सर्वंकष युद्ध : (टोटॅलिटॅरियन वॉर). युद्धप्रवण प्रतिस्पर्धी संपूर्ण विजय संपादण्यासाठी कोणत्याही प्रकारचा त्याग करण्यास तयार असतात व सर्वसाधनसामग्री लढतात, ते युद्ध वा लष्करी संघर्ष. हा संघर्ष मर्यादित युद्धाहून वेगळा असतो. जगभरातील युद्धांच्या इतिहासाचा मागोवा घेतला असता असे आढळले की, युद्धतंत्राच्या कृतिकक्षांवर राजनीतीपेक्षा आर्थिक व सामाजिक परिसीमांचा अधिकतर परिणाम झालेला आढळतो. केवळ प्रादेशिक किंवा राज्यक्षेत्रीय अभिवृद्धी हाच प्रत्येकवेळी युद्धाचा प्रतिबंध (जबाबदारी वा कारण) असेलच असे नाही. आतापर्यंत अत्यंत प्राणघातक संघर्ष वा युद्धे ही क्रांत्यांतील मतप्रणालींच्या मुदयांवर आणि धार्मिक कारणांसाठी झाली. फ्रेंच राज्यक्रांतीत राजेशाही नष्ट करण्यासाठी फ्रान्समधील जनतेने सर्वकष लढा दिला, तसेच अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धात ब्रिटिश वसाहतीतील लोकांनी इंग्लिश साम्राज्याशाहीविरूद्ध सर्वंकष युद्ध पुकारले. दोन्ही क्रांत्यांमधून सर्वंकष युद्धांव्दारे संपूर्ण विजय अनुक्रमे फ्रेंच लोक आणि अमेरिकन जनतेस मिळाला.

सर्वंकष युद्धाच्या आधुनिक संकल्पनेची मीमांसा एकोणिसाव्या शतकातील प्रशियन सेनानी व लष्करी डावपेचांचा युद्धनीतिज्ञ ⇨ कार्ल फोन क्लाउझेव्हिट्स (१७८०-१८३१) याच्या फोम क्रीग (इं. भा. ऑन वॉर) या गंथात आढळते. त्याने नेपोलिनिक युद्धे अनुभविली होती आणि वॉटर्लूच्या लढाईत चीफ ऑफ स्टाफ म्हणून प्रत्यक्ष सहभाग घेतला होता. त्याने फ्रीड्रिख द ग्रेट आणि पहिला नेपोलियन यांच्या लढायांतील कौशल्याचा आणि नेतृत्वाचा बारकाईने अभ्यास केला होता. त्याच्या या युद्धशास्त्रावरील गंथाचा प्रभाव आधुनिक युद्धतंत्रीय संकल्पनांवर पडलेला दिसतो. त्याच्या मते युद्धे ही नीतिनियमानुसार कधीच लढली जात नाहीत. त्याने मर्यादित हेतूंसाठी वापरलेले अठराव्या शतकातील युद्धतंत्र हे अनुप्रयुक्त ठरविले आहे तथापि त्यांतील स्थानिक लष्करी विजय राजनैतिक सौदेबाजीला उपयुक्त ठरण्याचे साधन बनले आणि त्या लढायांची परिणती सततच्या उत्तरोत्तर वाढत जाणाऱ्या हिंसेत झाली व ती अखेर सैद्धांतिक अनिर्बंधतेकडे वळली. ‘युद्धासाठी युद्ध’ हे तत्त्व त्याने अग्राह्य मानले आणि युद्ध म्हणजे दुसरे तिसरे काही नसून विविध साधनसामग्रीचे ते अवमिश्रण होय, ज्याव्दारे पुढे राजकीय व्यवहार गतिमान होतात. क्लाउझेव्हिट्‌सने प्रतिपक्षाच्या सामर्थ्याचा निःपात करण्याच्या कृतीचे महत्त्व विशद केले असून त्याबाबतीत समर्थनसुद्धा दिले आहे. एकोणिसाव्या शतकातील त्याचे चाहते (अनुयायी) ‘राजकीय उद्दिष्टे साध्य करून युद्धपिपासू मनोवृत्ती कठोरपणे नियंत्रणाखाली आणली पाहिजे’, या याच्या आग्रही भूमिकेकडे सोयीस्कर रीत्या डोळेझाक (दुर्लक्ष) करतात.

