नाविक वातावरणविज्ञान : नाविक वातावरणविज्ञान किंवा अधिक व्यापक अर्थाने सागरी वातावरणविज्ञान म्हणजे ‘सागरी पुष्ठावरील हवेत घडणारे वातावरणीय आविष्कार, उथळ आणि सखोल समुद्रांच्या पाण्यावर त्या आविष्कारांमुळे होणारे परिणाम आणि सागरी पृष्ठभागांचा वातावरणीय भागाचा आविष्कारांवर पडणारा प्रभाव यांचा अभ्यास वातावरणविज्ञानाच्या ज्या शाखेत केला जातो ती शाखा’. वातावरणविज्ञानाच्या या शाखेत महासागर व त्यांच्यावरील वायुराशी ह्यांच्यामध्ये घडणाऱ्या अन्योन्य क्रियांवर विशेष भर देण्यात येतो. अन्योन्य क्रिया आणि अंतर्गामी सौर प्रारणाला (तरंगरूपी ऊर्जेला) जमीन आणि पाणी यांच्याकडून मिळणारा अतिशय भिन्न स्वरूपांचा प्रतिसाद या दोन घटना सागर आणि हवा यांच्यामध्ये ऊर्जाविनिमयात्मक प्रक्रिया घडवून आणण्यास कारणीभूत होतात. याच दोन घटनांमुळे भूपृष्ठांवर अनुभवासयेणाऱ्या वातावरणीय आविष्कारांपेक्षा सुस्पष्टपणे भिन्न दिसणारे वातावरणीय आविष्कार जलपृष्ठांवर निर्माण होतात. उदा., व्यापारी वाऱ्यांसारख्या वाऱ्यांचे व्यूह सागरी पृष्ठांवरून वाहत असताना स्थिरमार्गी आणि जटिलताशून्य (गुंतागुंतीचे नसलेले) असतात. सागरी पृष्ठावरील हवेचे दिवसाचे व रात्रीचे तापमान विशेष बदलत नाही. याच्या उलट तेच वारे भूपृष्ठांवरून वाहताना भूपृष्ठाचा उंचसखलपणा आणि भूपृष्ठावरील दिवसाच्या व रात्रीच्या तापमानातील उल्लेखनीय फरक यांमुळे त्या वाऱ्यांच्या व्यूहात गुंतागुंत निर्माण होते. भूपृष्ठावरील तापमानात उन्हाळ्यात व हिवाळ्यात फार मोठे बदल होतात. उत्तर गोलार्धातील खंडांतर्गत प्रदेशांवरील ऋतुकालिक तापमानाच्या अभिसीमा फार मोठ्या असतात. हिवाळ्याच्या आणि उन्हाळ्याच्या तापमानांत ५५°से. पेक्षा अधिक फरक असतो. सागरी पृष्ठावर किंवा एखाद्या बेटावर ऋतुकालिक तापमानाची अभिसीमा बहुधा ८°से. पेक्षा अधिक नसते. हिवाळ्यात भूपृष्ठावर आढळणारी अतिशीतित धुकी सागरी पृष्ठांवर किंवा बेटांवर क्वचितच आढळतात. तथापि समुद्रांवरील हवेत ऊर्जाविनिमय घडवून आणणाऱ्या प्रक्रिया अत्यंत प्रभावी असतात. त्यामुळे समुद्रांवर निर्माण होणारी व समुद्रांवर भ्रमण करणारी चक्री वादळे सतत होत असलेल्या बाष्पपुरवठ्यामुळे अत्यंत उग्र स्वरूप धारण करू शकतात. त्यांत परमावधीची विध्वंसक शक्ती साठविलेली असते. भूपृष्ठांवरून मार्ग आक्रमिणारी अभिसारी चक्रवात किंवा अवदाब क्षेत्रे त्या मानाने बरीच सौम्य असतात. उग्र चक्री वादळे समुद्रकिनाऱ्यांवर थडकून भूप्रदेशांत शिरतात तेव्हा त्यांचे रुद्र स्वरूप हळूहळू मावळते [⟶ चक्रवात].
