नारायण पिळ्‌ळा, पी. के. : (१८७८–१९३८). आधुनिक मलयाळम् साहित्यसमीक्षक व निबंधकार. त्यांनी थोडीफार काव्यरचनाही केली (श्रीमूलमुक्तावलि, १९१८) तथापि एक साक्षेपी साहीत्यसमीक्षक म्हणूनच मलयाळम् साहित्यात ते प्रसिद्ध आहेत.

विसाव्या शतकाच्या सुरुवातीस मलयाळम् साहित्यसमीक्षेत मोठे परिवर्तन घडून आले. ए. आर्. राजराज वर्मा व पी. के. नारायण पिळ्ळा यांच्याकडे ह्या परिवर्तनाचे श्रेय जाते. हे दोघेही आधुनिक विद्याविभूषित व संस्कृतचे पंडित होते. राजराज वर्मा हे पी. के. नारायण पिळ्ळांचे गुरू होते तथापि आपल्या शिष्याचा ज्ञानक्षेत्रातील अधिकारही ते मानत. त्यांनी आपल्या केरळ पाणिनीयम् ह्या व्याकरणविषयक ग्रंथास पी. के. नारायण पिळ्ळांची अभ्यासपूर्ण इंग्रजी प्रस्तावना घेतली आहे. ह्या गुरुशिष्यांनी मलयाळम् साहित्यसमीक्षेत नवे प्रवाह आणून तीत मोठेच परिवर्तन घडवून आणले.

पी. के. नारायण पिळ्ळांनी मलयाळम्‌मधील अभिजात साहित्यकृतींची समीक्षा वस्तुनिष्ठ भूमिकेतून, सूक्ष्म विश्लेषणाद्वारे पण त्याच वेळी विदग्ध रसिकतेने केली. चेरुश्शेरीची कृष्णगाथा, एळुत्तच्छनचे ग्रंथ, कुंचन नंप्यारचे तुळ्ळल, उण्णायी वारियरचे ग्रंथ इ. महत्त्वाच्या साहित्याचा सर्वांगीण आणि सखोल अभ्यास करून त्यांचे वाङ्‌मयीन सौंदर्य चिकित्सकपणे उघड करून दाखविले. रसास्वादाच्या अंगाने त्यांची समीक्षा जात असल्यामुळे तिला सर्जनशील साहित्याचा दर्जाही प्राप्त झाला. चिल कविता प्रतिध्वनिकळ (१९२४), तुंचत्तेळुत्तच्छन् इ. त्यांचे उल्लेखनीय समीक्षाग्रंथ होत.

त्यांनी इंग्रजीतील ‘पर्सनल एसे’च्या धर्तीवर काही लघुनिबंधही लिहिले आहेत. व्ही. के. नायनार व सी. अच्युत मेनन यांनी प्रवर्तित केलेल्या या साहित्यप्रकारात पी. के. नारायण पिळ्ळांचे लघुनिबंधलेखनही आपले वेगळेपण दर्शवते. प्रसंगतरंगिणि (३ खंड–१९२७, ४९, ५०), प्रबंध कल्पलता (१९३५), विज्ञान रंजिनि (१९४६) यांसारखे त्यांचे लघुनिबंधसंग्रह उल्लेखनीय आहेत.

स्मरणमंडलम् (१९३८) हा त्यांच्या आयुष्यातील काही आठवणींचा संग्रह असून त्यांची शैली प्रसन्न व वेधक आहे. याशिवाय त्यांनी प्रयोगदीपिका (दुसरी आवृ. १९३८) हा भाषाविषयक ग्रंथ क्षेत्रप्रवेशना वादम् (१९२७) हा सामाजिक स्वरूपाचा ग्रंथ शेक्सपिअरच्या अ मिडसमर नाइट्स ड्रीमचे विचित्र विपिनम् (१९३८) हे मलयाळम् रूपांतर निरणम् शंकर पणिक्कर (१५ वे शतक) यांच्या काव्याचे भारतमाला (१९५०) नावाने संपादन तसेच एन्. रामन् पिळ्ळा यांच्यासमवेत महत्त्वाच्या उपनिषदांचे व त्यांवरील शांकरभाष्यांचे मलयाळम्‌मध्ये ब्रह्मविद्या अथवा उपनिषत्तुकळ (१९५०) नावाने सटीप भाषांतर केले आहे. त्यांचे चरित्र पी. के. परमेश्वरन् नायर यांनी साहित्य पंचाननन् नावाने प्रसिद्ध केले आहे.

नायर, एस्. के. (इं.) कर्णे, निशा (म.)