विसाव्या शतकातील सर्वंकष युद्धविषयीचा अभ्यासपूर्ण विवेचन करणारा सर्वांत विचारपरिप्लूत गंथ म्हणजे जर्मन विचारवंत व युद्धनीतिज्ञ एरिख लूडेन्डोफ याने लिहिलेला गेर तोताल (१९३५ इं. भा. टोटल वॉर) हा होय. पहिल्या जागतिक महायुद्धात (१९१४-१८) एरिख लूडेन्डोफ याने जर्मनीच्या युद्धविषयक प्रयत्नांत सक्रिय सहभाग घेतला होता. त्यामुळे त्याच्या अनुभवाचेच बोल या गंथात उमटलेले दिसतात. त्याच्या मते शत्रूसैन्याचा पराभव करून त्याला तह करण्यास प्रवृत्त करण्याची कल्पना व प्रक्रिया आता कालबाह्य झाली आहे. आता युद्धाला कालाचे बंधन राहिले नाही. लढाईचे मुख्य उद्दिष्ट जरी शत्रूचा सर्वनाश किंवा तिन्ही सैन्यदले निष्प्रभ करण्याचे असले, तरी तिथे युद्ध संपेलच याची खात्री नाही. त्यामुळे प्रतिस्पर्धी देशांनी आधीच उद्दिष्टे निश्चित करून कुठेतरी युद्धाला पायबंद घातला पाहिजे. पहिल्या महायुद्धाच्या वेळी जीत दोस्त राष्ट्रांच्या राजकीय नेत्यांनी पराजित देशांवर अपमानास्पद अटी लादल्या आणि त्यांचा काही भूभागही बळकाविला, ही घोडचूक केली. त्यातूनच दुसऱ्या महायुद्धाची बीजे पेरली गेली. ॲडॉल्फ हिटलरने Mein Kampf या आत्मचरित्रात स्पष्टपणे असे म्हटले आहे की, शांतता काळ हा केवळ सर्वंकश युद्धाच्या तयारीसाठी दोस्त राष्ट्रांनी दिलेली एक संधी व सवलत होती. त्या काळात नाझी राजवटीने युद्धप्रक्रिया कृतीत आणण्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणाच तयार केली होती. हिटलरने स्वत: दुसऱ्या महायुद्धात जर्मनीच्या लष्करी कारवायीचे नेतृत्व केले आणि सर्वेसर्वा लष्कर प्रमुख म्हणून सर्व डावपेचांची आखणी-नियोजन केले. ज्या जर्मनांनी एतद्देशीयांनी त्याच्या या सर्वंकश युद्धाच्या भूमिकेस विरोध केला, त्यांचा त्याने कूरपणे नि:पात केला. या युद्धाची रंगीत तालीम म्हणून स्पॅनिश यादवी युद्धातील (१९३६-३९) घडामोडींकडे पाहावे लागेल. या युद्धात कम्युनिस्ट आणि फॅसिस्ट यांनी आधुनिक शस्त्रास्त्रांचा वापर करून युद्घतंत्रातील नवीन पद्धती उपयोगात आणल्या होत्या. यातील भीषण अनुभवांची प्रचीती पुढे आली. जर्मनीच्या तत्कालीन नेत्यांनी सर्वंकश युद्धाची जी तत्त्वे आचरणात आणली किंवा ज्या पद्धतीने संहारकारी हल्ले विमानांतून केले, ते पूर्णत: अन्य पाश्चात्त्य देशांतील लोकशाही तत्त्वप्रणालीत वावरणाऱ्या राजधुरिणांच्या बचावात्मक प्रवृत्तीविरूद्ध होते. त्यांना युद्ध टाळावयाचे होते परंतु जर्मनीच्या आक्रमक पवित्र्यापुढे गेट ब्रिटनला युद्धाची तयारी करणे क्रमप्राप्त झाले तरीसुद्धा या हुकूमशाहांना शांत करण्याचा ब्रिटनने प्रयत्न केला परंतु हिटलर आणि त्याची नाझी राजवट यांपुढे हे प्रयत्न निष्फळ ठरले. परिणामी दुसरे महायुद्घ हे सर्वार्थाने सर्वंकष झाले. विसाव्या शतकातील पहिले व दुसरे महायुद्घ ही दोन जागतिक महायुद्घे पूर्णत: सर्वंकष मानली जातात किंवा युद्धांच्या इतिहासातील जास्तीत जास्त सर्वंकष समजली जातात तथापि तीसुद्धा काही बाबतींत मर्यादित होती.