वातावरण आणि समुद्र यांच्यातील परस्पर संबंधांचा व प्रक्रियांचा नाविक वाहतुकीवर आणि मनुष्याच्या सागरावरील इतर अनेक उद्योगांवर परिणाम होतो. या परस्पर संबंधांतून निर्माण होणाऱ्या अनेक आविष्कारांचा नाविक वातावरणविज्ञानात समावेश होतो. वारे, लाटा, सागरी प्रवाह आणि सागरपृष्ठाजवळील पाण्याच्या काही थरांची तापमानीय संरचना यांच्यातील परस्पर संबंध महत्त्वाचे असतात. वाऱ्यांमुळे समुद्रावर लाटा उत्पन्न होतात. वाऱ्यांचा वेग, त्यांचा पल्ला व ते वारे वाहण्याचा कालावधी यांच्यावर लाटांचा परमप्रसर (आंदोलनातील कमाल विस्थापन) अवलंबून असतो. लाटांचा परप्रसर जितका अधिक असतो तितक्या प्रमाणात अधिकतर पाण्याचे थर घुसळून निघतात आणि एकजिनसी किंवा एकजातीय होतात. स्थिरमार्गी वारे आणि लाटा यांच्या सक्रियतेमुळे एकजिनसी झालेल्या पाण्याच्या थरांच्या तापमानातही समप्रमाणता येते. अशा रीतीने एकजिनसी झालेल्या जलस्तराच्या जाडीवर व विस्तारावर ‘सोनार’वा जलांतर्गत ध्वनि-यंत्रणेच्या साहाय्याने समुद्रातील वस्तूंचे स्थान निश्चित करण्याची किंवा समुद्रपृष्ठाची खोली मोजण्याची अचूकता अवलंबून असते.
समुद्रपृष्ठावर वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे निर्माण होणाऱ्या सागरी लाटांचा व प्रवाहांचा अभ्यास सागरविज्ञान या शाखेत होत असला, तरी वातावरणवैज्ञानिक यंत्रणाच सागरविषयक निरीक्षणे मिळविते आणि सागरांवर निर्माण होणाऱ्या आविष्कारांचे पूर्वानुमान नित्यक्रमाने वातावरणविज्ञच करतो. मच्छीमारी, सागरी वाहतुकीला लागणारा इंधनपुरवठा, लढाऊ जहाजांवरील तोफांची अचूक गोलंदाजी, खनिज तेलासाठी समुद्रात जाऊन वेधन करणे (विहीर खणणे) ह्यांसारख्या कामासाठी सागरी हवामानाचे अंदाज अत्यंत महत्त्वाचे व उपयुक्त ठरतात.
हवामानानुसार नौकानयनमार्गात करावे लागणारे बदल : वातावरणीय निरीक्षणांसाठी नवनवीन तंत्रे- उपकरणे अवलंबिल्यामुळे आणि इलेक्ट्रॉनीय संगणकांच्या (गणकयंत्रांच्या) साह्याने केलेल्या प्राथमिक विश्लेषणामुळे अल्पावकाशात एखाद्या विशिष्ट वेळेची हवामानाची स्थिती दर्शविणारे विविध प्रकारचे तक्ते व नकाशे उपलब्ध होऊ लागले आहेत. त्यांच्या आधारे वाऱ्यांची दिशा व वेग आणि लाटांची उंची, वारंवारता व परमप्रसर यांच्याबद्दल विश्वासार्ह अंदाज वर्तविता येतात. ह्या अंदाजांच्या साह्याने जहाजांचे इच्छित स्थळापर्यंतचे अल्पतम काळाचे, लघुतम अंतराचे व महत्तम सुरक्षिततेचे मार्ग निश्चित करता येतात. उग्र चक्री वादळे, उग्र अभिसारी चक्रवात, वादळी लाटा, ⇨जलशुंडा, चंडवात, गडगडाटी वादळे यांसारख्या आविष्कारांचा धोका टाळून ठरलेल्या मार्गात उचित बदल करण्यास नाविकांना सांगण्यात येते. त्यामुळे