निर्माण झाली. आपल्या सुधारणांच्या आड येणाऱ्या मुस्लिम ब्रदरहुड व वफ्द या धर्मांध पक्षांचा त्यांनी आपला खून करण्याचा यत्न केला म्हणून बीमोड केला. भूधारण सुधारणा कायदा करून चाळीस हेक्टरांपेक्षा जास्त जमीन एका व्यक्तीला धारण करता येणार नाही असा कायदा केला. भ्रष्टाचाराविरुद्ध त्यांनी मोहीम काढली. स्त्रियांना अनेक अधिकार व हक्क देण्यात आले. नासरांची एकपक्षपद्धती म्हणजे जवळजवळ उपकारकर्ती हुकूमशाही होती आणि ईजिप्त हे एक पोलीस राज्य होते. दळणवळण व टपाल याची चोख व्यवस्था झाली परंतु वर्तमानपत्रांचे राष्ट्रीयीकरण आणि अभ्यवेक्षण, तसेच दूरध्वनीवरील वृत्तांतही नोंदून ठेवण्याची व्यवस्था इत्यादींमुळे लोकशाही जवळजवळ अस्तित्वात नव्हती. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे जीवन फारसे बदलले नव्हते. लोकसंख्या वाढत होती. त्या दृष्टीने कोणतेच कार्यक्रम राबविण्यात आले नाहीत, त्यामुळे जीवनमानात काही अंशी सुधारणा होऊनही उपयोग नव्हता. नासर यांनी आपल्या राजकीय शत्रूंची रवानगी बंधनागारात केली होती. पक्षाचे उमेदवार तेच निवडीत. शिवाय ईजिप्तचा इस्राएलाकडून पराभव झाल्यामुळे लष्करावर अतोनात खर्च वाढला आणि त्याचा परिणाम त्यांच्या सामाजिक क्रांतीवर काही प्रमाणात झाला.

आंतरराष्ट्रीय राजकारणात नासर यांनी नेहरू व टिटो यांच्या बरोबरीने अलिप्ततावादाचा पुरस्कार केला. १९५५ च्या बांडुंग परिषदेनंतर त्यांना जागतिक राजकारणात, विशेषतः आफ्रिका व आशिया यांच्या घडामोडींत, महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले. १९६४ मध्ये त्यांच्या पुढाकाराने अलिप्ततावादी राष्ट्रांची परिषद कैरो येथे भरली. १९६७ मध्ये इस्राएलने केलेल्या पराभवानिमित्त त्यांनी राजीनामा दिला पण लोकाग्रहास्तव तो त्यांना परत घ्यावा लागला.

नासर यांनी फिलॉसॉफी ऑफ द रेव्हल्यूशन (१९५४) हे पुस्तक लिहिले. त्यात त्यांचे क्रांतीसंबंधीचे विचार असून शांततामय मार्गाने कोणतेही उद्दिष्ट साध्य करता येते, असे त्यांचे मत होते. म्हणूनच त्यांनी फरूक राजाला ठार मारावे, याऐवजी हद्दपार करावे, अशी सौम्य भूमिका घेतली. त्यांनी अखेरच्या दिवसांत जॉर्डनमधील पॅलेस्टिनी अरब गनीम व राजे हुसेन यांच्यात तडजोड घडवून आणली (१९७०) व त्यानंतर दोन दिवसांनी ते हृदयविकाराच्या झटक्याने कैरो येथे मरण पावले.

संदर्भ : 1. Copeland, Miles, The Game of Nations, London, 1969.

            2. Stephens, Robert, Nasser : A Political Biography, New York, 1971.

 

देशपांडे, सु. र.