दुसऱ्या महायुद्धानंतर, विशेषत: शीतयुद्धाच्या काळात सर्वसाधारण अणुयुद्धाचा संभव दृष्टिपथात आला होता कारण अणुबाँबच्या हल्ल्याने जपान हा देश शरण आला होता. त्याचे भूदल बराकीत स्थिरावले होते, नौदल जाग्यावर होते आणि विमानेही निष्क्रियपणे थंडावली होती. अशा प्रकारचे अणुयुद्ध उद्‌भवल्यास सर्व राष्ट्रीय राजनीतीचे प्रयत्न आणि सेना-सज्जतेचा तरणोपाय किंवा त्याविषयीच्या प्रक्रिया अल्पकाळातच कुचकामी ठरणार होत्या. अणुयुगातील व्यूहतंत्र आणि युद्धनीति-पद्धतीत दुसऱ्या महायुद्धानंतर आमूलाग्र बदल घडले होते. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात युद्धतंत्रावर आणि शस्त्रास्त्रांवर विज्ञान व तंत्रज्ञान यांचा फार मोठा प्रभाव पडलेला आढळतो. किंबहुना या क्षेत्रातील प्रगतीमुळे या काळात अणुबाँब, हायड्रोजन बाँब, औष्णिक अणुकेंद्रीय बाँब, क्षेपणास्त्रे, अग्निबाण, पाणबुडया यांसारखी आधुनिक, अत्यंत प्रभावशाली व तेवढीच संहारक अस्त्रे निर्माण झाली. ती वापरण्याची आधुनिक तंत्रे विकसित झाली होती. त्यांतून अणुयुद्धाची भीती व शक्यता निर्माण झाली होती आणि तसे काही  अटीतटीचे प्रसंगही उद्‌भवले. भारत, इराण, कोरिया, पाकिस्तान या विकसनशील देशांनी अणुबाँब निर्मितीचे तंत्र व कौशल्य प्राप्त केले होते मात्र दुसऱ्या महायुद्धातील कटू अनुभव आणि हीरोशीमा व नागासाकी येथील मानवी संहार आणि अणुबाँब टाकल्यानंतरची दीर्घकालीन दुरावस्था लक्षात घेता महासत्तांच्या संघर्षाच्या संदर्भात शस्त्रास्त्रांच्या चढाओढीबरोबरच मानवी हत्याकांडाला कसा पायबंद घालता येईल, याविषयीचा विचार पुढे  आला. त्यामुळे अणुयुद्ध ही संकल्पना थंडावली असली, तरी त्यानंतर अशा प्रकारचा पुन्हा प्रयत्न करणे धारिष्टयाचे होईल, नव्हे आत्मघातकी ठरेल, याचीही जाणीव महासत्तांना झाली. प्रबळ राष्ट्रे अणुयुद्ध करून स्वत:चा सर्वनाश करून घ्यावयास धजेनात व लहान देशांना खात्री होती की, प्रबळ राष्ट्रे अणुशक्तीचा वापर आपल्यावर स्थानिक युद्धात करणार नाहीत. त्यामुळे सर्वंकष महायुद्धाची शक्यता मावळली व युद्धाचे स्वरूप आणि श्रेय आकुंचित झाले. आता अल्पकाळ अल्पक्षेत्रांत लहानलहान युद्धे होतात व होत राहतील. त्यामुळे यापुढील राष्ट्रांचे धोरण आपल्या इष्ट हेतूसाठी मर्यादित भौगोलिक परिसरात छोटी मर्यादित युद्धे हे राहिले आणि त्यांतून शक्यतो पारंपरिक अस्त्रांचाच वापर झाला. ⇨ बर्नार्ड मंगमरी (१८८७-१९७६) या माजी सेनापती व युद्धशास्त्रज्ञाने अशा प्रकारची युद्धे पौर्वात्य देशांत, विशेषत: आग्नेय आशिया खंडात आणि प्रामुख्याने आफ्रिका खंडातील देशांत होण्याची शक्यता वर्तविली होती. शिवाय अशा आधुनिक युद्धातील सर्वांत वैकासिक बाब म्हणजे नाविक दल आणि हवाई दल यांचे वर्चस्व होय. याचा अर्थ सर्वंकष युद्धात जय किंवा पराजय फक्त लढाऊ दलांच्या जयापजयावर न ठरता देशाचे मनोबल, मानवी हानी, लोकमत ह्यांवरही अवलंबून असतो. भारत-पाकिस्तानमधील अनुकमे १९६५, १९७१-७२ व १९९९ ची युद्घे, व्हिएटनाममधील संघर्ष, सोव्हिएट रशियाचे विभाजन इत्यादींसारख्या युद्धजन्य घटनांतून त्याची प्रचीती येते मात्र अमेरिकेचा अफगाणिस्तानातील हस्तक्षेप आणि इराकवरील आक्रमण ही सर्वंकष युद्धाचीच उदाहरणे होत. कारण या लष्करी संघर्षात अमेरिकेचा हेतू अनुकमे तालीबान राजवट पूर्णत: नामशेष करणे आणि सद्दाम हुसेन या हुकूमशहाला नेस्तनाबूत करणे हा होता.