नौकानयन सुकर व सुरक्षित होते. कोणत्याही बाबतीत जगाच्या प्रवासमार्गाच्या नकाशावर दाखविलेल्या प्रस्थान बिंदू व अंतिमस्थान बिंदू यांना जोडणारी सरळ रेषा प्रत्यक्षात लघुत्तम अंतराची व क्वचितच असते. विमानांना किंवा जहाजांना प्रवासाला निघण्याच्या अगोदरच किमान काळ लागणारा मार्ग निश्चित करून घ्यावा लागतो. अल्पतम काळ मार्गनिर्देशनासाठी जहाजांच्या बाबतीत समुद्रपृष्ठावरील प्रवाहांच्या, लाटांच्या व वाऱ्यांच्या विविध लक्षणांचे अंदाज उपयुक्त ठरतात. विमानांच्या बाबतीत उपरी-वाऱ्यांच्या (वातावरणाच्या विविध स्तरांतील वाऱ्यांच्या) दिशा व वेग यांचे अंदाज उपयुक्त ठरतात. उत्तर अमेरिकेची संयुक्त संस्थाने, नेदरलंड व रशिया यांनी नौकानयनाच्या मार्गनिर्देशनाच्या बाबतीत अनेक प्रयोग केले आहेत. हिवाळ्याच्या दिवसांत अटलांटिक महासागरावर फिरणाऱ्या जहाजांनी निर्देशित केलेले मार्ग अवलंबिल्यामुळे प्रवासाच्या कालावधीत १०–१४ तासांची बचत झाल्याचे दृष्टोत्पत्तीस आले आहे. कधीकधी लाटांची उंची ४ मी. पेक्षा अधिक असते. त्यांना तोंड देऊन अनेकदा जहाजांना आपला मार्ग आक्रमावा लागतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वेळेचा व इंधनाचा अपव्यय होतो तसेच प्रवासातील धोका वाढतो. अशा वेळी वातावरणवैज्ञानिक निरीक्षणांचा योग्य उपयोग करून मार्गनिर्देशनाचे नवीन तंत्र वापरल्यास नौकानयन सुरक्षित, कमी खर्चाचे व वेळेची बचत करणारे होते.
टायफून, हरिकेन इत्यादींसारखी उग्र चक्री वादळे : हवामानाच्या अनेक आविष्कारांत उष्ण कटिबंधीय चक्री वादळांचा प्रथमांक लागतो. चक्री वादळ हे एक अत्यंत विध्वंसक आणि अतिविराट स्वरूपाचे वातचक्र असते. भिन्न गुणधर्मांच्या वाऱ्यांचे त्यात मंथन-संमिश्रण होत असते. पूर्ण विकसित चक्री वादळांचा व्यास सु. १५० ते ८०० किमी. व उंची १२ ते १७ किमी. इतकी असते. समुद्रांवर असताना ती प्रतिदिनी ३०० ते ५०० किमी.च्या वेगाने भ्रमण करीत असतात. चक्री वादळाच्या केंद्रापासून ५० ते १०० किमी.च्या भागात वाऱ्यांचा कमाल वेग ताशी २२० किमी.पर्यंत जाऊ शकतो. ह्याच भागात पर्जन्यवृष्टीही खूप होते. समुद्र अतिशय खवळलेला असतो. समुद्रपृष्ठावर प्रचंड लाटा निर्माण होतात. त्यात सापडलेल्या जहाजांचा तोल सुटून त्यांचे अनियंत्रित परिभ्रमण सुरू होते. कधीकधी दोन जहाजे एकमेकांवर आदळतात, तर कधी ती किनाऱ्यावर किंवा कोठल्यातरी खडकावर आपटून विनाश पावतात. मच्छीमारीसाठी समुद्रावर गेलेल्या कोळ्यांची व त्यांच्या नौकांची वाताहात होते. उत्तर गोलार्धात चक्री वादळाच्या उजवीकडच्या अर्धवर्तुळात अधिक धोका असतो, दक्षिण गोलार्धात डावीकडचे अर्धवर्तुळ अधिक धोक्याचे असते.
उष्ण कटिबंधीय चक्री वादळांचा केंद्रीय विभाग १० ते ३० किमी. व्यासाचा असतो. त्याला वातचक्राक्ष म्हणतात. ह्या विभागात वारे क्षीण गतीने वाहतात, आकाश बव्हंशी निरभ्र किंवा अल्प प्रमाणात अभ्राच्छादित असते. पाऊस बहुधा नसतोच. तथापि ह्या भागात ३ ते ९ मी. उंचीपर्यंत पाणी साचले जाते आणि ते सारखे घुसळून निघत असते. ३० किमी. व्यास आणि ८·९ मी. उंची असलेला हा पाण्याचा प्रचंड स्तंभ वादळाबरोबर प्रवास करीत असतो. जेव्हा हे चक्री वादळ किनाऱ्यावर येऊन थडकते तेव्हा ते सर्व पाणी किनाऱ्यालगतच्या सखल प्रदेशात इतस्ततः पसरते. ह्याला वादळी भरतीची लाट असे म्हणतात. त्यामुळे किनाऱ्यावरील प्रदेश निमिषार्धात जलमय होतात. महापूर आल्यासारखी परिस्थिती होते. फार मोठ्या प्रमाणावर वित्तहानी आणि प्राणहानी होते. ७५% मनुष्यहानी ह्या प्रकारच्या भरतीच्या लाटेमुळे होते. उष्ण कटिबंधीय चक्री वादळे अटालांटिक महासागरात हरिकेन व पॅसिफिक महासागरात टायफून या नावाने ओळखली जातात. अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात त्यांना उग्र चक्री वादळ अशा साध्या नावानेच निर्देशिले जाते. सागरी वाहतुकीला आपत्तिजनक असलेल्या ह्या आविष्काराचे केंद्रस्थान, चलनवेग आणि तीव्रता निश्चित करून बंदरांना व समुद्रावर भ्रमण करणाऱ्या जहाजांना योग्य त्या धोक्याच्या सूचना देणे हे नाविक वातावरणविज्ञाचे मुख्य कर्तव्य असते. कोणत्याही राष्ट्राचा आर्थिक विकास त्या राष्ट्राच्या नौकानयन पद्धतीच्या सुरक्षिततेवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतो. त्यामुळे अशा उग्र चक्री वादळांच्या बाबतीत सर्व दृष्टिकोनातून संशोधन करून त्यांचे स्वरूप संपूर्णपणे ज्ञात करून घेणे अगत्याचे ठरते.
दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात अनेक विध्वंसक चक्री वादळांच्या संरचनेवर खूपच महत्त्वाचे संशोधन झाले आहे. त्यात टायरॉस, कॉस्मॉस, मोलनिया, एसा, निंबस, आयटॉस यांसारख्या कृत्रिम उपग्रहांनी बजावलेली कामगिरी अमोल आहे. त्यांनी पाठविलेल्या छायाचित्रांवर चक्री वादळांशी निगडित असलेले ढगांचे प्रकार, त्यांची उंची व मांडणी, वेगवान वाऱ्यांचे क्षेत्र व त्यांचा महत्तम वेग, चक्री वादळांची चलनदिशा इत्यादींबद्दल अनुमाने बांधता येतात. शास्त्रीय उपकरणांनी सुसज्ज अशा अनेक विमानांनी चक्री वादळांच्या विविध भागांत शिरून त्यांची आंतररचना व बाह्य परिसराच्या बाबतीत पाहणी केली तेव्हा केंद्रीय शांत विभागाभोंवती दुर्गम ढगांचे भिंतीसारखे एक वाटोळे कडे निर्माण होऊन ह्याच क्षेत्रात चक्री वादळांचे खरे रौद्र स्वरूप प्रत्ययास येते असे दिसून