एकविसाव्या शतकात राज्यशासनातील उच्च्पदस्थ-राजनीतिज्ञ आणि मुत्सद्दी यांची जबाबदारी मोठी व महत्त्वाची आहे. युद्धाची घोषणा करण्याची व दिशा ठरविण्याची कार्यवाही त्यांच्या हातात असते आणि त्यांनी युद्धनेतृत्व करणाऱ्या सेनापतींना स्पष्ट सूचना दिल्या पाहिजेत. आण्विक युद्धाच्या युगात त्यांना जर शांततेचे महत्त्व उमजले नाही आणि सामंजस्याने प्रश्न मिटले नाहीत तरच त्यांनी हा विध्वंसक मार्ग पूर्ण विचारांती अवलंबावयाचा की नाही, हे ठरवावे कारण दुसऱ्या महायुद्धात हेच तत्त्व डावलल्यामुळे-दुर्लक्षिल्यामुळे फार मोठा मानवी संहार झाला आणि अण्वस्त्रांबद्दल लोकांच्या मनात भीती व घृणा निर्माण झाली. त्यामुळे लष्करी सेनापतींनी राजकीय नेत्यांचे सबुरीचे धोरण अंमलात आणावे, विजय हा महत्त्वाचा किंवा कळीचा मुद्दा आहे, पण युद्धात कमीत कमी जीवित हानी होईल, अशा प्रकारची युद्धतंत्रे वापरली जावीत किंबहुना युद्ध होऊच नये असे प्रयत्न करावेत व सुरू झाल्यास ते तात्काळ थांबावे म्हणून बलिष्ट राष्ट्रे आर्थिक नाकेबंदी, युद्धसामग्रीवर बंदी इ. प्रयोग करू शकतात आणि त्यांनी ते यापूर्वीही केले आहेत. लष्करी दहशतीपेक्षा आर्थिक मंदीची भीती अधिक असते आणि शत्रूचा भूभाग पादाकांत करण्याऐवजी त्याच्या  बाजारपेठा हस्तगत करून त्याला परावलंबी करण्यावर जास्त भर दिला जातो. भूक, दारिद्र्य, दुष्काळ, बेरोजगारी आणि वाढती लोकसंख्या यांना आळा घालण्यासाठी युद्ध हे काहीही करून टाळावे, अशी मानसिकता व विचारसरणी आता सर्वत्र दृढमूल झाली आहे. त्यामुळे सर्वंकष युद्धाची संकल्पना सर्वंकष शांततेत परिणत होईल. अणुऊर्जेचा उपयोग देशाच्या आर्थिक उन्नतीसाठी, विकासासाठी आणि शांततेसाठी व्हावा, असे आता जागतिक मत बनत चालले आहे. नि:शस्त्रीकरण हा त्याचाच एक भाग असून आण्विक शस्त्रास्त्रांवर बंदी घालावी, ही चळवळ त्याची दयोतक होय.