आले. अमेरिकेत ‘प्रोजेक्ट स्टॉर्म फ्युरी’या योजनेखाली वातचक्राक्षाभोवतालच्या ढगांच्या दुर्गम भिंतीत सिल्व्हर किंवा पोटॅश आयोडाइडाचे कण विखरून (म्हणजे मेघबीजन करून) वादळी वाऱ्यांचा जोर कमी करण्याचा प्रयोग करण्यात आला. एका प्रयोगात डेब्बी नावाच्या चक्री वादळाच्या केंद्रीय गाभ्याच्या प्रदेशात शिरून ९ विमानांनी पोटॅश आयोडाईडाचे कण विखुरले. त्यामुळे वाऱ्यांचा वेग ताशी १९० किमी. वरून १३१ किमी. वर आला असा दावाही केला गेला तथापि अशा प्रयोगांचे मूल्यमापन अजून व्हायचे आहे. मेघबीजन केल्यामुळे ढगांची भिंत उघडू लागते व तिच्यात खिंडारे पडून ती विरू लागते हे स्पष्टपणे अनुभवास आले असले, तरी वादळांच्या तीव्रतेवर तिचे नक्की काय व कसे परिणाम होतात याबद्दल विश्वासार्ह निष्कर्ष वातावरणविज्ञांना अजून काढता आलेले नाहीत [⟶ टायफून हरिकेन].
चक्री वादळांची पूर्वसूचना देण्यासाठी भारतीय वातावरणवैज्ञानिक खात्याने मुंबई, कलकत्ता आणि मद्रास येथे खास केंद्रे स्थापिली आहेत. ती अहोरात्र भारतावरील आणि निकटवर्ती समुद्रांवरील हवामान परिस्थितीवर लक्ष ठेवतात. समुद्रावर वादळ निर्माण होताच भारतीय आकाशवाणी, वृत्तपत्रे, पोलिस-रेडिओ, तारायंत्रे, बंदरावर स्थापन केलेली रेडिओ-यंत्रणा इत्यादीकांकरवी वेळोवेळी धोक्याच्या सूचना प्रसृत केल्या जातात आणि लोकांना, जहाजांना आणि विमानांना वादळांचे केंद्र व गमनमार्ग यांविषयी माहिती पुरवून सावध केले जाते. बंदरावर धोकासूचक बावटे किंवा विशिष्ट प्रकारची सांकेतिक चिन्हे उभारली जातात. कालवे, रेल्वे, तारायंत्र इ. सार्वजनिक उपयुक्ततेच्या दृष्टीने महत्त्वाच्या विभागांच्या अनेक कार्यालयांना योग्य दक्षता घेण्याबद्दल तातडीचे संदेश पाठविले जातात. साधारणपणे जेथे चक्री वादळे जास्त प्रमाणात येऊन थडकतात, अशा किनारपट्टीवरील महत्त्वाच्या ठिकाणी १० सेमी. तरंगलांबींच्या वादळसूचक रडार यंत्रणांची स्थापना केल्यास वादळांची पूर्वसूचना अचूकपणे देणे शक्य होते. मुंबई, गोवा, कारिकल (नागापट्टणम्च्या उत्तरेस सु. ५० किमी. अंतरावर), मद्रास, मच्छलिपट्टम्, विशाखापटनम्, परादीप (ओरिसाचा किनारा) व कलकत्ता अशा आठ ठिकाणी ४०० किमी. दूर असलेल्या चक्री वादळांचा वेध घेता येईल अशी रडार यंत्रणा स्थापण्याचे भारत सरकारने ठरविले आहे. त्यांपैकी विशाखापट्टनम्, परादीप, कलकत्ता व मद्रास येथे अशा यंत्रणा कार्यान्वितही झालेल्या आहेत. सागरतरंगमापक यंत्रे आणि समुद्रपातळीमापक यंत्रे किनाऱ्यावर बऱ्याच ठिकाणी बसविलेली आहेत. वादळी लाटेच्या उंचीचा अंदाज वर्तविण्यास त्यांनी केलेल्या नोंदीचा अभ्यास उपयुक्त होतो.