वाढती अण्वस्त्रस्पर्धा व प्रदूषण यांना पायबंद घालण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या पुढाकाराने सर्वंकष अण्वस्त्र चाचणी बंदी करार ( सीटीबीटी ) अस्तित्वात आला. या करारांतर्गत सैनिकी वा नागरी हेतुसाठी केल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या अण्वस्त्र चाचण्यांवर बंदी घालण्यात आली आहे. २४ सप्टेंबर १९९६ रोजी न्यूयॉर्क येथे हा करार मान्यतेसाठी खुला करण्यात आला. सुरूवातीस ७१ राष्ट्रांनी त्यावर स्वाक्षरी केली. विशेष म्हणजे स्वाक्षरी करणाऱ्यांत त्यावेळच्या आठपैकी पाच अण्वस्त्रधारी राष्ट्रांचा समावेश होता. त्यानंतर जानेवारी २००७ पर्यंत या करारावर सर्व यूरोपीय राष्ट्रांसह १७८ राष्ट्रांनी स्वाक्षऱ्या केल्या. त्यांपैकी १४४ राष्ट्रांनी त्याला मुंजुरीही दिली आहे. भारत, पाकिस्तान आणि उत्तर कोरिया या अण्वस्त्रधारी राष्ट्रांनी अदयाप या करारावर सही केलेली नाही. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांनी त्यावर सही केली परंतु अदयापि त्यांच्या सिनेटने कराराला मंजुरी दिलेली नाही. भारतातसुद्धा केंद्र शासनाचा त्यास विरोध आहे.

हा करार अंमलात आणण्यासाठी तसेच अण्वस्त्रांसंबंधी माहितीची देवघेव करण्यासाठी ‘ प्रिपॅरटरी कमिशन फॉर द कॉम्प्रिहेन्सिव्ह न्यूक्लिअर टेस्ट बॅन ट्रिटी ऑर्गनायझेशन ’ची स्थापना करण्यात आली आहे. ही  एक आंतरराष्ट्रीय संघटना असून तिचे मुख्यालय ऑस्ट्रियातील व्हिएन्ना येथे आहे.

पहा : महायुद्ध, दुसरे महायुद्ध, पहिले हिटलर, ॲडॉल्फ.

संदर्भ : 1. Howard, Michael Paret, Peter, Ed. and Trans. Carl Von Clausewitz : On War, New York, 1991.

           2. Montgomery of Alamein, A History of Warfare, London, 1968.

देशपांडे, सु. र.