समुद्रावरील हवामानाची निरीक्षणे : हवामानाच्या अंदाजांच्या अचूकतेसाठी अनेकविध निरीक्षणे आवश्यक असतात. भूपृष्ठावर अनेक ठिकाणी वातावरणवैज्ञानिक वेधशाळा स्थापून निरीक्षण केंद्रांची संख्या वाढविणे सहज शक्य असते. महासागरी पृष्ठावर ही सुविधा नसते. जहाजांवर व विमानांवर जरी वातावरणीय निरीक्षणाची यंत्रेउपकरणे बसविली आणि त्यांनी ठराविक वेळी निरीक्षणे केली, तरी ती प्रचलित सागरी व हवाई वाहतुकीच्या भागापुरतीच मर्यादित व तुरळक स्वरूपाची राहणार आणि जलपृष्ठाचा विस्तीर्ण भाग निरीक्षणांशिवाय राहणार, हे उघड आहे. भूमध्यसमुद्रासारख्या चोहोबाजूंनी जमिनीने वेष्टिलेल्या जलाशयाच्या बाबतींत सुद्धा वस्तुस्थिती वेगळी नाही. कृत्रिम वातावरणवैज्ञानिक (वातावरणाचे वेध घेणाऱ्या) उपग्रहांनी समुद्रांवरील निरीक्षणांची ही उणीव अंशतः दूर केली आहे. त्यामुळे पृथ्वीवरील समुद्रांचे आणि महासागरांचे व्यापक दृष्टीने अवलोकन करण्याचे हे एकमेव तंत्र वातावरणविज्ञाला उपलब्ध झाले आहे. कृत्रिम उपग्रहांत प्रत्यही नवनवीन सुधारणा होत आहेत. अवरक्त (वर्णपटातील तांबड्या रंगाच्या अलीकडील अदृश्य) व सूक्ष्मतरंग (अतिशय कमी तरंगलांबी असलेल्या) प्रारणांचे मापन करणारी संवेदनशील साधने त्यांत बसविलेली असल्यामुळे सागरपृष्ठ व वातावरण यांमध्ये होणाऱ्या ऊर्जाविनिमयाबद्दलच्या ज्ञानात भर पडून अनेक वातारावरणीय आविष्कारांच्या निर्मितीची कारणपरंपरा कळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खूप खोलवर नांगर टाकण्याची व समुद्रांवर ठिकठिकाणी बोयरे (तरंगणारी मार्गदर्शक वस्तू) दीर्घकालपर्यंत तरंगत ठेवण्याची तंत्रे आता चांगलीच अवगत झाली आहेत. अशा बोयऱ्यांवर अणुकेंद्रीय ऊर्जेवर चालणारी वातावरणीय निरीक्षणाची अतिसंवेदनशील स्वयंचलित व स्वयंप्रेषक उपकरणे ठेवली, तर सागरी परिसरातील वेधशाळांची संख्या वाढविता येणे शक्य आहे. अमेरिकेच्या नाविक दलाने ‘नोमॅड ’ (नेव्ही ओशनोग्रॅफिक मिटिऑरॉलॉजिकल ऑटोमॅटिक डिव्हाइस) सारखा बोयरा तयार केला आहे. असे बोयरे ३,६०० मी. किंवा त्यापेक्षाही अधिक खोल असलेल्या समुद्रात नांगरून ठेवता येतात.⟶ जागतिक हवामान निरीक्षण योजनेच्या आदेशानुसार विस्तृत प्रमाणावर समुद्रपृष्ठांवर अशा वेधशाळा स्थापण्याचे कार्य चालू आहे. १९६४ च्या जानेवारी महिन्यात मेक्सिकोच्या आखातात स्थापिलेल्या अणुकेंद्रीय ऊर्जेवर चालणाऱ्या स्वयंचलित नोमॅड वेधशाळेकडून अजूनही वातावरणीय निरीक्षणे नियमितपणे व अचूकपणे उपलब्ध होत आहेत.
अद्ययावत नोमॅड उपकरण प्रणालीत खूपच प्रगती आणि सुधारणा केल्या गेल्या असल्या, तरी तत्पूर्वीच्या प्रायोगिक नोमॅडकडून अत्यंत प्रशंसनीय कामगिरी पार पाडली आहे. १९६० मध्ये अशाच एका नोमॅडने ईथेल नावाच्या उग्र चक्री वादळाला यशस्वी तोंड दिले आणि वादळी भरतीच्या लाटांच्या व द्रुतवेगी वाऱ्यांच्या तडाख्यात सापडून सुद्धा अत्यंत महत्त्वाची निरीक्षण-सामग्री वातावरणविज्ञांना पुरविली. मानवविरहित सागरी वेधशाळांकडूंन चक्री वादळांविषयक निरीक्षणे मिळविण्याचा वातावरणविज्ञानाच्या इतिहासातील हा पहिलाच प्रसंग होता. ह्याच नोमॅडने १९६१ मध्ये कार्ला नावाच्या अतिविध्वंसक उग्रतम चक्री वादळाचा केंद्रीय भाग डोक्यावरून जात असताना प्रत्येक तासाला समुद्रपृष्ठाचे तापमान व समुद्रपृष्ठावरील हवामान यांसंबंधी अत्यंत महत्त्वाची निरीक्षणे प्रेषित केली. विसाव्या शतकात टेक्सस राज्याच्या किनारपट्टीवर थडकणाऱ्या वादळांत कार्ला हे चक्री वादळ उग्रतम समजले जाते. अशा परिस्थितीत नोमॅडसारख्या तरंगत्या स्वयंचलित वेधशाळांची उपयुक्तता निश्चितपणे अमोल आहे. नोमॅडसारखी निरीक्षण केंद्रे ६० वॉट शक्ती देणाऱ्या अणुकेंद्रीय विद्युत् घटावर चालू शकतात. त्यांची दर दोन वर्षांनी तपासणी करून ती कार्यक्षम ठेवल्यास दहा वर्षांपर्यंत उत्तम रीतीने काम करू शकतात.
वातावरणवैज्ञानिक व सागरवैज्ञानिक मोहिमा : विस्तृत सागरी क्षेत्रात प्रतीत होणाऱ्या वातावरणवैज्ञानिक, सागरवैज्ञानिक आणि इतर पर्यावरणी लक्षणांबद्दलची माहिती मिळविण्यासाठी आंतरराष्ट्रीय संघटनांच्या विद्यमाने शास्त्रीय मोहिमा काढणे हाच एक अत्यंत प्रभावी उपाय व मार्ग आहे. १९६१–६५ या काळात आंतरराष्ट्रीय हिंदी महासागर मोहिम (आय. आय. ओ. ई. – इंटरनॅशनल इंडियन ओशन एक्सपिडिशन) आयोजित केली गेली. २० देशांनी तीत भाग घेतला होता. ह्या शास्त्रीय मोहिमेत संशोधनात्मक उपकरणांनी सुसज्ज अशी ४० जहाजे, ५ विमाने व काही कृत्रिम उपग्रह उपयोगात आणले गेले आणि त्यांच्या साह्याने हिंदी महासागराच्या ७२,५०,००० चौ. किमी. एवढ्या क्षेत्राचे समन्वेषण केले गेले. त्यामुळे एका महत्त्वाच्या विस्तृत सागरी परिसराच्या गुणधर्मांचे ज्ञान उपलब्ध झाले. यानंतर १९७३ मध्ये रशिया आणि भारत यांच्या सहकार्याने भारतीय नैऋत्य मॉन्सूनवर संशोधन केले गेले व त्यामुळे नैर्ऋत्य मॉन्सून वाऱ्यांच्या उगमस्थानासंबंधी महत्त्वाचे निष्कर्ष काढता आले.
पहा : उपग्रह, कृत्रिम महासागरविज्ञान मॉन्सून वारे.
संदर्भ : 1. Bolin, B., Ed. Atmosphere and the Sea in Motion, New York, 1959.
2. Donn, W. L. Meteorology with Marine Applications, New York, 1959.
चोरघडे, शं. ल.
“